....या जातीला आरक्षण द्याच
सायंकाळी रोज चालायला जातांना अनेक किस्से घडतात. सायंकाळी सात वाजले की, रस्त्यावर माणसांचा आणि वाहनांचा पूर वाहू लागतो. त्यातून वाट काढत चालणं ही एक कला आहे. बहुधा त्यात आपण पारंगत झालो आहोत, असा अभिमान वाटायला लागतो, तेव्हाच एखादा अपघात होतो, आणि आपलं विमान जमिनीवर लॅड होतं. तसंच माझं अभिमानानं विमान चार दिवसापूर्वी लॅंड झालं. गर्दी टाळत फुटपाथवरुन चालत असतांना मी धडपडले. नव-यानं पकडलं म्हणून नाहीतर मी पार त्या फुटपाथवरील लाद्या मोजणार होते. सावरुन उठले, तर समोरुन येणा-या मुलानं आम्हाला दोघांनाही, जरा बघून चालत जा ना, म्हणून सुनावलं. वास्तविक हे महाशय हाती मोबाईल घेऊन चालत होते. मोबाईलवर काहीतरी बघण्यात एवढे मशगूल झाले होते की, समोर काय आहे, याचा त्यांना पत्ताच नव्हता. फुटपाथवर जागा केवढी असणार, अशात मान खाली घालून येत असलेल्या या मुलाला बघून मी त्याला वाट देण्याच्या नादात बाजुला झाले आणि धडपडले. बरं ज्यासाठी आणि ज्याच्यामुळे मी धडपडले, त्याला याचा पत्ता लागलाच नाही. स्वारींची नजर त्या मोबाईलवरुन एक क्षण दूर झाली. आम्हालाच उपदेश करत पुन्हा त्या मोबाईल विश्वात रंगून स्वारी निघूनही गेली आणि मी डोक्याला हात लावून घेतला.
अलिकडे जाती आरक्षणावरुन लढा सुरु आहे. पण आपल्या समाजात एक नवी जात जन्माला आली आहे, त्या जातीकडे अत्यंत तातडीनं लक्ष देण्याची आणि तिच्यासाठी विशेष तरतुदी कऱण्याची गरज भासत आहे. ही नवी जात म्हणजे, मोबाईलधारी जात. मोबाईल हातात धरुन कायम नजर त्यात घुसवलेली ही जात खरोखर आरक्षणासाठी पहिली दावेदार आहे. कुठेही जा, मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला एक मोठा वर्ग दिसतो. बरं फक्त तरुणच असं मोबाईल हाती धरुन चालतात असंही नाही. सर्व वयोगटातील माणसं या मोबाईलच्या नादानं बावचळली आहेत की काय, हा प्रश्न पडतो. ब-याच महिला लहान मुलं सोबत असली तरी त्यांच्याशी बोलण्याऐवजी त्या मोबाईल चॅटमध्ये व्यस्त असतात. अशावेळी ती लहानगी आईबरबोर चालतांना खूप केविलवाणी दिसतात. मोबाईल आवडतो, त्यावर रिल बघायला आनंद येतो, फेसबूक, इन्टावर कायम लाईव्ह रहावसं वाटतं, वॉटस्अपवर आलेला कुठलाही मेसेज आल्याआल्या लगेच वाचावासा, नाही वाचला तरी त्याला त्वरित प्रतिक्रीया देण्याची घाई करणं, हे सर्व ठिक आहे. एका बाजुला बसून हे सर्व करा...पण रस्त्यात चालतांनाही त्या मोबाईलमध्ये आणि या सोशल मिडियामध्ये डोकं खूपसून घ्यायलाच हवं का. रोज चालायला जातांना असे अनेक नमुने भेटतात, आणि मन खिन्न होतं. मोबाईल, सोशल मिडिया हे चांगलं साधन आहे. मात्र या साधनाची दुसरी बाजू ही काळी आहे. याच काळ्या बाजुनं जाणारी एक वेगळी जात तयार होत आहे.
