फराळाची फारकत

 

फराळाची फारकत


दिवाळी झाली. पण डब्यात अजून दिवाळी आहे.  म्हणजेच आमच्याकडे अगदी डब्याच्या तळाला गेलेला थोडाफार फराळ शिल्लक आहे. अर्थात लेकाला फराळाची दुसरी फेरी पाठवण्यासाठी पुन्हा सगळा फराळ झाला, ही बात वेगळी.  पण यावेळी दिवाळीत प्राकर्षानं जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, फराळ फारसा केला जात नाही.  दिवाळीचे मुख्य वैशिष्ट असलेल्या फराळासोबतच फारकत घेत, आनंदानं ही गोष्ट कबूल करणारे अनेकजण यावेळी भेटले.  त्यासाठी सांगितलेली कारणंही अगदी खास होती.  दरवर्षी तेच-तेच काय खायचं, म्हणून फराळाऐवजी ऐन दिवाळीत समोसा खाऊ घालणारेही भेटले. तर आमच्याकडे  नेहमी चकली, चिवडा होतो, आता त्यात काही नवीन वाटत नाही, असं सांगून दिवाळीच्या फराळाला हिणवणारेही भेटले.  आता सांगा ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतोय म्हणून श्रावणातल्या पावसाचं महत्त्व कमी होणार आहे का....

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे....

ही कविता श्रावणातल्या पावसातच ओठावर येते.  आता जो ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतोय, त्याला पाहून काय....ही....आहे....कधी जाणार....अशा स्वरुपाचे सुविचारच मनात अधिक येतात.  माझ्यामते दिवाळीतील फराळ आणि अन्य महिन्यातील फराळ, यात अशाच स्वरुपाचा फरक आहे. 


दिवाळी हा सण दिव्यांचा, रोषणाईचा, रंगाचा जसा असतो, तसाच तो फराळाचा आणि त्यानिमित्तानं माणसं जोडण्याचा असतो.  दिवाळच्या जेवढ्या काही आठवणी आहेत, त्यात हा फराळ प्रमुख घटक आहे.  लहानपणी आई हरा भरुन करंजा करायची.  माझा पोलपाट लाटण्यावर हात बसण्यासाठी या करंज्याच कारणीभूत ठरल्या.  त्याच्या लाट्या लाटायचे काम माझ्याकडे यायचे.  आणि एखाद दुसरी करंजी तेलात जाऊन फसली की, लक्षं कुठे आहे...लाटी जरा पातळ नको, की फार जाड नको...हे सांगून जीवनाचा समतोल कसा राखला पाहिजे, याचा अनाहूतपणे धडा द्यायची.  पोह्यांच्या चिवड्याला फोडणी पडली, की त्या गरमा गरम चिवड्यातून शेंगदाणे, काजू, खोब-याचे तुकडे वेचून खायला गोड वाटायचे...पण आई पुन्हा शाब्दीक धपाटा द्यायची.  आपण निवडून खायचं, आणि बाकीच्यांना काय, नुसते पोहे...म्हणत तो चिवड्याचा ढीग पुन्हा सावरायची.  शंकरपाळ्या हा आणखी एक वेगळा विषय.  बहुधा शंकरपाळ्या करण्यासाठीचा शेवटचा गोळा माझ्या ताब्यात यायचा.  सरळ रेषा कशी मारायची, याचा पहिला सराव या शंकरपाळ्यांनी करुन घेतलाय.  एकसारख्या चौकोनी किंवा आयताकृती शंकरपाळ्या जोपर्यंत त्या झिकझॅक कैचीनं करता येत नाहीत, तोपर्यंत आईचं पुन्हा लाट, पुन्हा कर...हे पालुपद चालू असायचं.  कंटाळा आला तर, आपण, हा फराळ आपल्या पाहुण्यांना देणार.  त्यांना असं वाकडंतुकडं खाऊ घालायचं का, ते तू ठरव म्हणून त्या शंकरपाळ्यांचा डाव माझ्याकडे सरकवायची.  मग, आणखी दोन-चारवेळाच्या सरावानंतर बरोबर चौकोनी शंकरपाळ्या पडायच्या. 

