म्हातारा आंबा
ए....तुमचे आंबे म्हातारे झाले...घरात आलेल्या पाहुण्यांच्या मुलांनी पहिला ताबा घेतला तो, टेबलाखाली टाकलेल्या आंब्यांच्या अढीचा. त्यातले काही आंबे सुरुकतले होते. घरात आलेल्या या पाहुण्यांना पाणी, सरबत देईपर्यंत त्यांच्यासोबत आलेल्या छोट्यांनी आम्हाला आंबा आवडतो, अशी थेट डिमांड केली. मग त्यांना आमच्या आंबांच्या अढीचा मार्ग दाखवला, आणि सगळ्यांनी लगेच त्या अढीभोवती कल्ला सुरु केला. तुम्हाला हवा तो आंबा उचला, असं मी सांगितलं खरं, पण ती बच्चेकंपनी चांगलीच चोखंदळ. हा घेऊ की तो घेऊ असा त्यांचा हिशोब सुरु झाला. मग त्यातील एक छोटासा हळूचपणे म्हणाला, ए...तुमचे आंबो म्हातारे झालेत....बघ त्यांना आजीसारख्या सुरकुत्या आल्यात. त्याच्या त्या निरागस बोलण्यावर मी खुदकन हसले. त्या छोट्याला आवडलेला तो सुरुकत्या पडलेला आंबा घेतला. सोबत आणखी चार आंबे घेतले. त्या छोट्याचे ते हलकेसे वाक्य पुन्हा आठवून हसू आले. मग त्या छोट्या पाहुण्यांना सांगितले, चला तुम्हाला एक जादू दाखवते. या म्हाता-या आंब्यांची जादू करुया. माठातले गार पाणी एका टोपात काढले, त्यात ते सगळे आंबे टाकले. घरी आलेली बच्चेमंडळी त्या आंब्यांकडे कौतुकानं बघत होती. एकान विचारलं जादू कधी होणार. मी त्या छोट्यांना थोडावेळ थांबण्यासाठी सांगितलं. तोपर्यंत त्यांच्या हातावर चॉकलेट दिले आणि टिव्हीवर कार्टून लावून दिले.
पाहुण्यांबरोबर गप्पा चालू असतांना नाष्टा झाला. वाढलेला उष्मा पाहता पुन्हा सरबताची फेरी झाली. पण ती बच्चेमंडळी काही खायला तयार नव्हती. त्यांना आंब्याची जादू बघायची होती. एव्हाना वीस-पंचवीस मिनिटं होऊन गेलेली. त्यांची वाढलेली चुळबूळ बघता, सर्वांना पुन्हा स्वयंपाक घरात बोलवलं. त्यांनी निवडलेले आंबे ताब्यात घ्यायला लावले. आता पाण्यात राहिलेले ते आंबे सुखावले होते. त्यांच्यावरच्या सुरकुत्या हलक्या झाल्या होत्या. मग माझा आंबा कुठला याची पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही, आता तूच सांग माझा आंबा कुठला ते, असं सांगून सर्वांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली. ब-याच दिवसांनी असा छोट्यांचा गोतावळा घरी जमल्यामुळे मलाही आनंद वाटत होता. त्या चौघांसाठी चार डिश घेतल्या. चार आंबे कापून त्यात ठेवले. वरुन अजून जास्तीचे दोन आंबे दिले. मग ही मंडळी खूष. त्यांचे आईबाबा निट खा. कपड्यांना लावू नका. अशा नेहमीच्या सूचना देत होते. त्याकडे दुर्लक्ष करत या गोपाळांनी सरळ खाली बैठक मारली. आंब्यांचा फडशा पाडला. आंब्यांना म्हातारा म्हणणा-याचा तर चेहरा त्या आंब्यांनी पार भरुन गेला होता. मस्त होता....गोड होता...अजून हवा का, तुझा म्हातारा आंबा....तर म्हणाला, आता नको, थोड्या वेळानं सांगतो.
त्या छोट्याच्या आईनं डोक्यावर हात मारला. मावशीनं जेवण केलंय. ते नाही का जेवायचं म्हणून तिनं त्याचा ताबा घेतला. चेहरा धुतला. हात धुवून झाले. बाकीच्या छोट्यांच्याही आया पुढे आल्या, मुलं आंब्यांचे ढेकर देऊन खेळायला लागली आणि आम्ही गप्पामध्ये रमलो. दुपारच्या जेवणानंतर पाहुण्यांची वामकुक्षी चालू झाली. पण ही छोटी मंडळी कसली वामकुक्षी घेतात. मी तेवढ्या वेळात पुन्हा आंब्याची अढी लावायला घेतली आणि माझ्या मदतीसाठी हे चौघंही धावत आले. नवीन पेटी फोडली होती.
त्यातले सर्व आंबे तजेलदार होते. दोन दिवसात पिकणारे आंबे, बाहेर काढले बाकी पुन्हा पेटीत गेले. मुलांना कोण आनंद. त्यांना अढी म्हणजे काय ते सांगितले. मग पुन्हा तो म्हातारे आंबे हा शब्द आला. हे आंबे कधी म्हातारे होणार, म्हणून तो मुलगा विचारु लागला. का रे तुला म्हातारे आंबे आवडायला लागले का...तो फक्त मानेनंच हो म्हणाला. मला पुन्हा हसायला आलं.
