बस्स, आज उपवास आहे

 

बस्स, आज उपवास आहे


उपवास,  एवढं म्हटलं तरी मला भूक लागते.  त्याला कारण म्हणजे,  उपवासाची साबुदाण्याची खिचडी आणि माझा छत्तीसचा आकडा.  साबुदाण्याची खिचडी खाल्ली की हमखास डोकं दुखणार.  पण पळून पळणार तरी किती.  उपवास म्हणून नाही, पण त्या साबुदाण्याची भीती घालवण्यासाठी मी काही प्रयोग सुरु केले.  त्यातलाच एक सफल झालेला प्रयोग आज सर्वांबरोबर शेअर करणार आहे.  हा प्रयोग म्हणजे, उपवासाची इडली.  साबुदाणा आणि वरीच्या तांदूळाची इडली आणि त्याच्या सोबतची मस्त चटणी.  माझ्याच वळणावर गेलेला माझा लेक साबुदाणा, वरी आणि खजूर यापासून चार हात दूर रहाणारा.  मग या सर्वांचा मेळ घालत हा इडली-चटणीचा नवा मेनू केला.  विशेष म्हणजे, या चटणीत खजूर आहे, याचा सुगावाही लेकाला कधीही लागलेला नाही.


साधारण दोन वर्षापूर्वी एक वेगळ्याप्रकारचे वरीचे तांदूळ आमच्याकडे आले.  या वरीच्या तांदळावरचे आवरण काढण्यात आलेले नव्हते.  डायट फूडमध्ये त्यांचा समावेश होतो. ही वरी घरी आल्यावर  माझे त्यावर प्रयोग सुरु झाले.  अगदी मसाले भातापासून केकपर्यंत सगळे पदार्थ करुन झाले.  सर्व पदार्थ चांगलेच झाले, पण त्यातही इडली जास्तच आवडली.  दोन वाट्या वरीच्या तांदुळांसोबत एक वाटी साबुदाणा भिजत घातला.  साधारण चार तासांनी हे सर्व एकत्रितरित्या वाटले,  अगदी अर्धातासभरानं याच्या इडल्या करायला घेतल्या.  इडल्या झाल्या छान.  फक्त साबुदाणा असल्यामुळे पहिल्यांदा थोड्या चिकट झाल्यासारख्या वाटल्या.  मग नंतर इडलीचे पात्र पूर्णपणे थंड होईपर्यंत त्या इडल्या तशाच ठेवल्या.  थोड्या थंड झाल्यावर  त्यातला तो साबुदाण्याचा चिकटपणा कमी झाला आणि इडल्या सहज निघाल्या.  उपवासाची उडली सहज जमली पण त्याच्यासोबत चटणी असल्याशिवाय मजा नाही.  आणि उपवासाची चटणी म्हटलं की भरपूर खोबरं आणि शेंगदाणा कुट याला पर्याय नाही.  पण या दोन गोष्टींचा अगदी नावाला वापर करत एक मजेदार चटणी माझ्या प्रयोगातून तयार झाली.

बदाम, काजू आणि अक्रोड यांची मिक्सरमध्ये पावडर करायची.  मग त्यात ओलं खोबरं, थोडे भाजलेले शेंगदाणे, खजूर आणि अंजिर टाकून परत बारीक करायचे.  हे सर्व छान बारीक झाले की यात भाजलेलं थोडंस जिरं आणि लाल मिरची टाकायची.  पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्यायचा.  इथपर्यंत येईपर्यंत एक चटणीचा गोळा झालेला असतो.  चटणी म्हणजे आंबट, गोड, तिखट चव हवी.  याचवेळी या चटणीमध्ये अननसाचे तुकडे किंवा डाळींबाचे दाणे टाकून


पुन्हा मिक्सर फिरवून घेणे.  या सर्व गोष्टी या प्रत्येकाच्या आवडीवर आहेत.  ड्रायफ्रूटचे प्रमाणही आवडीप्रमाणे करता येते.  मी मात्र प्रत्येकी चार असे प्रमाण घेते.  त्यात चमचाभर खोबरं आणि तेवढेच शेंगदाणे.  फक्त खजूर मात्र काजू, बदामच्या डबल घेते.  त्यामुळे चटणी छान मिळून येते.  अननस किंवा डाळीबांचे दाणे टाकले की चटणीला आंबट चव येते.  चटणी जेवढी पातळ हवी तेवढे अननसाचे तुकडे वाढवता येतात.  चटणी पातळ करण्यासाठी पाण्याचा वापर मात्र करायचा नाही.  तसं केलं तर चवीत खूप फरक पडतो.  त्यातही एक ट्विस्ट करता येतो.  जर अननसाचे तुकडे टाकून चटणी तयार केली असेल तर त्यात नुसते डाळींबाचे दाणे टाकले तरी चालतात.  हे सर्व झाल्यावर चवीनुसार काळं मिठ टाकलं की चटणी तयार.  यात मी क्वचित साखर टाकते.  कारण यात असलेला खजूर आणि अंजीर हे गोडाचे प्रमाण बॅलेन्स करतात.  ड्रायफ्रूट असल्यामुळे ही चटणी थोडी जास्त कॅलरिजची होते, अशी तक्रार माझ्या नव-यानं केली होती.  तेव्हापासून मी त्यात थोडं तिखटाचं प्रमाण वाढवलं आणि वरुन आमचूर पावडर आणि सुंठ पावडर घातली.  मग नेहमीप्रमाणे इडली चटणी न देता, इडलीला मेओनिजप्रमाणे चटणी लावली आणि तशा इडल्या द्यायला सुरुवात केली.  यामुळे चटणी अगदी कमी नाही आणि जास्तही जात नाही. 

