ती..आहे तशी....
गेल्या शनिवारची गोष्ट. दुपारी अगदी तीनच्या ठोक्याला बेल वाजली. ही वेळ शक्यतो, कुरिअरची असते. पण दरवाजा उघडल्यावर कुरिअर नाही, तर अपर्णा होती. तिला बघताच मी काही सेकंद स्तब्ध झाले, इतकी की, दरवाजा उघडायचंच विसरुन गेले. तिनं पलिकडून दरवाजा वाजवल्यावर माझी तंत्री भंग झाली, आणि मी दरवाजा उघडला. अपर्णानं पहिलं पाऊल घरात टाकलं आणि मला घट्ट मिठी मारली. त्या तिच्या भावनांमधूनच तिचा सध्याचा प्रवास कसा चालला आहे, याची जाणीव झाली. त्याच आनंदात आम्ही दोघीही कोचावर धाडकन बसलो, आणि आमचा आवडता गप्पांचा रतीब सुरु झाला.
अपर्णा ही माझी जवळपास वीस वर्षापासूनची मैत्रीण. एकाच भागात रहाणा-या आम्ही दोघी रिक्षामध्ये पहिल्यांदा भेटलो. मग तुम्ही कुठे, मी कुठे असं करत मैत्रीचा टप्पा सुरु झाला. दोन मुलं, नवरा आणि अपर्णा असं चौकोनी कुटुंब. आम्ही भेटलो, तेव्हा अपर्णाची मोठी मुलगी एक वर्षाची होती, आणि तिला दुस-यांदा दिवस गेले होते. मुलीला बाबा गाडीत टाकून फिरणारी अपर्णा रोज भेटायची. मग तिची आई तिच्यासोबत रहायला आली आणि आमची ओळख पक्क्या मैत्रीमध्ये रुपातंरीत झाली. पुढे मुलांच्या शाळा आणि त्या मुलांमागे धावणारी अपर्णा दिसायची. कधीतरी भाजी घ्यायला दोघी एकत्र भेटलो, दहा-पंधरा मिनीटं गप्पा मारल्यावर तिची घाई सुरु व्हायची. एकूण बाई कायम कामाच्या रगाड्यात. मुलं लहान होती तेव्हा गावाला सुट्टीमध्ये अपर्णा अगदी महिनाभरासाठी जायची. गावावरुन आली की माझ्या घरी तिची फेरी ठरलेली. मग पोटभर गप्पा. गावचा खाऊ आणि गम्मती जमती. एकूण अपर्णा म्हणजे, साधीभोळी. पंजाबी ड्रेस आणि साडीमध्ये कायम दिसणारी. पंजाबी ड्रेसही अगदी कॉटनचे, ढिलेढाले. फुलहातांचे. साडीबाबतीतही तेच. साध्या पण निटनेटक्या साड्या. लांब केसांची, सैलसर वेणी आणि त्यावर कधीतरी गजरा. अपर्णा अशीच असायची. पण दीड दोन वर्षापूर्वी अचानक काहीतरी बिघडलं. मला अपर्णा दिसली ती सिव्हलेस पंजाबी ड्रेसमध्ये. माझ्या अगदी पटकन लक्षात आलं नाही. पण अपर्णा भेदरल्यासारखी चालत होती. ड्रेसची ओढणी वारंवार आपल्या हातांवर घेऊन, हात झाकण्याचा प्रयत्न करीत होती. मी तिला हात दाखवला, हाक मारली, तेव्हा जरा गडबडीत आहे, म्हणून समोरुन निघून गेली. नंतर काही दिवसांनी अपर्णा दिसली ती चक्क जिन्सपॅन्टमध्ये. अपर्णाची मोठी लेक आता कॉलेजमध्ये आहे, लेकीनं आईला जिन्स घालण्याचा ह़ट्ट केला असेल, हा
विचार माझ्या मनात आला, तेव्हाही अपर्णा घाईत होती, आणि भिरभिरत्या नजरेनं पहात चालत होती. नंतर मात्र हद्द झाली. जिन्स आणि क्रॉप टॉपमध्ये अपर्णा दिसली. आपल्या एका हातानं त्या टॉपला वारंवार खाली खेचत अपर्णा अगदी धावल्यासारखी चालत होती. आता मात्र काहीतरी वेगळं आहे, याची मला जाणाव झाली. मी तिला हाक मारली, तेव्हा चक्क माझी नजर चुकवून ती चालू लागले. तेव्हामात्र मी पुढे झाले, आणि अपर्णाचा हात पकडून तिला थांबवलं. काय ग, कुठे घाईत. किती वेगळी दिसतेस म्हणून तिचं कौतुक केलं. पण अपर्णा हू की चू नाही. मी परत तिला हाक मारली, तेव्हा घाईत आहे, लेक घरी येईल, म्हणून ती निघून गेली. पण तिच्या बोलण्यांनी जाणवलं, ही नेहमीची अपर्णा नव्हती. काहीतरी बिनसलं होतं, याची जाणीव व्हायला लागली. कधीतरी तिला थेट विचारलं पाहिजे, ही खुणगाठ मारुन मी माझ्या कामाला गेले.
