अब सब शांती शांती है
महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून जी काही लगबग चालू होती, ती आता शांत झाली आहे. निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यावर तर घराला टाळं लावून कुठेतरी दूर निघून जावं अशी परिस्थिती होती. कारण प्रचाराच्या आवाजांची दुनिया. एक रिक्षा गेली, की दुसरी रिक्षा. घरासमोर मोठ्या स्क्रीनवर लावलेल्या उमेदवारांच्या प्रचार व्हिडिओंनी आणि त्यांच्या आवाजांनी नको केलं होतं. या सर्वांचा एवढा परिणाम झाला होता की, झोपेत सुद्धा आपल्या आसपास ती प्रचार करणारी रिक्षा फिरत असल्याचा भास होत होता. हा प्रचार थांबला तेव्हा कानांना कोण आनंद झाला. घराशेजारील झाडावर बसलेल्या साळुक्यांचा आवाज टिपता आला. प्रचार संपला. मतदान झाले आणि या शांततेची नव्यानं जाणीव झाली. पंधरा दिवसांच्या धुरळ्यानंतर येणारी ही शांतता अनमोल वाटली. पण या निवडणुकीमुळे बरेच अनुभव आले. व्यवस्था आणि अव्यवस्था यातील दरी पुन्हा एकदा दिसली. लेकानं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना स्वर अडखळला. अर्थात निवडून आलेले उमेदवार या शहराच्या विकासाला नवी वाट करुन देतील, ही उमेद नक्कीच आहे.
यावेळेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका एक नवा अनुभव देणा-या ठरला. मुख्य म्हणजे, उमेदवारांच्या बदलेल्या प्रचाराच्या पद्धती या लक्षवेधक ठरल्या. पण ब-याचवेळा त्यांचा ताप अधिक झाला. एकतर त्या आवाजी प्रचारामुळे जगात दुसरे काही आवाज नाहीच की काय, असा समज झाला. त्यातही सोशल मिडियाचा झालेला तुफान वापरही वेगळा ठरला. पण या सर्वात मला आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे या निवडणुकीमुळे तयार झालेली तात्पुरती रोजगाराची संधी. आमच्या घरी प्रचाराच्या निमित्तानं आलेल्या एका मुलाबरोबर संवाद साधला,तेव्हा त्याच्यासारखीच अनेक मुलं या संधीचे कशाप्रकारे सोनं करत आहेत, याची माहिती मिळाली. आमच्याकडे जो मुलगा आला होता, तो मतदान कसे करायचे, याचा डेमो देत होता. पॅनल पद्धत, त्यामुळे चार उमेदवार. त्यांना कशापद्धतीनं मत द्यायचे, हे तो अगदी सराईतपणे सांगत होता. चौकशी केल्यावर कळलं की, त्याच्यासारखीच अनेक मुलं या कामामध्ये व्यस्त आहेत. दिवसाला अगदी ५०० ते १००० रुपयांपर्यंत त्यांची कमाई होत आहे. घरोघरी जाऊन मतदान कसे करायचे याची माहिती द्यायची, मतदार किती आहेत, याचा डेटा गोळा करायचा, उमेदवारांसोबत घरोघरी फिरायचे, त्याचे शूट करायचे, त्याचे एडिटींग करायचे, रिल किंवा व्हिडिओ स्वरुपात मग लगेच उमेदवाराच्या प्रचार दौ-याचा कार्यक्रम शेअर करायचा. सोबत उमेदेवारांनी केलेल्या किंवा करणार असलेल्या विकास कामांची माहिती देणारे व्हिडिओ करायचे. उमेदवाराची पत्रके तयार करायची, ती प्रिंटर कडून छापून आणण्यापासून ते ती घरोघर वाटेपर्यंतची कामे करायची....अशी असंख्य काम करण्यासाठी अनेक तरुण या निवडणुकीत झटत होते. आमच्याकडे जो मुलगा आला होता, त्याला सहज म्हणून विचारलं, काय रे, तू याच उमेदवाराला मत देणार का....तेव्हा तो लगेच