चकली हा प्रकार सर्व कुटुंबाच्या शक्तीची परीक्षा घेणारा ठरायचा.  चकली


आणि शेवेचा लाकडी साचा, हे तेव्हाचे आणखी एक अजब होते.  आता मी वापरते तो साचा अगदी सहज, सोप्पा आहे.  एक बटन दाबले की, चकलीचे सारण बाहेर येते.  मात्र जुना लाकडी साचा हट्टी असायचा.  बहुतेक घरात अवघं कुटुंब या साचातून चकली पाडतांना दिसायचं.  आमच्याकडेही तशीच गत होती.  कारण तेव्हा चकली, हा फक्त दिवाळीपुरता पदार्थ होता.  त्यामुळे भले मोठे दोन डबे भरुन चकली व्हायची.  ती सुद्धा तुळशीच्या लग्नापर्यंत पुरायची नाही.  तुळशीच्या लग्नाचा प्रसाद म्हणून मग पुन्हा चकलीचा घाट घातला जायचा. 

या सर्व अवघड वाटणा-या फराळाच्या घाटासोबत आईचे नकळत झालेले संस्कार नंतर कामी आले.  लग्न झाल्यावर पहिल्या दिवाळीला मी फराळ करु शकेन, यावर नव-याचा विश्वास नव्हता.  त्यामुळे चांगला फराळ आणतो, हे सांगून तो बाहेर पडला आणि थेट दादरला फराळ आणण्यासाठी गेला.  त्या वेळेत मी, खुसखुशीत साठ्यांची करंजी, शंकरपाळी, चिवडा, मूगाचे लाडू तयार केले होते.  नवरा घरी आला, तेव्हा त्याला हे सरप्राईज खूप आवडले.  अर्थात त्यानं विकत आणलेला फराळ नंतर काही दिवस फक्त शो-पीस म्हणून डब्यात पडून राहिला होता.  पुढे नोकरीच्या काळात तर हे फराळ प्रकरण सांभाळतांना तारेवरची कसरत झाली.  एकदा तर नाईट शिप करुन आल्यावर डुलक्या मारत फराळ केला होता.  अर्थात आई ज्या प्रमाणात फराळ करायची, तो टप्पा कधी गाठता आला नाही.  पण तेवढे प्रकार मात्र नक्की करत राहिले.  त्यामुळे आजही एक रात्र जागून दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळा फराळ तयार होतो.  आता अनेकवेळा रिल बघून काहीतरी नवीन पदार्थ करावासा वाटतो, पण जेव्हा फराळाची सुरुवात होते, तेव्हा हात पुन्हा त्या ठराविक साच्यात विसावतो.  गेल्या चार वर्षापासून तर लेकाच्या निमित्तानं हा सगळा फराळ दोन-चार महिन्यांनी होत आहे.  पण तो त्याच्यासाठी असल्यामुळे


अगदी नावाला देवापुढे नैवेद्य म्हणून ठेवायचा आणि बाकी डब्यात भरुन रवाना करायचा.  हे सर्व सांगायचे निमित्त म्हणजे, यावर्षी दिवाळीला अनेक घरातून आमच्याकडे फराळ करत नाही.  आता तो कोण खात नाही.  नेहमी तेच तेच काय खायचे.  फराळ खाल्यानं अँसिडिटी होते, इथपासून ते फराळामुळे शुगर वाढते, तेला-तुपाचा त्रास होतो अशी कारणं पुढे आली.  मी ज्या मित्रपरिवारामध्ये फराळ घेऊन गेले होते, त्यांनी आमच्यापुढे पंजाबी समोसे आणि कचोरी, फराळ म्हणून ठेवली.  त्यांच्याकडे तेलाचा फार वापर होत नाही, म्हणून आता फराळ करणे टाळले असल्याचे त्यांनी आधी गप्पा मारतांना सांगितले होते.  अर्थात, हे सांगितल्यावर मी समोरचे समोसे ओव्हनमध्ये भाजलेत का, हा प्रश्न विचारणार होते, पण नव-यानं आधीच ओळखून गप्पांचा विषय बदलला.  असो.  पण येथून बाहेर पडतांना नव-यानं आता यांच्याकडे पुढच्यावर्षीपासून फराळ नको आणायला,  असं सुचवून बघितलं.  पण माझ्यामते दिवाळीचा फराळ ही संस्कृती आहे.  खाद्यसंस्कृती.  त्यातील प्रत्येक पदार्थाचे आगळे महत्त्व आहे.  दिवाळीसोबत

