आणखी एक...

 

आणखी एक...


बारावीची परीक्षा सुरु झाली आणि पहिल्याच दिवशी एक बातमी आली. पहिल्याच पेपरला जाणा-या एका विद्यार्थ्यांचा गाडीतून पडून मृत्यू झाला.  आणखी एका घरातील स्वप्नांचा विध्वंस रेल्वे प्रवासात झाला होता. रोज ट्रेन प्रवास करणारे, हा प्रवास एका मृत्यूच्या सापळ्यातून करतात. कधी, कुठे, कुणाचा नंबर लागेल हे माहित नाही. पण तो लागला, की काही मिनीट, काही तास आणि बळींची संख्या जास्त असली तर काही दिवस हळहळ व्यक्त करायची, आणि पुन्हा शो मस्ट गो ऑन....आत्ताही तेच झालं आहे. एकाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवणार, ऑफीसच्या वेळा बदलणार...या ठेवणीतल्या घोषणा झाल्या नाहीत. सगळं कसं अंगवळणी पडलंय.  सहन करणा-यांच्या आणि ज्यांच्या हाती बदल करण्याची क्षमता आहे,त्यांच्याही. इथे रोज माणसं मरतात, कुणाच्या घरातील एकुलता एक मुलगा नाहक त्या रेल्वेखाली चिरडला जातो. साध्या गाडीतील प्रवास सोडा, पण सुखानं प्रवास करु म्हणून एसी गाडीचा खिशाला न परवडणारा पास काढूनही रोज धक्केखात दाटीवाटीनं प्रवास करणा-यांच्या समस्यांकडेही बघायला कोणालाही वेळ नाही. व्यवस्थेमधील या अनास्थेमुळे आता कमालीचा संताप येत आहे. ही सर्व यंत्रणा मुर्दाड या शब्दाच्या पलिकडे गेली आहे, किंवा नेऊन ठेवली आहे.


बारावीच्या परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू...अशी बातमी सोशल मिडियावर आली आणि धस्स झालं. डोंबिवलीहून रेल्वे पकडणं हा एक टास्क झाला आहे. फक्त डोंबिवली कशाला, तिकड़े पुढे अंबरनाथ-बदलापूर कडेही हिच बोंब आहे. आणि पुढे तर विचारता सोय नाही. पण डोंबिवलीहून या परिस्थितून जात असल्यामुळे वास्तवाचे चटके अजून किती काळ सोसायचे हा प्रश्न आहे. मी अठ्ठावीस वर्षापूर्वी या रल्वे प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा एवढी गर्दी नव्हती....वगैरे ठेवणीतले वाक्य मी वापरणार नाही. कारण तेव्हाही कधी डोंबिवलीला चढून एखादी बसायली सिट मिळेल, हे सुख कधी मिळाले नाही. असे सुख हवे असेल तर सकाळी सातच्या आधीची गाडी पकडायची किंवा दुपारी बारा नंतरची.  एवढ्या वर्षानंतरही अशीच परिस्थिती आहे. आता आमची दुसरी पिढीही त्याच मरणयातनातून जात आहे. हे सांगायला लाज वाटते. पण ज्या प्रशासनाला याची लाज वाटायला पाहिजे, ते मात्र दिवसेंदिवस नाही तर वर्षानुवर्ष मुर्दाड होत चालले आहे. नावाला ट्रेन वाढवल्या आहेत, एसी ट्रेनचा गारवा सुरु केलाय. पण नियोजनाच्या नावानं सगळा सावळा गोंधळ. त्याबद्दल कधीही कोणी जबाबदारी घेत नाही की माफी मागत नाही. गाड्या येतात, त्यात माणसं कोंबली जातात आणि जी कोंबली जात नाहीत, ती दाराला लटकतात. त्यातलीच काही खाली पडतात. मरतात...इथे फरक कोणाला पडतोय...

