सोन्याची भाजी

 

सोन्याची भाजी


आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी फ्रिज उघडला तर तो खाली झालेला.  भाजीच्या नावावर दोन टोमॅटो आणि बारीकशी ब्रोकली.  त्यामुळे व्यायामाला टाटा करत आम्ही दोघंही बाजारात दाखल झालो.  आज तुझ्या भाजीवाल्यांसोबत गप्पा मारत बसू नकोस, लवकर आटप म्हणून भाजी खरेदीची सर्व सूत्र नव-यानं हातात घेतली.  एकाच ठिकाणी सर्व भाजी घेऊयात, म्हणत त्यानं एका मोठ्या भाजीच्या स्टॉलसमोर मला उभं केलं.  पहिलीच नजर पडली ती, शेवग्याच्या मोठ्या गठ्ठ्याकडे.  अन्य भाजीसोबत या शेवग्याच्या शेंगांचा दर विचारला आणि आम्ही आवाक झालो.  कारण किलोला चारशे रुपये. हा दर सांगतांना त्या भाजीवाल्यानंही त्याच्या मिशांवर ताव मारुन घेतला.  मग काय, आपल्या नेहमीच्या भाजीवाल्या ब-या म्हणत, आम्ही दोघांनीही या मोठ्या स्टॉलवरची खरेदी आटपली आणि माझ्या नेहमीच्या भाजीवाल्यांना गाठलं.  अर्थात त्यांच्याकडेही शेवग्याच्या शेंगा होत्या, आणि त्यांचा भावही तसाच चढा होता.  पण त्यासोबत आणखीही आवडीच्या भाज्या होत्या.  त्यामुळे शेवग्याच्या शेंगांची ताटातली चव अधिक वाढणार या खुशीमध्ये सोन्याच्या किंमतीत या शेवग्याच्या शेंगा खरेदी केल्याच.


तो संपूर्ण दिवस या सोनेरी शेवग्याच्या शेंगांचा झाला.  दुपारच्या जेवणासाठी शेवग्याच्या शेंगाची शेंगवणी.  अगदी साधी.  तेलावर जिरे, कडीपत्ता फोडणी आणि बेतानं तिखट, हळद, त्यावर कापलेल्या शेवग्याच्या शेंगा.  अगदी पाच मिनिट शेंगा वाफेला लावल्या.  त्या शिजू लागल्याचा सुवास दरवळू लागल्यावर शेंगदाण्याचा कूट, आमच्या निर्मितीनं दिलेल्या चिंचेचा कोळ, गुळाचा खडा आणि मिठ आणि पेलाभर गरम पाणी.  त्यानंतर आणखी दहा मिनिट.  रस्सा भाजी तयार.  सोबतच आखणी एक गम्मत मिळाली होती.  ती म्हणजे, शेवग्याची फुलं.  या दिवसात क्वचितच ही फुलं मिळतात.  आता मिळाली तोही फक्त एक वाटा होता,  अर्थात   तोही त्या शेंगासारखाच चढ्या दरानं होता.  पण या शेवग्याच्या फुलाच्या भाजीच्या चवीसमोर ही किंमतही कमी होते.  एकच वाटा असल्यामुळे त्याला जोड म्हणून मुगाच्या बिरड्याचा वापर केला.  या शेवग्याच्या फुलांची भाजी करण्याची पद्धत अगदी सोप्पी, फक्त ती साफ करतांना थोडी काळजी घ्यावी लागते.  काहीवेळा या फुलांमध्ये मुंग्या किंवा अगदी बारीक किड असते.  ती साफ करण्यासाठी थोडावेळ ही फुलं हळदीच्या पाण्यात घातली, की स्वच्छ होतात, आणि त्यातील मुंग्या, किडे पाण्यावर तरंगू लागतात.  मग पुन्हा एका पाण्यातून धुतल्यावर फुलांची भाजी करायला सुरुवात.  फोडणीला भरपूर ठेचलेला लसूण आणि मिरच्या.  त्याच्यावर कांदा आणि मुगाचे बिरडे.  एखादं मिनिटांची वाफ दिल्यावर मग यावर स्वच्छ केलेली शेवग्याची फुलं घालायची.  परतून

झाल्यावर मिठ घालायचे.  अगदी दोन मिनिटात भाजी तयार, वरुन चांगलं खोबरं घातलं, की भाजी अधिक छान दिसते, आणि चवही वाढते.  दुपारच्या जेवणात हा शेवग्याचा बहार आल्यावर रात्रीचे जेवणही असेच शेवगामय झाले. 

