कुंकू
अशा अनेक घटना होतात ज्यावर लिहायला पाहिजे असं वाटतं. संताप येतो. वैताग वाटतो. हीच का ती लोकशाही म्हणून आरडाओरडा करावासा वाटतो. पण नंतर मनाला आवर घालून नव्या विषयावर मनमोकळं करते. पण गेल्या आठवड्यात झालेल्या काही घटना पाहता, यावेळी मात्र मनाला आणि शब्दांना असे नियंत्रण घालणे कठीण वाटू लागले. विषय अर्थात कुंकू. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या बद्दल होत असलेल्या चर्चेने कमालीची अस्वस्थता वाटत आहे. बाईचं अस्तित्व काय...हा प्रश्नही उपस्थित झाला. तिचं अवघं आयुष्य तिच्या कुंकवाभोवती गुरफटून टाकण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला...हा प्रश्नही मनात घिरट्या घालू लागला. एका दुर्दैवी अपघातात एका महिलेच्या पतीचे निधन झाले. अचानक झालेल्या या आघाताने तिचे अवघे जगच हिरावून घेतले. हे दुःख किती आहे, याचे मोजमाप कोणीही...कधीही करु शकणार नाही. पण यासोबत त्या महिलेच्या खांद्यावर तिच्या कुटुंबाची आणि पतीच्या वारशाची जबाबदारी आली आहे, ही गोष्ट दुर्लक्षित करता येत नाही. अशावेळी दहा-बारा दिवस घरात बसून दुःख करत बसायचं की, पतीच्या मार्गाने चालायचं, हा प्रश्न समोर आल्यावर, श्रमती सुनेत्रा पवार यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. तो यथार्थाने योग्यच आहे. मात्र पुरुषी मानसिकता असलेल्या काही विद्वानांनी त्यांच्यावर बोट ठेवलेच. वरुन आपल्या या कोत्या वृत्तीला
त्यांनी परंपरागत रुढी परंपरांची भरजरी साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं बघून आणि ऐकून ज्यांना आपण आदर्श मानतो, त्यांची आदर्शता पुन्हा एकदा तपासावी लागणार, याची जाणीव झाली आहे.
वास्तविक लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यावर लिहायची खूप इच्छा होती. तेव्हा प्रचारादरम्यान त्यांच्याच कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीनं त्यांना आमच्या कुटुंबात बाहेरून आलेली, अशा शब्दात हिणवले होते. एक महिला म्हणून मला ते शब्द फार डसले. मी सहज म्हणून त्यांच्या विवाहाची तारीख शोधली. ३० डिसेंबर १९८५ रोजी अजित पवार यांच्या त्या अर्धांगिनी झाल्या. लग्नाच्या ३९ वर्षानंतरही एखाद्या विवाहितेला बाहेरची म्हणून हिणवले गेल्यावर तेव्हा तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील, हा विचार मनात आला. बरं, सुनेत्रा पवार यांना बाहेरची म्हणून हिणवल्यावर त्या जेष्ठांच्या मागे बसलेल्या व्यक्तींची हसण्यासाठी जी स्पर्धा लागली होती ती बघून तर त्यांच्यावर किव करावी की संताप व्यक्त करावा यात मी गुंतले. अर्थात त्यांनी फक्त एकाच महिलेचा अपमान नाही केला, तर त्यांच्याच घरातील लेकी-सुनांचाही अपमान केला होता. पण याची जाणीवच बहुदा त्यांना नव्हती. लग्न होऊन जेव्हा स्त्री आपल्या सासरच्या कुटुंबात प्रवेश करते, तेव्हा ती सर्वार्थांनं त्या कुटुंबाला स्विकारते. जिथे जन्म झाला, ते घर मागे सोडून, एका नव्या घराला, कुटुंबाला आणि त्यातील माणसांना आपलेसं करणं, कुटुंब वाढवणं, आणि त्या वाढत्या कुटुंबावर संस्कार करणं हे कुणा येड्या गबाळ्याचे काम नव्हे. ती घरची लक्ष्मी होते, अन्नपूर्णा होते, सरस्वती होते, आणि प्रसंगी दुर्गाही होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी आणि अपघाती निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अवघ्या चार दिवसात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा मला त्या माता दुर्गाच्या रुपात दिसल्या. पदराखाली घेणं म्हणजे, संकटात सापडलेल्या व्यक्तीला संरक्षण देऊन मायेने जवळ करणे, आणि पदर खोचून उभं रहाणं म्हणजे, कठीण परिस्थितीतही खचून न जाता, धैर्याने आणि जिद्दीने संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज होणे. या व्यापक अर्थामुळेच हे दोन्ही वाक्प्रचार
महिलांच्या बाबत का वापरले जातात, हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं.
