जत्रेमधून बालपणाच्या पाऊलखुणा जपतांना...

 

जत्रेमधून बालपणाच्या पाऊलखुणा जपतांना...



डिसेंबर महिना चालू झाला की माझ्या मनाला एक हूरहूर लागते.  या महिन्यात दत्त जयंती येते.  या दत्त जयंतीला आलिबाग तालुक्यातील चौलमधील श्री दत्त मंदिरात, दत्त महाराजांचे दर्शन आणि मग या सोहळ्यानिमित्त भरणारी यात्रा.  रेवदंड्याला रहात असतांना प्रत्येक वर्षी हे पाच दिवस सोन्याचा मुलामा चढवून यायचे.  यात्रेनिमित्त कुणी ना कुणी पाहुणे आल्यामुळे भरलेलं घर आणि दुपारी शाळेतून घरी आलं, की सगळ्या कुटुंबासह त्या स्थानाकडे जाण्यासाठी सुरु होणारी लगबग.  अगदी रोज, नियमीत पाच दिवस साडेसातशे पाय-या चढून दत्त महाराजांचे दर्शन घेतले की, रात्री उशीरापर्यंत मग यात्रेचा फेरफटका मारायचा.  एवढ्या वर्षाच्या या नेमानं या डोंगराची प्रत्येक पायरी मनवर एवढी कोरली गेली आहे की, आजही कुठल्या पायरीवर काय असेल, हे सांगू शकते....याच कोरल्या गेलेल्या सुवर्ण आठवणी डिसेंबर महिना लागला की मनाभोवती पिंगा घालू लागतात.  गाव सुटलं, तशी ही दत्ताची यात्राही चुकली.  दरवर्षी कॅलेंडरमध्ये या वर्षाच्या


शेवटच्या महिन्याचे पान मी जड मनानं पलटून ठेवते.  नजर वारंवार दत्तजयंतीच्या तारखेकडे जाते,  आणि मग निदान एक दिवस तरी जमतोय का याची जुळवणी सुरु होते.  पण कुठल्या ना कुठल्या कारणानं ही जुळवणी फस्स होऊन गेली की मन पुन्हा त्या निराशेच्या छायेत अडकून जायचं.  मात्र हे वर्ष अद्भूत आहे.  गेल्या कित्तेक वर्षापासून जे सुख हुलकवणी देत होतं, ते आपसूक कधी आणि कसं जुळून आलं, हे समजलंच नाही.  त्याला निमित्त ठरली ती, माझी मैत्रिण निर्मिती कदम. 

माझी मैत्रिण निर्मिती, हिने किहीम जवळ एक फार्महाऊस बांधलं आहे.  कोरोनाच्या काळापासून निर्मिती आणि तिच्या दोघी बहिणींनी एक टुमदार घर उभारले आणि घराभोवतीचा परिसर विकसीत केला आहे.  घर झाल्यापासून निर्मिती नियमीतपण एकदातरी घरं बघायला या, म्हणून आग्रह करत आहे.  यावेळी तिने पुन्हा हा विषय काढला, आणि किहीम दौ-याला जोडून चौलचे दत्तमंदिर करता येईल का, याची जुळवाजुळव केली.  शेवटी हो ना हो करत, सर्व जुळून आले, आणि निर्मिती, कुंतल आणि मी अशा तिघीजणी अगदी पहाटे किहिमकडे रवाना झालो.  निर्मितीच्या घरी थोडी मस्ती केली आणि मग लगेच पावलं वळली ती दत्ताच्या डोंगराकडे.  को कोण जाणे, पण आलिबाग सोडून चौल-रेवदंड्याची वाट सुरु झाली की माझे शब्द संपून जातात.  जेवढं गाडीच्या त्या काचेमधून दिसतं तेवढं टिपून घेण्यासाठी डोळ्यांची धडपड सुरु होते, तशीच धडपड चालू असतांना दूरवरून दत्त महाराजांचा डोंगर दिसला, ते पाळण्याचं मोठं चक्र दिसलं, आणि एवढ्या वर्षांनी मिळालेल्या सुखावर मन झोके घेऊ लागलं.

