तुमच्याकडे येतात का असे(नकोसे)पाहुणे

 

तुमच्याकडे येतात का असे(नकोसे)पाहुणे


दुपारी सव्वातीन साडेतीनचा सुमार होता.  दुपारी चांगली दोन वाटी ताकाची कढी, भरली वांगी, ज्वारीच्या भाक-या आणि खिचडी असा बेत हाणल्यामुळे डोळे जड झाले होते.  पण समोरच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरील लेख ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे बंधनकारक होते.  त्यामुळे डोळ्यावरील झोप उडवत काम चालू होते.  माझ्या शेजारी बसलेल्या नव-याचीही तिच अवस्था होती.  टी-कॉफी ब्रेक आज लवकर घेऊया का...हा त्याचा प्रश्न यायला आणि आमच्या डोअर बेलची जोरदार किंकाळी कानावर यायला एकच वेळ झाली.  क्षणासाठी मी दचकले.  ती डोळ्यावरची झापड पार उडाली.  कोण आहे, ही काय पद्धत आहे का बेल वाजवायची...म्हणून मी पुढे जाणार, एवढ्यात नवरा पुढे झाला.  तो दरवाजापर्यंत जाईपर्यंत आणि दरवाजा उघडेपर्यंत पुन्हा तशीच बेल वाजली.  त्यानं घाईघाईनं दरवाजा उघडला आणि तो आवाज कानावर पडला.  काय....दुपारची झोप चालू होती का...तुम्ही झोपत नाही ना...म्हणून म्हटलं जाऊया...दरवाजा उघडायला किती उशीर लावलात...अशा वाक्यांच्या फैरी झाडत त्या बाई घरात आल्या आणि माझ्या मनात एक धडकी भरली.  घरात पाहुणे आलेले, सगळ्यांना आवडतात.  पण त्यातही काही असे पाहुणे असतात की, ते आले की आनंद होण्यापेक्षा मानसिक त्रासच जास्त होतो, या बाई त्यातल्याच होत्या.  आता पुढचा तासभर तरी कानामागून ज्वाळा...अशा वातावरणात जाणार हे जाणून मी चालू असलेला लेख सेव्ह करुन कंप्यूटरला स्लीप मोडवर ठेवलं.  तोपर्यंत त्या बाई माझ्यापर्यंत आल्याच...हे काय, तू घरात आहेस ना, मग त्याला कशाला दार उघडायला पाठवलंस.  हे बरं आहे...त्या बहुधा आणखीही काही बोलायच्या विचारात होत्या...पण नवरा मागून आला...चला, आपण बाहेर बसूया...आम्हीपण चहा-कॉफीसाठी उठतच होतो. म्हणून त्यांना हॉलमध्ये घेऊन गेला.