त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी दुपारची जेवणं
झाली, आणि दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर अपर्णा आणि तिची मोठी लेक, सखी
दोघी दारात हजर. अपर्णाचा चेहरा पार पडलेला. काय ग अपर्णा बरं नाही का, म्हणत मी
दरवाजा उघडला आणि अपर्णा रडतच घरात दाखल झाली. मी सखीकडे प्रश्नार्थक नजरेनं
बघितलं, तेव्हा तिनं माझ्याकडे तशाच काळजीच्या नजरेनं बघितलं. दोघींना पाणी दिलं. थोडी
शांत झाल्यावर अपर्णानं जे सांगितलं त्यानं मस्तक भिणभिणलं...अपर्णाचा साधेपणा
तिच्या सुखामध्ये आला होता. साधारण तीन वर्षापासून अपर्णाचा नवरा तिला तिच्या
राहण्यावरुन बोलू लागला होता. तुझे कपडे साधेच असतात. तुला स्टाईलिश दिसता येत
नाही. आमच्या ऑफीसमध्ये तुला नेण्याची सोय नाही. कायम तू साड्यांमध्ये असतेस,
आजकाल सर्वजणी फॅशनचे कपडे घालातात, त्यात तू शोभत नाहीस या शब्दांनी
त्यांच्यातल्या दुराव्याला सुरुवात झाली. सुरुवातीला अपर्णानं या सर्वाकडे
दुर्लक्ष केलं. पण नंतर नवरा चारचौघात, पाहुण्यांसमोर, मुलांसमोर पाणउतारा करायला
लागला, तेव्हा मात्र अपर्णा बिथरली. आपलं काय चुकलं हेच तिला कळलं नाही. त्यानंतर नव-यानं
आणखी एक पाऊल पुढे टाकलं. तो ऑफीसच्या नावाखाली जास्तीत जास्त वेळ बाहेर राहू
लागला. घरात खटके उडू लागले. मग पैशाचा प्रश्न आला. तुझ्या आणि मुलांच्या सगळ्या
गरजा भागवतोय ना...मग तुझी कटकट कशाला हवी, म्हणून अपर्णालाच त्यानं ठणकावलं.
या सर्वात तिच्या मुलांची अवस्था अतिशय
केविलवाणी झाली. सुरुवातीला सखीनं बाबा म्हणतोय ना, मग घाल ना जिन्स पॅन्ट...काय
बिघडतं, म्हणत आईला तिला न आवडणा-या धाटणीचे कपडे घेतले. आपला नवरा यानं तरी निट
वागेल, म्हणून अपर्णानं तोही बदल करुन बघितला. त्यावर तिचा नवरा अधिक बिघडला, तू ध्यान
दिसतेस. तुला स्टाईलिश दिसणं, जन्मात जमणार नाही, हे सांगितल्यावर अपर्णा पार
कोसळून गेली. वयानं पंचेचाळीसचा आकडा ओलांडलेला. बावीस वर्षाचा संसार झालेला, मोठी
मुलगीही विशीची झालेली....संसाराच्या या वळणावर आपल्या नव-याला आपण आवडत नाही, हे
कुणाला सांगावं हा प्रश्न अर्पणापुढे होता. मुळात हे बाहेर कळलं तर आपलं काय होईल,
हा विचार आल्यावर तिनं देवाचा धावा सुरु केला. डोळ्यातील अश्रू थांबेनात. आता आपलं
काय होईल, याची भीती तिला वाटू लागली. नव-यानं सोडून दिलं तर...हा विचार करुन करुन
ती वेडीच झाली. सखीनं समजावलं, मुलगाही तिला चिकटून होता, पण तेवढ्यानं तिच्या
मनातील भीती कमी झाली नाही. अशाच अवस्थेत दोन दिवस काढल्यावर सखी आणि अपर्णा
माझ्याकडे आल्या होत्या. प्रसंग बाका. मला सांगतांनाही अपर्णानं घर डोक्यावर घेतलं
होतं. मला नव-यानं सोडलं तर कुठे जाऊ ग.
