आम्ही मतदार...
महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली आणि आमच्या शेजारच्या इमारतीला जाग आली. शेजारीच असलेल्या पालिकेच्या इमारतीत कोण राबता सुरु झाला. माणसांची आणि गाड्यांची संख्या तर विचारुच नका. या दोघांमध्ये एक समान धागाही मिळाला, तो म्हणजे, पांढ-या रंगाचा. खिडकीतून कधीही बाहेर बघितलं, की पांढ-या रंगाचे कपडे घातलेली मंडळी घोळक्यांनी उभी. बरं एक घोळका गेला की, पुन्हा एक लांबलचक मोठी पांढ-या रंगाची गाडी दाखल होणार...त्यातूनही पुन्हा पांढ-या रंगाचा पोशाख घातलेली मंडळी. मध्येच घोषणा...मध्येच पळापळ. मग पोलिसांची गडबड...एकूण निवडणुका होईपर्यंत आमची खिडकी ही निवडणूकमय झालेली राहणार, याची जाणीव झाली. जिथून बघावं तिथे, इच्छूक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते. मध्येच येणा-या घोषणा...हाती झेंडे घेतलेल्या आणि फेटे बांधलेल्या महिलांची गर्दी...गेला आठवडाभर ही गम्मत बघण्यात बराच वेळ गेला. शेवटी नवरा ओरडला, त्यांना बघून काय होतंय...तेव्हा माझी खिकडी सुटली. त्या संध्याकाळी नेहमीसारखी एक फेरी मारायला बाहेर पडले. अगदी स्टेशनपर्यंतचा रस्ता. नेहमीचाच. पण त्यादिवशी तो वेगळा भासला. ज्यांना मत देतो, ते त्या मताचं नेमकं काय करतात, हा प्रश्नही त्यातून मला पडला.
सायंकाळचे पाच-साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे बाहेर पडलो. पहिल्यांदा पुन्हा नजर गेली ती आमच्या शेजारच्या इमारतीमध्ये चालू असलेल्या गडबडीकडे. पक्षाचे कार्यकर्ते, नेते, आणि सरकारी अधिकारी सर्वच गडबडीत. त्यांची ती लगबग बघत मी आमच्या इमारतीमधून बाहेर पडत होते, आणि नव-यानं खसकन माझा दंड ओढत मागे खेचलं. त्याच्यामते ही माझी एक वाईट सवय. एकडे-तिकडे बघत चालणं आणि धडपडणं. पण आता त्यांनी ओढलं होतं, ते आमच्यासमोरुन सुसाटवेगानं जाणा-या गाडीपासून वाचण्यासाठी. नेहमीचा रहदारीचा रस्ता आहे, याचं भान न ठेवता तो गाडीवाला सुसाट वेगानं निघून गेला आणि मी भानावर आले. आमचा नेहमीचा रस्ता. पण नेहमीचा रस्ता म्हणून त्याला गृहित धरायचं नाही, हे मी आत्तापर्यंतच्या धडपडीनंतर शिकले आहे. त्यामुळे काळजीपूर्वक चालत असतांनाच या नेहमीच्या रस्त्यावर एक मोठा खड्डा उगवलेला दिसला. त्याच्या बाजुनं चार काठ्या उभ्या केल्या होत्या, दगड, माती लावून त्यावर कुंपण केलेलं. त्या खड्ड्यामुळे रस्त्याचा अर्धा भाग व्यापला होता. आधीच रस्त्यात गाड्यांची गर्दी, ती कशाला या खड्यांना घाबरते. शेवटी आम्हीच अंग चोरून त्या खड्ड्याला चुकवत, त्यावरील दगडावर हळूवार पाय ठेवत मार्ग काढला. येथून पुढची वाट अजून अवघड होते. कारण मुख्य रस्ता चालू होतो आणि गाड्यांची संख्या वाढते. मग अशावेळी फुटपाथचा आधार घ्यावा लागतो. पण तेही कुठे धड. अर्धे फुटपाथ नेमके कोणासाठी हा प्रश्न पडावा एवढे व्यापून टाकलेले. आमच्या
रस्त्यात सुरुवातीला जे फुटपाथ लागतात, ते म्हणजे, नजर हटी दुर्घटना घटी या वर्गातले. कारण त्या फुटपाथ आणि त्यावरील गटारांच्या झाकणाची बेरीज चुकलेली. त्यामुळे डोंगर की नदी हा खेळ करत हे फुटपाथ पार करायचे. त्या पुढचा टप्पा अधिक घातक. कारण इथे रस्ता क्रॉसिंगचे दिव्य पार पाडावे लागते. हे दिव्य पार पाडतांनाच मला माझं वय वाढत आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. नव-याचा हात गच्च धरुन, मनात देवाचे नाव घेत, हा टास्क पार पाडावा लागतो. मग पुन्हा कशासाठी तरी करुन ठेवलेला एक खड्डा दिसतो. त्याच्याभोवतालच्या माती, दगडावरुन मग ते अंग चोरत चालणं....हे आता सरावाचं झालं आहे. कारण हे महाराज जवळपास महिनाभरापासून अधिक काळ येथे आहेत. का...कशाला...ते कधी बुजवले जाणार....याची काहीही माहिती नाही...असो....
