मेड इन इंडियाचा कणा....

 

 मेड इन इंडियाचा कणा


मेड इन इंडिया...हा शब्द ऐकायला गोड वाटतो.  सध्या आपले सरकार या मेड इन इंडिया साठी खूप प्रयत्नशील आहे.  भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंना मेड इन इंडिया हा गौरवशाली शब्द वापरण्यात येतो.  यातून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळत आहे.  आपल्या देशाला उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हेच या शब्दामागचे उदिष्ट आहे.  अर्थात मेड इन इंडिया या शब्दाची ही अगदी सरकारी भाषेतील व्याख्या आहे.  मात्र प्रत्यक्षात मेड इन इंडिया हा शब्द समजून घेण्याची संधी नुकतीच मला मिळाली.  नरसोबाच्या वाडीला आमचा दौरा झाला.  नेहमीप्रमाणे महाराजाचे दर्शन झाल्यावर अवघी वाडी पायी पालथी घालण्याचा आमचा नेम.  वर्षातून किमान दोन वेळा तरी वाडीला आम्ही जातो. त्यामुळे कुठे काही नवीन दिसलं की लगेच तिथे हजर होतो.  यावेळेही असेच एक नवीन दुकान दिसले.  चौकशी केल्यावर कळलं की दुकान जुनचं होतं, पण आमची नजर आत्ता त्यावर गेली.  वरुन लाकडी खेळण्यांचं दुकान वाटेल अशी सजावट होती.  पण दुकानात गेल्यावर अवघा सुबक खजाना यात दडवून ठेवल्याची जाणीव झाली.  हे दुकान सांभाळणारी एक महिला होती.  त्या महिलेचे पती या सर्व खेळण्यांची निर्मिती त्यांच्या कारखान्यात करतात, याची माहिती मिळाली.  इंजिनिअर असलेला त्यांचा मुलगा या सर्व खेळण्यांच्या


मार्केटिंगसाठी देशभर दौरे करतो.  आम्ही जस्ट बघूया, म्हणून या दुकानात गेलो होतो, पण तिथेच हरवलो.  एक तर दुकानतली प्रत्येक वस्तू सुबक आणि आकर्षक होती, दुसरं म्हणजे, या दुकानाची मालकीण.  सौ. ज्योती चंद्रकांत सुतार.  ज्योतीताईंचे पती, चंद्रकांत सुतार हे, ही सर्व खेळणी तयार करतात.  त्यांची विक्री ज्योतीताई करतात.  आपल्या पतीची ही कला दाखवतांना त्या अगदी हरखून गेल्या होत्या.  आम्ही नुसतं बघणार, असं सांगून दुकानात गेलो, आणि दिवाळीची सर्व खरेदी करुन या दुकानातून बाहेर पडलो.  हे फक्त परफेक्ट मार्केटिंगचे उदाहरण नव्हे तर मेड इन इंडिया म्हणजे काय, याचे पक्के उदाहण आहे.  आपल्या घरातील निर्मित वस्तू किती मजबूत आहे, त्याचे फायदे किती आहेत, ती वस्तू बनवण्यासाठी किती काळजी घेतली जाते, आदी सर्वांची माहिती या ज्योतीताईं सारख्या महिला जेवढ्या आत्मितयतेनं देतात, त्यातूनच या मेड इन इंडियाचा पाया भक्कम होत असल्याचे मला जाणवले.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेले


नरसोबाची वाडी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.  श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून दत्तमहाराजांचे भक्त या वाडीमध्ये येतात.  याच वाडीच्या बाजारपेठेत विश्वकर्मा वुडन टॉईज नावाचे दुकान आहे.  अगदी नरसोबा वाडीच्या ग्रामपंचायतीनं उभारेल्या भल्यामोठ्या पार्किंगसमोर हे दुकान आहे.  सौ. ज्योती चंद्रकांत सुतार या २०११ पासून हे दुकान चालवत आहेत.  ज्योतीताईंचे पती, चंद्रकांत शामराव सुतार हे सुतार आहेत.  वंशपरांपरागत आलेला हा व्यवसायाला चंद्रकांत सुतार यांनी आपल्या मेहनतीनं नवीन आकार दिला आहे.  त्यांचा फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे.  चंद्रकांत सुतार यांची या कलेवर हुकमत आहे, ज्योतीताईंच्या सांगण्यानुसार त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची पाच नाही तर पन्नास वर्ष गॅरेंटी दिली जाते.  याच चंद्रकांत सुतार यांनी सुरुवातीला त्यांच्याकडील उत्तम लाकडाच्या तुकड्यापासून लहान मुलांची खेळणी तयार करायला सुरुवात केली.  ही खेळणी तयार झाली, पण त्यांची विक्री कोण करणार, हा प्रश्नही आला.  अशावेळी त्यांची पत्नी, त्यांच्यामागे उभी राहिली.  ज्योतीताई अगदी सुरुवातीला छोट्याशा पिशवीत भरून ही खेळणी वाडीमध्ये विक्रीसाठी घेऊन येत असत.  रस्त्याच्या कडेला, छत्री उभारुन दिवसभर त्या खेळणी विकायच्या.  हळूहळू त्यांचा विश्वास वाढला, आणि खेळणीही मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली.  अशावेळी त्यांनी विश्वकर्मा वुडन टॉईज नावाचे दुकान सुरु केले.  या पतीपत्नींनी आपल्या मुळ व्यवसायाला जोड म्हणून सुरु केलेला हा व्यवसाय सुस्थितीत येण्यासाठी