आता माहेरी पण तोंड दाखवायची सोय नाही. आई-बाबा गेलेत, भाऊ-वहिनीकडे काय कारण
घेऊन जाऊ....असे नको नको ते प्रश्न तिला पडत होते. आपला संसार टिकवण्यासाठी ती काहीही करायला तयार
होती. मलाही फार काही सुचेना. पण अपर्णानं अगदी दहा-बारा वर्षापूर्वी एक मॉन्टेसरी
टिचरचा डिप्लोमा केल्याचे मला आठवत होतं. मी तिला त्याबद्दल विचारलं. या सर्वात तो
डिप्लोमा कशाला हवा, म्हणून ती विचारु लागली. मला अचानक उत्साह वाटला. एकाच रेषेवर
कशाला अडून राहायचं. त्याच्या बाजुला आणखी एक रेष मारुन ती मोठी करत न्यायची. अंतर
पार करण्याशी मतलब.
मी सखीला सूचना केल्या. अपर्णाला पटापट फ्रेश हो, म्हणून सांगितलं, कॉफी केली, आणि पटापट पिऊन तिघीही बाहेर पडलो. आमच्या घराच्याच अगदी काही मिनिटावर असलेल्या एका शाळेबाहेर मॉन्टेसरी शिक्षिका हव्या असल्याचा बोर्ड लावला होता. अपर्णाला घेऊन थेट त्या शाळेत गेले. अर्थात तिथे जाईपर्यंत अपर्णानं लाख प्रश्न विचारले असतील. शाळेत गेल्यावर तिथल्या व्यवस्थापकांना भेटून चौकशी केली, तेव्हा तेच शिक्षकांची मुलाखत घेणार असल्याचे समजले. मी त्यांना अपर्णाची सर्व खरी माहिती सांगितली. त्यांनी अपर्णला काही प्रश्न विचारले. ती प्रंचड गोंधळली होती. काय होत आहे, हे तिला समजत नव्हतं. मात्र सखी उभी राहिली. आई, हे सर्व आपल्या घरासाठी आहे, म्हणत तिनं आपल्या आईला धीर दिला. मुलाखत घेणारे
गृहस्थही समजुतदार होते. त्यांनी काही हरकत नाही, उद्या या, वर्गात तुम्ही कसे शिकवता हे बघून लगेच सांगतो, म्हणून आम्हाला अश्वस्थ केलं. दहा मिनिटात त्या शाळेबाहेर पडल्यावर अपर्णाला समजावलं. जे झालं ते झालं, आता तू तुझा विचार कर. थोडासा स्वतःसाठी वेळ काढ. स्टाईलिश दिसून काहीही होत नाही, पण आत्मविश्वासानं वावरलं तर खूप काही मिळून जातं. तोच आत्मविश्वास तू गमवला आहेस, ही छोटी संधी आहे, तिचा लाभ घे म्हणत, तिला विश्वास दिला. त्या छोट्याश्या प्रसंगानंतर अपर्णा बदलून गेली. दुस-या दिवशी ती सर्व प्रमाणपत्रांसह शाळेत गेली. तिची मुलाखत झाली, शिवाय तिला एका वर्गावर तासही घ्यायला सांगितलं. अपर्णानं सर्व व्यवस्थित सांभाळलं. तिची नोकरी सुरु झाली. सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तिचं नवीन वेळापत्रक तयार झालं. सुरुवातीला तिच्या नव-यानं खूप कटकट केली. पण अपर्णाला सांगितलं होतं, डोक्यावर बर्फ ठेव. वाद अजिबात नाही, संवादपण कमी. दोन्ही मुलांनी आईला खूप मदत केली. सकाळी सर्व आवरुन अपर्णा शाळेत जाऊ लागली. एकच झालं, एरवी नव-याला टेबलावर सगळं आयतं मिळत होतं. आता ते त्याला हातांनी घ्यावं लागत होतं. