त्यांना काय माहित, आईची तगमग
दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला. ही बातमी आली आणि माझा फोन वाजू लागला. लेकाला फोन केलास का...तो कुठे आहे..त्याच्याकडे काही नाही ना..काळजी घ्यायला सांग...असे अनेक मेसेज आणि फोन चालू झाले. मैत्रिणी असल्या की, जगात दुसरं कोणी नसेल तरी चालतं. अशाच सगळ्या प्रेमळ मैत्रिणींचे फोन आणि मेसेज सुरु झाल्यावर मी सुखावले. लेकाशी आधीच बोलणं झालं होतं. त्याचं ऑफीस त्या बॉम्बस्फोटाच्या ठिकाणापासून काही तासांच्या अंतरावर होतं, त्यामुळे आपला लेक त्यात नाही, ही समाधानाची एक भावना मनाला सुखावत होती. पण त्याचवेळी या बॉम्बस्फोटात शरीराच्या चिंधड्या उडलेल्यांची माहिती येऊ लागली... त्यांचा काय दोष..काहीही नाही. त्यांचीही आई होती, बहिण होती, पत्नी होती.....आता त्यांच्या भावना काय असतील, या विचारांनी मनाचा थरकाप झाला. आपण ज्याच्यावर जीवतोडून प्रेम करतो, त्याचा चेहराही शेवटच्या क्षणी दिसू नये, यासारखी वाईट बातमी नाही. आणि हे सर्व कोणामुळे, ज्यांचा या प्रशासनावर विश्वास नाही, देशावर श्रद्धा नाही, इथल्या मातीला ते आपलं मानत नाहीत. त्यांना काहीतरी वेगळंच साध्य करायचंय. त्यासाठी त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलंय. त्यांचे शिक्षण, पैसा आणि कुटुंबियही. त्यांना माणसं मारण्यात आनंद होतो. जेवढी माणसं मेली, तेवढा त्यांचा आनंद मोठा. पण या सर्वात जे मागे जीवंत रहातात, किंवा या सर्वांची झळ ज्यांना पोहचते त्यांचा कधीतरी माणूस म्हणून हे विचार करणार आहेत की नाही. अर्थात, त्यांच्या खात्यात भावना हा शब्दच नाही, नाहीतर असंख्य सुखी कुटुंबांना उद्धवस्त करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नसता.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा मनात एका भीतीची चाहूल जागी झाली. ही भीती स्वतःच्या जीवाची नाही. तर, ती आता पुढच्या पिढीची. लेक, तिकडे दिल्लीजवळच्या शहरामध्ये. बॉम्बस्फोट झाल्यावर असंख्य मैत्रिणींचे मेसेज आले, तो कसा आहे...त्याला काळजी घ्याला सांग...या सर्व मेसेजनी भारावून जायला झालं. आपल्यामागे किती प्रेमाचा गोतावळा आहे, याचा अभिमान वाटला. पण नंतर, बॉम्बस्फोटाची अधिक माहिती येऊ लागल्यावर मन अस्वस्थ झालं. त्यात सुरुवातीला १० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. एका मुलाची ओळख तर त्याच्या हातावरील टॅटूवरुन झाली. आपल्या आई-वडिलांना दैवत मानणा-या या तरुणांना आई-वडिलांसाठी हातावर टॅटू कोरुन घेतला होता. कोणी घरी फोन करुन अगदी दहा मिनिटात पोहचतो असं सांगितलं होतं, तर कुणी आपल्या दुकानात काम करत होते. या सर्वांच्या शरीराच्या अक्षरशः चिथड्या झाल्या आहेत. जे जखमी झाले आहेत, त्यांपैकी अनेकांच्या कानाचे पडदे फाटले आहेत, शरीरावर गंभीर घाव झाले आहेत, याशिवाय मनावर झालेल्या घावांची गणना नाही. हे सर्व जण कधी यातून बाहेर पडणार हे कधीही सांगता येत नाह. मुंबई बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले काही माझ्या परिचयात आहेत. काहींनी आपल्या कुटुंबातील हक्काच्या माणसाला या बॉम्बस्फोटात गमावले आहे. ही मंडळी, अजून या धक्यातून सावरलेली नाहीत. मुंबई बॉम्बस्फोट झाला, दरवर्षी त्या दिवशी श्रद्धांजली कार्यक्रम होतो. या बॉम्बस्फोटाची दाहकता सांगणा-या बातम्या सांगितल्या जातात. पण त्या डागण्या पुन्हा नको, म्हणून ही मंडळी त्या दिवसाच्या आसपास टीव्ही, सोशल मिडियापासून दूर रहातात. त्यांचा सवाल एकच असतो, आमचा काय दोष. आमच्या माणसाचा
काय दोष. कोणाला तरी हा देश आवडत नाही, या देशाला ते स्वतःचा देश मानत नाहीत, म्हणून त्यांना इथे अस्थिरता निर्माण करायची आहे. पण बाबांनो त्यासाठी बॉम्बस्फोट कशाला करायला हवेत. तुम्हाला इथे आवडत नाही ना...मग तुम्हाला जिथे आवडतं तिथे जा....तिथे सुखानं रहा आणि इथे आम्हाला राहूदे....त्यासाठी हा रक्तरंजित खेळ कशासाठी...
