मैत्रीची सुगंधी केशरी कुपी....

 

मैत्रीची सुगंधी केशरी कुपी....


कुठे आहेस, तुझ्या मित्राचा वाढदिवस आहे, पन्नासावा.  तुला यायला हवं.  त्याच्याशिवाय वाढदिवस साजरा होणार नाही.  धाकयुक्त आमंत्रण देणारा फोन थेट दुबईहून आला होता.  फोनवर बोलत होती, ती माझ्या मित्राची, प्रफुल्लची पत्नी धनश्री.  आमचा शालेय मित्र, प्रफुल्ल, नोकरी निमित्त दुबईला रहातो.  कलावती आईंचे भक्त असलेले त्याचे कुटुंब आईंच्या सेवेसाठी बेळगावला स्थायिक झालेले.  धनश्रीनं वाढदिवसाचे आमंत्रण केले, तेव्हा पहिला प्रश्न माझ्या मनात आला, की वाढदिवस नेमका कुठे आहे.  धनश्रीनं लिलया बेळगांवला वाढदिवस असल्याचे सांगितले.  शिवाय बेळगांव काही लांब नाही.  मित्राच्या आनंदासाठी तर नाहीच नाही, अशीही मधाळ गोडीही लावली.  मग काय बेळगांवला जाण्याचा आणि शालेय मित्राच्या वाढदिवसाच्या सोहळ्याचा प्लॅन सुरु झाला.  फोनाफोनी.  खरेदी. शंभर मेसेज.  जाण्यासाठी नेमक्या मार्गाचा शोध.  बुकींग.  आदी सर्व टप्पे पार पाडत अखेर बेळगांवी पोहचलो.  वाढदिवस साजरा झाला.  अगदी पेशवाई थाटात साजरा झाला.  मनाला आनंद देऊन गेला आणि हळवा करुन गेलाय.  आता ब्लॉग लिहितांना या वाढदिवस सोहळ्याला दोन दिवस होऊन गेलेत.  पण तरीही मन तिथेच घुटमळत असल्याची जाणीव आहे, एवढा तो सोहळा मनभावन होता.  याच सोहळ्याची ही सफर. 


मैत्री.  हा शब्दच मनाला आराम देणार आहे.  माझी मैत्रिण.  किंवा माझा मित्र.  अशी ओळख जेव्हा आपण करु देतो, तेव्हा आपले शब्द एका ठसक्यात बाहेर पडतात.  हे नातंच तसं आहे.  त्याला स्त्री, पुरुष असा भेद नसतो. वयाचा फरक नसतो.  ते निर्मळ नातं असतं.  तजेलदार.   त्यातही शाळेपासून मैत्री असेल तर विचारायलाच नको.  आमचाही असाच सरदार रावबहादूर शाळा, रेवदंडा, तालुका आलिबाग येथील ग्रुप आहे.  वॉटसअप बाबाच्या आशीर्वादानं हा ग्रुप जुळला.  मात्र त्यातला ओलवा जपण्याचं नातं आमच्या शाळेनं  केलं आहे.  त्यामुळेच आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आलेल्या आम्हा मित्र मैत्रिणींच्या मैत्रीच्या नात्याचा प्रवास एका कुटुंबाकडे झालेला आहे.  कुटुंब असेल तर जबाबदारी असते.  त्यात एकी महत्त्वाच असते.  दुखल्या-खुपल्याची काळजी असते.  आणि आनंदाच्या क्षणी सहभागाची गरज असते.  तसाच आमचा एसआरटी मित्रपरिवार आहे.  या मित्रपरिवातील प्रफुल्ल सोमण हा नोकरीनिमित्त दुबईला असतो.  त्याचे कुटुंब बेळगांवला.  त्याची पत्नी, धनश्री, ही सुद्धा आम्हा सर्वांची चांगली मैत्रिण.  प्रफुल्लच्या वाढदिवसानिमित्त तिनं मोठा घाट घातला.  पन्नासावा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा.  अगदी पेशवाई थाटात.  काही दिवसापूर्वी याच प्रफुल्लनं मोठ्या बुद्धीबळ स्पर्धेत यश मिळवलेले.  त्याच्या धाकट्या लेकीला, ओजस्विनीला आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याचा योग आला होता.  या सर्व आनंदाच्या बातम्यांची गुंफण सोनरी वाढदिवसानिमित्त धनश्रीनं केली.  