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला खूप आरडाओरडा केला. अगदी अपर्णाच्या माहेरीही तक्रार केली. त्या दरम्यान वैतागलेली अपर्णा घरी आली होती. खूप धावपळ होत आहे, दमायला होतंय, मुलांकडे दुर्लक्ष होतंय अशा नव्या तक्रारी आल्या. पण फक्त दोन महिने सहन कर, नाही जमलं तर सोडून दे, म्हणून तिला धीर दिला. या दोन महिन्यात जादू झाली. अपर्णा सर्वार्थांनं बदलली. एकतर तिच्या डोक्यातील सर्व नकारात्मक विचार त्या छोट्या मुलांमध्ये गेल्यावर गायब झाले. ती त्यांच्यातील एक झाली. शिवाय शाळेत नव्या मैत्रिणी भेटल्या. छानसा ग्रुप झाला. उठबस वाढली आणि आत्मविश्वासात भर पडली. ज्या कपड्यांमध्ये ती सहज होती, तेच कपडे तिनं स्विकारले. तिची आवडती साडी. पण आता तिला याच साडीमध्ये नवी अपर्णा सापडली. नव-याचा चार दिवसाचे बोलही शांत झाले. महिना पगार मिळू लागला. अपर्णा प्रत्येकवेळी त्याच्याकडे पैशासाठी हात पसरायची, तो प्रकार बंद झाला, त्याला त्याचे घरातले महत्त्व कमी झाले की काय याची बोच लागली. त्यात मुलंही वडिलांबरोबर मोजकं बोलू लागली. आपला त्राग आपल्यावरच बुमरॅंगसारखा उलटला आहे, याची जाणीव त्याला झाली. या सर्वात अपर्णानं शाळेसाठी आणखी काही अभ्यासक्रम पूर्ण केले. नोकरी पक्की झाली. दोन वर्षाचा कालावधी कधी गेला हे कळलंच नाही. बाई कधीतरी घरी यायच्या, पण आज आल्या आणि गळ्यात पडल्या, तेव्हा कळलं काहीतरी खास होतं. दोन वर्षात सगळं रुळावर आलं होतं. नव-यानं अपर्णाचं कतृत्व मान्य केलंच शिवाय त्यानं अपर्णाची माफीही मागितली. हिच बातमी घेऊन अपर्णा घरी आली होती. तिचा तो उत्साह बघून मी सुद्धा हरखून गेले होते.
तिला विचारलं लिहू का ग यावर...तर म्हणाली नक्कीच. माझ्यासारख्या कितीजणी बॉडी शेमिंगच्या बळी पडत
असतील. आम्ही आहोत तशा राहू. आम्ही आणि
आमचं शरीर. त्याच्यावर काय घालायचं हा आमचा अधिकार, बाकी कुणाचा नाही. तू लिहून
काढ माझी स्टोरी. त्यातून एकीला जरी आधार मिळाला, तरी खूप झालं. मी अधिकारवाणीनं
बोलणा-या माझ्या या लाडक्या मैत्रिणीकडे भरल्या डोळ्यांनी बघत होते. दोन
वर्षापूर्वी संसारावर आलेलं वादळ तिनं हिमतीनं बाजुला सारलं होतं, आणि आता बाई इतरांच्या
डोलणा-या नौकेला सहारा देण्यासाठी सज्ज झाल्या होत्या...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
प्रामाणिक मित्र मैत्रीण सोबत असले की, असल्या वादळ वाऱ्यांनी आयुष्यात फरक पडत नाही.
ReplyDeleteछान कथा आहे. आत्मविश्वास कमवावा लागतो.साधेपणा हेच खरं तुमचे व्यक्तिमत्त्व !
ReplyDeleteखूप छान आणि खरोखरच महिलांना प्रेरणादायी लिहिलं आहे.
ReplyDeleteEncouraging for all women.
ReplyDeleteKhup chan lekh
ReplyDeleteलेख खुप छान आहे.
ReplyDeleteKhup ch chhan lekh aahe sai
ReplyDeleteखूप छान लेख आहे.हे वाचून महिला ना आत्मविश्वास येईल.आपण काही तरी करु शकतो.
ReplyDelete