तो येतो आणि जातो...

 

 तो येतो आणि जातो...


ब-याच गोष्टी अशा असतात की, त्या घडून गेल्यातरी त्यातच गुरफटून रहायला आवडते.  ते क्षण परत येणार नाहीत, याची माहिती असते, पण तरीही त्याच्याच आसपास मन घुटमळत रहाते.  असं बहुदा माझ्या बाबतीत होतं, ते लेक पाहुण्यासारखा चार दिवसासाठी घरी येतो तेव्हा.  गेल्या चार वर्षापासून शिक्षणामुळे तो बाहेरगावी गेला आणि त्याचं वेगळं विश्व निर्माण झालं.  तोपर्यंत त्याच्या आयुष्यातले प्रत्येक निर्णय हे माझ्या सल्यानुसार झालेले.  आपला मुलगा आपल्याला विचारल्याशिवाय काही करत नाही, असा कणभर का नाही पण अभिमान माझ्या मनात कोरला गेला होता.  सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळं घर त्याच्याभोवती असायचं.  त्याला हवा तो नाष्टा, हवी ती भाजी, संध्याकाळची चटपटीत नाष्टा आणि रात्रीच्या जेवणाचा बेत...सगळं तो सांगेल तसं...या तो सांगेल तसं...या  वाक्यानं मी बांधले गेले होते.  माझं विश्वच तेवढं होतं.  पण तो दूर झाला आणि मला माझ्या विश्वातल्या पोकळीची जाणीव व्हायला लागली.  ही जाणीव धक्कादायक होती.  त्यातून बाहेर पडायला अर्थातच तो दूर असला तरी त्यांनीच मदत केली.  आता या गोष्टीला चार वर्ष होऊन गेली आहेत.  आता तो फक्त आराम करायचा आहे, या नावाखाली आठ-दहा दिवसांसाठी येतो.  त्याच्या या मोजक्या दिवसाच्या पाहुणचारात मग मी पुन्हा त्याच्या भोवती माझं विश्व गुंफण्याचा प्रयत्न करते.  मात्र आता तो सजग झालाय.  मला वेळीच आडवतो.  मी आज आहे, पण उद्या नसेन.  तेव्हा काय करशील...तुला हवं तसं कर...तुझ्या वेळेचा तुझ्यासाठी वापर कर...मी फक्त जेवणार नाही,  तू पण जेवणार आहेस, तुझ्या आवडीचाही विचार कर...असं बरचं पोक्तपणा आल्यासारखा बोलतो.  मग मी पुन्हा त्याच्या कोषातून बाहेर पडते.  तो येतो आणि जातो, यातील हे अंतर आहे....आता तो मला पुन्हा माझ्या विचारांच्या कोषात अडकू देणार नाही, याची खात्री होऊन जाते. 


पहिल्यांदाच लेक मला सोडून शिक्षणाच्या निमित्तानं दूर गेला, तेव्हा तो दुरावा माझ्यासाठी जेवढा कठिण होता, तेवढाच त्याच्यासाठीही होता.  फरक एवढाच होता, की तो त्यानं त्या दुराव्याची मानसीक तयारी केली होती, आणि इथे मी कच्ची राहिली होते.  या दुराव्यात आमच्या भुमिकाही बदलल्या.  त्यानं कधी माझी भूमीका घेतली हे मलाही कळलं नाही.  तो फरक आता मला चार वर्षांनी जाणवला.  यावेळी तो आला तो पाच महिन्यानंतर.  मग काय, मी भलेमोठे प्लॅन तयार केलेले.  खाऊची मोठी लिस्ट.  दिवसाचा मेनू वेगळा.  फिरण्याचे मोठे बेत.  खरेदी.  नातेवाईकांच्या भेटी.  सर्व काही तयार होतं.  पण तो आला आणि या सर्वांना बाजुला ठेवलायला लागलं.  कारण बदलेली त्याची दृष्टी.  आल्याआल्याच बॅग खोलून आणलेल्या सामानाची माहिती दिली.  अगदी मोजके कपडे.  तेही व्यवस्थित लावलेले.  लाडवाचा रिकामा डबा.  जातांना यामध्ये फार भर नको.  एवढचं सामान मला हवं आहे.  हे सांगून त्यांनी पुढच्या दहा दिवसांची कल्पना दिली. 