काही माणसं ही आम्ही म्हणजे, आम्हीच, आमच्याशिवाय दुसरं कोणी नाही.  या धाटणीतील असतात.  आपला जन्म हा दुस-याला कायम शहाणपण शिकवण्यासाठी झाला आहे, अशी त्यांची स्वयं मान्यता असते.  अशाच धाटणीतल्या या बाई.  आमच्या अगदी दूरच्या नातेवाईकांपैकी एक.  त्या आणि त्यांचे यजमान दोघेही सत्तरीच्या पुढचे.  वयानुसार आता थोड्या थकल्या होत्या.  पण जिभेवर कायम मिरचीचा ठेचा ठेवल्यासारखे त्यांचे बोलणे.  त्यामुळे सर्वजण कायम अंतर ठेऊन असतात.  त्यात माझाही समावेश.  पण आता त्याच थेट घरी आल्यामुळे मी भांबावून गेले होते.  नव-यानं सुरुवातीला सूत्र हाती घेतली.  काय काकू, कशा आहात.  मुलं कशी आहेत, ही जुजबी चौकशी सुरु झाली.  त्यावर त्यांचे नेहमीप्रमाणे उत्तर.  त्यांचं काय ठिक चाललंय.  इथे आम्ही म्हातारा-म्हातारी रहातोय, तिकडे त्यांची मजा चालू आहे.  मग नव-यानं चहा-कॉफी काय घेणार याची चौकशी केली.  मी पोहे करते, म्हणून किचनकडे वळले.  पण मला तिथेच थांबवून त्या काकू म्हणाला, पोहे कुठे करतेस.  आम्हा दोघांनाही पोह्यांचा त्रास होतो, तुला माहित नाही का.  पोह्यांचा कधी कुणाला त्रास होतो का, अर्थात हा माझा प्रश्न मी माझ्या मनातच ठेवला होता.  शिरा करते मग, म्हणून मी अजून एक ऑप्शन दिला.  नको, आम्हा दोघांनाही शुगर आहे.  उगा नंतर त्रास झाला तर कोण बघायला येणार, म्हणून त्यांनी तोही ऑप्शन उडवून लावला.  मग काय करु ते तुम्हीच सांगा...म्हणत मी चेंडू त्यांच्या कडे दिला.  आम्ही कुठे बाहेर काही खात नाही, नंतर त्रास होतो आम्हाला, म्हणत, त्यांनी मला पुन्हा गप्प केलं.  मग मी आशेनं नव-याकडे बघितलं, त्यानं त्याचं हक्काचं नाणं बाहेर काढलं.  काकू तुम्ही बसा, मी फक्कड चहा करतो.  त्या काही बोलणार इतक्यात नवराच बोलला, माहीत आहे हो, तुम्हा दोघांनाही बीनसारखेचा लागतो ना.  करतो करतो...बसा.  म्हणत नवरा आत गेला, आणि मला त्या काकूंसमोर बसवून...फसवून गेला...

नव-याचा चहा येईपर्यंत माझी सगळी चौकशी सुरु झाली.  घरातून काम करतेस म्हणजे काय करतेस...याची चौकशी सुरु झाली.  वास्तविक याबाबत मी त्यांना आधीही अनेकवेळा सांगून झालं होतं.  पण उपाय काय.  त्या




काका-काकूंनी नव्यानं माझी चौकशी केली.  त्यातही पैसे किती मिळतात, यावर जास्त भर.  मला हा प्रश्न फारसा आवडत नाही.  ती प्रत्येकाची खाजगी बाब असते, ती कशाला विचारायची, हा माझा कटाक्ष.....पण ही भूमिका या काका-काकूंना कधीही उमजणारी नाही, एवढी समज मला आलेली.  त्यामुळे ढोबळ रक्कम सांगितली.  त्यावर दोघांचीही प्रतिक्रीया, एवढेच...त्यात काय होतंय...पण माझं होतंय...मी समाधानी आहे...हे माझं मत...अर्थात मनामध्ये.  त्यानंतर त्यांची गाडी घराच्या सजावटीकडे वळली.  हे काय आहे, ते कशाला लावलंय.  इथे हाच फोटो कशाला लावलास...अशा नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करुन झाली.  तेवढ्यात चहा आला.  मी उठले.  चहा सोबत बिस्कीटांची डिश पुढे केली.  काका-काकूंना एका पर्यटन संस्थेबरोबर फिरायला जायचे होते.  वाराणसी आणि अयोध्येची सफर होती.  आमची ही ट्रीप झाली होती, त्यामुळे हे दोघंही त्याची चौकशी करायला आले होते.  त्या पर्यटन संस्थेनं जे शुल्क सांगितले होते, ते त्यांना जास्त वाटत होते.  बाहेर रहाणारा त्यांचा मुलगा ऑनलाईन पद्धतीनं ते शुल्क भरणार होता, पण या दोघांनी त्याला थांबवले होते.  पैसे काय झाडाला लागतात का, म्हणून त्या मुलांना चांगले झापून..इती काका आणि काकू, ते आमच्याकडे आले होते.  नव-यानं त्यांना सगळं सांगतो, पण चहा तर घ्या आधी म्हणून आग्रह केला.  त्यांनी पहिला चहाचा घोट घेईपर्यंत तो त्यांच्याकडे आशाळभूत नजरेनं बघत होता.  नंतर त्यांनी बिस्किट उचललं आणि माझी नजरही तशीच...आशाळभूत झाली.  चहा कसा झाला आहे, याचं कौतुक ऐकलं की नवरा भारावतो आणि सोबतीला घरी केलेल्या बिस्किटांची तारीफ केली की मी सुखावते.  पण समोरच्या काका-काकूंना आमच्या या आशाळभूत नजरा समजल्याच नाहीत.  तरीही मी काय कमी आहे, मी सांगितलच, काकू, बिस्कीटं मी घरी केली आहेत, नाचणीची आहेत, कशी झालीत.  त्यावर काकू

