विचार...अविचार
नाण्याच्या दोन बाजू असतात... हे वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि पाहतोही. पण या दोन बाजू आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत असतात. मुख्यतः माणसाचे विचार हे या दोन बाजूच्या छाप्या काट्यामध्ये बांधलेले असतात. अशाच दोन विचारांची माणसं मला गेल्या शनिवारी भेटली. दोघेही रिक्षा चालक. पण दोघांच्या विचारांमध्ये कमालीची तफावत. पहिल्याला भेटल्यावर, त्याच्याशी बोललल्यावर त्याच्या सकारात्मक विचारांना नमस्कार केला. दुसऱ्याने मात्र या सर्वांवर पाणी फिरवलं. त्याच्या बोलांनी डोक्यावर एवढ्या आठ्या पडल्या, की नको रे बाबा...म्हणत त्याची रिक्षा मध्येच सोडून पायी रवाना झालो.
गेल्या शनिवारी संध्याकाळी ठाण्याला काही खरेदी निमित्त गेलो होतो....तेव्हाचा हा प्रसंग. किमान 30 ते 35 मिनिटांचा प्रवास. त्यामुळे सहाजिकच रिक्षावाल्या काकांबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. सुरुवातीला निवडणुकांचा विषय झाला. मग हळूहळू गप्पांची गाडी मुलांच्या शिक्षणावर
आली. याच गप्पांमधून समजले की, त्या रिक्षावाल्या काकांची मुलगी यूपीएससी परीक्षांची तयारी करत आहे. मुलगी बारावीला आहे. पण आयएस अधिकारी होण्याचं तिचे स्वप्न आहे. त्यासाठी ती अहोरात्र अभ्यास करतेय. एक लायब्ररीही लावली आहे. काकांचा धाकटा मुलगा दहावीला आहे. ताईचे बघून तोही गुमान अभ्यासाला बसतो. त्याला डॉक्टर व्हायचे आहे. काकांची ही दोन मुलं जशी अहोरात्र अभ्यास करतात, तशीच मेहनत काकाही करत आहेत. जवळपास 18 तास रिक्षा चालवतात. त्यांची पत्नी जेवढी जमेल तेवढी संसाराला मदत करतेय. घर सांभाळून, फॉल बिडींगची कामं करते. दोघंही मुलांच्या अभ्यासामध्ये खंड यायला नको, म्हणून फार कमी गावी जातात. सण समारंभामध्ये अगदी मोजून खर्च करतात. हे सर्व सांगतांना मध्येच काका म्हणाले, या रोजच्या कष्टांचा कधी कधी कंटाळा येतो, थांबावसं वाटतं, पण मग मुलांचे भवितव्य दिसू लागतं. आयएस झाल्यावर लेक कशी दिसेल याचा विचार करतो, आणि पुन्हा कामाला लागतो. काका पुढचा सगळा वेळ मुलांची शैक्षणिक प्रगती, सध्याचे प्रगतीचे युग, मुलांचे कशाप्रकारे उज्वल भविष्य आहे, याबाबत बोलत होते. हा आमचा दोघांचा अगदी आवडता विषय. त्यामुळे आम्ही आमच्या इच्छित स्थळी पोचलो तरी दोन मिनिटं थांबून काकांशी गप्पा मारल्या. त्यांना आणि त्यांच्या मुलांना शुभेच्छा दिल्या. त्यांना नमस्कार करून आमच्या कामाला रवाना झालो.
अर्थातच एवढे चांगले सकारात्मक विचार ऐकल्यावर आमची ठरलेली काम
चांगली पार पडली. रात्री दहा वाजता परतीला
लागलो. रात्रीचे दहा वाजले तरी ट्रॅफिकचा
मारा भरपूर होता. परिणामी 40 मिनिटं तरी आम्हाला पुन्हा स्टेशनला यायला
लागणार होती. रिक्षा केली, पण बसतानाच त्या काकांनी त्यांच्या अटी
सांगितल्या. इथेच सोडणार. पैसे सुट्टेच
हवे. याच मार्गाने जाणार.... त्यांचा तो तोरा बघून रिक्षा सोडण्याचा विचार आला, पण रात्रीचे दहा वाजलेले, ट्रॅफिक आणि रिक्षाची कमतरता त्यामुळे त्यांना
हात जोडत रिक्षात
बसलो आणि पुढचा अवघा अर्धा तास या रिक्षावाल्या काकांच्या
विचारांनी
डोक्याला तापच जास्त दिला. रिक्षा जिथून सुरू झाली तिथेच एका पक्षाचा मोठा बोर्ड लागला होता. त्या बोर्डवरील नेत्याचा फोटो बघून काकांनी त्यांना अस्सल दोन शिव्या हाणल्या आणि काकांची रिक्षा सोबतच तोंडाची पट्टी सुरू झाली. त्यांच्या गावचा नेता, त्यांच्या मते सर्वोत्तम नेता होता. त्या नेत्याच्या एका हाकेवर अवघा महाराष्ट्र बंद पडला म्हणे....त्यात मुंबईची काय बात...त्याच्या सभेला करोडो लोक येतात, अर्थात हे त्या काकांच्या म्हणण्यानुसार...त्यानंतरचा सगळा वेळ काका तो नेता किती महान आहे हे आम्हाला सांगत होते. या काकांनाही दोन मुलं. पण काकांनी मुलांना बजावून सांगितलंय आपल्यासाठी आपला नेता देव आहे, याच्यापुढे काहीच नाही. त्यामुळे नेत्याची सभा लागली की, काकांची मुलं कॉलेज सोडून त्या सभेच्या तयारीला लागतात. पंधरा दिवस कॉलेज बुडलं तर काय होतं, ते काय नंतर शिकता येईल, पण आपल्या नेत्याला काही पडता कामा नये. काकांनी हे सूत्र, आपल्या दोन्ही मुलांना सांगितलं आहे. काकांची दोन्ही मुलं गावाकडच्या कॉलेजमध्ये आहेत. दोघेही एफ वाय बी कॉमला. मोठ्याने दोन वर्ष एकाच वर्गात मुक्काम केल्याचे काकांनी हसून सांगितले. काकांच्या मते आपला नेता सक्षम आहे, पोरांना काही लागलं तरी तो देऊ शकतो. जगायला फार काय लागतं, हे त्यांचे प्रगल्भ विचार ऐकल्यावर मी डोक्याला हात मारून घेतला.
