प्रामाणिक
प्रामाणिक या शब्दाची व्याख्या किती व्यापक आहे, याची पुन्हा जाणीव मला या आठवड्यापूर्वी झाली. आईला घेऊन आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले होते, तेव्हाची ही गोष्ट. ठराविक वेळ घेऊन डॉक्टरांकडे गेल्यावर जे होतं तेच आमच्याबाबतीत झालेलं. त्या अपॉईंटमेंटच्यावर दोन तास होऊन गेले, तरी आमचा नंबर येईना, म्हणून माझी कोण चुळबूळ सुरु झालेली. मध्येच दवाखान्याचा आतला दरवाजा उघडला, की आता आमचं नाव येणार, या आशेनं बघण्यात वेळ चालला होता. मग तो दरवाजा बंद करत, आणखी दोन नंबर नंतर तुम्हीच, हे वाक्य आलं की परत ती चुळबूळ. या सर्वात माझं लक्ष एका व्यक्तिकडे गेलं. दवाखान्यात काम करणारी मावशी. दवाखाना, पेशंट आणि त्यांच्यासोबत आलेल्यांनी एकदम फुल्ल झालेला. त्यातही लहान मुलांची संख्या अधिक. डॉक्टरांकडे नंबर लागल्यावर भोकाड पसरणा-या मुलांना सांभाळण्याचे अवघड काम या मावशी करत होत्या. एवढा वेळ बसल्यावर मी त्यांची ती लगबग आणि त्यांचा टापटीपणा टिपत होते. त्या प्रामाणिकपणे आपलं काम करत होत्या. पण अजून एका बाबतीत त्यांचा प्रामाणिकपणा मला अधिक भावला. कानाच्या बाळीपासून ते पायाच्या पैजणांपर्यंत मावशींनी दागिने घातले होते. हातात बांगड्यांचा चुडा होता. आपला हा सगळा साज सांभाळत त्या मावशी ज्या पद्धतीनं काम करत होत्या, ते बघून माझ्या मनात एकच शब्द भुंगा घालत होता, तो म्हणजे, प्रामाणिक.
हा गेल्या आठवड्यात घडलेला किस्सा आहे. आईला घेऊन आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे अगदी साडेदहाच्या ठोक्याला गेले होते. आईची अपॉईंटमेट अकराची होती. पण तिची तयारी सकाळी नऊपासून झालेली. अर्धातास आधी गेलं, तर नंबर आधी येईल, असं लालूच तिनं मला दाखवलं, आणि पूर्वीच्या सगळ्या अनुभवाची पाटी कोरी करत मी दावखाना गाठला. अर्थात तिथे आल्यावर पुढच्या दोन तासात मनःशांतीचे धडे गिरवावे लागणार याची कल्पना आली. आमचा नंबर यायला अजून दहा-नंबरचा अवकाश होता. त्यात त्यादिवशी लहानमुलं अधिक होती. त्यामुळे त्यांची रडारड आणि त्यांच्या आईची होणारी तारांबळ पाहत माझा मागचा काळ आठवून झाला. आजूबाजुंच्याबरोबर गप्पा मारुन झाल्या. पण वेळ काही जाईना. तेवढ्यात एक लहान बाळ जोरात रडायला लागलं. त्याचा डॉक्टरांकडे नंबर लागला. डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा उघडल्यावर त्या छोट्यानं पुढे काय होणार याचा अंदाज घेत, भोकाड पसरलं, मग त्याच्या आईची तारांबळ उडली. आलेला नंबर महत्त्वाचा आणि सोबत त्या छोट्याला शांत करणंही तेवढंच गरजेच. अशात दवाखान्यातल्या मावशी मदतीला आल्या. त्यांनी छोट्याला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या बाईला, तुम्ही आता जा, डॉक्टरांबरोबर बोला, मग मी याला शांत करुन घेऊन येते, म्हणून सांगितलं. ती बाई विश्वासानं आत गेली. इकडे मावशींनी एखाद्या सराईतासारखा त्या मुलाचा ताबा घेतला, आणि त्याला काही क्षणात शांत केलं. थोड्या वेळानं त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेल्या. बहुधा त्याला इंजेक्शन दिलं, त्यामुळे त्याचा आवाज आणखी वाढला. पुन्हा त्या मावशी त्या छोट्याला घेऊन बाहेर आल्या. त्याची आई, डॉक्टरांकडून त्याच्या औषधांबद्दल सर्व समजावून घेईपर्यंत त्या बाळाला खेळवत होत्या. ती आई बाहेर आली, अगदी पायात चप्पल घालून रिक्षा पकडेपर्यंत ते बाळ मावशींच्या कडेवर होतं. त्या बाई रिक्षात बसल्यावर त्यांनी हळूच बाळाला आईच्या ताब्यात दिलं, आणि त्या दवाखान्यात परत आल्या.