एरवी वाढदिवस म्हटला, की केक कापायचा.  पार्टी करायची एवढीच व्याप्ती झाली आहे.  मॅडम धनश्रीनं मात्र कमालच केली होती.  तिनं पेशवाई थिम ठेवली.  वाढदिवस पार्टी असा उल्लेख तिनं कधी केलाच नाही.  आपला सोहळा आहे, असाच उल्लेख कायम केला.  त्याचा परिणाम म्हणजे, पैठणीचा ड्रेसकोड महिलांसाठी आला.  सोबत नथही.  आणि मित्रवर्गासाठी झब्बा, लेंगा.  पण हे सर्व सांगण्यात ठिक होते.  मुळात बेळगांव काही आपल्या लोकल ट्रेनच्या अंतरावर नाही.  त्यामुळे ग्रुपमध्ये ब-याच चर्चा झाल्या.  गणपतीचा काळ.  महिना अखेरही.  ब-याच मित्र-मैत्रिणींना मनात असूनही

शक्य झाले नाही.  शेवटी चार जणं फिक्स झालो.   रेल्वेची तिकीटं बुक झाली.  नेमकं त्यापैकी एका मित्राला कार्यालयीन काम आले आणि दुस-याला फणफणून ताप भरला.  मग उरले मी आणि माझा मित्र प्रशांत.  आम्ही दोघंही बेळगावं सर करण्यासाठी निघालो.  पहिल्यांदा बेळगावला जाण्याची उत्सुकता एवढी की आम्ही दोघंही सकाळी पाच वाजल्यापासून उठून खिडकीत बसलो होतो.  अगदी लहान मुलांसारखे.  पळणा-या  ट्रेनच्या वेगात काय काय दिसले याचा वेध घेत होतो.  त्यातही मोर, वेगवेगळे पक्षी, उस, कापूस, हळद, फळभाज्या यांची संपन्न शेती.  उगवणारा सूर्यदेव आणि धुक्याचा मंद सुवास.  या सर्वात ते बेळगांव आलेही.  दस्तुरखुद्द उत्सवमुर्ती आम्हाला न्यायला आलेला.  आमच्या सोबतच प्रफुल्लचे अन्य मित्र मैत्रिणीही होते.  त्यांच्याबरोबर परिचय करुन दिला.  फार नाही, एक मिनिटात आमची एवढी गट्टी जमली की परतण्याच्या दिवशी ट्रेन येईपर्यंतही आमच्या गप्पा संपल्या नव्हत्या.  असो. 

वाढदिवसाची काय बात,  तो तर थाटातच होता.  पण आपल्यासाठी वेळ काढून आलेल्या मित्र परिवाराच्या दिम्मत्तीला हे सोमण कुटुंब एवढं गुंतलं होतं, की मन भरुन आलं.  प्रत्येकाची आपलेपणानं चौकशी.  जेवणाचे त-हेत-हेचे प्रकार.  मुख्य समारंभात आमचा लाडका मित्र पेशव्यांच्या रुपात आला.  त्याची पत्नी पेशवीणबाई म्हणून शोभून दिसत होती.  सगळा समारंभ आपल्या संस्कृतीनुसार.  अगदी दिव्यांची ओवाळणी ते गाणी आणि पारंपारिंक नृत्यही.   जेवणाचा थाट थेट केळ्याचा पानावर.  रात्रभराचा प्रवास, त्यानंतर बेळगावचा फेरफटका, वाढदिवसाची तयारी.  यामुळे थोडासा थकवा आला होता.  पण वाढदिवसाच्या सोहळ्यातील आपलेपणाच्या साजानं तो कुठल्याकुठे दूर पळाला होता.  रात्रीचा एक वाजून गेला तरी कोणाचाही पाय निघेना.  वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे चार दिशेहून जमलो होतो.  त्यात प्रफुल्लचे नातेवाईक, नोकरीच्या ठिकाणाचे मित्र यांचाही समावेश होता.  पण नंतर आम्हा सर्वांचे धागे एकमेकांत असे गुंफले गेले, की त्या दिशा कुठल्याकुठे विरघळून गेल्या.  एकूण प्रफुल्लचा वाढदिवस हा मैत्रीच्या पेटा-यात भर टाकून गेलाय.  प्रज्ञा, महेश, मनोज, अपर्णा अशांची मैत्रीच्या लिस्टमध्ये भर पडली.  आणि ही लिस्ट अधिक संपन्न झाली.  हा सोहळा बघत असतांना जाणवलं की वाढदिवस हा फक्त त्या व्यक्तीचा होत नाही, तर सगळ्या परिवाराचा होतो.  प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वाढ होते, तशीच आमच्या आयुष्यात प्रफुल्लच्या वाढवसानिमित्त मित्र मैत्रिणींच्या रुपानं झालीय वाढ झालीय. 

