एक घास चिऊचा..

 

एक घास चिऊचा..


प्राथमिक...माध्यमिक...उच्चमाध्यमिक असे टप्पे पार करत आपल्या लक्षापर्यंत पोहचत असलेल्या लेकानं आता नोकरीनिमित्त स्वतंत्र रहायला सुरुवात केली आणि माझ्या आनंदात कोण भर पडली.  पण एका क्षणात तो आनंदाचा पारा खाली आला.  आता जेवायचं काय.  हॉस्टेलमध्ये असतांना निदान तिथे दोन वेळ नाष्टा आणि दोन वेळ जेवण मिळणार याची खात्री होती.  पण स्वतंत्र रहातांना जेवणाचं काय...हा प्रश्न मला लागला.  त्याचं रहातं शहर लांब, त्यामुळे सध्या मला तिथे जायलाही जणणार नाही, मग काय करायचे हा विचार करत मी कामाला लागले.  दोन प्रकारचे लाडू, चकली, करंजी, शंकरपाळी, चिवडा हे हक्काचे पदार्थ तयार झाले.  मग रेडी टू इटचा फंडा सुरु झाला.  पोहे, उपमा यांचे इंन्टट मिक्स करुन त्याचे डबे भरले.  तोच प्रकार चटण्यांचा.  मग इडली, डोसा, आंबोळी यांचे पिठ करुन झाले.  झालंच तर भाजीचा मसाला तयार केला.  मग पंजाबी रेडी टू इट भाजी आणि बिर्याणी मसाले तयार केले.  दोन दिवस अहोरात्र या रगाड्यात राहिल्यावर त्याच्यासाठीचा मोठा बॉक्स तयार केला आणि त्याला पाठवला.  त्यानंतर रोजचा व्हिडिओ कॉलचा खेळ सुरु झाला.  तो ऑफिसवरुन आला रे आला की त्याला फोन...आज काय करशील, म्हणून चौकशी. पहिले दोन दिवस तोही उत्साहात होता.  त्या रेडी टू मिक्स मसाल्यांचा त्यानं वापर केला.  पण नंतर मात्र सगळं फ्रिज मध्ये भरुन ठेवलं आणि स्वारी ख-या अर्थानं कामाला लागली.  रोज त्यानं केलेल्या वाकड्या तिकड्या चपात्यांचे फोटो यायला लागले, आणि माझे डोळे भरुन आले.  तो लहन होता, तेव्हा त्याला खातांना गम्मत वाटावी, म्हणून बराचवेळ्या मी चपात्यांचे आकार बदलत रहायचे.  आता त्याच्या हाताच्या या चपात्या पाहून त्याचे लहानपण पुन्हा आठवले.  आता एक घास


चिऊचा...एक घास काऊचा...यापुढे आमचं नातं गेलं आहे.  मी कधी घरी जेवण तयार केलं नाही, पण तुला बनवतांना रोज बघितलं आहे, त्यामुळे माझा होमवर्क पक्का आहे, तू काळजी करु नकोस, मी सगळं करेन बरोबर....हे लेकानं लडावाळपण सांगितलं आणि माझ्या समाधानाच्या बॅलेंसमध्ये किती भर पडली, हे विचारु नका. 

लेकाच्या शिक्षणाच्या काळात त्याच्यासोबत रहायला हवं, म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिला, तेव्हा मला अनेक उलट सुलट सल्ले मिळाले.  एवढ्यासाठी कशाला चांगली नोकरी सोडली.  तो काय, चार-पाच वर्षात मोठा झाला, की त्याला तुझी गरज लागणार नाही.  मग तू एकटी पडशील, घरातून कुठलंही काम होत नाही,  सर्व वेळ लेकावर खर्च केलास तर तुझ्या हाती काहीच लागणार नाही, असे सल्ले आले, आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा काळजीत पडले होते.  पण त्याचवेळी काही जाणकारांनी चांगले सल्ले दिले.  लेकाबरोबरचा प्रत्येक क्षण आनंदानं साजरा कर.  स्वतःच्या नफ्या तोट्याचा विचार करु नकोस.  नंतर हाती फळ मिळेलच.  असे सल्ले आले, आणि मी