आमचा डॉक्टर मित्र केदार आणि त्याची पत्नी डॉक्टर सीमा यांची भेट घेऊन


दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास, मंदिर गाठायचं हे लक्ष होतं.  एवढ्या वर्षानी दर्शन घेणार, तेव्हा दर्शन निवांत व्हावं यासाठी सर्व खटाटोप चालू होता.  बरोबर ठरलेल्या वेळी मंदिरात पोहचलो.  देवाची कृपा काय असते, याची जाणीव करुन देणारा तो क्षण होता.  कारण अवघा गाभारा आमच्यासाठीच मोकळा ठेवला असल्यासारखा.  मन भरेपर्यंत ते रुप बघितलं आणि चरणांवर नतमस्तक झाले.  दत्ताच्या डोंगरावर वाहणारा वाराही वेगळाच असतो, त्यात अल्हाद असतोच, पण एक आगळा सुगंध असतो.  फुलं, धूप, अगरबत्ती यांना स्पशून हा वारा महारांजाचा आशीर्वाद घेत वाहत असतो.  महाराजाच्या आशीर्वादासह हा सुखाचा वाराही सोबत घेतला आणि मग यात्रा फिरु लागलो.  भरपूर फोटो झाले.  प्रत्येक पायरीवर आता काय आहे, पूर्वी काय होतं, याची उजळणी करुन झाली.  अर्थात एवढ्या वर्षानंतर या यात्रेध्येही थोडाफार बदल झाला आहे.  पूर्वी पावलोपावली असलेल्या भजांच्या स्टॉलच्या जागी आता चायनीजनं ठाण मांडून बसकण मारली आहे.  पावभाजी आणि चाट प्रकारांचीही गर्दी झालेली.   उसाचा चरका मात्र एकाच जागी बघायला मिळाला.  डोळे बंद केलेला बैल, गोल गोल फिरुन उसाचा रस काढतो.  ही आपली पारंपरिक पद्धती,  मी लहान असतांना अशाच रसाने भरलेला तांब्या वडिल हातात द्यायचे.  समोर पेपरवर पसरलेली कांदा आणि बटाट भजी.  फाईव्हस्टार मध्ये जेवण्यापेक्षा त्याचा आनंद मोठा वाटायचा.  तेव्हा यात्रेमध्ये बहुधा हेच रात्रीचे जेवण असायचे.  याचा कधी त्रास झाला नाही, की एसिडिटी वाढली नाही.  तो डायट नावाच शब्दच तेव्हा डिक्शनरीमध्ये नव्हता.  मात्र आत्ता यात्रेत फिरतांना या सर्वांची सोबत होती.  शिवाय घरी वेळेवर पोहचायचे बंधन.  वाटेतील ट्रॅफीकचा धाक.  त्यामुळे

दिसेल त्याला फोनच्या कॅमे-यात बंद करुन यात्रेचा आनंद लुटला.  थोडी खरेदी केली.  यात्रेत जे खेळ असतात ते खेळलो.  अगदी बॉल टाकण्यापासून ते रिंग टाकण्यापर्यंत.  यात्रेमध्ये आमचा मित्र संकेत जोशी याचा स्टॉल आहे, त्याच्या स्टॉलवरुन खरेदी केली, गप्पा मारल्या.  आणि मग पावलं परतीचा इशारा करायला लागली.  सुख मिळालं आहे, पण ते ओरबडायचं नाही, या शब्दामध्ये मनाची समजूत काढली.  पुन्हा मागे बघितलं, तर तो दत्ताचा डोंगर अगदी सोबत असल्यासारखा होता.  कुठेही जा, मी तुमच्या सोबत असेन, सुखाची छाय करुन,  मायेची उब घेऊन...असाच आशीर्वाद तिथून दत्त महाराज देत होते.  त्यांना पुन्हा नमस्कार केला, येतो म्हणून निरोप घेतला आणि परत येण्याची एक वाट त्यातून मोकळी ठेवलीय.... 