येणा-या थंडीच्या महिन्यांसाठी शरीराचा समतोल राखणारे गणित त्यात दडलेले आहे.  आज काही जणांना त्याचा कंटाळा येईल, मान्य आहे.  पण आपण त्यासाठी कशाला पदर सोडायचा.  कुठलिही फॅशन परतून येतेच.  तसंच या फराळावर आलेल्या आलेल्या आडपडद्याचे आहे.  या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा गड्या आपला फराळच बरा...म्हणत, फराळ करतांनाच्या सुरस कथा सांगितल्या जातील. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. आदरणीय सई जी अतिशय उत्तम दिवाळीच्या फराळाचे आपण वर्णन केलेले आहे वर्षानुवर्षांपासून दिवाळीला गृहस्वामिनीने परिवाराच्या आवडत्या पदार्थाचा दिवाळीच्या वेळेस तयार करणे आणि आवडीने सर्वांना खाऊ घालावे हा सणासुदीचा आनंदातील एक भाग आहे याची आपण छान वर्णन केलेले आहे

    ReplyDelete
  2. दिवाळीचा फराळ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. दिवाळी म्हणजे कंदील ,फराळ , पणत्या , रांगोळ्या, एकमेकांच्या घरी फराळ नेऊन देणे आणि फटाके सुद्धा .वर्षभर अनेक जण वेगवेगळे फराळाचे पदार्थ करत असले ( अशा अशी मंडळी बहुदा हे पदार्थ विकतच आणतात😄 ) तरी एकाच दिवशी सर्व प्रकार करत नाही. त्यामुळे दिवाळीचे हे महत्व राहणारच👍✨️

    ReplyDelete
  3. दिवाळीचा फराळ हायजेनिक नाही म्हणायचा आणि ब्रेड पास्ता पिझ्झा खायचे . वडे सामोसे अनेक वेळा तळलेल्या तेलात खायचं.किती चुकीचं आहे हे. मी दरवर्षी व्यवस्थित फराळ बनवते आणि खातेही.
    काही तब्येत बिघडत नाही आणि वजनही वाढत नाही

    ReplyDelete
  4. खूप छान अगदी खरं आहे.

    ReplyDelete
  5. सर्व सणांचा राजा दिवाळी. दिवाळी म्हटली की, सडा रांगोळी, दिव्यांचा झगमगाट, फराळ व त्यासोबत प्रत्येक नाते अधिक घट्ट करणारे आपली ही संस्कृती. दरवर्षी काय तेच पदार्थ, शुगर वाढते, तेलकट असणं हे बोलणं म्हणजे पुढच्या पिढीला आपणच आपल्या संस्कृती पासून दूर करत आहोत.

    ReplyDelete
  6. खूप छान, दिवाळीच्या फराळाइतकाच खमंग, खुसखुशीत लेख! शाब्दिक फराळ आवडला.
    प्रेषक... सौ.मृदुला राजे

    ReplyDelete
  7. खूप छान लेख

    ReplyDelete
  8. महेश टिल्लू7 November 2025 at 21:47

    प्रत्येकांच्या काही न काही आठवणी असतात,बालपणीच्या आठवणी अधिक रम्य.. पूर्वीच्या काळात खूप पदार्थ बनत असत. आता वेळ तसेच तब्येतीच्या तक्रारी यामुळे सर्व पदार्थ करणे आणि त्याचा आस्वाद घेणे यावर मर्यादा आहेतच. दिवाळीचा फराळ gi एक संस्कृती आहे हे या लेखातील तुमचे वाक्य,या लेखातील सेंट्रल लाइन आहे असे मला वाटते.

    ReplyDelete

Post a Comment