मध्यंतरी गाडीवरुन जात असतांना कानाला हेडफोन लावलेली एक तरुणी गाडीवर येता येता वाचली. तिला वाचवायला जोरात ब्रेक लावला आणि मागची गाडी आमच्या गाडीवर धडकली. पण जिच्यामुळे आम्ही धडकलो, त्या तरुणीला त्याचं काहीही नाही. उलट, काय, अशी खूण करुन बाई चालू लागल्या होत्या. मग तिच्या कानातले ते हेडफोन काढून तिच्या हाती दिले, आणि रस्ता आहे, बाग नाही, हे सांगितले. पण बाई आपल्या हेडफोनच्या गुर्मीत, पुन्हा ते हेडफोन कानावर लावून निघून गेल्या. या अशा मोबाईल धारींसाठी आता स्वतंत्र ट्रॅक बनवण्याची गरज येणार आहे. जसे अलिकडे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत ना...तसेच हे मोबाईल ट्रॅक करावे
लागणार आहेत. मग मोबाईल हाती पकडून, हेडफोन लावून कितीही मान खाली वाकवून ही मंडळी चालली, तरी अन्य कुणाला धक्का लागण्याची भीती रहाणार नाही. या सर्वात आणखी एक प्रगत प्रकारही आला आहे, त्यांच्यासाठीही वेगळा ट्रॅक करावा लागणार आहे. ही मंडळी कानाला मोबाईल लावून बेभानपणे टूव्हीलर चालवतात. ही मंडळी खतरोके खिलाडी प्रवर्गातील आहेत. कानाला मोबाईल लावायचा आणि तिरपी केलेली मान सांभाळत टूव्हीलरचा जोरात एक्सीलेटर पिळणारा कोणी दिसला की मी अंग चोरुन बाजूला उभी रहाते. पहिल्यांदा त्यांना जाऊ द्यायचं आणि नंतर आपलं बघायचं. बरं, यातही आणखी तल्लख मंडळी असतात. ती चक्क हेलमेटमध्ये फोन अडकवतात. आणि मग तो संवाद साधत रस्त्यावरचे खड्डे, ट्रॅफीक सांभाळून गाडीची दोन चाकं पळवत असतात. मला नेहमी प्रश्न पडतो, एवढा कोणाचा अत्यावश्यक फोन असतो. अगदी आवश्यक असेल तर जरा गाडी बाजुला थांबवून काही मिनिट संवाद साधला तर काय जातं. पण ते न करता, स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत गाडी का चालवतात, हे काही कळत नाही. त्यातही त्यांच्याबरोबर जे संवाद साधतात, त्या फोनपलिकडील माणसालाही अशा संवादाबद्दल काहीच आक्षेप नसावा हे सुद्धा मन खट्टू करणारं आहे.
या सर्वांच्या पलिकडे आता त्या रिलप्रेमींची आणि व्हिडिओ कॉल फॅनचीही एक जात तयार झाली आहे. अगदी चालतांनाही हाती मोबाईल पकडून त्यावर रिल बघत चालणा-यांना बघितलं की डोक्यावर हात मारुन घ्यावासा वाटतो. आजूबाजुला काय आहे, याचे भानही ही मंडळी विसरतात. त्या मोबाईलच्या
रिलमध्ये एवढं गुंतून जातात, की भर ट्रॅफीकमध्ये रस्ता क्रॉस करतांनाही बिंधास्त रहातात. ती रिल काय पळून जाणार आहे. तो व्हिडिओ कॉलचा प्रकारही असाच...रस्त्यावर चालत असतांना व्हिडिओ कॉलवरुन बोलण्यात काय आनंद मिळतो, तो त्यांचा ते जाणो. आपण कुठे आहोत, काय पहात आहोत, कसला आस्वाद घेत आहोत, हे दुस-याला दाखवण्याची इतकी घाई होते की, त्या वस्तूचा आनंद घेण्यापासून आपणच वंचित रहातो, हे या मंडळींना कधी कळतच नाही. समोर विद्युत रोषणाई दिसली, की लाव व्हिडिओ फोन...आमच्याकडे काय केलंय बघ...कुठे पर्यटन स्थळावर गेलं की, लाव तो व्हिडिओ फोन...बघा किती छान आहे....अरे बाबांनो त्या समोरच्यापेक्षा तुम्ही तरी त्या गोष्टीचा आस्वाद निट घेतलात का...त्या मोबाईलच्या कॉलपेक्षा तुमच्या डोळ्यांचे आधी समाधान होणे गरजेचे नाही का...
