वैचारिक ब्रॅण्डची दाणादाण

 

वैचारिक ब्रॅण्डची दाणादाण


तिची आई मला शिकवणार, मला म्हणते, लेकीला पुढचं शिक्षण घेऊ दे.  शिकून काय करणार हिची लेक...नोकरी...ती तर आमच्या खानदानात कोणत्या बाईनं केली नाही...तिच्या आईला सुनावलं मी यावर चांगलं....हे अशा शब्दांचे फटाके माझ्यासमोर फुटत होते, तो दिवसही खास होता.  दिवाळीतील पाडव्याचा सण.  नवरा-बायकोमधील प्रेमाचा अनुबंध अधिक दृढ करणारा हा सण.  त्याच दिवशी माझ्यासमोर बसलेला एक नवरा त्याच्या बायकोबद्दल त्याच्या बहिणीकडे तक्रारींचा पाढा ऐकवत होता.  मंबईच्या लोकलचा डबा.  सणाच्या दिवशी खचाखच भरलेल्या या डब्यामध्ये बसलेले हे नवरोबा, आपल्याच बायकोबद्दल अगदी टिपेच्या आवाजात बहिणीबरोबर बोलत होते.  त्याच्या या टिपेच्या आवाजामुळेच या गृहस्थाकडे माझं लक्ष गेलं.  मी अगदी त्याच्या समोरच्या सिटवर बसले होते.  त्याच्याकडे आयफोन होता.  कपडेही ब्रॅण्डेड दिसत होते, अगदी शूजही.  फक्त भाषा आणि त्या गृहस्थावर झालेले संस्कार हे कुठल्याही ब्रॅंण्डच्या व्याख्येत बसत नव्हते.  आपण काय बोलतो, कुठे बोलतो, कोणाबद्दल बोलतो, आदी प्रश्नांची तमा न बाळगता हा माणूस अखंड बडबडत होता, आणि पलिकडून त्याची बहिणही बहुधा  तेवढ्याच तन्मयतेनं ऐकत होती आणि त्याला प्रतिसाद देत होती. 


दिवाळीच्या दिवसात शक्यतो, आम्ही ट्रेनचा प्रवास टाळतो.  कारण त्यातील गर्दीमुळे सणाचा आनंदच विरघळून जातो.  मात्र यावर्षी आमच्या कुटुंबातील कार्यक्रमासाठी हा नेम मोडला.  सकाळचा कार्यक्रम दुपारी दोनपर्यंत संपला आणि आम्ही परतीसाठी ट्रेन पकडली.  मला बसायला जागा मिळाली.  नव-यानं मला बसतांना अधिक सुटसुटीत व्हावं म्हणून हातीतील समानाच्या सर्व बॅग वरच्या रॅकमध्ये ठेऊन दिल्या.  या सर्वात माझ्या समोर बसलेला एक व्यक्ती जोरजारोत बोलत होता.  सुरुवातीला त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.  पण नंतर त्याचे जळजळीत शब्द कानावर आले, आणि आम्ही दोघांनीही एकदम त्याच्याकडे बघितलं.  हातात आयफोन घेऊन बसलेली ही व्यक्ती फारतर तिशीच्या आसपास असावी.  त्याच्या पत्नीला दिवस गेले होते.  ही आनंदाची बातमी तो बहिणीला सांगत होता, मात्र त्यातील सूर वेगळा होता.  त्याच्या पत्नीला शिकण्याची इच्छा होती, मात्र लग्नानंतर तिचे शिक्षण थांबवण्यात आले होते.  त्याबद्द्ल या तरुणाच्या सासूनं तक्रार केली होती.  मुलीला नोकरी करण्याची इच्छा आहे, ती करु द्या, म्हणून सासूबाईंनी जावयाला विनंती केली होती.  पण हा जावई तालेवर होता.  या एका इच्छेनंतर त्यानं सासूची पार पिसं कशी काढली, याची बढाई तो त्याच्या बहिणीकडे करत होता.  त्यांच्या खानदानात म्हणे कोणत्याही महिलेला नोकरी करण्याचा अधिकार नाही.  यावर घरात काय कमी आहे, हा त्याचा डायलॉग होता. त्याची बहिण आणि वहिनी सुद्धा शिकल्या होत्या. पण त्या कुठे नोकरी करतात, हा प्रश्न त्यानं

पलिकडे आपल्या बहिणीलाच विचारला होता.  हद्द म्हणजे, त्या बहिणीनंही यावर भाऊच बरोबर असल्याचे सांगितले.  त्यानंतर सासू आपल्याकडे रहायला आल्यावर तिची किती बडदास्त ठेवायला लागते, याचीही यादी हा तरुण आपल्या बहिणीला देत होता.  सासूला सफरचंद खायला आवडतात, पण त्याचा बाजार भाव काय आहे, एवढं महागातलं सफरचंद ती खाते...हे तो आयफोन असलेला तरुण एवढ्या तावातावानं सांगत होता की मी मोठा आ...करुन त्याच्याकडे बघत राहिले होते.  त्यानंतर फ्लॅटचा हिशोब झाला.  सुरुवातीला फ्लॅट घेतांना म्हणे, बायकोच्या नावावर करणार होता. पण सुबुद्धी झाली आणि फ्लॅट बायकोच्या नावावर केला नाही, नाहीतर ती आणखी डोक्यावर बसली असती...अशी बरीच मुक्ताफळं नंतर चालू होती. 

