एक पाऊल मागे...

 

एक पाऊल मागे...


दुपारी तीन-साडेतीनची वेळ होती. दारावरची बेल एवढ्या जोरात वाजली की विचारु नका. थोडसं वैतागून दार उगडलं, तर समोर सविता.  झोपली होतीस का...म्हणत बाई थेट घरात.  मी काही बोलायच्या आता तिनं अवघ्या घराचा ताबा घेतला. बाहेर उकडतंय किती, तू पंखे बंद करुन कशाला बसलीस, म्हणून हॉलचे दोन्ही पंखे फुल स्पिडवर केले, तेव्हाच कळलं सविताबाई प्रचंड त्राग्यात होत्या. पाण्याचा ग्लास समोर केला,तेव्हा म्हणाली, तू एवढं डोक्यावर बर्फ ठेऊन कशी रहातेस. आमच्याकडे यांनी नुसता वैगात आणलाय. यांनी म्हणजे, सविताचा नवरा, सुहास...काही येत नाही. आता लग्नाला पंचवीस वर्ष होऊन गेलीत, पण  साधा कुकर लावता येत नाही. फक्त ऑर्डर सोडता येतात. कधी बाहेर गेलं, तर घरी आल्यावर दोन घास मिळतील, ही आशाच नाही...सविता भडाभड बोलत होती आणि मला मात्र खुदकन हसू फुटलं. सविताचा तो शाब्दिक धबधबा अचानक थांबला...तिनं मलाच विचारलं, तू ठिक आहेस ना...तेव्हा तिला माझ्यामागे यायला सांगितलं. ड्राय बाल्कनीमध्ये वॉशिंग मशिन चालू होती. तिला मशिन दाखवली. तेव्हा काही कळत नाही, म्हणून तिनं माझ्याकडे बघितलं. यानंतर मात्र आमच्या दोघींमध्ये माझ्या नव-याची एन्ट्री झाली, तो सुद्धा हसत आला आणि सविता अधिकच गोंधळली. त्यांनी मशिनकडे बोट दाखवून सविताला सांगितलं, हे ट्रेनिंग सेशन आहे माझं...यावर मात्र सविताचा पारा पुन्हा चढला...काय चाललंय काय...मी काय बोलतेय...तुम्ही दोघं काय बोलताय..मग चिडलेल्या सविताला पुन्हा हॉलमध्ये घेऊन गेले, आणि सांगायला सुरुवात केली.


बारा दिवसांपूर्वी माझ्या हाताला जबर दुखापत झाली. नेमका उजवा हात. सुरुवातीला होईल, बरं, म्हणून स्प्रे मारुन झाला. हाताला पट्टी लावून झाली. पण हाताला बसणा-या वेदना कमी होण्याचं नाव घेईनात. किंचाळावं वाटेल इतक्या वेदना वाढल्यावर मात्र माझी गडबड उडाली. सकाळची वेळ. अशात कामांची यादी तयार असते. मला तर हातात झाडूही घ्यायला जमत नव्हतं. एव्हाना नव-याचा व्यायाम सुरु झाला होता. त्याला झाडू मारतोस का, म्हणून  विचारणा केली. त्यावर मी किती हलगर्जी आहे, माझ्यामुळेच मला कशी दुखापत होते, यावर एक लेक्चर झाडून मगच त्यानं हातात झाडू घेतली. हाताला बसणा-या कळा एवढ्या होत्या की, त्याला प्रत्युत्तर देण्याचेही टाळले. झाडून झाले, पण नव-याचा मुख्य प्रश्न टाळता येईना. नाष्ट्याचे काय. मी खाऊच्या डब्यांकडे बोट दाखवले. तेव्हा त्यानं नको सांगून बाहेरुन नाष्टा आणूया म्हणून प्रस्ताव दिला. अडला हरी...म्हणत मी हो म्हणाले. नाष्टा करतांना माझ्या वेदना पाहून नवराही घाबरला. डॉक्टरांकडे लगेच जाऊया, म्हणून त्याची तयारी सुरु झाली. हात जरा हलला तरी कळा मस्तकात जातील अशी परिस्थिती. अशात कशीतरी तयारी केली. केस विंचरण्यासाठीही नव-याची मदत घ्यावी लागली. डॉक्टरांनी आराम करा...असे सांगून गोळ्या दिल्या आणि आमची परीक्षा सुरु झाली. दुपारचे जेवण पोळीभाजी केंद्रातून आणले.  ते ताटात वाढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळी सूत्र नव-याकडे. पुन्हा संध्याकाळची चहा-कॉफी आणि आवराआवर. मग रात्रीचे जेवण पुन्हा पोळी भाजी केंद्र जिंदाबाद. 