फक्त हं...आम्हाला गुड डे ची सवय.  सकाळी खारी आणतो भय्याकडून आणि संध्याकाळच्या चहाबरोबर गुड डे ची बिस्कीटं...त्यात साखर नसते का, हा माझा प्रश्न अर्थात आणि अर्थात माझ्या मनातच. 

त्यांचे चहापान झाल्यावर नव-यानं त्यांना आम्हाला आलेला खर्च सांगितला.  आम्ही अगदी साध्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, पण त्यामागची आमची भूमिका वेगळी होती.  तिथल्या शासनच्या बसनं फिरलो होतो, तेव्हाही अशीच भूमिका होती.  हे सर्व या दोघांना सांगून काहीही उपयोग नाही, याची कल्पना आलेल्या नव-यानं त्यांना हा सर्व तपशील एडिट करुनच सांगितला.  बराच खर्च होतो की, अशी त्यावर काकांची प्रतिक्रीया.  जायचं का...उगाच खर्च होतोय.  असं काकूंनी विचारलंही.  तेव्हा घरी गेल्यावर त्याला फोन करुया, म्हणून काका उठले.  आता ते त्यांच्या मुलाबरोबर या खर्चाबाबच दीर्घ चर्चा करणार होते, आणि मगच त्या पर्यटन संस्थेला होकार कळवणार होते.  मी त्यातही त्यांना नक्की जा.  सगळं छान आहे, तुम्हालाही बदल वाटेल, असं सांगण्याचा प्रयत्न केला.  त्यावर काकूंनी, तुला काय जा म्हणून सांगायला काय जातंय, नंतर आवरणार कोण, हा प्रश्न विचारुन मला गप्प केलं.  तुमचं ठरलं तर आम्हाला नक्की सांगा, म्हणून नवरा परत मदतीला आला.  ते दोघं गेले आणि मी हुश्श करत बसले.  पण नवरा किचनमध्ये गेला.  मी बाहेरचा पसरा आवरुन आत गेले तर त्यानं कॉफीची तयारी सुरु केलेली.  त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितल्यावर तो दिलखुलासपणे हसत म्हणाला, तुझं काय माझपण डोकं जड झालंय.  मला तर पर्यटन संस्थेच्या लोकांची अधिक काळजी वाटतेय...त्यावर ही कडक कॉफीच उपाय आहे...अर्थातच या त्याच्या वाक्यानं माझं डोकं तरी ठिकाणावर आलं होतं आणि गालावर हसूही....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

  

Comments

  1. खूप छान लेख.

    ReplyDelete
  2. असे पाहुणे येती

    ReplyDelete
  3. काही काही लोकांना पोच नसते. त्यांच्या मनात येतं ते बोलतात दुसऱ्यांना काय वाटेल याचा विचार करत नाही.

    ReplyDelete
  4. खूप छान.असे अनुभव ही येतात.

    ReplyDelete
  5. महेश टिल्लू17 September 2025 at 13:15

    जुन्या माणसांचा स्वभाव जात नाही,त्यांनी खूप कष्टात आयुष्य जगलेलं असतं.आपण बदलावं ,हा सोपा उपाय.

    ReplyDelete
  6. अश्या लोकांमुळे आपली सहनशक्ती वाढण्यास मदत होते. किती तरी वाक्य मनातले मनात बोलायला शिकवले.

    ReplyDelete

Post a Comment