हे सर्व पार करुन डोकं भणभणायला लागतं, मग मंदिराचा आधार घ्यायचा. जरा वेळ शांततेत गेला की परतीची वाट. हा रस्ता वेगळा. अर्थात इथला टास्कही वेगळा. इथे फुटपाथकडे बघायचंही नाही. कारण त्यावर भाजीवाल्यांची सत्ता. ती भाजी घेण्यासाठी भर ट्रॅफीकमध्येच गाडी थांबवून उभ्या असलेल्या महाभागांना चुकवत समोरच्या गाड्यांपासून स्वतःचा जीव वाचवत थोड्या कमी गर्दीच्या रस्त्याला लागे पर्यंत जीवाची ही....धाकधूक. मग तो शांत रस्ता लागला की नव-याचं ठरलेलं वाक्य, खाली बघून चाल...का....कारण हा रस्ता कमी रहदारीचा, म्हणून की काय, यामध्ये फुटपाथची पार दैना झालेली, सोबतच त्यावरील दिव्यांनीही मान टाकलेली. त्या अंधारात मी अनेकवेळा त्या रबरी स्पिडब्रेकवर धडपडले आहे, त्यामुळेच नवरा या रस्त्यावर आल्यावर आठवणीनं त्याचं हक्काचं वाक्य मला ऐकवतोच. मग हा अंधारा रस्ता जागरुकपणे पार केला की परत रस्ता क्रॉस करण्याचा टास्क. फुटपाथवरचा डोंगर की नदी हा खेळ करत आमच्या घराच्या जवळपास यायचं. या जवळच्या रस्त्याला लागलं, की पुन्हा माना टाकेल्या पथदीपांचा सामना करायचा. पण आपण मोबाईलवाले...आपल्याला कशाला हवेत, रस्त्यावरचे लाईट....मोबाईलची बॅटरी चालू करायची आणि तो रस्ता पार करायचा. रस्ता नेहमीचाच....अगदी डोळ्यावर पट्टी बांधूनही तो
पार करता येईल, एवढा पाठ झालेला. पण इथे जीवाची भीती...कारण बेभानपणे गाडी चालवणा-यांना हा रस्ता जणू आंदण दिलेला. कानठळ्या बसणा-या आवाजात त्यांच्या गाड्या येतात, तेव्हा आपण अंग चोरुन घ्यायचं, आणि हाती घेतलेल्या मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात, आम्हीही आहोत, ही जाणीव त्यांना करुन द्यायची....याची धडपड...
रात्री घरी आल्यावर मैत्रिणीचा फोन...तिनं तिकीट मागितलं होतं, पण
तिला मिळालं नाही. चांगली कार्यकर्ती
दुखावली होती. सर्व पैशावर चालतं
ग...म्हणत हमसत होती...यावर काय समजवणार...उघड सत्य कधी बोलायचं नसतं....बराचवेळ
ती, कसं काम चालतं ते सांगत होती....मी एकीकडे तिची कथा ऐकत टिव्हीवरच्या बातम्या लावल्या. त्यावरही तेच...निवडणुकांचं जाळं...तिकीट
मिळालेल्या उमेदवारांचे फोटो झळकत होते....बायकोला मिळालेला एबी फॉर्म हातात धरुन
नवरा फोटो काढत होता...टिव्ही बंद केला.
मैत्रिणीला एक प्रश्न विचारला....तिकीट नाही, म्हणजे, तू काही काम करणार
नाहीस का...ती थांबली...छे ग...आपण आपल्या वाटेनं चालणारच ना...म्हणत तिचा सूर
बदलला....मग नेहमीच्या गप्पा चालू झाल्या....शेवटी काहीही झालं तरी मतदान
करुया....या वाक्यानं त्यांना विराम दिला...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
आदरणीय सईजी आपण राजकारण बाबतीत आले मांडलेले मत आणि अनुभव हा अगदी समर्पक आहे
ReplyDeleteअगदी खरं आहे.
ReplyDelete