मला या सगळ्या घटनेनंतर, दोन
वर्षांपूर्वी माझ्या आसपास झालेली एक घटना आठवली. माझ्या परिचित एक भाजीवाली
आहे. पंधरा दिवस तिचा पत्ता नव्हता. तिच्या नेहमीच्या जागेवर दुसरच कोणतरी बसत
होतं. पंधरा दिवसानंतर ती जेव्हा दिसली,
तेव्हा मी तिच्याकडे जाऊन चौकशी सुरू केली.
ती सहज म्हणाली, काय नाही ताई नवरा आजारी होता...आता
कसा आहे, हे मी विचारलं, तेव्हा म्हणाली, दोन दिवसापूर्वी गेला. सगळं कार्य करून आता बाहेर पडले बघा. मला तिच्या या वाक्याने जबरदस्त धक्का
बसला. दोन दिवसांपूर्वी तुझा नवरा
गेला....आणि तू बाहेर पण पडलीस.... हे वाक्य अवधनाने माझ्याकडून बाहेर आले. त्यावर ती ताई हसली. तिच्या डोळ्यातून पाणी
आले. पदराने ते पाणी पुसलं आणि तोच पदर
कमरेला खोचून ती म्हणाली,
माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची ताकद
कोणात नाही. नवरा गेला म्हणून कुंकू
पुसणार्यातली मी नाही. रडून काय करायचं, त्यानं गेलेला माणूस परत येत नाही. मी अशी आज खंबीरपणे उभे राहिले तर कुटुंब
चालेल. पोरांच्या शाळा आहेत. चार दिवस माणसं रडायला येतील...मी घरी नाही म्हणून
मला नावं ठेवतील आणि निघून जातील....पण माझ्या पोरांची, कुटुंबाची जबाबदारी घेणार
नाहीत. त्यासाठी मलाच माझा पदर खोचून असं बाहेर पडलंच पाहिजे. तिच्या तेव्हाच्या या स्पष्टीकरणानंतर मी तिला
घट्ट मिठी मारली होती. तिला सॉरी म्हटलं
आणि आम्ही दोघींनी भरपूर रडून घेतलं. तेव्हा रस्त्यावरून जाणारे अनेक जण
आमच्याकडे बघत होते, आणि निघून जात होते. आज हे लिहितानाही माझ्यासमोर तो प्रसंग उभा
राहिला आणि डोळ्यात पाणी आलंय.
आज सुनेत्रा पवार यांची परिस्थिती ही त्या ताईसारखी आहे. फक्त त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यामध्ये आणि माझ्या भाजीवाल्या
ताईमध्ये आर्थिक, सामाजिक दूरी जरी असली तरी महिला म्हणून समाजाने त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी एकच आहे. ती बाई आहे...तिचं आयुष्य तिच्या कुंकवावर निर्भर आहे....अर्थात ती तिच्या पतीवर अवलंबून आहे. वाईट एवढंच वाटतं की, समाजात वावरताना थोरा मोठ्याच्या विचारांचे दाखले द्यायचे आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्या विचारांना मुठमाती देऊन, सहज एका महिलेला, ती कशी चुकली, म्हणून उपदेशांचे डोस पाजायचे. असो. राजकारणात मनाला आणि स्त्रीच्या चारित्राला कायम हत्यार म्हणून वापर केले जाते. आताही तसेच सुरू आहे. मला मात्र मनस्वीपणे सुनेत्रा पवार यांच्या धैर्याचे कौतुक करावेसे वाटते. यामागे काय राजकारण आहे, या चर्चांच्या पलिकडे त्यांच्या कृतीकडे बघितले, तर त्यांच्या याच धैर्याला सलाम करावासा वाटतो. अर्थात टीकाकारांचे तोंड कधीच बंद करता येणार नाही, याची जाणीव त्यांनाही असावी. आता पुढच्या महिन्यात महिला दिन येत आहे. तो मारे साजरे करत, अनेकजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सरसावतील आणि नंतर ती महिला कशी दीन राहील यासाठी धडपडतील. पण या सर्वांवर मात करत सुनेत्रा पवार उभ्या राहतील, असा विश्वास वाटतो. मी काही त्यांच्या पक्षाची प्रचारक नाही. पण एक महिला म्हणून या कठीण काळात त्यांच्यासोबत माझ्या सदिच्छा कायम राहणार आहेत....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
अगदी बरोबर लिहिलंय! प्रत्येकीचे आयुष्य स्वतंत्र आहे. लोकांना त्या महिलेभोवती काय चाललय याची कल्पना नसते. बाहेरून टीका करायला काय जातं?