बरं या सर्वात मला एक अजून पदार्थही सापडला.  तो म्हणजे, चटणी आईस्क्रीमचा.  अशीच ही उपवास चटणी जास्त झाली होती, म्हणून तिला डिपफ्रिजमध्ये ठेवलं, तर त्याचा बर्फाचा गोळा झालेला.  हा बर्फाचा गोळा थोडा वितळल्यासारखा झाल्यावर मिक्सरमधून फिरवला आणि पुन्हा डिपफ्रिजमध्ये ठेवला.  अगदी तासाभरात त्याचं छानसं आईस्क्रीम झालं.  युरेका...नव्या डिशचा शोध लागला.  नव-यानं आणि लेकानं चाटून पुसून खाल्लं, म्हणजे ते भन्नाटच झालं होतं.  मग माझ्या डोक्याला चालना मिळाली.  मध्यंतरी मी त्या व्हेगन कम्युनिटीच्या फूडबद्दल वाचलं होतं.  ही मंडळी दूधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ खात नाहीत.  त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय शोधले आहेत.  जसे, सोयाबिनच्या दुधापासून होणारे पनीर.  तसेच खोब-याचे दूध काढून त्यापासून होणा-या व्हेगन आईस्क्रीमची कृती मी पाहिली होती.  याच व्हेगन आईस्क्रीमची कृती आणि ही उपवासाची चटणी या दोघांचे ऑपरेशन करत मग मी याच चटणीच्या जिन्नसामध्ये थोडी फार फेरफार करत नवं उपवास आईस्क्रीम तयार केलं.  यात फक्त खोब-याचे प्रमाण जास्त घेतलं.  अगदी शहाळ्याचे खोबरे असले तर अगदीच छान.  या


आईस्क्रीममध्ये जे ड्रायफ्रूट वापरणार आहे, ते आधी अर्धातास भिजवायला सुरुवात केली.  तसे भिजवलेले ड्रायफ्रूट अधिक मऊसूत वाटले जातात.  मग त्यात खोबरं आणि खजूर टाकला.  यात शेंगदाणा वापरला नाही. मीठही नाही.  पण अननसाचे तुकडे जास्त वापरले.  या मध्ये मग डाळींबाचे दाणे टाकले.  अर्थात घरात जेवढी फळं आहेत, ती आवडीप्रमाणे यात टाकली तर चालतात.  मी बहुताशी यात किवी, स्ट्रॉबेरी यांचे तुकडे टाकते.  माझ्या एका मैत्रिणीनं या आईस्क्रीमला मॅंगो फ्लेवर दिला आहे.  ती या मिश्रणात फक्त आंब्याचा रस टाकते आणि आंब्याचेच बारीक तुकडे करुन टाकते.  हे सुद्धा आईस्क्रीम छान लागते.  अर्थात जो जेवढे प्रयोग करेल तेवढी चव बहरत जाते.  मी नाशिकला तर मिरची असलेले आईस्क्रीमही खाल्ले आहे. 

एकूण काय कुठलाही पदार्थ करतांना आमच्याकडे असंच करतात, हे वाक्य बाजुला ठेऊन कायम त्या चवीवर प्रयोग करणं हे माझं काम आहे.  त्यातूनच मग तो पदार्थ अधिक खुलत जातो.  आज मी जर उपवासाची इडली या ठराविक प्रमाणात केली, तर उदया ती करतांना त्यात अजून एखादा प्रयोग नक्की करेन.  त्यामुळेच जसे नव्या नव्या सॉफ्टवेअरने फोन अपडेट होत जातात, तसेच माझे पदार्थही प्रत्येकवेळा अपडेट होत जातात. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूपच वेगळा प्रयोग,आमच्या घरी करून बघतो अर्थात process हिला दाखवून

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की करा महेशजी, आणि फोटोही शेअर करा...

      Delete
  2. कल्पना खुप छान आहे,मनापासुन आवडली.अभिनंदन🌷🌷

    ReplyDelete
  3. उपासाची इडली नक्की करून बघणार!! तू खरीखुरी सुगरण आहेस.. ललिता छेडा

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की करुन बघा आणि सांगाही...

      Delete
  4. आउटलेट टाकायला हरकत नाही

    ReplyDelete
  5. उपवासाची इडली मी करते .चटणी आईस्क्रीम चा प्रयोग भारी आहे. तसंच उपवासाच्या चटणी मध्ये अननस टाकून नव्हता बघितला. तो टाकून बघेन. तुझा लेख म्हणजे खवय्यांना चालना आणि चॅलेंज देणारा लेख आहे सई

    ReplyDelete
  6. कल्पना कुडे27 February 2024 at 10:20

    भारी प्रयोग केला आहे. उपवासाची चटणी म्हणजे दही आणि दाण्याचे कुट याच्या पुढे आमची गाडी कधी गेली नाही. मस्त करून बघायला हरकत नाही. धन्यवाद सई

    ReplyDelete

Post a Comment