याला जीवन ऐसे नाव

 

याला जीवन ऐसे नाव



वेळ वाचावा म्हणून रिक्षा केली आणि मला फसल्याची जाणीव झाली.  हातातल्या दोन पिशव्या जड वाटल्या आणि दुपारी बारा वाजता होणारा उन्हाचा मारा सहन झाला नाही, म्हणून एका रिक्षाला हात दाखवला.  साठ-पासष्ठीचे काका होते.  त्यांनी रिक्षा थांबवली, आणि ठरलेल्या दरात रिक्षा घरापर्यंत नेण्याचे मान्य केले.  त्यामुळे झालेला आनंद, नंतर अवघ्या दोन मिनिटात विरळ झाला.  बहुधा घराच्या वाटेवरचे सगळेच रस्ते ट्रॅफिकने फुलले होते.  रिक्षा ढकलगाडी सारखी चालू लागली, तेव्हा माझी चुळबूळ वाढू लागली.  मी त्या काकांना दुसरा रस्ता सुचवून बघितला.  तेव्हा त्यांनी त्या रस्त्याचे काम चालू असल्याचे सांगितले.  त्यानंतर अजून एक रस्ता आहे, तिथून चलता का, जरा वेळ वाचेल, म्हणून सांगितले, तेव्हा त्यांनी दुपारची वेळ आहे, शाळा सुटल्या आहेत, त्या रस्त्याला शाळेच्या बसची गर्दी असते, त्यामुळे तिथेही असेच ट्रॅफीक असेल, असे सांगितले.  शेवटी मी वैतागले.  तुम्हाला एवढं कसं माहित, म्हणून जरा चिडून त्या काकांना विचारले.  त्यावर त्यांनी अगदी शांत स्वरात, ताई, गेली तीस वर्ष या रस्त्यांवर रिक्षा चालवतोय, वयाच्या तिसाव्या वर्षी रिक्षा चालवायला घेतलीय, आज साठी आलीय.  त्यांच्या या अधिकारवाणीच्या बोलण्यानं मी वरमले.  मी शांत झालेली बघून ते काका पुन्हा म्हणाले, ताई, रागवू नका, पण थोडं धिरानं घेतलं, की सर्वांनाच मार्ग दिसतो.  या गर्दीचंही तसंच आहे.  जो लवकर जाईल, म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तोच अडकतोय बघा...थोडा वेळ थांबा, आपोआप मार्ग दिसेल, असे ज्ञानाचे बोल त्यांनी मला ऐकवले.  त्यानंतर जवळपास २०मिनिटं तरी मी रिक्षात होते.  ट्रॅफीकमधून थोडा मार्ग दिसायचा की रिक्षा चालू पुन्हा काही मिनिटं प्रतीक्षा...पण या सर्वात काकांनी जे त्यांच्या जीवनाचे तत्व मला सांगितले, त्याला तोड नव्हती. 


हे रिक्षावाले काका, एका कंपनीमध्ये नोकरीला होते.  चाळीमध्ये खोली, दोन मुलं, बायको असा सुखी संसार.  एकदिवस अचानक कंपनीनं नोकरीवरुन काढून टाकलं.  त्यांच्यासोबत १२ जणांची नोकरी गेली.  सुरुवातीला त्यांच्यासोबत अन्य कामगार उभे राहिले.  असं कसं काढून टाकता येईल, म्हणून आंदोलन केलं, उपोषण केलं, नेत्यांकडे दाद मागितली.  पण कंपनीनं नोकरी दिली नाही.  कंपनी तोट्यात होती, असं कारण पुढे केलं.  या सर्वात एक-दीड महिने गेले.  पुढे नोकरी शोधण्यात आणखी एक महिना गेला.  साठवलेले पैसे संपत आले.  काही दिवस नातेवाईक, मित्रपरिवारानं पैसे दिले.  पण रोज कोण पैसे देणार.  अखेर एका मित्रानं रिक्षा चालव म्हणून त्याच्या रिक्षाची चावी हातात दिली.  तेव्हा धाकटा मुलगा वर्षाचा होता, तर मोठा चार वर्षाचा.  बायकोनं सुरुवातीला खूप गोंधळ घातला.  घरी काय सांगू, रिक्षावाला नवरा म्हणून मला सर्व हसतील, म्हणून रडू लागली.  तिला समजावलं, घर खर्चासाठी पैसे गरजेचे होते.  मुलाचं शिक्षण सुरु करायचं होतं.  आम्हाला लेकाला इंग्लिश शाळेत टाकायचं होतं, पण आता ते शक्य नाही, म्हणून मराठी शाळा शोधायला सुरुवात केली.  तेव्हाही बायकोनं गोंधळ घातला.  नातेवाईकांपेक्षा आपली पोरं मागे रहाणार म्हणून रडू लागली.  मी माझ्या परिनं तिला खूप समजावलं, कधी कधी मलापण राग यायचा....पण डोक्यावर बर्फ ठेवला.  नंतर काही दिवसांनी याच शांत स्वभावामुळे बायकोला पटायला लागलं.  रिक्षावरही चांगला हात बसला.  लेकाला चांगली मराठी शाळा मिळाली.  फी कमी होती.  बायको लेकाचा अभ्यास घरी घेऊ लागली.  त्यानंतर धाकट्यालाही तिथंच घातलं.  दोन लेकांची शाळा सुरु झाली, तेव्हा


