अशीही एक पिकनिक...
दुपारच्या वेळी दारावरची बेल विश्रांती न घेता वाजायला लागली की मला दरवाजा न उघडताच पलिकडे कोण असेल याचा अंदाज येतो. ती सविता होती, माझी मैत्रिण. फोन करुन ये, हे वाक्याला सर्वात जास्त खुन्नस कोण देत असेल तर ही सविता. त्यामुळेच बाई, कधीही घरी भेटायला येतात. दरवाजा उघडेपर्यंत बेलवरचं बोट काढायचं नाही, हे आणखी एक सविताचं वैशिष्ट. त्यामुळेच तशी बेल वाजू लागली आणि मी धडपडत दरवाजा उघडायला धावले. या, म्हणून स्वागत करेपर्यंत बाई, कोचावर धाडकन बसल्याही. तू म्हणजे, त्या त्सुनामीपेक्षा कमी नाहीस, म्हणत तिच्यापुढे पाण्याचा ग्लास आणून ठेवला. हे सोपस्कार होत असतांना तिनं एक खाऊने भरलेली पिशवी समोर ठेवली. काय आहे म्हणून बघितलं तर, त्यात आवळे, गावठी तांदूळ, पापड असं सर्व ठेवलं होतं. मध्येच काय, म्हणून तिला विचारलं, तर म्हणाली, आम्हीही पिकनिकला गेलो होतो. तिथे हे सर्व चांगलं मिळतं, म्हणून घेऊन आलेय, तुझ्यासाठी. मी तिच्यासोबत असलेल्या मोठ्या पिशवीकडे बोट दाखवून हे पण का....असं विचारलं. तेव्हा कळलं, बाई एक दिवसाच्या पिकनिकला गेल्या होत्या. सकाळी जाऊन दुस-या दिवशी परत. या सर्वात या बाईंनी मजा करण्यापेक्षा दगदगच जास्त करुन घेतली होती. कॉफीचा कप समोर ठेवल्यावर या सविताची ही दगदगीच्या पिकनिक गाथा ऐकली आणि मी डोक्याला हात मारुन घेतला.
सविता ही माझी बहुगुणी मैत्रिण. कधीही मदतीसाठी आवाज दिला की या बाई हजर. दोन्ही मुलं, आता नोकरीला लागलेली त्यामुळे अलिकडच्या वर्षात ती ब-यापैकी निवांत रहायला लागली आहे. त्यामुळे ब-याचवेळा ये ग, गप्पा मारायला, घरी कोणी नाही, असा तिला फोन केला की, बाई मुक्कामालाच येतात. बाकी सविताचं कुठेही येणं-जाणं नाही. त्यामुळे आता जरा फिरुन घे, म्हणून मी नेहमी तिच्या मागे लागते. पण यावर तिच्याकडे बरीच कारणं असतात. आमच्याकडे कुणाला सुट्ट्या नसतात. कुणाला बाहेरचं खायला जमत नाही. आम्हाला पाण्याचा त्रास होतो, वा-याचा त्रास होतो, असे एक ना दोन हजार कारणांची यादी सविता समोर ठेवते. यावेळी आम्ही चार मैत्रिणी जाणार होतो, यात सविताला घ्यावं म्हणून फोन केला. तर मी काही सांगण्याआधीच या बाई मला कुठेतरी घेऊन जाण्यासाठी आग्रह करत होत्या. तिच्या मुलानं कुठलातरी फार्म हाऊस बुक केला होता. तिथे सविता आपल्या सर्व कुटुंबासह जाणार होती. फार्महाऊस मोठा होता, म्हणून मुलांचे दोन-चार मित्रही येणार होते. शिवाय तिच्या नणंदा, त्यांचे कुटुंबिय आणि आणखी दोन नातेवाईक असे मिळून वीसजणं या फार्महाऊसमध्ये जाणार होते. या वीसजणांमध्ये आम्ही दोघंही सामील व्हावं म्हणून ती आग्रह करत होती. शेवटी तिला मी माझ्या पिकनिकचं सांगितलं आणि तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या. शिवाय दोघीही पिकनिक नंतर एकमेकींना भेटून त्यातल्या गमतीजमती सांगू म्हणून आजचा दिवसही बुक करुन ठेवला होता. त्यानुसारच सविताची गाडी आली होती.