मला ही मोबाईलधारी मंडळी बघितली की असे अनेक प्रश्न पडतात. ब-याचवेळा काळजी वाटते. मान, खांदे किती दुखत असतील असा आगाऊ प्रश्न
मनात येतो. मग यासाठी कुठला व्यायाम करावा
लागेल, हे पुढचं गणित माझ्या मनात सुरु होतं.
मग जाणीव होते, ही एक वेगळीच जात निर्माण झाली आहे. त्यांना खरचं विशेष आरक्षणाची गरज आहे. त्यांची त्यांना वेगळी वाट करुन दिली पाहिजे. याच वाटेवर मग मोबाईल चार्जिंग सेंटरची मागणी
करण्यात येईल. पुढं झालंच तर मान आणि
खांदे दुखत असतील तर त्यांच्यासाठी मसाज सेंटर चालू होईल. एखादवेळी व्यायामही करुन घेता येतील...अर्थात
यातही ही मोबाईलधारी मंडळी जमिनीवर असतील तर नशीब...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
चांगला विषय घेतलास सई.
ReplyDeleteखरंच रेल्वेतून प्रवास करताना रस्त्यावर सुद्धा इतकी लोकं त्या मोबाईल मध्ये रुतलेली असतात की त्यांना आजूबाजूची माणसं बघावी दृश्यं बघावी आनंद घ्यावा असे वाटतच नाही. अशी माणसे स्वतः ला आणि दुसऱ्यांनाही घातक आहेत.
ज्वलंत विषय आहे पण सांगणार कोण कोणाला
ReplyDeleteखूप छान विषय,वास्तवदर्शी लेखन!
ReplyDelete... सौ.मृदुला राजे
खूप छान विषय अगदी ज्वलंत विषय म्हणायला हरकत नाही.तुझं म्हणणं खर आहे ही वेगळी जात च निर्माण झाली आहे.मोठा प्रश्न आहे समजा पुढे की यांचे काय करायचे.?
ReplyDeleteछान लिहिलंय. बाईकवरील मानमोडी आजारावर उपाय नाही तसं रस्ता मोकळा असतानाही आपल्या पुढील मोटार हळू चालत असेल तर समजून घ्या, तो किंवा ती मोटारीच्या स्टेरिंगवर एक हात आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन वॉट्स बघत आहे. हे वेड इतकं पराकोटीला गेलंय की अपघात घडला तर जखमींना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या ऐवजी लोकं व्हिडीओ काढतात. यांच्यासाठी आरक्षण, सुविधा नव्हे मनोचिकित्सा केंद्रे सरकारने काढली पाहिजेत
ReplyDeleteसई अतिशय विचार करायला लावणारा विषय घेतला आहेस. रस्त्यावर काय घरात सुध्दा हीच परिस्थिती आहे.. आपण काही सांगत असलो तरी लक्ष नसतं आणि हो हो म्हणतात. रस्त्यावर तर तू लिहीलं आहेस तेच दिसतंय... ललिता छेडा
ReplyDeleteKhup chhan vishay ahe. khup chhan lekh.
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे.अगदी खरं आहे.
ReplyDeleteकाही तरी उपाय करणे खूप गरजेचे आहे. आपण काळजी घेतली तरी समोरची व्यक्ती लक्ष नाही म्हणून आपल्याला धडकते काय करणार अशा वेळी ?
ReplyDelete