त्या दोघी अन् प्रायव्हसीची व्याख्या
ब्लॉगला एवढे चांगले विषय तुला मिळतात कसे, हा प्रश्न मैत्रिणी नेहमी विचारतात. तेव्हा माझं उत्तर एकच असतं, प्रवास आणि गप्पा यातून अनेक ओळखी होतात, आणि आपसूक एखादा विषय समोर येतात. गेल्या आठवड्यात झालेल्या गणेशोत्सवा दरम्यानही आपसूकपणे दोन टोकाच्या विचाराच्या आणि आचाराच्या स्त्रिया पहाण्यात आल्या. दोघींपुढे एकच शब्द होता, प्रायव्हसी. पण त्यात त्यांचे विचार त्यांच्यासारखेच टोकाचे होते. त्यातील एक अनुभवानं परिपक्व होती, आणि तिचे विचारही तसेच रापलेले. तर दुसरी अगदी नवखी नाही, पण पोक्तही नाही. याच मध्यावर नको तेवढा आलेला मीपणा आणि तसेच बांधले गेलेले अनुभव. या दोन्हीं ठिकाणी मी प्रेक्षकाच्या भुमिकेत होते.
गणपती उत्सवादरम्यान आईकडे जातांना रोज सकाळचा ट्रेनचा प्रवास व्हायचा. सकाळची ट्रेनला गर्दी किती. त्यात दाराजवळची कोप-यातली जागा मिळाल्यावर मी अगदी गपचूप उभी रहायचे. माझ्याच बाजुला एक ग्रुप
होता. पाच जणी होत्या. गणपतीच्या दिवसच ते....त्या दिवसात बाप्पाच्याच गप्पा चालू असायच्या. कोणाकडे बाप्पा येतात. त्याची कशी पुजा होते. गौरीमातेची पुजा कोण करतो. कोणाचा ओवसा आहे. सर्व चर्चा चालू असायच्या. त्यात एकीनं साडीचा विषय काढला, मग प्रत्येकजणी आपल्याकडच्या ठेवणीतल्या साड्या कशा आहेत, त्या कधी वापरल्या, याच्या चर्चा करु लागल्या. मध्येच एकीनं दुसरीला हाक मारली. अग सोना, तुझं काय...तुझ्या बहिणीकडे पण गणपती बाप्पा आहेत ना. तू कधी जाणार तिच्याकडे. मी त्या सोनाकडे बघितलं, ती मोबाईलमध्ये अखंड बुडालेली. मग तिला तिच्या मैत्रिणीनं हलवून जागं केलं, आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली, आई आज तयार रहाणार आहे. तिला घेऊन जायचं आहे. दादा आणि वहिनी परस्पर येणार आहेत. ताई आग्रह करीत होती, दोन दिवस रहा म्हणून. पण मला ते जमत नाही बुबा. तिचा सासरचा गोतावळा खूप आहे. दोन दिवस राहिलं तर कंबर साफ होते. या संभाषणात आता सर्वजणी सहभागी होऊ लागल्या. एकीनं अधिकारवाणीनं सांगितलं, सोना, हे बरोबर नाही. ती तुझी ताई आहे, जरा तिला मदत केलीस तर काय. आणि आज ना उद्या तुलापण अशाच गोतावळ्यात राह्यचं आहे. कधीतरी लग्न करणार ना तू...की अशीच रहाणार. लवकर ठरव. आम्ही येतो तुझ्या घरी मदतीला. आईला सांग. यावर सगळ्याजणी हसल्या. एकीनं थेट सोन्याच्या लग्नाचा देखावाच उभा केला. साड्या कुठल्या घालायच्या, नऊवारी साडी की घागरा चोली, इथपर्यंत तिची स्वप्न पोहचली. तिला जागं केलं ते सोनानेच. हे बाई, नको ती स्वप्न बघू नकोस. मी लग्न बिग्न काही करणार नाही. इथे घरी गेल्यावर आई नेहमी डोकं खाते. ती वहिनी कधी घरी आली की तोच प्रश्न विचारत बसते. आज ताईकडे गेल्यावरही माझ्या लग्नाची उजळणी होणार आहे. त्यात तुमची भर नको. जगात दुसरे विषय आहेत, त्यावर बोला. लग्न नको...का नको...ते सांग आधी. ती लग्नाचा देखावा उभी करणारी पेटलीच जणू...अरे तो माझा
प्रश्न आहे, सोना स्पष्टीकरण देऊ लागली. लग्न झालं की प्रायव्हसी संपली. आणि ती अँडजेस्टमेंट किती असणार. ती कोण करणार. मी तुमचं ऐकते ना रोज. घरात किती अँडजेस्ट करता तुम्ही. इथे एवढा पगार हाताशी