मी स्वतःची रिक्षा घेतली. 

पाच वर्षात माझा चांगला जम बसला.  एकच सूत्र पकडलं, कधीही, कुठलंही भाडं नाकारलं नाही.  अगदी जवळंच असलं तरीही.  कोणी आजी-आजोबा असले तर त्यांच्यासाठी आधी गाडी थांबवू लागलो.  त्याचा फायदा झाला.  काही आजी-आजोबांची एवढी चांगली ओळख झाली, की ते कुठंही जायचं असेल तर फोन करुन बोलवून घेऊ लागले.  त्यातल्या काहींची तर हॉस्पिटलमध्ये नियमीत तपासणी असायची, अशावेळी माझ्याच रिक्षातून त्यांना घेऊन जायचो.  काही आजी-आजोबांची मुलं बाहेर आहेत.  त्यांना महिन्याची फळं, खाऊ, औषधं आणि काही गरजेच्या वस्तू नेऊन देतो.  अशी माणसं खूप जोडली.  माझंही वय साठीच्या घरात आहे.  माझी दोन्हीही मुलं इंजिनिअर झाली.  सुरुवातीला रडणा-या बायकोनंही चांगली साथ दिली.  मुलांचं सगळं तिनं बघितलं.  शिवाय कधी पुरणपोळ्या, कधी चकल्या, कधी भाक-या अशा ती ऑर्डर घ्यायची.  त्यातून थोडा हातभार लागला.   दोन्ही मुलांची लग्नही झालं.  मोठ्याला एक मुलगा आहे.  दोन्ही मुलांचं लग्न अगदी थोड्या पैशात केलं.  आमच्या परिस्थितीमुळे मुलांना पैशाची किंमत चांगली समजली आहे.  आमच्या मोठ्या सूनबाई लेकानच पसंत केलेल्या.  आमची काही ना नव्हती.  फक्त एकच अट ठेवली.  लग्नात कुठलही बडेजाव नको, अगदी २५-३० माणसांच्या उपस्थित लग्न करा....सुरुवातीला सूनबाईंना वाटलं, की त्या आम्हाला पसंत नाही, म्हणून ही अट ठेवत आहोत.  मग त्यांना आमच्या संघर्षाचा किस्सा सांगितला.  मग त्यांनीही आनंदानं होकार दिला.  आता लेक आणि सूनबाई बंगलोरला असतात.  मी कधीही वेळ काढून मंदिरात गेलो नाही.  गेलो तर अगदी एक मिनिटात डोकं टेकवून बाहेर.  गर्दी असेल तर लांबूनच देवाला हात जोडून मंदिराच्या बाहेर.  पण एवढ्या वर्षात कधीही कोणाला दुखावलं नाही.  आमचे गि-हाईकच आमचा देव.  त्याचं फळ आत्ता मिळतंय.  दोन्ही सूनबाई, चांगल्या घरातल्या आहेत, संस्कार चांगले आहेत. त्यापण इंजिनिअर.  मोठा लेक आणि सून मला आग्रहांनं बंगलोरला बोलवात.  पण ताई, मग इथल्या गोतावळ्याचं काय करु.  आत्ताही काही घरामध्ये डबे देतो, फळ-भाजीपाला नेऊन देतो.  यातलं कोणी आजारी झालं, तर लगेच दवाखाना करतो.  ज्यांची मुलं लांब आहेत, त्यांच्याबरोबर आठवड्यातून एकदा तरी घरी गप्पा मारायला जातो.  अलिकडे बायकोही सोबत येत.  अशानं खूप मोठी माणसं मला जवळून पहाता आली.  आता माझा धाकट लेकही मोठ्यासोबत  बंगलोरला जाणार आहे.  आम्ही इथं एकटेच राहू, तेव्हा हिच माणसं उपयोगी पडतील. आता घरं बदललंय.  आता टू बेडरुमचा फ्लॅट आहे.  पण हे सर्व या रिक्षाच्या जीवावर झालं आहे, याची जाणीव आहे.  आता माझ्यापेक्षा माझी बायकोच रिक्षाला जपते, तिची पूजा करते. 


