काळ्या आवरणातील पांढरं सोनं
नोव्हेंबर महिना सुरु झाला की, मला दर दिवशी बाजारात मोठी पिशवी घेऊन फिरायला जायची फार इच्छा होते. अगदी डोंबिवलीतीलच नाही, तर ठाण्यातील बाजारपेठही या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मी कितीतरी वेळा पालथी घातली आहे. या दोन महिन्यात असं काय असतं...असं विचारालं तर, या दोन महिन्यात बाजाराला बहार आलेला असतो. थंडीची चाहूल लागताच, बाजारात भाज्यांची जंत्री लागते. हिरवा वटाणा काय, लाल चुटूक गाजर काय, रसिले टोमॅटो काय, तो हिरवा पालक, तूर, हिरवी वांगी...अशी ही....लांब यादी. या यादीमध्ये कंदमुळांची नावेही बरीच आहेत. यातील प्रत्येकावर माझा फार जीव. पण त्यातही शिंगाडे म्हटलं की, किती घेऊ आणि किती नको, असं होऊन जातं. आता बाजारात ही काळ्या रंगाची दौलत यायला लागली आहे. मध्यंतरी आम्ही वृंदावन, मथुरा भागात गेलो होतो, तेव्हा याच शिंगाड्याचा अद्भुत प्रकार मिळाला होता. या भागात उपवासाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तिथे उपवासाच्या पदार्थांची मोठी यादीच हॉटेलमध्ये लिहिलेली असते. त्याच यादीमध्ये शिंगाड्याची चाट नावाचा पदार्थ आम्हाला दिसला होता. उपवास तर नव्हता, पण शिंगाडा खाण्यासाठी मी उपवासही करेन...म्हणत, ही चाट मागवली होती. तुपात क्रिप्सी केलेले शिंगाडे असे
काही सजवून दिले होते, की आम्ही एका डिश संपवली आणि पाठोपाठ दुसरीचीही ऑर्डर दिली होती. हिच शिंगाड्याची चाट आता बाजारात शिंगाडे डोकवू लागल्यापासून घरात वारंवार होऊ लागली आहे.
भाजी बाजारात मोठी पिशवी घेऊन फिरणं, आणि भाजीवाल्या मावशींबरोबर ऐसपैस गप्पा मारणं हे माझं सर्वात आवडतं काम. नोव्हेंबर महिना लागला की, या फे-या जरा अधिक वाढतात, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने माझ्यासारख्या खवय्यीसाठी पर्वणीचे असतात. याच सर्वात काळ्या रंगातील शिंगाडे दिसले, की माझी कळी अधिक खुलते. एवढ्या वर्षाच्या ओळखीनंतर नेहमीच्या भाजीवाल्याही हाक मारुन, तुझे शिंगाडे आलेत ग...अशी हाक देतात, मग मनात या शिंगाड्यांच्या रेसिपीची उजळणी सुरु होते. अलिकडे झालेल्या मथुरेच्या ट्रिपमध्ये याच शिंगाड्यांची चवदार चाट टेस्ट केली होती. मुळात शिंगाड्यापासून मी अगदी हातावर मोजण्याइतके पदार्थ तयार करते. त्यात शिंगाड्यापासून सलाड आणि अलिकडे उपवासाच्या मिसळमध्ये या शिगाड्यांचा वापर करायला सुरुवात केली आहे. पण ही चाट भन्नाट होती. मथुरेत चाट खाऊन झाल्यावर मी बराचवेळ तिथेच घुटमळले. मग एकावर एक दुसरी चाट मागवली. त्यामध्ये काय-काय घातलं आहे, याचा अंदाज घेऊन झाला. पण ती चाट बनवणा-याला भेटल्याशिवाय माझं समाधान होईना. रिकाम्या प्लेट नेण्यासाठी आलेल्या
मुलाला विनंती केली, आणि चाट कोणी बनवली, त्याला भेटायचं आहे, म्हणून सांगितले. तेव्हा साठी ओलांडलेले एक काका समोर आले. अरे...ए तो हम कबसे बनाते है...उसमे क्या खास है...म्हणत त्यांनी या शिंगाड्याच्या चाटची रेसिपी सांगतली. अर्थात त्यांची भाषा समजून घेतांना माझी तारांबळ झाली, पण माझ्यासोबत त्यावेळी त्या हॉटेलमध्ये आलेल्या अन्य दोघी महिलाही या शिंगाड्याच्या चाटची रेसिपी ऐकण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्या काकांना किती हुरुप आली, हे विचारु नका...