मी कितीही ठरवलं तरी सविता भेटल्यावर बोलण्याचा पहिला मान तिचाच असतो. त्यामुळे तिची पिकनिकची गाथा ऐकू लागले. वीस जणांचा ग्रुप असल्यामुळे एक स्वतंत्र बस केली होती. यातील अर्धीमंडळी दुस-या शहरातून येणारी होती, त्यामुळे चार जणं सविताच्या घरी आदल्या दिवशी सायंकाळीच येऊन दाखल होणार होते. त्यामुळे ही पिकनिक आणि त्यानिमित्तानं येणारे पाहुणे यांच्या सरबराईसाठी सविता दोन दिवस आधीच कामाला लागली होती. मुख्य म्हणजे, घराची साफसफाई, पाहुण्यांसाठी खाऊ आणि त्या पिकनिकमध्ये सर्वांना आवडेल असा आणि दोन दिवस टिकेल असा नाष्टा. सवितानं मोठा प्लॅन केला होता. पुरणपोळ्या, भाकरवड्या, खोब-याच्यावड्या,
शंकरपाळ्या आणि चकल्या यांचे डबे तिनं तयार केले. त्यात ती पिकनिक जिथे होती, तिथे जेवणाची सुविधा काही नव्हती. आपले जेवण आपणच तयार करायचे होते. पिकनिकमध्ये मुलांची संख्या जास्त होती, त्यामुळे त्यांनीच मेनू तयार केला. व्हेज, नॉनव्हेज असे भाग तयार झाले होते. मुलांनी या सर्व पदार्थांची यादी सविताकडे दोन दिवस आधीच दिली. सवितानं मग त्या सर्वांचे सामान जमवण्याचीही जबाबदारी घेतली. झालीच तर जेवणासाठीचे वाटण, आलं-लसूण पेस्ट अगदी बाईंनी किलोभर वटाणेही सोलून घेतले होते. हे सर्व करत असतांना सविताकडे रहाणारे पाहुणे दाखल झाले. आधी चार येणार होते, त्यात दोघांची भर पडली होती. त्या चौघांनी आपल्या आणखी दोन नातेवाईकांना चला, बस तर केलीय, सर्व सोय आहे, तुम्हाला कुठे काय करायचे आहे, म्हणून भरीस पाडले आणि पिकनिकसाठी आणले होते. त्यामुळे आदल्या दिवशीच सविताची ही....गडबड उडाली होती. घरातील इतर मंडळी, पिकनिकमध्ये काय गेम खेळायचे त्याची तयारी करत असतांना सविता मात्र आपली केलेली तयारी कमी तर पडणार नाही ना, या विचारानं कावरीबावरी झाली होती.
