अस्सल मराठमोळी...तर्री

 

अस्सल मराठमोळी...तर्री 





काहीतरी झणझणीत, चमचमीत हवं...असलं काहीही नको.  चार दिवसासाठी पाहुणा म्हणून आलेला माझा लेक आणि मी खरेदीसाठी बाहेर पडलो होतो.  बराचवेळ चाललेल्या खरेदीनंतर भूक लागली.  हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाऊया, म्हणून मी त्याला विचारल्यावर त्याच्याकडून आलेलं हे उत्तर.  थोडी शोधाशोध केल्यावर एक अस्सल मराठी नाव समोर दिसलं.  त्याच्या नावातच अस्सल मराठमोळा साज होता की, लेकानं लगेच होकार दिला.  आम्ही पहिल्यादाच या तर्री नावाच्या हॉटेलमध्ये गेलो.  समोर मेनू आला तो आम्हाला हवा असा, मराठमोळा.  त्या मेनूकार्डवरील मराठमोळ्या पदार्थांची नावं बघून आम्ही त्याच्या प्रेमात पडलो.  कारण हे मेनूकार्डही वाचनीय.  काय घेऊ आणि काय नको अशी आमची अवस्था झाली.  बरीच चर्चा झाली.  शेवटी मिसळ अंगारे, लेकानं तर मी साबुदाणा वड्याची ऑर्डर केली.  दरम्यान तो मेनू कार्ड पुन्हा एकदा वाचून काढला. आँर्डर टेबलावर आल्यावर त्याचं जे सादरीकरण होतं, ते पाहून एकच शब्द निघाला, तो म्हणजे, व्वा.  त्यानंतर आम्ही दोघंही काहीही न बोलता त्या पदार्थांवर अक्षरशः तुटून पडलो.  अप्रतिम चव.  भन्नाट सादरीकरण  आणि तेवढ्याच आपुलकीनं होणारी चौकशी.  पहिल्यांच नजरेतलं प्रेम म्हणजे, हे तर्री ठरलं.  मग ही तर्री
नेमकी कोणाची याची चौकशी केली.  तेव्हा शिल्पा विवेक सातव हे नाव समजलं.  नंतर असंच एकदा मैत्रिणींबरोबर तर्रीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला.  तेव्हा शिल्पाची भेट झाली.  एक सामान्य गृहिणी ते तर्री सारखं मराठमोळं हॉटेल चालवणारी उद्योजिका.  तिचा हा प्रवास प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी असाच आहे. 



शिल्पा विवेक सातव, ही काही वर्षापूर्वी अगदी सर्वसामान्य गृहिणी होती. पार्थ


या मुलाची आई असणारी शिल्पा सुगरण.  टिव्हीवरील सर्व कुकींगचे शो हमखास बघायची.  शिवाय पेपरमध्ये येणा-या पदार्थांच्या कृती वाचून त्याही घरी बनवत असे. त्याचही शिल्पाची हुकमत मिसळवर.  पार्थच्या मित्रमैत्रिणींचा कंपू घरी आल्यावर तिच्या या मिसळीला मागणी असायची.  शिवाय शिल्पाचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही तिच्या या मिसळीचे चाहते होते.  अशा मिसळ पार्टीमधून अनेकांनी शिल्पाला स्वतःचे हॉटेल सुरु कर म्हणून सल्ला दिला होता.  2017 मध्ये शिल्पाचे पती, श्री. विवेक यांची नोकरी गेली.  हा सातव कुटुंबाला मोठा धक्का होता.  आत्तापर्यंत अत्यंत सुरक्षित असं आयुष्य असणा-या शिल्पासाठी हा टर्निंग पॉईंट ठरला.  विवेक सातव यांची नोकरी गेल्यावर साधारण एक वर्ष अन्य नोकरी मिळेल म्हणून या कुटुंबानं प्रतीक्षा केली.  पण त्या दरम्यानच शिल्पाला आपण स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची हिम्मत मिळाली.  त्यातून 1 सप्टेंबर 2018 मध्य तर्री नावाचं आऊटलेट सुरु केलं.  घरी पंचवीस माणसांची मिसळ बनवण्याचं कौशल्य वेगळं आणि हॉटेल सुरु केल्यावर 500 जणांसाठी मिसळ बनवण्याचं कसब वेगळं, याची शिल्पाला कल्पना होती.  मात्र आपल्या व्यवसाय सुरु करतांना तिनं तिच्यासाठी काही नियम आखून घेतले.  त्यात मराठमोळे पदार्थच आपल्या हॉटेलमध्ये असतील,  आपल्याकडे बनवणा-या सर्व पदार्थांमधील मसाले हे घरी केलेल असतील, फारकाय अंबोळी, थालिपीठ यासारख्या पदार्थांचे पिठही घरी बनवायचे, हा नियम तिनं स्वतःला घालून घेतला.  चवीमध्ये कुठलीही तडजोड करायची नाही, हा नियम ठेवल्यामुळे तर्रीमधील पदार्थांची चव सर्वांना भावू लागली.