ज्योतीताईंचे हे पाऊल पायभरणीसारखे ठरले.  ब-याचवेळा या खेळण्यांना रंग लावलण्याचे कामही त्या करत असत.  या सर्वात त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारीही होती.  सुरुवातीला अगदी मोजकी खेळणी तयार करणा-या चंद्रकांत सुतार यांनी आपल्या कारखान्यात हळूहळू या खेळण्यांना मोठी जागा द्यायला सुरुवात केली.  काही ठिकाणी दौरे केले.  त्यातून लाकडाच्या खेळणी कशी तयार करायची, त्याचे मार्केटिंग कसे करायचे, लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी या लाकडाच्या खेळण्यांचा कसा उपयोग होतो, आदी सर्वांचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली.  याचा परिणाम म्हणजे, त्यांच्या हातून अनेक प्रकारची लाकडाची खेळणी आणि शोभेच्या वस्तू तयार होऊ लागल्या. 

आता या दुकानामध्ये एकापेक्षा एक सरस वस्तू आहेत.  त्यात सर्व आकारातील लाकडाची बैलगाडी, सोबत तेवढेच उमदे दिसणारे पांढरे शुभ्र बैल, तशीच पांढरी शुभ्र बगळ्यांची जोडी, धुप स्टॅड, चपातीचा डबा, मसाल्याचा डबा, लाकडी स्कुटर, गणपती बाप्पा, छोटीशी रेल्वेगाडी, बाहुल्या, वाजंत्री, मिनी बॅंक अशा एक ना दोन, हजार वस्तू या दुकानात पहायला मिळतात.  मात्र या दुकानाची खरी ख्यासियत आहे ती त्यामध्ये मिळणा-या लहान मुलांच्या खेळण्यात.  अलिकडे मुलं मोबाईलमध्ये मान वाकडी करुन बसलेली असतात.  या मुलांना मोबाईलच्या बाहेर काढायचे असले तर ज्योतीताईंच्या दुकानातील खेळणी नक्कीच उपयोगी पडतील अशीच आहेत.  त्यातील खुळखुळ्यासारख्या आकाराच्या खेळण्यामध्ये एक चेंडू टाकण्याचा गेम तर खास आहे.  यामुळे मुलांची एकाग्रताही वाढत असल्याचे ज्योतीताई सांगतात.  शिवाय लाकडाचा


बाजाही आहे.  त्यावरील रंग आणि नक्षीही एवढी सुबक आहे की, लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही त्याचा मोह पडतो.  या सर्वात ट्यूब गेम, खुळखुळा, एबीसीडी शिकवणारी गाडी, बुद्धिबळ, रंगीत ठोकळ्यांचा गेम आदी अनेक प्रकार या दुकानात पहायला मिळतात.  उत्तम लाकडाच्या माध्यामातून केलेली ही खेळणी तेवढ्याच छान रंगात रंगवलेली आहेत, त्यामुळे मुलं याकडे आकर्षित होतात. 

याशिवाय घर सजावटीसाठीही अनेक शोभेच्या वस्तू ज्योतीताईंकडे आहेत.  त्यात विविध प्रकारचे फ्लॉवरपॉट आहेत.  २५ वर्षापासून सुरु असलेल्या खेळण्यांच्या व्यवसायाला आता या जोडप्यानं आपल्या मेहनतीनं परदेशातही पोहचवलं आहे.  शाळांमधूनही या खेळण्यांना मोठ्याप्रमाणात मागणी आहे.  सुतार दांम्पत्याच्या या व्यवसायाला मोठी उभारी मिळाली ती त्यांच्या मुलामुळे.  सौरभ चंद्रकांत सुतार हा त्यांचा मुलगा आपल्या या व्यवसायाला ख-या अर्थांनं मेड इन इंडिया या लेबलखाली घेऊन आला आहे.  सौरभनं दत्त