निघण्याच्या दिवशी भल्या पहाटे, अगदी चारवाजता सविता उठली होती. सर्वांचे आवरुन झाल्यावर, घर आवरुन, डबे गाडीमध्ये ठेवायला देऊन, मग ती गाडीत जाऊन बसली. तोपर्यंत सर्वांनी चकली आणि शंकरपाळीचे डबे उघडले होते. त्या पिकनिकच्या स्पॉटवर जाईपर्यंत सकाळचे दहा वाजून गेले होते. एव्हाना सगळ्यांना भूका लागल्या होत्या. सवितानं घेतलेले डबे अर्धेअधिक संपले होते, त्यामुळे या बाई जेवणाच्या तयारीला लागल्या. तिथे अगदी चुली तयार होत्या. ज्यांचे घर होते, त्यांनी मदतनीस म्हणून एक बाई सविताच्या सोबत दिली. त्या बाईकडे भाक-या करायची जबाबदारी सोपवून सविता कामाला लागली. सोबत आलेल्या अन्य महिला थोडीफार मदत करुन ते फार्महाऊस बघायला गेल्या. काहीजणी खेळामध्ये रमल्या. या बाई मात्र नेहमीप्रमाणे आपल्याच रगाड्यात अडकल्या गेल्या. जी गत सकाळची, तिच रात्रीची. रात्री उशिरा झोपलेल्या सविताला दुस-या दिवशी सकाळी उठता येईना, एवढा थकवा आलेला. पण आता निघायची गडबड. लेकाचे मित्र आणि नातेवाई, स्टेशनवरुन परस्पर जाणार होते, त्यामुळे सकाळचा नाष्टा करुनच जाण्याचे ठरवण्यात आले. पुन्हा सामानाची जमवाजमव आणि सविताची धावपळ. अशी ही तिची पिकनक झाली, आणि सविता दुपारी
तीनच्या सुमारास घरी परतली. परत येतांनाच आता जेवणाची ऑर्डरच करा, माझ्यात काही ताकद नाही, म्हणून जी झोपली ती थेट रात्रीच्या जेवणास उठली. अशी पिकनिक नको बाई, तू कशी सारखी जातेस, तेव्हाही असंच होतं का, म्हणून मला विचारु लागली. तेव्हा मी डोक्यावर हात मारुन घेतला. जिथे आपण जातो, तिथे जे मिळतं, ते खायचं, आणि तिथल्या निसर्गात रंगून जायचं, याला पिकनिक म्हणतात. तू तिथे हे जेवणाचे घाट कशाला घालत बसलीस, म्हणून मी तिला ओरडले. पण ऐकेल ती सविता कशी. आमच्याकडे सर्वांच्या खाण्याच्या वेगळ्या त-हा आहेत, त्यांना कुठे तुझ्यासारखं जमतंय, म्हणून मलाच जाब विचारला. मग अशांनी कुठे जाऊच नये...आणि दुस-यांना ताप देऊ नये...हे मी सांगितल्यावर सवितात खट्टू झाली. एव्हाना तिचा दुसरा मेथीचा लाडू चालू झाला होता. सविता, कधीतरी आपल्या रोजच्या रगाड्यातून बाहेर काढावं ग...जग खूप सुंदर आहे...ते बघण्यासाठी जगाची सफर केलीच पाहिजे असं नाही, अगदी आपल्या शेजारच्या गावी गेलं, तरी या सुंदरपणाची कल्पना येते. पण त्यासाठी आपले नेहमीचे सर्व कोष दूर सारायचे. जिथे जाऊ तिथल्या मातीत मिसळून जायचं. या समरसतेचा आनंद घेतला, की मन अगदी मोकळं होतं...अशा ठिकाणी जातानांही फार पाश घेऊन जाऊ नयेत, आणि तिथे गेल्यावरही अशा खाण्यापिण्याच्या नादात राहू नये....आणि हो...तिथून येतांना उगा सर्वांना काही आणलेच पाहिजे, म्हणून अशी वारेमाप खरेदीही करु नये...म्हणून मी तिला टपली मारली...एक कप कॉफीचा आणखी देशील तर हे ऐकते...घरी गेल्यावर मुलांचे कान ओढून त्यांनापण हा डोस देते...म्हणून सविता खळवळून हसली आणि माझ्या पिकनिकची गाथा विचारु लागली.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
वा सुरेख
ReplyDeleteसुरेख
ReplyDeleteMast
ReplyDeleteपिकनिकच्या कथेपेक्षा सविताच्या आवडीनिवडी व तुमच्या मैत्रीची कथा मस्त आहे.
ReplyDeleteछान मांडलंय. कुटुंबातील अन्य सदस्यांनी पण सहलीला नेताना आपल्या घरातील महिलेला कामगार/ आचारी म्हणून नेत नाही हे ध्यानात ठेवलं पाहिजे.
ReplyDeleteभारी आहे तुझी मैत्रीण सई..
ReplyDeleteखूप छान लेखन
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteखूप छान लेख आहे.
ReplyDeleteआपला अशीही एक पिकनिक(सहल)लेख खुप. छान आहे.
ReplyDelete