दुस-या दिवशी मात्र आता बाहेरचं नको, घरातच खिचडी करु म्हणून नव-याला थोडी मदत करायची विनंती केली. खरंतर दोन माणसांचं जेवण. त्याला कितीसा वेळ लागतो. पण त्यादिवशी तब्बल तास-दिड तास तरी आमची जेवणाची तयारी चालू होती. केलं काय तर खिचडी आणि भाजी, कोशिंबीर. या सगळ्या वेळात, तुम्हाला हे साधं येत नाही का...कुकर कुठे आहे...मसाल्याच्या डब्यात एवढे प्रकार कशाला...तूझं हे नेहमीचं आहे, म्हणून तू पटपट करु शकतेस, मी नाही करणार...मला असंच येतं...अशा अनेक वाक्यांनी आमच्यामध्ये वाद प्रतिवाद सुरु होते. शेवटी, एका हातानं ओटा आवरायला घेतला, आणि नव-यानं भांडी उरकली. या सगळ्यात मला त्याचं एक वाक्य चांगलंच लागलं. तुला सर्व गोष्टी जागच्याजागी लागतात, एखाद्यावेळी एक वस्तू दुसरीकडे ठेवली तर काय बिघडतं. त्यामुळेच मी स्वयंपाकघरात येत


नाही...या त्याच्या वाक्यानं मला विचार करायला भाग पाडले. मी हाताच्या कळा सोसत असतांना तो त्याच्या परीनं घराची आणि माझी काळजी घेत होता.  त्यात त्याची सर्व कामंही चालू होती. फोन चालू होते. मिटिंग चालू होती. आणि माझी भूणभूणही....कचरा काढतांना इथून असाच काढ...हीच झाडू वापर...खिडक्या साफ करायच्या राहिल्या...कितीतरी वेळा मी त्याला बोलून दाखवलं होतं. पण त्याच्या या एका वाक्यानं मी थोडीशी ताळ्यावर आले. त्यानंतर पुढचा आठवडा तरी हाताला येणा-या कळा थांबल्या नव्हत्या. पण या सर्वात आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. अगदी चपात्या आणि भाक-याही.  पण हे असचं हवं, म्हणून माझा आग्रह थोडा बाजुला ठेवला आणि सगळं सुलभ झालं. सविता आली तेव्हा जी वॉशिंग मशीन चालू होती, हा सुदधा यातलाच एक प्रकार. वॉशिंग मशिनच्या बटनांचा खेळ मात्र नव-याला अजून जमत नव्हता. जाऊदे, परत लावूया का म्हणत, सविता आली तेव्हा तिस-यावेळी पुन्हा मशिन फिरत होती. सविताला हे सर्व सांगितलं, तेव्हा बाईंचा पारा एकदम खाली आला, ती सुद्धा खळवळून हसू लागली.

मग काय ती नॉर्मल झाली, आणि माझी कामांची यादी चालू झाली. आयती सविता माझ्या हातात लागली. नवरा चहा-कॉफीची तयारी करु लागला, तेव्हा तिनं पोहे करु का...म्हणून विचारलं. अर्थात आम्ही दोघंही एकसाथ हो...म्हणून मोकळे झालो. तिचे पोहे होईपर्यंत नव-यानं सविताच्या नव-यालाही फोन करुन बोलवून घेतलं. त्या दोघांमधलाही तणाव निवळला...माझ्या हाताची चौकशी झाली. चहा-कॉफी आणि पोह्यांसोबत गप्पा रंगल्या. एवढ्या वेळेत ते वॉशिंग मशीनमधील कपडेही धुवून झाले होते. सावकाश वाळत घालूया, असं नव-यानं सांगितल्यावर मी सुद्धा होकार दिला. सविता हसून आमच्याकडे बघत होती. भांडी आवरण्यासाठी आम्ही दोघी मैत्रिणी स्वयंपाकघरात गेलो, तेव्हा सविताला काही बोलणार इतक्यात तिच म्हणाली, थोडं मागे यायला हवं ना कधीतरी...अर्थात मी हो म्हणाल्यावर आम्ही दोघीही हास्यात बुडून गेलो. बाहेरुन सविताच्या नव-यानं आता रात्रीचं जेवण इथेच करायचं का...असा प्रश्न केला. त्यावर सविता पुढे झाली, नाही...आपण घरी जाऊया...दुपारचं आवरायचंय. त्यांचं जेवण ते दोघं करतील, आपलं आपण करुया...तिच्या नव-याला यातलं काही कळलं नव्हतं. पण हसणा-या सविताला पाहून मला मात्र फार समाधान वाटलं....

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. खूप सुरेख

    ReplyDelete
  2. Khup chhan lekh

    ReplyDelete
  3. खुप छान लेख👌👌👍👍

    ReplyDelete

Post a Comment