फोडणीचा भात....

 


फोडणीचा भात....


जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे....

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे भावगीत,  मला दिवाळी संपल्यावर पहिल्या दिवशी आवर्जून आठवलं.  चार दिवसांची दिवाळी उत्साहात पार पडली.  भाऊबीजेला तर खूप धम्माल.  सगळं कुटुंब एकत्र आलं होतं.  त्यांच्या स्वागतासाठी पहाटे पाचपासून कामाला लागले होते.  रात्री अकरा वाजेपर्यंत हा उत्साह कायम होता.  सर्व पाहुणे गेल्यावर घराची आवराआवर.  दिवाळी संपल्याची जाणीव आणि सगळ्या वस्तू पुन्हा जागेवर ठेवण्याचे महत्त्वाचे काम.  दिवळीची सुरुवात जशी जोशात होते.  पण ही दिवळी संपली की मलूल मनानं त्या सर्व वस्तू, जागेवर ठेवल्या जातात.  रात्री घर आवरतांना माझं मनही तसंच मलूल होतं.  भाऊबीजेच्या दुस-या दिवशी नवरा ऑफीसला गेल्यावर घरातला मोठा कोपरा उघडला.  त्या कोप-यात भाऊबीजेच्या दिवशी हाती आलेले सर्व पदार्थ डम्प केले होते.  मिठाईचे डबे,  खाऊ, सरबताच्या बाटल्या असं कितीतरी त्याच्यात अक्षरशः कोंबून ठेवलं होतं.  सर्व घर आवरलं आता फक्त हा थंडगार कोपरा, म्हणजे फ्रिजच आवरायचा बाकी राहीला होता.  त्यातले सर्व डबे जागच्या जागी ठेवतांना एक मोठा डबा हाताला लागला.  आदल्या दिवशी बाकी राहिलेला भात त्या डब्यात भरुन ठेवला होता.  दिवसभराच्या गडबडीत तो तसाच राहिला.  पण आता नेमक्यावेळी हाती आला.  दिवाळीचे चार दिवस नाही म्हटलं तरी पिट्या पडणे, या वाक्यप्रयोगाचा अनुभव येतो.  त्यातही गोडाचा मारा.  अशावेळी एखादा झटपट होणारा आणि चटपटीत चव असणारा पदार्थ जिभेला हवा असतो.  फ्रिज आवरतांना हाती लागलेला तो भाताचा डबा बघून अशा एकाच पदार्थाचं नाव तोंडात आलं, ते म्हणजे, फोडणीचा भात....


फोडणीचा भात हा तमाम घरातील आवडीचा पदार्थ.  घरातील गृहिणींचा तर अधिक आवडीचा.  कारण फोडणीचा भात करतांना फारशी झंझट नसतेच.  या भाताबरोबर प्रत्येकीची एक नवी रेसिपी असते.  बहुतांशी घरात आदल्या रात्री राहिलेला भात दुस-या दिवशीच्या नाष्ट्यामध्ये तेलावर परतून दिला जातो.  सकाळी घाई गडबडीच्या वेळी होणारी फोडणी भाताची फोडणी, सगळ्या घराची भूक वाढवते.  अगदी एखाद दोन लसूणीच्या पाकळ्या ढेचून त्या तेलावर लालेलाल करायच्या.  त्यात हवा तेवढा कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता टाकायचा.  त्यावर जिरं, राई, हिंग, हळद यांचा मारा.  मग हिरवी मिरचीची गोडी ज्यांना आहे, त्यांनी हिरवी मिरची, किंवा मसाल्याच्या लाल रंगात रंगलेल्यांनी लाल मसाला टाकायचा.  बरं हे सर्व करतांना क्रम कुठला असावा,  हा प्रश्नच कधी मनात आणायचा नाही.  कारण, कशावरही काही टाकलं, तरी या फोडणीच्या भाताची फोडणी वाया जात नाही, हीच तर त्याची खासियत आहे.

माझ्या हातात भाताचा डबा आल्यावर मी सुद्धा असाच चटकदार फोडणीचा भात करायला सुरुवात केली.  मुळात दिवाळीचा सगळा थकवा जाण्यासाठी किचनपासून एक दिवस सुट्टी घेण्याचा विचार होता.  पण फोडणीच्या भाताचा विचार मनात आला, आणि ती सुट्टी रद्द केली.  फोडणीच्या भाताची पुढची आवृत्ती म्हणजे, मसाले भात.  मी या दोघांमध्ये ताळमेळ  ठेवत भात