तो थोडासा स्थिरावल्यावर मग माझी भूणभूण सुरु झाली.  आपण इथे जाऊया, तिथे जाऊया.  पण तो काही त्याच्या चौकानासमोरुन बाहेर येईना.  त्याचा लॅपटॉप आणि तो.  बाकी काही नाही.  मग माझी हतबलता.  अरे, यांना भेटायला हवं,  त्यांना भेटायला हवं.  पण तो कमालीचा शांत.  परीक्षा झाली की अभ्यास संपत नाही,  माझा अभ्यास चालू आहे, तो सोडून मी येऊ शकत नाही.  पण माझ्यासाठी तू थांबू नकोस.  तू तुझी कामं कर.  ज्या कार्यक्रमाला जायचं आहे, तिथे जा.  मी एकटा मॅनेज करु शकतो.  अशा त्याच्या बोलांनी मी मनातून खट्टू. म्हणजे, माझ्यापासून तो दुरावतोय का...असा काहीसा वेगळा विचार.  पण पुन्हा त्याची मदत.  मी दहा दिवसांनी परत जाणार.  तेव्हा पण तू अशीच वागणार का.  तुझं स्वतःचं मत नाही का.  ते कधी वापरणार.  स्वतःचा विचार कर...मी मग क्षणभर विचार करते.  मलाच एक प्रश्न विचारते. हा तोच आहे का माझा लेक.  साधी पेन्सील घेतांनाही मला विचारणारा.  आता किती बदललाय.  मग एक सुखद भावना मनात येते.  तो बाहेर पडला हेच चांगलं झालं.  त्याच्या विचारात पक्वता आली.  स्वतःची काळजी घेता येतेय त्याला.  आणि तिथे बसून आमचा दोघांचाही विचार करतोय.  पण हे सर्व नकळत.  त्यात कुठलाही दिखावा नाही.  विचार स्पष्टपणे मांडता येऊ लागलेत.  मग सर्व सुरळीत


झालं.  दहा दिवसात, तो एखाद-दोन ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडला.  खरेदीला नेलं, तेव्हाही अगदी मोजकी खरेदी.  जे गरजेचं नाही, ते नकोच.  माझा आग्रह होता, एखादं जास्तीचं झालं, तर काय बिघडतं.  पण तो हिशाबोत.  कशाला, नाहक वस्तू वाढवायच्या.  गरज लागली की हवी ती वस्तू मागवता येते.  पण नको असलेली वस्तू तशीच पडून रहाते.  तू काळजी करु नको.  मी पुन्हा शांत आणि प्रसन्न.  

एरवी स्वयंपाकघरात माझाच राबता.  मात्र आता तोही स्वयंपाकघरात डोकावतो.  फोडणी घालण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत मला मदतीला येतो.  कधीतरी मग मीच त्याला बाहेर जा, मी आवरते, म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.  मग त्याचे पुन्हा समजुतदार बोल,  नको मी करतो.  तू बस.  मी आहे ना.  हे शब्द किती लहान.  पण त्यातील अश्वस्तपणा किती मोठा.  नकळत डोळ्यात पाणी येतं.  हा कधी एवढा मोठा झाला म्हणून विचार मनात येतो.  हे होतं न होतं तोच, त्याच्या जाण्याचा दिवस समोर येतो.  मग बॅग भरण्याची धावपळ.  पण तो स्थिर.  मी गोंधळ घालते, म्हणून त्यानं आधीच काळजी घेतलेली.  बॅग भरतांनाचे फोटो काढून ठेवलेले.  अशीच भरायचीय.  जास्तीचे कपडे नकोत.  खाऊ नको.  फक्त लाडवांचा डबा, आणि सुक्या मेव्याची बरणी.  त्याला हवे तस्से कपडे भरतांना मी फक्त त्याच्याकडे बघत होते.  या चार वर्षात तो कमालीचा बदललेला.  विचारांनी आणि आचारांनीही.  जातांना आमच्यासाठी चांगल्या चित्रपटांची यादी काढून गेला.  सोबत नवी पुस्तकं कुठली आली आहेत, याचीही माहिती देऊन गेला.  आता त्यानं सांगितलेले चित्रपट बघतांना आणि त्यांनी सुचवलेली पुस्तकं वाचतांना जाणवतं, की हे सर्वही त्याच्या नियोजनाचा भाग होता.  आपण गेल्यावर आईला एकटं वाटणार.  अशावेळी तिला पुस्तकांची सोबत होईल, हा त्याचा होरा अचूक होता.  म्हणूनच म्हटलं, आमच्या भूमिका बदलल्यात. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Khup chhan lekh

    ReplyDelete
  2. khup chhan...bhavnik lekh...

    ReplyDelete
  3. Today's generation is far advance than ours.We had very limited access to information,whereas this generation is global in true sense.They are very well aware about their needs and necessities.But we have to watch them what are the doing.Most of the boys and girls are perceiving higher education,new advance development in science and technology.So we should not worry about.Becoming emotional is our way,they also understand this.Nice subject selection,but it could have been elaborated.

    ReplyDelete

Post a Comment