माझ्या समोरच्या सिटवर बसलेल्या या तरुणांचा बाकी वरचा आवतार ब्रँण्डेड होता.  गळ्यात सोन्याची चेन, हातात ब्रॅंण्डेड घड्याळ,  अगदी शूजही...पण तोंड उघडल्यावर या ब्रॅण्डचा बाजा वाजवेल, असे त्याचे संस्कार होते.  त्याचे बोलणे ऐकत, माझ्या तोंडाचा झालेला आ....पाहून शेवटी नव-यानं दुसरी सीट पकडली.  विंडो सीटचे लालूच दाखवून डब्याच्या अगदी दुस-या भागात मला घेऊन गेला.  तिथे बसल्यावरही मी वळून त्या तरुणाकडे बघितले, तेव्हाही तो तसाच फोनवर बोलत होता.  आता अधिक पसरुन बसला होता, अर्थात त्याच्या गप्पाही अधिक पसरल्या असणार, कारण त्याच्या बोलण्याला आता हसण्याची जोड मिळाली होती.  त्याला जाऊदे, तू हे बघ म्हणत, माझ्या नव-यानं हातात पिशवी देत माझं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला.  मी मग त्याच्या पत्नीबदद्ल विचार करु लागले.  त्याच्या फोनवरुन बोलण्यानुसार तिचं वय पंचवीस वर्षाचं होतं.  बहुधा तिला वडिल नव्हते.  सर्व जबाबदारी


आईच पार पाडत होती.  तिला दिवस गेले होते, आणि तिचा नवरा तिला किती रुपयाचं शहाळ्याचं पाणी दिलं, याचा हिशोब मांडत होता.  मला तिची किती घुसमट होत असेल, याची जाणीव होत होती.  अनेकवेळा बाहेरच्या ब्रॅण्डेड आवरणाला भुलून मुली लग्न करतात, आणि अवघं आयुष्य स्वतःच्यातला आत्मसन्मान कोंडून टाकतात.  यात त्यांच्या मनाची किती होरपळ होते, याची कल्पना करत येत नाही.  मला या अदृष्य तरुणीचा विचार करत असतांना माझी एक मैत्रिण आठवली.  नवरा सरकारी नोकरीत.  गावी मोठी शेतजमीन.  बक्कळ पैसा.  कसलीही कमी नाही.  पण स्वातंत्र्याच्या नावानं बोंब.  अगदी स्वतःसाठी एक पिन जरी विकत घ्यायची असले तरी त्याचा हिशोब द्यावा लागतो, आणि गरज आहे का, हा प्रश्न ऐकावा लागतो.  हे सर्व खूप साठलं की ती घरी येते आणि माझं डस्टबीन होतं.   ती मोकळी होत, जाऊदे, मुलांचं तर व्यवस्थित होत आहे ना...अशी व्यापक भूमिका मांडत स्वतःला पुन्हा त्या कोषात झाकून देते.  हा सर्व विचार करत असतांना आमचं स्टेशन आलं.  हातात दोन मोठ्या पिशव्या होता.  ज्या कार्यक्रमात गेलो होतो, तिथे माझा सत्कार केला होता.  पुष्पगुच्छ, ट्रॉफी, शाल, श्रीफळ यांच्या दोन पिशव्या आणि खांद्याला माझी पर्स.  नव-यानं त्या दोन पिशव्या हातात धरल्या, ट्रेन थांबताच तो आधी उतरला आणि मग मला हात दिला.  त्याचा सावकाश, हा शब्द एवढा हळूवार होता, की माझ्या मनातलं द्वंद थोडंतरी शांत झालं.  शेवटी प्रत्येकीला आवाज असतो, हा आवाज कधी, कसा, कुठे वापरायचा याचा निर्णय तिनं घ्यायला हवा...एकूण काय एकवीसावं शतक येवो की एआयचं युग येवो...प्रत्येक ती...ला तिची लढाई लढायची आहे....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

  

Comments

  1. छान लेख.
    भय इथले संपत नाही

    ReplyDelete
  2. छान लेख.
    भय इथले संपत नाही

    ReplyDelete
  3. स्वभाव, संस्कार, विचार करण्याची पध्दत

    ReplyDelete
  4. उत्तम

    ReplyDelete
  5. छान लिहिलंय! काही पती आणि पत्नी मधील मतभिन्नता, त्या महिलांना स्वतःच्या मनासारखं वागता न येणे हे लिहिताना तुमचा पती काळजी घेतोय हे प्रकर्षाने जाणवलं!

    ReplyDelete
  6. आदरणीय सइजी
    आपण अतिशय सुंदर लिहिले आहेत
    व्यक्ती तितक्या प्रकृती असे समजावे समाजात असे नमुने भेटतच राहतात लक्ष दिल्याने आपली मनस्थिती बिघडते आपण आनंदात आपलं परिवारा आनंदात...

    ReplyDelete
  7. अगदी खरं आहे.

    ReplyDelete
  8. अगदी खरं आहे.

    ReplyDelete
  9. प्रवासातील अनुभव सर्वच चांगले असतात असं नाही.

    ReplyDelete
  10. खूप छान लेख.

    ReplyDelete
  11. खूप छान लेख अजूनही अशा विचारांची माणसे सापडतात.मला वाटते प्रत्येक स्त्रीनेच हे काम हाती घेतले पाहिजे की आपल्या मुला वर असे संस्कार केले पाहिजेत त्याने स्त्री जातीचा मान राखला पाहिजे.बायका काय करतात आपल्याला जे मिळालं नाही (नोकरी,स्वातंत्र्य)ते माझ्या मुलीला मिळालं पाहिजे असा आग्रह असतो तसाच अग्रह सुनेच्या बाबतीत ठेवला पाहिजे असे संस्कार मुलावर केले पाहिजेत.

    ReplyDelete

Post a Comment