पॉलिटेकनिक, शिरुळ मधून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेतली आहे.  त्यानंतर सौरभ अन्य मुलांसारखा नोकरीला लागला.  पुण्यामध्ये जापनीज कंपनीमध्ये तो दोन वर्ष कामाला होता.  कोरोनाच्या काळात तो कोल्हापूरला परतला आणि स्थानिक कंपनीमध्ये एक वर्षासाठी नोकरी केली.  पण जात्याच कल्पक असलेल्या सौरभनं मग या नोकरीला रामराम करुन आपल्या वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे उतरण्याची तयारी केली.  वडिलांचा व्यवसाय तो सांभाळू लागला, आणि काही हजारात उत्पन्न असलेला खेळण्यांचा उद्योग आता कोटींची भरारी मारत आहे.  हा आकड्यांचा खेळ दिसत असला तरी यामागे सौरभनं जी मेहनत घेत आहे, त्याला तोड नाही.  २०२२ नंतर या खेळण्यांच्या व्यवसायाला त्यानं देश-विदेशात पोहचवलं आहे.  मोठ्या ऑर्डर त्याला मिळू लागल्या.  पण यासाठी त्यानं देशभरात अभ्यास दौरे केले आहेत.  दिल्ली, वायझॅक, सावंतवाडी, म्हैसूर, तेलंगाणा या भागात फिरुन त्यानं लाकडाची खेळणी कशी करायची याची माहिती करुन घेतली.  त्यातील नवीन प्रकार शोधून काढले, शिवाय त्यांच्या मार्केटिंगच्या काय संधी आहेत, याची चाचपणी करण्यासाठी देशभरात लागत असलेल्या मोठ्या प्रदर्शनांमध्यो तो आवर्जून जाऊ लागला.  त्यातून त्याला मार्केटची कल्पना आली.  कुठल्या

खेळण्यांची गरज आहे, याची माहिती मिळाली.  लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये असलेली चीनची मक्तेदारी मोडण्यासाठी ही आपली लाकडाची खेळणी पुरेशी आहेत.  पण त्यांची निर्मिती ही आजच्या मुलांच्या गरजेनुसार होणे आवश्यक आहे, याची जाणीव झालेल्या सौरभनं मग आपल्याकडील लाकडाच्या खेळण्यात अमुलाग्र बदल केले.  मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी, त्यांना मोबाईलपासून दूर करण्यासोबत अभ्यासाला मदत होईल, अशी लाकडाची खेळणी करण्यावर त्यानं भर दिला.  त्याचा हा बदल फायदेशीर ठरला आणि आता त्यांच्या उत्पादनांना भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठी मागणी येऊ लागली आहे.  सौरभ आपल्या वडिलांची कला सर्वदूर नेण्यासाठी धडपडत आहे.  मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषांवर त्यांची पक्की पकड आहे.  सोबतच तो मल्लू, तेलगू आणि तामिळ या भाषाही बोलू शकतो.  या सर्वांचा  मार्केटिंगसाठी चांगला उपयोग होत असल्याचे तो आत्मविश्वासानं सांगतो.  आता येत्या पाडव्याला त्याला आणखी एक आऊटलेट चालू करायचं आहे.  शिवाय पुढच्या वर्षासाठीचा टर्नओव्हरही किती करोडनं वाढवायचाय याचं टार्गेट त्यानं नक्की केलंय. 

हे सर्व करतांना सौरभ आपल्या आईच्या, ज्योतीताईंच्या मेहनतीला सलाम


करतो.  वाडीतील दुकानाची पायाभरणी ज्योतीताईंच्या चिकाटीमुळे झाली, हे तो अभिमानानं सांगतो.  अर्थात, मंडळी हाच आपल्या मेड इन इंडियाचा कणा आहे.  आपल्या परंपरागत कलेचा मान ठेऊन त्याला नव्या पिढीच्या मागणीनुसार आकार देणे, हे मेड इन इंडियाचे यश ठरणार आहे.  वाडीचे सुतार कुटुंबिय, या मेड इन इंडियाचा एक भाग आहे.  अर्थात तुम्हालाही कोणाला ही सुबक लाकडी खेळणी किंवा शोभेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर आपण सौरभ चंद्रकांत सुतार याच्याबरोबर संपर्क साधू शकता.  ७०३८१४९४०२ हा सौरभचा संपर्क क्रमांक आहे.  आपल्या देशाच्या मेड इन इंडिया, हा स्वावलंबनाचा लढा आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच सफल आणि समृद्ध होणार आहे.

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Absolutely incredible

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you ma'am, you supporting me and display our journey to everyone thank you so much grate job ma'am, God always bless you with family 🙏

      Delete
  2. खूप छान ओळख करून दिलीस सई आज..
    वाडीला गेल्यावर दुकानाला नक्की भेट देणार

    ReplyDelete
  3. सई, तुझ्या निरीक्षणाला, नाविन्यपूर्ण उपक्रमांना दाद देण्याच्या वृत्तीला मनापासून प्रेम... ललिता छेडा

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती दिली होती.

    ReplyDelete
  5. छान लिहिलंय! सावंतवाडी इथंही अनेक व्यवसायिक स्वतः लाकडी वस्तू तयार करून विकतात. त्या चायनीज खेळण्यापेक्षा महाग वाटतात पण त्याच्या मागे मेहनत कष्ट असतात

    ReplyDelete

Post a Comment