येतांना एका पिशवीच्या ऐवजी दोन पिशव्या झाल्या होत्या.  आमच्या निर्मितीच्या वाडीतील नारळ, लिंब, तमालपत्राची पानं, झालंच तर भांबुर्डीचा पाला, चिंचेचा गोळा ही प्रेमाची भेट आणि यात्रेमध्ये संकेतच्या स्टॉलवर केलेली खरेदी यामुळे जड झालेल्या पिशवीपेक्षा मन अधिक जड झालं होतं.  यावर्षी कित्तेक वर्षांपासून जे सुख हुलकावणी देत होतं, ते सुख मिळाल्याची भावना होती.  आज एवढ्या वर्षानतंर यात्रेमध्ये फिरल्यावर जाणवलं की यात्रा बरीच बदलली आहे.  अर्थात काळाचा महिमा....पण त्यातील भाव आणि




आनंद तोच आहे.  उत्साह आणि उल्हास तोच आहे.  घराकडे परततांना आपसूकच मन शांत झालं...कारण या सर्वात दत्ताच्या डोंगरावर जो सुखाचा गारवा भरुन घेतला होता ना, तो सांगतोय...पुन्हा लवकरच आपल्याला भेटायचंय....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Khup chhan lekh.shree Gurudev Datt.

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय

    ReplyDelete
  3. छान फिरवून आणलंस सई. चौल रेवदंडा हा परिसर माझ्या खूप आवडीचा आहे. तू जे मंदिर म्हणतेस ते कनकेश्वर का. चौल्ला शीतला देवीचे मंदिर खूप सुंदर आहे ना

    ReplyDelete
    Replies
    1. नाही, कनकेश्वर मंदिर वेगळं आहे. ते किहिम जवळ आहे. तिथेही साडेसातशे पाय-या आहेत. मी ज्या मंदिरावर लिहिलं आहे, ते चौल, भोवाळे येथील दत्त मंदिर आहे. येथेही जाण्यासाठी साडेसातशे पाय-या चढाव्या लागतात. अलिकडे मंदिरात जाण्यासाठी गाडीचा मार्ग करण्यात आला आहे. भोवाळे भागापासून पुढे सरई नावाचा भाग आहे, तिथून डांबरी रस्ता केला आहे, डोंगरावर जाण्यासाठी. त्या मार्गावरुन अवघ्या १०० ते १५० पाय-या चढाव्या लागतात.

      Delete
  4. सुंदर …..सगळे आपण काल जगलो तसेच शब्दांतून रेखाटून परत त्या आठवणीत नेलेस सई

    ReplyDelete
  5. सुंदर सई...
    काल तुम्ही दोघी लहान मुलीसारख्या बागडत होतात ते बघूनच मनाला खूप बर वाटल..

    ReplyDelete
    Replies
    1. बालपणीच्या आवडीच्या ठिकाणी गेलं, की तसंच होतं....

      Delete
  6. खूप छान.परत जत्रेत जाऊन आल्या चा अनुभव आला.

    ReplyDelete
  7. महेश टिल्लू10 December 2025 at 22:25

    खूप समर्पक शब्दात यात्रेचे वर्णन केले आहे.मी सुद्धा या यात्रेत चार पाच वेळा गेलो आहे.मी अलिबागचा असल्याने वरसोलीची विठ्ठलाची यात्रा आठवणीत आहे.ती सुद्धा पाच दिवस असते.हल्ली पनवेल येथे असल्याने त्या यात्रेला जायला जमत नाही.अलिबाग जवळील thal डोंगर येथील यात्रा देखील पाच दिवस असते.

    ReplyDelete

Post a Comment