ज्या दिवशी बारावीच्या मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला, त्यादिवशी संध्याकाळी त्याच मार्गावरुन मी प्रवास करत होते. मनातून त्या मुलाचा विषय काही जात नव्हता. केवढासा तो जीव, त्याच्या स्वप्नांच्या दिशेनं तो आता कुठे सुरुवात करत होता. शुभेच्छा घेऊन पहिल्या पेपरला गेलेला आपला मुलगा परत केव्हाही येणार नाही, याची कल्पना त्याच्या आईला होती ना वडिलांना. या आईच्या मनामध्ये कायम त्याचा मृत्यू ज्या भयाण परिस्थितीमध्ये झाला, ती परिस्थिती गुंजी घालणार आहे. माझ्या मनात नेमका प्रश्न तोच होता, या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेतं का...अर्थात रेल्वे प्रशासनानं अशा मृत्यूंची जबाबदारी घेतली असती तर सर्वांचा रोजचा प्रवास सुखकारक नक्कीच झाला असता. मात्र ही सगळी यंत्रणा सुस्त-मस्त आणि करुया फस्त या त्रिकोणात फिरत आहे. हा अपघात झाला तेव्हा डोंबिवलीकडे येतांना ठाण्याहून मी तब्बल चार गाड्या सोडल्या. एकाही गाडीत


चढता येईना. शेवटी अर्धा तास थांबले. एक ठाणा गाडी होती, ती येईल म्हणून फलाट बदलला आणि समोरच्या गर्दीकडे हताश नजरेनं बघत होते. दूरवरुन गाडीचे लाईट दिसले की बायका तयार. बॅग काखेला लावून, पदर, ओढण्या खोचून जणू लढाईला जाणार असा थाटात त्या एकदम अलर्ट होत होत्या...ब-याचवेळा या महिलांची टिंगल केली जाते. पण त्यांच्या या सज्जतेचे वास्तव फार भयाण आहे. गाडी पकडतांना हात ओढला जातो. पाय निसटतो. पदर अडकतो. या सर्वांची कल्पना असते. पण करतात काय...एक गाडी सोडली तर दुस-या गाडीत आपल्याला सुखकारकरित्या प्रवेश मिळेल ही आशा इथे नसतेच. उलट एक गाडी सुटली तर पुढच्या गाडीला अधिक गर्दी होईल याची खात्रीच या महिलांना असते. त्यामुळे कधी धक्के देत तर कधी धक्के सहन करत त्या प्रवास करतात...नाईलाज को क्या इलाज हे यालाच म्हणतात.  या सर्वात मी ज्या गाडीची वाट पहात होते, तिची वेळ उलटून गेली होती. तब्बल वीस मिनीटांच्या उशीरानं गाडी फलाटावर दाखल झाली, तेव्हाही ती पकडण्यासाठी तेवढीच तुफान गर्दी झालेली. कशीबशी जागा मिळाली. गाडी सुरु झाल्यावर चौकशी केली, तर आजुबाजुला बसलेल्या महिलांनी हसल्यासारखे केले आणि डोळे मिटले. धावती गाडी पकडून कशीबशी बसण्यासाठी एक जागा मिळवणे हिच त्यांच्यासाठी बहुधा सुखाची व्याख्या झाली होती.

रात्री सव्वादहाच्या सुमारास ती गाडी डोंबिवलीस्थानकात आली. अर्थात आमचा स्थानक परिसरही एवढ्या रात्रीही फुललेला.  फेरीवाल्यांच्या गर्दीनं स्थानकाबाहेर पडणारा अवघा रस्ता व्यापलेला. कुणाचा कुणाला पायपोस नाही. रिक्षासाठी प्रवाशांची लागलेली रांग ही मारुतीच्या शेपटीसारखी.  आपला कधी नंबर लागणार, कधी घरी जाणार...या विवंचनेत असलेले चेहरे पहात मी पायी चालत निघाले. अर्थात पदपथ हे मोकळे नव्हतेच. फेरीवाल्यांचा त्याच्यावर असलेला कब्जा, त्याच्या पुढच्या भागातील रस्तावरही लावलेल्या खाद्यविक्रेत्यांच्या गाड्या यांच्यापासून जो काही रस्ता शिल्लक राहिला होता, त्यातून वाट काढून घर गाठलं. घरी आल्यावर नको त्या विचारांनी मनात घर केलं.  आपण एवढा पैसा कर रुपात कोणाला देतो, आणि तो कोणाच्या खिशात जातो. एवढ्या वर्षानंतरही कधी सुखाचा प्रवास ही संकल्पना आपल्यासाठी साध्य होणार का...वगैरे वगैर....आठड्यातून दोन दिवस प्रवास केल्यावर माझ्या डोक्याचा असा भुंगा होत असेल, तर त्या नेहमी प्रवास करणा-यांचे काय होत असतील....देवा...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. अतिशय सुदंर लिखाण, सुरेख लेख 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. त्या मुलाचा मृत्यू अतिशय क्लेशदायक वस्तुस्थिती आहे, त्या आईला काय समजायचं ! असा सवाल उपस्थित होतो... जो पर्यंत आपण मत देऊन नाकर्त्या राजकारण्यांना निवडून देणार तो पर्यंत परिस्थिती बदलणार नाही. मत द्या बदल घडवतो या पेक्षा बदल घडवा मत देतो अशी भूमिका घ्यायला हवी.