पण एवढ्यावर काका कशाला थांबतात. त्यांनी पुन्हा आपल्या गावच्या नेत्याचे गुणगान सुरू केले. सोबत महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आढावा. कुठला नेता चांगला, कुठल्या नेत्याचा कोणी गेम केला, दिल्लीतले राजकारण किती खराब आहे, तिथले नेते आपल्या नेत्याला किती पाण्यात बघतात यावर काकांचे अगाध ज्ञान होते. पण हद्द तर झाली जेव्हा काकांनी त्यांच्या गावचा नेता देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असा दावा करत बोलायला सुरुवात केली. कोणी किती बढाया मारायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण त्या बढाया कोणी कितपत ऐकायच्या हे मात्र ऐकणाऱ्याच्या हातात अर्थात कानांवर असतं. माझ्या कानांना आता अजीर्ण होत आलं होतं. आमचा स्टॉप येण्यासाठी किमान दहा मिनिटांचे तरी अंतर होते. मी शांतपणे काकांना रिक्षा थांबायला सांगितली आणि नवरा खो खो हसू लागला. सगळ्या
गप्पांमध्ये त्यांनी त्या रिक्षावाल्या काकांना किमान चार वेळा तरी तुम्हीच किती बरोबर आहात हे ठासून सांगितलं होतं. त्यामुळेच की काय ते काका थेट आपल्या नेत्याला देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान करायला निघाले होते.
काकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हातावर सुट्टे पैसे दिले.
त्यांना काही अजून बोलायचे होते, पण
त्याआधीच आम्ही त्यांच्यापुढे हात जोडून सरळ रस्ता क्रॉस केला. अर्थात मनात दोन्ही रिक्षाचालकांच्या
विचारांची तुलना चालू होती. दोघेही कष्ट
करत होते, पण दोघांच्याही विचारांची सांगड वेगळी
होती. त्यांच्या विचारांची छाया त्यांच्या
कुटुंबावर... मुलांवर होती.... एकाच्या उज्वल विचारामुळे त्यांची मुले थेट आयएस
सारख्या पदावर जाऊन देश सेवेचे स्वप्न बघत होती.
तर दुसऱ्या काकांची मुलं वडिलांच्या शिकवणीनुसार, आपलं सर्वस्व नेत्याच्या चरणी समर्पित करायला
तयार होती. आयुष्यात काही मिळवायची त्यांची
इच्छा नव्हती की ध्येयही नव्हतं. फक्त
कार्यकर्ता हा शिक्कच त्यांना आयुष्यातील सगळे आनंद प्राप्त करून देणार होता. असो.
हा आपल्या प्रत्येकाचा विषय असतो. पण या सर्वात आपण आपल्या मुलांच्या भवितव्याचा
खेळखंडोबा करतो, हे मात्र काही पालक विसरुन जातात, आणि वेळ निघून गेली की, आपल्या
नशिबाला दोष देऊन मोकळे होतात.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
तुम्ही लिहिलेले दोन्ही रिक्षाचालक हे प्रातिनिधिक स्वरूप. बाकी असे लोक ठायी ठायी भेटतात. अनेक लोक मोदींनी ट्रम्प बाबत काय रणनिती आखली पाहिजे हे देखील सांगतात. इतका राजकारण हा आवडीचा सोपा विषय झालेला आहे. राजकारण म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग असल्याने रिक्षाचालकच नव्हे तर अनेक छोट्या व्यवसायिकांना राजकारणात आपले उत्थान होईल असे वाटत असते कारण त्यांच्या व्यवसायातून अनेक लोक राजकारणात मोठे होतात आणि मग तेच त्यांचा आदर्श ठरतात.
ReplyDeleteअगदी खरं आहे.असे काही चांगले आणि वाईट अनुभव प्रवासात येतात.
ReplyDeleteNice good experience
ReplyDeleteदोन वैचारिक भेद छान उलगडून दाखवले आहेत.हे सर्वत्र पाहायला मिळते. आपल्याकडे सर्वात सोपे म्हणजे राजकारणावर बोलणे.त्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवणे. राजकारणी मात्र एकमेकांना सांभाळून घेतात.आपण उगाच आपसात भांडत बसतो. खूप छान लेख, आणि वेगळा विषय हाताळला आहे
ReplyDeleteVery good
ReplyDelete