पहिल्यांदा अख्खे शिंगाडे पाण्यानी स्वच्छ धुवून शिजवून घ्यावेत. शिजतांना अगदी थोडं मिठ त्यात घालायचं. साधरण पंधरा मिनिटात शिंगाडे शिजून तयार होतात. शिंगाडे शिजल्यावर त्यातील गरम पाणी काढून टाकावं. शिंगाडे थंड झाल्यावर मधोमध कापून त्याचे दोन भाग करावे, आणि त्याच्या काळ्या आवरणापासून वेगळे करायचे. त्यानंतर अगदी हलक्या हातानं दाब देऊन त्यांना पसरट करायचे. त्यासाठी एखादा पेला, किंवा वाटीचा वापर केला तरी चालतो, पण शिंगाडा मुळात असतो केवढा, त्यात त्याचे दोन भाग केल्यावर तो केवढा होणार...हे सर्व विचारात घेऊन हलक्या हातांनी त्यावर दाब द्यायचा. मग हे पसरट केलेले शिंगाडे, तव्यावर तळायला टाकायचे. मथुरेत मी जिथे ही चाट पहिल्यांदा खाल्ली तिथे तर ते चांगल्या तुपात डिपफ्राय करत होते. पण नंतर मी या डिपफ्रायमध्ये बदल केला. फ्रायरमध्ये अगदी जरासं तुप लावून हे शिंगाडे भाजून घेतले. या शिंगाडा चाटमधील हिच स्टेप गेमचेंजर असते. शिंगाडे छान क्रिप्सी झाले, की समजावं चाट चांगलीच
होणार. मग काय नेहमीचे सामान. हे शिगाडे एका डिशमध्ये लावून घ्यायचे. त्यावर तुम्हाला हवं तेवढं गोड दही घालायचं. त्यासाठी दही चांगलं फेटून घ्यायचं. त्यात थोडी साखर आणि काळं मिठ घालायचं. शिंगाड्यावर दही घातलं की, खजूर-गुळाची चटणी घालायची आणि त्यावर मग मिरची आणि खोब-याची चटणी घालायची. या सर्वांवर भाजलेल्या जि-याची पूड भूरभूर करुन पसरायची. थोडं काळं मिठ घालायचं. अगदी वर बटाट्याची शेव आणि फारच हौस असेल तर यामध्ये डाळींबाचे दाणे. अर्थात मी पहिल्यांदा जेव्हा ही चाट बनवली तेव्हा त्या मथुरेच्या काकांनी सांगितली तशीच तयार केली. त्यात फार फेरफार केला नाही. पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे पुढच्यावेळी शिंगाडा चाट तयार करतांना थोडा-थोडा बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता हिरव्या चटणीमध्ये मी आवळ्याचा वापर करते. शिवाय डाळींबाच्या दाण्यासोबत अननसाचे तुकडे थोडे तुपावर परतून चाटमध्ये टाकते.
एकूण काय, मथुरेहून येतांना घेऊन आलेली ही रेसिपी आमच्याकडे हिट ठरली
आहे. अर्थात ही फक्त सुरुवात आहे. आता कुठे तो नोव्हेंबर महिना सुरु होतोय. या महिन्याचा राजा असलेला मटार आणि गाजर आत्तासे दिसू लागलेत. नंतर त्यांचे मोठे ढिग बाजारात आले की, घर चोवीस तास मटारमय आणि गाजरमय होऊन जाणार आहे. ती तूर हटून बसणार आहे, आणि डोक्यावर मुकूट असलेले वांगे ऐसपैस विसवणार आहे....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान.उपवासा साठी नवीन रेसिपी मिळाली.
ReplyDeleteछान रेसिपी दिलीय, टेम्पटेशन वाढतेय.
ReplyDeleteखुप छान👌👌👍👍
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteलहानपणाची आठवण आली लेख वाचून,कारण पुणे जिल्ह्यात माझे आजोळ,तेथे जायचो तेव्हा शिंगाडे खाल्ले आहेत,पण बऱ्याच वर्षात खाण्याचा योग आला नाही, आजोळी ata जुनी माणसं कुणीही नाहीत,पण लेख वाचुन तो काळ डोळ्यासमोर आला, धन्यवाद
ReplyDelete