या एवढ्या वर्षाच्या अनुभवानं सांगतो, कधीही घाई करुन, पुढच्याला मागे ढकलून प्रगती होत नाही.  ती होणार तेव्हा होणारच.  फक्त आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहायचे.  कुणाला दुखवायचे नाही, की कुणाबरोबर भांडण नाही.   या दोनच गोष्टी मी माझ्या आय़ुष्यात पाळल्या आणि मी सुखी झालो.  लेकांचं भलं झालंय.  जेवढी जमेल तेवढी रिक्षा चालवणार.  आत्ता ठराविक वेळेत चालवतो.  फार दगदग करत नाही.  ठरलेले गि-हाईक आहेत, त्यामुळे बसून रहावे लागत नाही.  मुळात माझ्या मुलांना बाप रिक्षावाला आहे, याची लाच वाटत नाही.  हेच माझे समाधान आहे, चला येतो....एवढं बोलून ते काका माझ्यासमोरुन निघूनही गेले.  ट्रॅफीकमध्ये अडकेल्या रिक्षामधून त्यांनी हा सगळा प्रवास सांगायला सुरुवात केली तेव्हा मी शांत झाले.  मग सर्ववेळ ते बोलत होते.  घरापर्यंत आले, त्यांना पैसे दिले, तरीहीते बोलत होते, आणि मी भारावल्यासारखी ऐकत होते.  त्यांचे बोलणे झाले, आणि ते निघूनही गेले.  तेव्हा मी त्या भारावल्याच्या स्थितीतून जागी झाले.  एरवी कोणी भेटला तर त्याचे नाव, गाव, पत्ता सगळं विचारुन घेते.  पण त्या काकांचं साधं नाव मी विचरलं नाही, की घरी चहाला चला, म्हणून आग्रह केला नाही.  मी मलाच दोष देऊ लागले.  पण मनात त्या काकांचे वाक्य घोळत राहिले,  कधीही घाई करुन, पुढच्याला मागे ढकलून प्रगती होत नाही.  ती होणार तेव्हा होणारच...मी मनोमन त्या काकांना नमस्कार केले....अशी माणसं भेटतात, त्यामुळेच आपल्या जीवनाला सकारात्मकचेचा स्पर्श होतो, याची पुन्हा एकदा जाणीव झाली...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

  

 

 

Comments

  1. आदरणीय सइ जी नमस्कार
    आपण अतिशय सुंदर वर्णन एका वयोवृद्ध कर्मयोगी चे केलेले आहे.
    "अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर"
    जवळपास संसाराचे असेच असते आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देणे हेच खरे धैर्य.
    जीवनात प्रत्येक गोष्ट ही मनाप्रमाणे घडतेच असे नाही..का.. ' काही विधानही विधी लिखित लिहिलेले असतात 'ते आपणास मान्य करावेच लागतात..

    ReplyDelete
  2. नशिबात लिहिलं आहे तेच काम करावं लागतं. मात्र नशिबात असलेलं काम नियम, इमानदारी व सचोटीने केल्यास संसाराचा गाडा सहजपणे ओढता येतो, मात्र त्यापेक्षा मानसिक समाधान खूप मोठे मिळते. कंपनीची नोकरी जाणे आणि हातात रिक्षा येणे यालाच नशीब म्हणतात.

    ReplyDelete
  3. याला जीवन ऐसे नाव.
    चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर वास्तववादी लेख.
    माधवी काळोखे.

    ReplyDelete
  5. खूप छान लेख

    ReplyDelete

Post a Comment