असतांना कोण कशाला अँडजेस्ट करायचं. नवरा, त्याचं घर, त्याची माणसं...नको ते सर्व त्यापेक्षा मी बरी आणि माझी प्रायव्हसी बरी. सोन्याच्या या उत्तरानं तिच्या ग्रुपसह तिचं बोलण ऐकणा-या माझ्यासारख्या डब्यातील सर्व महिला तिच्याकडे तोंडाचा आ करत बघू लागलो. एव्हाना ठाणा स्टेशन आलं. थोडी गर्दी झाली. आम्ही अधिक जवळ आलो. सोन्याच्या ग्रुपमधील एकीचा आवाज हळूवार झाला. अग सोना, त्यात खरी मजा असते ग. आम्ही कितीही नावं ठेवली तरी त्या माणसांना काही झालं, की जीव तुटतो. त्यांच्या घरी आनंदाची बातमी असेल तर आम्हीही त्या आनंदात सामिल होतो. त्यात कुठलीही प्रायव्हसी जात नाही की अँडजेस्टमेंट करायला लागत नाही. माणसांचा स्वभाव आहे तो. थोड कमी जास्त असणारच की. एव्हाना सोनानं कानात हेडफोन अडकावले. तिला या गप्पांचा नूर आवडला नव्हता हे उघड होतं. पण तिच्या नाराजीकडे दुर्लक्ष करीत आणखी एक मैत्रिण म्हणाली, लग्न करणार नाहीस मग तुझ्या भविष्याचं काय ग. कधीतरी तुला एकटं वाटेलच ना. तेव्हा काय करशील. तेव्हा मी माझ्या ताईच्या लेकीला घरी घेऊन येईन..आता सोनाही वैतागली होती, पण मैत्रिणी होत्या, त्यांना दुखवता येत नाही, ही अँडजेस्टमेंट तिला जमत होती. माझ्या ताईच्या धाकट्या लेकीचा खर्च मीच करणार आहे. ताईला सांगितलंय. ती करेल माझं. तू काळजी करु नकोस हो...म्हणत सोना हसली आणि कानावर हेडफोन घालून गाणं ऐकू लागली. पुढच्या स्टेशनवर मी आणि सोनाच्या दोन मैतिणी उतरल्या. जीना चढतांना पुन्हा त्यांच्या चर्चा कानावर पडल्या. मागच्या महिन्यात पस्तीशीची झाली ना ही. कसलं खूळ घालून घेतलंय डोक्यात काय माहित. तिची आई रडत असते. अजिबात ऐकत नाही. पगार भरपूर आहे, पण तो काय आयुष्यासाठी पुरतो का. जिना संपल्यावर त्या दोघी एका बाजुला गेल्या आणि मी त्या सोनाचे विचार बाजुला ठेवत आईच्या घरचा रस्ता पकडला.
रात्री पुन्हा ट्रेनचा प्रवास करुन डोंबिवलीत. रस्तावरची गर्दी बघून सरळ चालायला सुरुवात केली. घरच्या वाटेवर ओळखीची फळवाली दिसली. तिच्या फळांच्या गाडीवर एकाबाजुला पेरुचा ढिग करुन ठेवला होता. तिनं हाक मारुन बोलवलं. ताई, तुझ्या आवडीचे पेरु आहेत ग, दोन घेऊन तर जा. घरात फळं बरीच होती, पण तिचा आग्रह मोडता आला नाही. दोन ऐवजी चार पेरु घेतले. साडेनऊ झाले तरी तू अजून इथे कशी, म्हणून तिला प्रश्न विचारला. तेव्हा खूष झाली. म्हणाली, गणपती ना. पोर आलीय घरी. ती करतेय दोन दिवस जेवण. त्यामुळे थोडा आराम आहे. गणपतीचे दिवस ना, धंदा पण चांगला होतो. दहा वाजता घरी जाते. सर्व आटपून साडेदहा अकरा वाजतात जेवायला. थोड अँडजेस्ट करायचं, त्यात काय. पण लेक गरग गरम डाळ भात वाढते ना, तेव्हा सगळा ताण निघून जातो बघ ताई. उद्या धाकटीपण येणार आहे. आता दोघी लेकी आल्यावर मोकळ्या हातानं कशी पाठवू, म्हणून नव-याला सांगून आलेय, लेट होईल, तू बाकीचं घर सांभाळ. माझ्या नजरेसमोर तिचं घर आलं. चाळीतली खोली. तिचा नवरा, ती, आणि दोन लग्न झालेल्या लेकी आणि एक नातू. मी तिच्या चेह-याकडे बघितलं, ती कधीच तिच्या गोकुळात पोहचली होती. चेह-यावर कोण आनंद. माझ्यापाठोपाठ आलेल्यांनी सफरचंद आणि केळी खरेदी केली. माझ्याशी बोलतांना तिचा पैशाचा हिशोब चालू झाला. लेकीच्या साड्यांचे पैसे अलगद वेगळे होत होते. मनात आलं, हिच्या प्रायव्हसी किंवा अँडजेस्टमेंटचे काय....पण उत्तरही तिनंच दिलं. उद्या जरा लवकर जाईन, पोरी असतील ना...घरात गोंधळ असेल...त्याच्याशिवाय मजा नाही ग...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
.jpg)
.jpg)

Super duper dear ❤️ 👍
ReplyDeleteनेहमी प्रमाणे छान विचार मांडले
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteसुरेख
ReplyDeleteखूप छान लेख आहे.
ReplyDeleteखरं आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या विचारांनी जगत असतो! लेख आवडला.
ReplyDeleteKhup chaan lekh
ReplyDeleteप्रत्येकीचा आयुष्य घालवण्याचा विचार वेगळा असतो.
ReplyDeleteJo तो aaple jivan paropkarachya bhumiketun swarachi privhyu japato
ReplyDelete