शेवग्याच्या शेंगांचे सूप.  सध्या हे शेवग्याचे सूप म्हणजे, सर्वाधिक व्हायरल झालेला पदार्थ.  आमच्याकडे आठवड्यातून किमान एकदा तरी हे शेवग्याचे सूप होते.  त्यात मुख्य मान या शेवग्याच्या शेंगांचाच.  आता त्याची संख्या किती असावी....तर त्याला जोड म्हणून या सुपामध्ये काय वापरणार आहोत, यावर ही संख्या ठरवली जाते.  मी बहुधा शेवग्याचे सूप करतांना त्यात मक्याचे दाणे टाकत नाही.  सुरुवातीला कढईमध्ये अगदी काहीही न घालता शेंगा थोड्या भाजून घ्यायच्या.  मग त्यात बटर किंवा अगदी चमचाभर तेल टाकायचे.  यामध्ये मग टोमॅटो, आलं, लसूण, कांदा, गाजर, बिट यापैकी आपल्याला जे आवडेल ते घालायचे.  दुधी, बटाटा, ब्रोकली, एखादी भिजवलेली डाळ घातली तरी चालते.  हे सर्व पाच मिनिट परतून घायचे.  सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करायचे.  आणि पुन्हा गरम करण्यापूर्वी एकदा मोठ्या गाळणीतून गाळून घ्यायचे.  मी बाकी कुठलेही सूप गाळून घेत नाही, मात्र या शेवग्याच्या सूपामध्ये त्याचे बारीक तूस तोंडात येतात, आणि सूप पिण्याची मजा निघून जाते, म्हणून ही काळजी घ्यावी लागते.  सूप उकळायला लागल्यावर त्यात काळीमिरी पावडर आणि मिठ घातले की सूप तयार.  फार


लाड करायचे असतील तर वरुन थोडं बटर घालायचं.  असेच सूप एकीकडे तयार होत असतांना त्या शेवग्याच्या भाजीतील आणखी एक प्रकार हाती घेतला, तो म्हणजे, शेवग्याच्या पाला.  सकळी भाजीवाल्या मावशीनं आठवणीनं एक जुडी पिशवीत टाकली होती.  तिच जुडी साफ करुन त्याचा पाला वेगळा करुन घेतला.  तो स्वच्छ धूवून थोडा चिरुन घेतला.  मग या शेवग्याच्या पाल्यामध्ये थालीपिठाचे पिठ, मिठ, कांदा आणि मिरची घालून मस्त थालीपिठं तयार केली.  एकूण काय रात्रीच्या जेवणातही त्या सोनेरी शेवग्याची सोबत होती. 

शेवग्याच्या शेंगाच्या सोबतीनं रात्रीचे जेवण झाले, आणि गावाहून फोन आला.  इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि विषय विशेष मुद्याकडे आला.  आज जेवायला काय केलंय.  हा प्रश्न आला आणि मी सुरु झाले.  शेवग्याची भाजी.  शेवग्याच्या शेंगांचा भाव काय आहे माहित आहे का,  चारशे रुपये किलो.  या महागड्या शेंगासोबत आज शेवग्याची फुलं आणि


पानांचीही भाजी आणली होती.  तोच बेत केला आज.  बस्स....एवढं बोलायचं बाकी होतं...पलिकडून मोठा हासण्याचा आवाज आला....हत्तीच्या, आमच्याकडे रास आहेत शेवग्याच्या शेंगा.  इथे कोण विचारतोय त्या शेंगांना.  शेवग्याच्या शेंगांना कोण विचारत नाही, तर पाला आणि फुलांची काय बात...म्हणत पुन्हा जोरात हसण्याचा आवाज आला.  यानंतर मी फोन गुमान नव-याकडे दिला.  पलिकडून अजून शेवग्याच्या भाजीवरुन आम्हाला मिठ लावले जात होते.  पण मी मात्र राहिलेल्या शेवग्याच्या शेंगा प्रेमानं साफ करायला घेतल्या.  वाल-शेवगा, तूर-शेवगा, डाळ-शेवगा ,  बटाटा-शेवगा   अशी माझी मोठी यादी तयार होती...त्याची तयारी सुरु केली.

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

Comments

  1. शेवग्याच्या शेंगाचे प्रकार आणि तुमचे विविध विषयावरील लेखन सगळेच चविष्ट असते. वेगवेगळ्या विषयावरील दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या आपल्या ब्लॉगच्या लेखामुळे आठवडाभराचे वाचनाचे चांगले काम होते. तसेच नवीन प्रकारे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी तुमचा लेख मदतगार पण ठरतो.

    ReplyDelete
  2. शेवग्याच्या शेंगांची नवीन रेसिपी मिळाली खूप छान.

    ReplyDelete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete
  4. खूप छान पाककृतीचे वर्णन

    ReplyDelete
  5. अलिबागला आमच्या घरी शेवग्याचे झाड होते,पण ती जागा आता devlope होत असल्याचे सर्व महत्वाची झाडे गेली.या लेखाद्वारे गत स्मृतींना

    ReplyDelete

Post a Comment