ReplyDeleteआदरणीय सई जी साष्टांग नमस्कार
ReplyDeleteआपण आपले मत अतिशय योग्य पद्धतीने मांडलेले आहे असे आम्हाला वाटते.
खरोखर आपल्या लिखाणातल्या काही गोष्टी समाजाने विचारात घ्यायला पाहिजे असे मला वाटते.
बहुतेक पुरुष हे जीवन जगताना परिवाराची सुरक्षितता आणि परिवारा साठी सर्व सोयी उपलब्ध करण्यात मग्न असतात
मात्र त्यातले फार काही कमी विचार करतात की आज मी हे सगळं परिवारासाठी करतो आहे मात्र मी हे कायमस्वरूपी करू शकणार नाही.
मी कधीतरी जाणार आणि माझ्या नंतर माझ्या परिवाराचं काय होणार.
ज्यांनी हा विचार केला ते आपल्या परिवारातील प्रथम व्यक्ती म्हणजे पत्नी आणि नंतर मुलं यांना चांगले शिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबनाने जगण्याची दिशा दाखवतात ज्यामुळे भविष्यात परिवारावर कुठले संकट आले तरी परिवारातील इतर व्यक्ती त्या संकटाला धैर्याने तोंड देऊ शकतात
धन्यवाद
एक स्त्री म्हणून मनात उमटलेल्या भावनांचं योग्य शब्दांकन 🙏🏼✍️👌
ReplyDeleteसई , सध्या मला डोळ्यांच्या प्राॅब्लेममुळे डाॅ. नी मोबा. चा वापर कमीतकमी करण्याचा सल्ला दिला आहे. तरीही लेखाचे शीर्षक वाचून प्रतिक्रिया द्यायलाच हवी असे वाटले. 'कुंकू ' या ब्लाॅगमधले तू मांडलेले विचार हे आजचे वास्तव आहे. स्रियांविषयीची समाजाची मानसिकता आजही बदललेली नाही हे सत्य तू प्रभावीपणे मांडले आहेस.
ReplyDeleteअगदी खरं आहे
ReplyDeleteउत्तम 👌
Deleteसई नेहमी प्रमाणेच छान लेख
ReplyDeleteअगदी वास्तव लिहीले आहेस. अनेक महिलांना लोक काय म्हणतील म्हणून बाहेर पडता येत नाही. पण एक तर असा प्रसंग आला तर तीच्यावर ब्रम्हांड कोसळते. पूढे अनेक प्रश्न असतात न या सारख्यांना तीलाच तोंड द्यायचे असते.
Khup chhan vichar mandale ahet.
ReplyDeleteछान लेख लिहिला आहे.. सई
ReplyDeleteलेख खुप छान आहे.
ReplyDelete.
छानच लेख
ReplyDeleteSai ताई मस्तच खूप छान
ReplyDeleteविषय आणि विचार अतिशय सडेतोड तरीही योग्य पद्धतीने मांडला आहेस.सई तुझं लिखाण प्रगल्भ होत आहे.-ललिता छेडा
ReplyDeleteचांगला विषय घेतलास सई. स्त्री म्हणजे कोणाची तरी बायको किंवा मुलगी अशीच ओळख करून दिली जाते. जेव्हा कोण माझी ओळख करून देतात , मी आवर्जून उल्लेख करते मी जयश्री कर्वे बाकीच्या उपाध्यांची गरजच नाही. आपले स्वत्व आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करायला पाहिजे.
ReplyDelete