सावरले.  बघता-बघता तो शिक्षणासाठी दुस-या शहरात गेला, आणि मी पुन्हा माझ्या कामाला मोकळी झाले.  या सर्वात आमच्या दोघांच्यात झालेली नाते शब्दांच्या पलिकडे गेले.  अगदी चित्रपट कुठला बघावा, ते पुस्तक कुठलं वाचावं हे माझे निर्णयही तो घेऊ लागला.  एखादा चित्रपट मी बघण्याचा हट्टच केला तर तो, बघ पण तुला आडणार नाही,  एवढं बोलून माघार घ्यायचा.  अर्थात, नंतर त्याचे निदान अचूक असल्याचे मी सांगायचे, आणि त्याची कळी खुलायची.  तो शिक्षणासाठी बाहेर गेला, तेव्हा मात्र मी प्रचंड काळजीत घालवली.  कारण दर दोन दिवसांनी त्याची ठरलेली तक्रार यायची, आई, इथे आपल्या घरासारखे जेवण नाही.  सुरुवातीला तो जेव्हा ही तक्रार  करायचा, तेव्हा त्याच्या काळजीनं मला जेवण जाईना.  मग नव-यानं आम्हा दोघांचीही शाळा घेतली.  त्याला, तू जेवणासाठी गेला आहेस की शिक्षणासाठी...हे नक्की करायला सांगितले.  आणि मला त्याच्याजवळ स्वतंत्र रुम घेऊन रहा, असा खोचक सल्ला दिला.  या त्याच्या खड्याबोलानं आम्ही दोघंही ख-या अर्थांनं ताळ्यावर आलो आणि  चार वर्ष कशी गेली हे कळंलही नाही. 

आता त्याचा शिक्षणाच्या पुढचा टप्पा सुरु झाला.  यशाची एक आणखी पायरी म्हणून मी कौतुक करत असतांना परत जाणीव झाली, ती त्याच्या पोटपुजेची.  रोजच्या जेवणाची सोय कशी होणार याची काळजी वाटू लागली.  मग गुगलबाबाची मदत घेतली.  त्याच्या घरापासून जवळ असलेल्या सर्व टिफीन सर्विसची यादी काढली.  त्या क्लाऊड किचनचे पत्ते काढले, फार काय घरगुती जेवण कुणी तयार करतं का, याचीही माहिती काढून घेतली.  सर्व यादी काढून त्याला ते पत्ते आणि फोन नंबर दिले.  पण तो माझाच लेक.  त्यानं एका फटक्यात या सर्वाला नकार दिला. माझं मी जेवण घरी तयार करेन, तू फक्त आपले घरचे मसाले पाठव.  त्यानं एवढं विश्वासानं सांगितल्यावर मला काय हुरुप आला, मी मसाले, चटण्यांपासून सर्व तयार


भाज्यांची मिश्रणं पाठवून दिली.  त्याच्या नव्या घरचा फ्रिज या वस्तूंनी भरुन गेला.  रोजची आमची ऑनलाईन पाठशाळा दोन दिवसच टिकली.  पण नतंर तो मुळ पदाकडे परतला.  आपल्या घरच्यासारखी भाजी हवी, रेडी टू इट मसाल्यांमध्ये ती चव नाही, हे त्याचं वाक्य आलं, आणि मी पुन्हा धास्तावले.  तुला सर्व कापता येणार नाही, चपातीचं पिठ मळणं कठीण असतं...अशा पळवाटा मीच त्याला काढून दिल्या.  पण त्यानं या पळवाटा, टाळल्या.  काही हरकत नाही. दोन-तीन दिवस गडबड होईल, पण मी करेन.  एवढं बोलून तो कामाला लागला.  दोन तास बहुधा त्याची खटपट चालली.  त्यानंतर चपात्या आणि भेंड्याच्या भाजीचा फोटो त्यानं शेअर केला.  लगेच फोन करुन, बघ जमलं का, म्हणत माझ्याकडून दाद मागितली.  पण माझे डोळे आणि मन भरुन आलं होतं.  छान जमलं की तुला, म्हणून मी कौतुक केलं, तर म्हणाला, आपल्या घरचा मसालाच चांगला आहे.  तुला एवढी वर्ष जेवण करतांना पाहिलं आहे, त्यामुळे मला अंदाज आलाय.  आता करेन मी सगळं.  तू काळजी करु नकोस, म्हणून मलाच धीराचे चार शब्द ऐकवले.  कशाला एवढी दगदग हवी, म्हणून माझा हेका चालू होता.  रेडी टू इट मसाले पाठवले आहेत ना, ते वापर, म्हणून माझा आग्रह संपत नव्हता.  पण मग त्यानं त्याचं हक्काचा डायलॉग काढला, शॉर्टकटचा काहीही फायदा नसतो, हे सांगणारी तूच ना.  अभ्यासातच नाही, प्रत्येक क्षेत्रात चालणारा हा मंत्र आहे...म्हणून हसत त्यानं फोन ठेवला.  इथे मी  भरल्या डोळ्यांनी पुन्हा त्यानं पाठवलेल्या भाजी-चपातीच्या फोटोला बघून मन भरुन घेऊ लागले. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Khup sensational journey aste आईची…

    ReplyDelete
  2. Ek ghas chiucha yatharth surekh varnan keep it up

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहे.

    ReplyDelete

Post a Comment