या अशा जखमी मनाच्या कुटुंबामध्ये आता आणखी भर पडली आहे. त्यांचाही असाच प्रश्न या सर्वांमागील दहशतवाद्यांना
असणार आहे. तुम्हाला नाही आवडत ना...मग
सोडून जा बाबांनो....आतातरी आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला इथे शांततेनं
जगूदे....या देशावर आमचे मनापासून प्रेम आहे...इथली प्रत्येक वस्तू आमची आहे...आम्हाला
वंदनीय आहे...यात जात-धर्म हे शब्दही येत नाहीत...जो देशाला मानतो...भारतमातेची
पुजा करतो...तो आमचा...बस्स एवढीच आमची आमच्या देशाबद्दलच्या प्रेमाची व्याख्या
आहे.
बरं, या सर्वात एक नवीकोरी जात लोकप्रिय होत आहे. ती म्हणजे, सोशल मिडियाची जात. बॉम्बस्फोट झाला, हे फक्त ऐकल्यावर त्यांचे मेसेज सुरु झाले. कुठे गेली देशाची सुरक्षा व्यवस्था...देशाच्या राजधानीत स्फोट, मग सुरक्षा यंत्रणा झोपली होती का...हा काय करतोय...तो काय करतोय...असे अनेक प्रश्न विचारुन हे सोशल मिडिया बहाद्दर आपले सामाजिक ज्ञान किती काळंवडलेलं आहे, याचे दर्शन घडवू लागले होते. पण बाबांनो जरा विचार करा...कुणाला वाटेल की बॉम्बस्फोट व्हायला पाहिजेत. मी आई आहे, त्यामुळे आईच्या नजरेतून उदाहरण देते. आई, आपल्या बाळाची किती काळजी घेते. त्याला काहीही त्रास व्हायला नको, म्हणून झटत असते. साधी सर्दी झाली तरी तिची तारांबळ होते. पण बाळाला कधीतरी ताप येतोच ना. कधीतरी त्याच्या पोटात दुखतेच. मग यासाठी त्या आईनं बाळाकडे दुर्लक्ष केलं, असा ठपका लावता येतो का. नाही ना...मग देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणा-या सुरक्षा यंत्रणांना कशाला लगेच नावं ठेवायला हवीत. बरं,
आपला टप्पा कुठपर्यंत...तो फेसबुकवरील मित्र-मैत्रिणींपर्यंत...त्यातही अगदी हातावर मोजण्याइतके तुमच्या मताला लाईक, किंवा एखाद्या सिंम्बॉल टाकून उत्तर देतात, त्याला जनमन मानून ही सोशल मडियावरील नवीकोरी जात सगळ्यांना जाब विचारायला मोकळी होते. माझ्यामते यांची मानसिकताही या स्फोट घडवणा-यांच्या विचारांना आसपास असते...त्यात भावनांपेक्षा, आम्ही म्हणतो तेच बरोबर, या अधिकारवादाची भर असते.
माझ्या सारख्या हजारो, लाखो, करोडो आईंची मुलं दूर आहेत. अन्य राज्यात, देशात आपल्या आयुष्याला चांगले
वळन देण्यासाठी आणि या देशाच्या प्रगतीसाठी झटत आहेत. ही मुलं कितीही लांब असली तरी त्यांच्या भोवती माझ्यासारख्या
आईंचं मन कायम झुलत असतं. अशात अशा
बॉम्बस्फोटासारख्या बातम्या आल्या, की या मनावर किती आघात होतात, याची कल्पना त्या
मारणा-यांना होणार नाही. कुणा आईचा लेक,
तिच्यापासून कोणीतरी दूर केला आहे... ही आयुष्यभराची त्या आईला झालेली शिक्षा आहे.
तिच्या मनाची ही वेदना या रक्ताला
चटावलेल्यांना कधीही दिसणार नाही....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Good one
ReplyDeleteUnending religious fanaticism
ReplyDeleteअगदी खरं आहे.
ReplyDeleteखरं आहे. दहशतवादाने सर्वत्र अनामिक भीती कायमचीच निर्माण करून ठेवली आहे.
ReplyDelete