शिल्पानं हे धाडस केलं, मात्र यासाठी कुठलंही खास प्रशिक्षण घेतलेलं नाही.  कुकींगचा कोर्सही न करता थेट हॉटेल चालू करायचे म्हणजे, भर समुद्रात पोहण्यासारखे होते.  मात्र यामागे शिल्पानं जी मेहनत घेतली त्याला तोड नाही.  आपल्या हॉटेलमध्ये मराठमोळे पदार्थच असावेत, यावर ती ठाम राहिली.  त्यासाठी तिनं विस्मरणात गेलेल्या मराठमोळ्या पदार्थांची माहिती मिळवली.  वेगवेगळ्या भागातील पदार्थांचा अभ्यास केला.  यातूनच तिनं तर्री चे नाव तयार केले.  10 सप्टेंबर 2019 रोजी शिल्पाचे तर्री हे दुसरे हॉटेल डोंबिवली येथील फडके रोडला सुरु झाले.  हा शिल्पाच्या आयुष्यातील प्रगतीचा आणि आनंदाचा टप्पा होता.  मात्र जेवढा आनंद आयुष्यात येतो, तेवढाच तो अधिक आव्हानांना घेऊन येतो.  2020 च्या मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका शिल्पाला चांगलाच बसला.  इथपर्यंत येईपर्यंत शिल्पाचे कुटुंब वाढले होते.  तर्री, शिल्पानं स्वतःचं कुटुंब उभं करण्यासाठी सुरु केलं.  मात्र तिच्या या यशस्वी प्रवासात तिच्या सोबत असलेल्या 20 महिलां


साथीदारांची कुटुंबही तिच्यावर अवलंबून होती.  या सर्व महिला तर्रीमध्ये विविध जबाबदा-या सांभाळत आहेत.  शिल्पानं कधीही त्यांना कामगार म्हणून वागवलं नाही.  आपल्या कुटुंबाचा भाग त्यांना करुन घेतलं.  या सर्वांना करोनाच्या काळात एकटं सोडायला शिल्पा तयार नव्हती.  म्हणून या काळात तिनं मसाले बनवण्यास सुरुवात केली.  हॉटेलसाठी लागणारे मसाले, वेगवेगळ्या प्रकारची पिठं या काळात बनवून तिनं आपल्या साथीदार महिलांचा संसारही उभा केला. 

शिल्पा मेहनती आहे, याच जोरावर तिनं आपल्या तर्रीचा स्वाद सर्वदूर केला आहे.  आपल्या आयुष्यात जी आव्हानं येतात, ती काहीतरी शिकवण्यासाठीच येतात, अशी सकारात्मक भावना ती ठेवते.  कुठलंही चांगलं काम करायला लाजायचं कशाला, हा तिचा प्रश्न.  त्यामुळेच स्वतः हॉटेलची मालकीण असलेली शिल्पा वेळ आल्यास भांडी घासायलाही मागेपुढे पहात नाही.  रोज कितीही घाई असेल, मोठी ऑर्डर असेल तरी तर्रीची सुरुवात अन्नपूर्णेची पुजा करुनच होते.  अन्नपूर्णा देवीच्या मंत्राचा पाठ होतो, आणि मगच तर्रीची सुरुवात होते.  आपल्या सोबत काम करणा-या महिलांना शिल्पा एकच मंत्र देते, येथे येतांना तुमच्या सर्व समस्या बाहेर ठेवा.  निखळ आनंदी मनानं आपले पदार्थ करा, आणि ग्राहकांना द्या.  शिल्पाच्या तर्रीच्या दोन्हीही शाखेत महिला कर्मचारी आहेत, आणि या तिच्या कुटुंबातील सर्व महिलांच्या मतांचा ती आदर करते.  कुणी काही बदल सांगितले, तर ते स्विकारते. 

तर्रीच्या सर्वच पदार्थांची चव अप्रतिम आहे.  काही मंडळी तर फक्त डाळ भात खाण्यासाठी तर्रीमध्ये जातात.  खूप वर्षानंतर अशी आई, आजीच्या हातची चव आम्हाला चाखायला मिळाली, असं कौतुक करुन शिल्पाला शाबासकी देतात.  तर्रीमध्ये शिल्पानं अनेक प्रयोग केले आहेत.  अर्थातच हे सर्व प्रयोग यशस्वी झाले आहेत.  तर्रीमध्ये सर्वात आवडता प्रकार म्हणजे, महाराष्ट्रीयन