नंतर दोन वेळा असाच काहीसा प्रसंग घडला. त्यानंतर एका छोट्या बाळानं
उलटी केली. मावशींनी नाकबिक न मुरडता डस्टरनं सगळं साफ केलं, शिवाय त्या बाळाचे कपडे बदलायलाही त्याच्या आईला मदत केली. या सर्वात मी त्यांचं निरिक्षण करत होते. अगदी साधी साडी, पण निटनेटकी. मॅचिंग ब्लाऊज, मोठी टिकली. केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा, शिवाय अष्टरची दोन फुलं खोचलेली. गळ्यात मंगळसूच्र आणि एक मोत्याची माळ. कानातही मोत्याचे डूल, हातातही साडीला मॅचिंग अशा बांगड्या, पायात जोडवी आणि अगदी एकसोडून दोन-दोन पैजण. मी बराचवेळ त्यांच्या त्या अफलातून लूककडे बघत होते. पायात दोन पैजणं बघून तर अगदी अवाक झालेले. मला पैंजण हा प्रकार आवडतो, त्यामुळे आईनं हौसेनं दिलेले पैजणांचे जोड तसेच पडून होते, कधीकाळी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बाहेर यायचे, बाकी कडीकुलपात बंद. या मावशी मात्र मजेत सर्व घालून बसल्या होत्या. त्या दोन पैजणांचा विषय काही माझ्या मनातून जाईना, शेवटी त्या मावशी थोड्या मोकळ्या झाल्यावर मी त्यांना खुणेनंच विचारलं, दोन-दोन पैजणं कशाला. तेव्हा छानसं हसल्या. म्हणाल्या, एकाला घातलं, आणि दुस-याला कपाटात ठेवलं, तर ते रागवेल ना, म्हणून दोघांनाही घालून घेतलंय आता ते त्यांचं बघून घेतील...मी पुन्हा आवाक...हे काय उत्तर आहे. किती तो प्रामाणिकपणा.
नंतर लहान मुलांची संख्या जरा कमी झाल्यावर मावशीही निवांत
झाल्या. मी त्यांना माझ्याशेजारी बसा म्हणून
खूण केली. त्या बसल्याबरोबर हळू आवाजात त्यांच्यांवर प्रश्नांचा मारा सुरु केला. पहिला
प्रश्न अर्थात, एवढ्या सगळ्यात आनंदी कशा रहाता...मावशी हसून म्हणाल्या. अहो माझं
कामच आहे ते. मुलांना सांभाळायला आवडतं, आणि जे आवडतं ते करण्यात आळस कसला. उलट मुलांना वाटलं पाहिजे, आपली सख्यी मावशी
आहे म्हणून. म्हणून मी छान तयार होऊन येते. फुलं, गजरा, गळ्यातलं, बांगड्या, पायातले
पैजण...सगळं मुलांसाठी. लहान मुलं कशानं आपल्याला आपली समजील हे सांगता येत नाही.
पण त्यांना समोरचा माणूस प्रसन्न दिसला की ते पहिल्यांदा रडं थांबवतात. हेच तर मला
हवं असतं. या मुलांसोबत राहून एवढं
प्रामाणिकपणे मला समजलं, अजून काय हवं. मावशीनं तो माझ्या मनातला, प्रामाणिकपणा हा
शब्द घ्यायला, आणि डॉक्टरांकडे आईचा नंबर यायला एकच वेळ झाली. मी आईला घेऊन उठणार,
इतक्यात मावशीच पुढे झाल्या. तुम्ही बसा, आधी आजींना तपासतील डॉक्टर, म्हणत, आईचा
हात हातात धरुन त्या आत जाऊ लागल्या. एरवी आमची आई, कोणाचा हात पकडत नाही. पण
मावशींचा हात तिनं सहजपणे पकडला. आई
केबिनमध्ये जाता जाता त्यांना सांगत होती, माझ्या लेकीकडेपण पैजण आहेत, पण ती घालायचा
आळस करते, तुम्ही छान घातलेत. छान दिसत
आहेत....अर्थात मी यावर डोक्यावर हात मारुन घेतला होता, हे सांगायला नकोच...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
Superb concept 👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteYour observation skills and reaching out to simple people is admirable.
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteखूप छान लेख आहे.
ReplyDelete