    ReplyDelete
  3. लेख छान आहे

    ReplyDelete
  4. खरी parishiti आहे. लेख मनाला भिडला

    ReplyDelete
  5. आदरणीय सइजी साष्टांग नमस्कार
    मोठ्या शहरातले धकाधकीचे जीवन धावपळीचे जीवन फार कष्ट दायक झालेले आहे. त्यात माणूस म्हणून जगताना माणुसकीतली शून्यता आपल्याला पाहायला मिळते.
    बाजूला चिरडला जातो मरतो त्याच्या बाजूने लोक सरळ निघून जातात कोणी किती मदतीला येते हे जवळपास दुरापास्त असल्याचे दिसते
    सकाळी दिवस उजाडल्यावर तीच धावपळ जीवन जगण्यासाठी क्षणाक्षणाला केलेला संघर्ष आणि त्यातून अशा काही भयानक गोष्टी घडतात हे वास्तव फार विदारक आहे!!
    मात्र गावाकडे तसे नसते इकडेही सर्व सोयी सुख सुविधा असतात त्याच सोबत माणुसकी ही जिवंत असल्याचे क्षणोक्षणी दिसते अहो
    कुठेही असो ओळखीचा असो नसो हात दिल्यावर थांबतात त्यातल्या त्यात ओळखीचा असला तर तो परत फिरून येतो आणि विचारतो दादा कुठे निघाले सोडून देऊ का
    काही दुःख संकट आलं शेकडोच्या संख्येने जमा होतात काही जवळचे आप्त
    परिचित काही मित्र संकटात खंबीरपणे उभे असल्याचे दिसते माणुसकी... तोच असतो मनाचा धीवसा..
    माणूस असल्यावर माणुसकीचे प्रेम तर मिळतेच पण गेल्यावर तिच्या आठवणींचा इतका उजाळा असतो की तो आपल्यातच आहे असा काही क्षणाला भास होतो !!
    तसे तिकडे नसते एकदा गेला की कदाचित त्याचा फोटोही लावला जात नाही. मी असे एक उदाहरण पाहिलेले आहे घरातला महत्त्वाचा व्यक्ती गेला नंतर त्याचे नाव बॉडी म्हणून ठेवले जाते मग ती बॉडी येते ॲम्बुलन्स मधून आणि आणि त्यांच्या तिथल्या सोसायटीत खाली त्या शीतपेटीत त्या बॉडीला टाकून देतात ती बॉडी रात्रभर तिथेच शीतपेटीत वाचमन सारखी पडलेली असते आणि हे वर त्यांच्या घरात गेल्यावर स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून झोमॅटो मधून खाद्यपदार्थ मागवतात रात्री खाऊन पिऊन झोपून जातात सकाळी ॲम्बुलन्स येते ते लोक त्या शीतपेटीतून त्या बॉडीला काढतात आणि घेऊन जातात हे त्या ॲम्बुलन्स मागे कार णे जातात तिथे लाकड वगैरे काही नसतात सरळ असते ती भट्टी एकदा टाकल्या नंतर बटन दाबलं की क्षणात राख.......

    ReplyDelete
  6. मुंबईत लोकलचा प्रवास जीवघेणा झाला आहे.

    ReplyDelete
  7. अगदी खरं आहे.

    ReplyDelete

Post a Comment