म्हणला, मी मत देईन किंवा नाही, हे नक्कीही नाकी, तेव्हाही काही काम असेल तर ते आधी करेन. कारण तो शेवटचा दिवस. मतदानानंतर आमचं काम संपलं, आणि पैसेही. त्याच्या या माहितीवर माझ्या मनात पहिला प्रश्न आला, आणि तो मी त्याला विचारला. तुझ्या शिक्षणाचं काय...दहा दिवस कॉलेजला दांडी घ्यावी लागत असेल ना. तो मुलगा हात झटकून म्हणाला, कॉलेजमध्ये रोज कुठे काही होतं, एरवी मी आठवड्यातून एक दांडी मारतोच. आता तर पैसे मिळत आहेत. त्या मुलाबरोबर संवाद वाढल्यावर कळलं की त्याचे अन्य मित्रपण असेच काम करत आहेत. काहींच्या घरची परिस्थिती बेताची आहे, अशात निवडणुकीच्या प्रचाराचे मिळाले, त्यामुळे हे दिवस त्यांना सोन्यासारखे वाटतात. दिवसाला ठराविक पैसे, शिवाय सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण. ही तर त्यांच्यासाठी ऐश झाली. आमच्याकडे जो मुलगा आला होता, त्याने या दिवसात १५ हजार रुपये कमावले होते. तो हे पैसे साठवून ठेवणार होता. पुढच्या वर्षी कॉलेजला तो शेवटच्या वर्षाला असणार आहे. त्यावेळी तो एक क्लास लावणार आहे, त्यासाठी हे पैसे त्याच्या उपयोगी पडणार होते. या सर्वात त्याची आई, वहिनी आणि काकूही प्रचारसाठी वेगवेगळ्या उमेदवारांकडे काम करत होत्या. एकूण काय माझ्यासाठी जो प्रचाराचा आवाज त्रासदायक झाला होता, तो या मुलासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी आधार होत होता.
बाकी निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार जिवाची बाजी लावत असतात. त्यात ते प्रचारात आवाजाचीच काय, पण आश्वासनांची आणि वर्तनाची मर्यदा ओलांडत असले तरी आपण आपली लोकशाहीची मर्यादा जपावी लागते. हेच जाणून मी आग्रहानं लेकाला मतदानासाठी बोलावून घेतलं. तो आलाही. पण
त्याचे सध्याचे विश्व बदललेले. अपेक्षा वाढलेल्या. त्यामुळेच आल्या आल्या त्याने प्रश्नांच्या फैरी चालू केल्या. एवढी पत्रकं कशाला वाटतात. हे खरोखरच तू वाचतेस का. नंतर हे सर्व पेपर रद्दी म्हणून जातात, त्या एका पेपरसाठी किती झाडांची हत्या होते...वगैरे...वगैरे. त्यात एक दिवस त्याला आग्रह करुन बाहेर नेले, तर घराजवळच्या नाक्यावर कोण गर्दी. बहुधा सर्वच अनोळखी चेहरे, मोठ्या गाड्या यांनी नेहमीचा नाका भरलेला. काहीतरी गडबड आहे, याची जाणीव होऊ देणारी कुजबूज. या गर्दीतून वाट काढत आमच्यासारखे अनेक ये-जा करत होते. त्यानंतर पुन्हा प्रश्नांच्या फैरी. निवडणुकीत सामान्य माणासाला स्थान किती, तू किंवा मी उभं राहिलो तर काय होईल, प्रचारासाठी किती पैसे लागतात, पैसे लागतात की माणसं लागतात....वगैरे वगैरे...शेवटी मी हात जोडले...बाबारे फक्त मतदान कर...आपली झेप फक्त एवढीच असते...ती मात्र घ्यायची आणि पुढची पाच वर्ष त्यांच्यावर सोडून द्यायची. आणि मग आपण काय करायचं....हा त्याचा पुढचा प्रश्न होताच....त्याला मी उत्तर दिलं नाही...पण मनात मात्र उत्तर सुरू झालं...आपलं ते नेहमीचंच, फेरीवाल्यांना आणि गाड्यांना चुकवत, स्वतःला सांभाळत रस्ता ओलांडा, रस्ते नेहमीचे असले तरी सांभाळून चाला...वगैरे वगैरे..
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
Yes, you are right 👍
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteChaan lekh
ReplyDeleteवास्तव मांडलंय
ReplyDelete