निघतांना धनश्रीनं हातात एक छानसा बटवा ठेवला.  हातात घेतल्यावर त्याचा सुगंध ओळखला. केशर.  बटव्यात छानशी कुपी, आणि त्यात केशर.  केशरासारखाच सुगंध आपल्या मैत्रीत कामय रहावा म्हणत गळाभेट झाली.  यात कोणच बोललं नाही.   शब्द जणू संपले.  मनाला, ह्दयाला जाणून


घेणारी भाषा सुरु झाली.  मैत्रीचा हा सुंगंध सोबत घेत बेळगाव सोडलं.  मन जड होतं.  घरी आल्यावर कपड्याची बॅग खाली करण्यासाठी उघडली, तर तोच केशराचा सुगंध अलगद बाहेर आला.  एका जादुई पेटा-यातून जशी ती रंगीबिरंगी आणि चमकणारी फुलपाखरं बाहेर येतात ना  तसाच तो केशराचा सुगंध बाहेर आला.  मन पुन्हा मोहरलं.  जाणीव झाली.  आमचा सर्व मित्र परिवार कितीही लांब असूदे,  पण मनानं मात्र आम्ही सर्व जवळ आहोत.  कुटुंब म्हणजे काय,  हेच तर असतं.  आपल्या माणसांचं आपल्यासाठी मोहरणं आणि बहरणंही.

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. Chan kharach ek chan athavan

    ReplyDelete
  2. आयुष्यात मित्र असणे याला देखील नशीब लागते आणि ते टिकवून ठेवणे हा देखील एक नशिबाचाच भाग आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं. आयुष्यात मित्र आणि मैत्रिणी असणे, आणि हा नशिबाचा भागच आहे. चांगले मित्र हे कायम सोबती असतात.

      Delete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete
  4. Khup chhan lekh

    ReplyDelete
  5. हा लेख मी पूर्ण वाचला .खूप समर्पक वर्णन केले आहे. हा लेख म्हणजे तुमची कल्पनाशक्ती व सुयोग्य शब्द निवड याचा सुरेख संगम होय. मी पनवेल येथे असलो तरी बेळगावला हे सर्व अनुभवत आहे असेच वाटते.वहिनी आणि वैष्णवी, ओजु यांनी अपार मेहनत घेतली,त्यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला.मी हे दोन दिवस माझ्या आयुष्यात कधीही विसणार नाही. खूप सुंदर लेख,अभिनंदन...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेशजी. प्रफुल्लचा वाढदिवस छान साजरा झालाच. पण त्या वाढदिवसानं मित्रपरिवार वाढवला. आपली ओळख झाली. सर्वांचे छान विचार जमले. वाटलंच नाही की आपण सर्व पहिल्यांदा भेटलो. प्रफुल्लच्या वाढदिवसानिमित्त मिळालेली ही अनोखी आणि अनमोल भेट ठरली आहे.

      Delete
  6. अतिसुंदर लेखन..
    सोहळा.. नविन मैत्रीण.. प्रवास.. बेळगांव.. हरिमंदिर.. सर्व काही मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. प्रज्ञा, तुझ्यासारखी छान मैत्रिण मिळाली. आणि आपली बेळगांव ट्रीप सुंदर झाली.

      Delete
  7. खुपच सुंदर वर्णन.
    तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या योग्य नियोजनामुळे सर्व सोहळा कायम लक्षात राहिल असाच झाला.

      Delete
  8. Khup chan article

    ReplyDelete

Post a Comment