थाळी.  येथे तुम्हाला सोमवारी मराठवाड्यातील पदार्थ थाळीमध्ये मिळतील.  मंगळवारी कोकण प्रांत असतो.  तर बुधवारी विदर्भ.  गुरवारी पश्चिम महाराष्ट्र तर शुक्रवारी खान्देशचे पदार्थ थाळीमध्ये असतात.  याशिवाय शनिवार, रविवारी तर्री स्पेशल थाळी मिळते.  या सर्व थाळीमधील पदार्थ हे शिल्पा ऋतुनुसार बदलते.  याशिवाय पोहे, थालिपिठ, आंबोळ्या, शिरा, पुरणपोळी, मोदक, बासुंदी श्रीखंड या आपल्या नेहमीच्या स्वादाची मेजवानीही शिल्पाच्या तर्रीमध्ये मिळते.  फक्त नेहमीचे पदार्थ ही तर्रीची ओळख नाही, तर आपण जे पदार्थ विसरलो आहोत, त्या पदार्थांना शिल्पानं पुन्हा ताटात सजवलं आहे.  यामागे तिनं खूप मेहनत घेतली आहे.  पण जेव्हा तरुण मुलं तर्रीमध्ये येतात, आणि हक्कानं थालिपीठ किंवा धिरडे मागतात, तेव्हा आपली मेहनत सफल झाल्याचा आनंद तिला मिळतो.  या सर्वासह शिल्पानं काही जुन्या नव्या पदार्थांची सांगडही घातली आहे.  पाऊल उंडे, दराव्याचे लाडू, लाटी वडा, आलु बोंडा,  सारखे पारंपारिक पदार्थही तर्रीच्या मेनूमध्ये आहेत.  तर्रीमध्ये गेलेल्या ग्राहकांना हॉटेलमध्ये आल्यापेक्षा घरी आल्याचा अनुभव यावा यासाठी शिल्पाचा प्रयत्न असतो.  त्यामुळेच ज्यांचा वाढदिवस आहे, वा लग्नाचा वाढदिवस आहे, अशांचे ती औक्षण करते.  यातूनच तिनं अगदी थोड्याच काळात आपला ठसा उमटवला आहे. 

एका संकटातून शिल्पापुढे संधी उभी राहिली.  चार मित्रांच्या सहाय्यानं तिनं आपलं विश्व उभं केलं.  तिची ही हिम्मत आणि मेहनत करण्याची वृत्तीच तर्रीच्या यशाचं गमक आहे. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. सई शिल्पावरचा लेख वाचून आनंद झाला.शिल्पा माझीही मैत्रीण आहे तर्रीचा आस्वाद घ्यायला जातील आणि निश्चित खुश होतील..गोड,मृदू स्वभावाने ती आपल्स करते.तू तुझ्या शब्दात अगदी चॅन वर्ण तिच्या तर्री हॉटेलचे व शिल्पाचे केले आहेसतुझा हा लेखवाचून नक्कीच लोक

    ReplyDelete
  2. आदरणीय सईजी सादर प्रणाम..
    त्यांच्या नावालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो.

    ReplyDelete
  3. खूप छान

    ReplyDelete
  4. भेट द्यायला हवी

    ReplyDelete
  5. भेट द्यायला हवी

    ReplyDelete
  6. सई खूप छान आणि सविस्तर लिहिलं आहेस
    अनेकदा तिथून जाते पण आत जाऊन पाहिलं ही नाही पण आता नक्की जाणार

    ReplyDelete
  7. वाचतांनाच खाण्याचा आनंद मिळतो असं सुंदर लिखाण, तर खाद्यपदार्थांची चवच अशी आहे वाटतं, त्यामुळेच लेखकाला देखील लिहीत आहोत की खात आहोत याचे भान हरपलेले दिसते

    ReplyDelete
  8. सई‌ , तर्री जसं आहे तसंच वर्णन केलं आहेस आपण ही तिथं गेलो होतो ना? आमची‌ गुरवारची भेटायची जागा आहे.‌ललिता छेडा

    ReplyDelete
  9. मी पण या कुटुंबाला मागच्या एक वर्षा पासून जानतो . खूप सुंदर कुटुंब आणी त्यांचे आचारण… आता तर्री बदल काय बोलावे … तुम्हीं सर्व काही लिहिले आहेंच.. पण तर्री ची शेव भाजी माझी आवड़ीची.. नक्की एकदा ख़ावून बघा ..तुम्हीं खूप छान ब्लॉग लिहिलाय .. तर्री आणी तुम्हाला पण खूप शुभेच्छा …

    ReplyDelete
  10. आम्ही tarri मध्ये थालीपीठ आणी मिसळ खाल्ली आहे. खूप चविष्ट आणी रुचकर जणू काही आपल्या घरीच खातोय. इथला staff, स्वच्छता, आपुलकीने दिलेली सेवा...सगळे छान. पुन्हा एकदा भेट द्यायला नक्कीच आवडेल...

    ReplyDelete
  11. खूप छान लिहिलंय.वाचून प्रत्यक्ष जाऊन नक्कीच बघायला व खायला आवडेल!

    ReplyDelete
  12. संकटाला न डगमगता त्याला सामोरे जाऊन त्यावर मेहनतीने कशी मात करता येते हे या लेखातून शिकण्यासारखे आहे.नक्कीच या हॉटेल का भेट द्यायला आवडेल कारण मराठमोळी खाद्य संस्कृती येथे जपली आहे हे लक्षात येते...

    ReplyDelete
  13. 🎉 Excellent. Keep it up

    ReplyDelete

Post a Comment