बनवायला सुरुवात केली.  फ्रिजची साफसफाई झालीच होती.  त्यात  थोड्या थोड्या भाज्यांच्या पिशव्या हाती लागल्या.  यांचे काय करावे हा प्रश्न हा भाताच्या रेसिपीनं सुटला.  त्या मुळ्याच्या चट्ट्यासाठी भिजवलेली चणा डाळ होती,  ओले शेंगदाणे हाती आले.  तुरीच्या दाण्याची बरणी खाली व्हायला फक्त दोन चमचाभर तुरीचे दाणे बाकी राहिले होते.  त्यातही एक वांग, टोमॅटो, आणि अर्धी कापलेली सिमला मिरची हाती आली.  बरं सर्व थोड्या राहिलेल्या भाज्या कशाला घ्याव्यात, हा विचार करत मटारचा डबाही फ्रीजमधून काढला,  त्यातले मुठभर मटार एका वाटीत घेतले आणि थोडासा फ्लॉवर आणि छोटा गाजरही त्यात घेतला.  एवढ्यानं ओट्यावर जाम गर्दी झालेली.   त्यात काही कमी नको, म्हणून मिरची, आलं, लसूण आणि कडीपत्ता यांची भर घातली.  अगदी साधी रेसिपी म्हणता म्हणता, चांगलंच भारी प्रकरण होणार होतं.  दिवळी संपली असली तरी दिवाळीचे रंग मात्र अजून कायम होते.  म्हणून तेलाचा थोडा अधिक मारा करत फोडणी घातली.  त्यात फक्त एक मिरची, ठेचलेलं आलं आणि लसूण, वरून चांगली मुठभर कडीपत्त्याची पानं टाकून फोडणी परतली.  मग त्यावर भिजलेली चणा डाळ, शेंगदाणे, तूरदाणे, मटार, वांगे, सिमला मिर्ची, गाजर आणि फ्लॉवर टाकला.   तेलावर या सगळ्या भाज्या चांगल्या परतल्या.  अगदी दोन मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवले.  मग त्यात मिठ टाकले, आणि पुन्हा चांगले परतून घेतले आणि दोन मिनिटासाठी पुन्हा भाज्या त्या झाकणाखाली लपवल्या.  आता मसाल्याची वेळ.  आधीच हिरवी मिरची टाकली आहे, याची आठवण काढत, अगदी रंग येण्यासाठी लाल मसाला टाकला,  त्यात अर्धा चमचा हळद.  मग पुन्हा परता परत.  आणि झाकणाखाली लवलेल्या भाज्या.  एव्हाना भाज्यांनी त्यांचा ताठरपणा सोडलेला होता.  त्या नरम आणि मसालेदार झालेल्या भाज्यांमध्ये तो पांढराशुभ्र भात टाकला.  भात चांगला परतून घेतल्यावर एक हक्काचा मसाला त्यात टाकला.  घरी केलेला मसाले भाताचा मसाला.  तो टाकल्यावर पुन्हा भात चांगला परतून घेतला.   भात तयार झाला.  गॅस बंद करुन भातावर झाकण ठेवलं.  


एव्हाना घड्याळात रात्रीचे आठ वाजले.  कधी नव्हे ते नवराही लवकर घरी आला.  घरभर त्या भाताचा सुगंध दरवळत होता.   त्याला फोडणीच्या भाताचा बेत सांगितला.  तोही खूष.  फक्त त्याची एक फरमाइश आली.  त्या भातावर फक्त ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू आणि चमचाभर तूप टाक अशी मागणी आली.  अर्थात मी त्याची तयारी केलीच होती.  नवरा ताटावर बसेपर्यंत मी ताटात वाढलेल्या त्या फोडणीच्या भातावर पांढ-या शुभ्र खोब-याचे आवरण घातलं होतं.  वर हिरव्या कोथिंबीरीचा पेरा होता.   या हिरव्या रंगावर लाल रंग शोभून दिसेल, हा विचार करत, अगदी चमचाभर डाळींबाचे दाणे पेरले.  मग त्यावर लिंबाची फोड ठेऊन दिली.  ताटाच्या बाजुलाच घरी कढवलेलं दाणेदार तूप...अशावेळी लोणचं, पापड या जोडदारांची कधी गरज भासत नाही.  शिळ्या भाताला फोडणी असली तरी ती भन्नाट जमल्याची जाणीव होत होती.  कारण त्या भाताच्या वासानं अधिक भूक लागली.  चार दिवस जो गोडाचा मारा झाला होता,  त्यावरचा हा चांगला उतारा होता.  मसाले भात किंवा फोडणीचा भात हे दोन्हीही प्रकार असेच परिपूर्ण आहेत.  आणि गरजेला त्या गृहिणाली मदत करणारे आहेत.  मलाही त्याची पुन्हा जाणीव भाताचा प्रत्येक घास घेतांना होत होती.  मनात ते गाणं पुन्हा गुंजी घालत होतं,  जगी ज्यास कोणी नाही...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. khup chhan lekh

    ReplyDelete
  2. आदरणीय सई जी साष्टांग नमस्कार आपला ब्लॉग अतिशय सुंदर लिहिलेला आहे मोठमोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट नावाजलेले यांचीही मेनू कार्ड आणि त्यातल्या काही माहिती मिळालेल्या रेसिपीज यांचे इतके सुंदर वर्णन नसते इतके सुंदर वर्णन आपण केलेले आहेत

    ReplyDelete
  3. छान रेसिपी. पौष्टिक पण

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू18 November 2023 at 19:22

    फोडणी भातावर माझ्या वाचनात आलेला हा पहिलाच ब्लॉग असेल.फोडणी भात ज्याला आवडत नाही असा मराठी माणूस नसेल.खूप छान...

    ReplyDelete

Post a Comment