मे महिना आणि या आंब्यांचे जसे समीकरण आहे ना, तसेच समीकरण मे महिना
आणि घरातल्या आजी आजोबांचे असते. अंगावरील
सुरकुत्यांमधून अनुभवाचे मुसळधार पावसाळे झेलणारी ही घरातील म्हातारी मंडळी या
आंब्यांसारखीच असतात की. थोडे सुरुकतलेले
आंबे पाण्यात टाकले की सैल होतात.
त्यांच्यावरच्या सुरकुत्या विरळ होतात.
पाण्यातील थंडाव्यानं त्यांच्यातील गोडवा अधिक वाढतो. मग अगदी म्हातारे वाटणा-या या आंब्याचा बाटा
खातांनाही तो पांढरा होईपर्यंत चोखला जातो.
घरातील आपल्या आजी आजोबांचेही असेच असते ना. त्यांच्यासाठी मे महिना हा खास असतो. दूरवर रहाणारी त्यांची नातवंड निदान या
सुट्टीमध्ये तरी त्यांच्यापाशी येतील अशी त्यांची अपेक्षा असते. एऱवी ही वयोवृद्ध मंडळी आपल्या आपल्यात
असतात. त्यांचे मध्येच गुढघे दुखतात. पोटाच्या तक्रारी असतात. जरा चालल्यावर थकवा येतो. पण सुट्टीत नातवंड घरी आली की त्यांच्या या
तक्रारी कुठल्या कुठे पळून जातात. आंब्यांसारखे
ते तजेलदार होतात. मग नातवांनी हाताला
धरुन ओढत नेलं तरी त्यांचे गुढघे दुखत नाहीत.
नातवाला आवडतं म्हणून चार पावलं अधिकची चालत, त्याला आवडणारे पदार्थ आणले जातात. तेव्हा त्यांना थकवा येत नाही. नातवंड या आजोबांसोबत खेळतात असं दृष्य दिसत
असलं तरी वास्तवात ही मंडळी त्या नव्या पिढीसोबत आपल्याला जोडू पहातात. त्यांच्यात रमून आपल्या सर्व तक्रारींना विराम
देतात. कारण काही दिवसासाठी आलेले हे
पाहुणे परत जाणार आहेत, याची जाणीव त्यांना असते.
घरी आलेल्या त्या छोट्या पाहुण्यांच्या गमती बघतांना मला माझ्या लहानपणीची आठवण येत होती. वार्षिक परीक्षा झाली की लगेच मामा घ्यायला यायचा. मग आजोळचे लाड सुरु व्हायचे. आजी आजोबा, मामा
मामी, मावशी यांच्या साथीनं सुट्टी अश्शी अश्शी संपायची. मग पुन्हा मामा घरी आणून सोडायचा. आत्तापर्यंत वाटायचं ही फक्त आपलीच मजा होती. पण या वयाच्या टप्प्यात आल्यावर जाणवलं, नातवंडासोबत रहाणं हा आजीआजोबांसाठीही एक आनंदाचा ठेवाच होता. घरातील ही सुरुकत्या धारण केलेली माणसं, फक्त ओलावा शोधत असतात. सुरकुतलेले आंबे जसे पाण्यात टाकल्यावर सैलावतात. तशीच ही मंडळी नातवंडांसोबत सैलावतात. मग त्यांच्यातील मधाळपणा अधिक खुलतो. आंब्याची बाट थोडी आंबट असली तरी ती पांढरी होईपर्यंत चोखण्याचं धाडस होंतं, तसच आजोबा कितीही कडक असले तरी त्यांच्या खिशातील चॉकलेट पळवण्याचं धाडस होतं. यात जे सुख त्यांना मिळत त्याची तोड नाही. म्हणूनच माझ्या मते मे महिना हा फक्त दोघांच्याच नावाचा असतो. एक तर आंब्याच्या आणि दुसरा आजी आजोबांच्या....या दोघांच्याही जवळ जे जातात. त्यांना मे महिन्यातील उन्हाच्या झळाही गारेगार लागतात.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


.jpg)
Nice
ReplyDeleteखूपच छान लिहिलंय!!
ReplyDeleteखूप छान लेख लिहिला आहे.लेखाचे शीर्षक बघून लेच वाचायची उत्सुकता वाढते.या लेखाने माझ्या लहापणापासून आजोळी केलेली धमाल मस्तीची आठवण झाली.पण आता या मोबाईल च्या युगात बालपण हरवले आहे असे वाटते.अशी धमाल मस्ती आत्ताच्या पिढीच्या नशीब नाही.आनंद आहे आपल्या पिढीने तो रम्य काळ जगला आहे.खूप सुंदर लेख.
ReplyDeleteSai ,tuzya apetim bavspeshi lekhane mn punha aajoli gheun gel amhi dar may mhinyat islampurla aajoli aameai hoti tithe jat asu aanlelya aambyachya aadhya ghalu lagt asu sar sar aathvl 😍😍
Delete