ब्रुसेल नावाचा छोटा कोबी
माझ्या हाताला झालेली दुखापत बरी झाली. पण या दुखापतीमध्ये अनेक शोधही लागले. त्यात ब्रुसेल स्प्राऊट नावाची भाजीही हाती लागली. ब्रुसेल स्प्राऊट म्हणजे अगदी छोटा कोबी. आपल्याकडे मिळतात ना ते मोठे कोबी, त्याचे अगदी पिल्लू असलेली ही भाजी चवीला मात्र सुभान लागते. ब्रुसेल स्प्राऊटचा बहुतांशी वापर सॅलेडमध्ये होतो. करायला अगदी झटकीपट, पण चवीला एकदम छान. माझा लेक नववीला असतांना त्याला एकदा एका परीक्षेसाठी मुंबईच्या कॉलेजमध्ये घेऊन गेले होते. त्याची परीक्षा चार तासांची. अशावेळी त्याच कॉलेजसमोर असलेल्या एका मोठ्या मॉलमध्ये फेरफटका मारतांना मला पहिल्यांदा ही ब्रुसेल स्प्राऊट नावाची भाजी मिळाली. तिथल्या भाज्यांच्या स्टॉलवर या ब्रुसेल स्प्राऊटसह अनेक अशा माझ्यासाठी नवख्या असलेल्या भाज्या होत्या. त्यातही छोट्या कोबीसारखी भाजी पाहिल्यावर मला पहिल्यांदा कोबी छोटे असतांना तोडतात की काय, अशी शंका आली. पण त्याच स्टॉलवर असलेल्या तरुणीनं माझ्या या सर्व शंकांचे निरसन केलं, आणि ब्रुसेल
स्प्राऊटचा पहिल्यांदा परिचय करुन दिला. फारकाय त्यांची लागवड कशी होते, त्याचे रोपटे कसे धरते इथपासून ते त्याच्यामुळे किती आणि कसे विटॅमीन मिळतात, याची सविस्तर माहिती दिली. तिच्या या सर्व माहितीमुळे मी चव न चाखताच ब्रुसेल स्प्राऊटच्या प्रेमात पडले. तिथून भरपूर ब्रुसेल आणि अन्य सॅलेडच्या भाज्यांची खरेदी केली. अर्थात नवरा आणि लेकानंही तेव्हा डोक्यावर हात मारुन घेतला होता. पण या ब्रुसेल स्प्राऊटची रेसिपी मी त्या तरुणीनं सांगितल्याप्रमाणे केली, तेव्हापासून ब्रुसेल स्प्राऊट आमच्या घरातील हक्काची भाजी झाली. मात्र लेकाच्या परीक्षांचा हंगाम संपला आणि ही ब्रुसेल स्प्राऊटही गायब झाली. ती आत्ता ब-याच वर्षानंतर आपसूक सापडली.
माझ्या हाताच्या दुखापतीच्या त्या पंधरा दिवसात नव-याला सोबत घेऊन काही पदार्थ केले. पण चार दिवसानंतर त्याची धावपळ वाढली. मग डबा लावूया का, हा प्रस्तावही पुढे आला. पण त्याऐवजी मी एकवेळ सॅलेड करुया का...असा प्रस्ताव ठेवला. त्यानं होकार दिल्यावर मग घरात भाज्या काय आहेत, याची चाचपणी करु लागले. पण या सर्वात भाज्या आणण्यासाठी वेळच मिळाला नव्हता. आता तू मला भाजी घ्यायला पाठवू नकोस, म्हणून नव-यानं सरळ त्याचा मोबाईल स्वखुषीने माझ्या हातात दिला आणि हव्या त्या भाज्या, फळं
बुक कर म्हणून सांगितलं. एका ॲपवरुन भाज्या आणि फळं बुक केल्यावर मी सहज म्हणून त्यातील सॅलेड सेक्शनवर नजर टाकली, तर तिथे मोठा खजिना होता. आइसबर्ग, रेड-ग्रीन लीप लेट्यूस, बेबी पालक, बटरहेड असं बरंच काही होतं आणि तिथेच ब्रुसेल स्प्राऊट दिसले. मग काय मी युरेका....युरेका करत त्या ब्रुसेल स्प्राऊटची चार पाकीटं बुक केली. नव-यानं यादी बघितली एवढी संपणार आहेत का, म्हणून विचारलं, तेव्हा माझ्या मनात या चार पॅकमधील ब्रुसेल स्प्राऊटपासून काय तयार करायचं याच्या रेसिपी तयारही झाल्या होत्या.
ब्रुसेल स्प्राऊट हा असा प्रकार आहे, की त्याच्या जेवढ्या रेसिपी कराल, तेवढ्या नव्या आणि छान लागतात. एका पाकीटामध्ये साधारण १२ ते १५ ब्रुसेल येतात. त्याचा आकार कितीसा, अगदी एका छोट्या चिकूसारखा, किंवा जांबासारखा. मी जेव्हा त्याचा सॅलेडमध्ये वापर करते, तेव्हा तर अगदी पाच मिनिटात ब्रुसेल तयार होतात. प्रथम ब्रुसेल स्वच्छ धूवून त्याचे दोन भाग करायचे. अगदी थोडसं बटर किंवा तेल टाकून बारीक गॅसवर वाफेवर ठेवायचे. पाच मिनिटात हे छोटेसे कोबी तयार होतात. मग वरुन त्यावर काळीमिरी पावडर आणि मिठ टाकलं की खायला तयार. आता यामध्ये आणखी बहार हवी असेल तर वर चिज टाका, चाट मसाला टाका. या ब्रुसेलसोबत मी शक्यतो असेच वाफवलेले बेबी कॉर्न, वाफवलेले काबुली चणे, गाजर, काकडी, चिज किंवा पनीर, अननसाचे तुकडे आणि जेवढी असतील तेवढी सॅलेडची पानं टाकते. अर्थात हा सर्व जुमला आपल्या आवडीचा आणि घरात उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आहे. पण यातून जी पोषक भेळ तयार होते, त्याच्या
चवीला तोड नाही. बरं नुसते ब्रुसेल स्पाऊट खायचे असतील तरी त्याचे अनेक प्रकार होतात. माझा आणखी एक आवडता प्रकार म्हणजे, चणापीठ टाकून केलेल ब्रुसेल वडे. यात गरम पाण्यात अख्खे ब्रुसेल टाकून त्याला एक उकळी द्यायची. अगदी मिनीटात हे ब्रुसेल पाण्याबाहेर काढायचे आणि वाटी, किंवा पेल्याच्या सहाय्यानं त्यावर थोडा दाब द्यायचा. मग त्यातलं पाणी बाहेर पडतं आणि चपट्या वड्यासारखे होतात. त्यानंतर त्यावर थोडं चण्याचं पीठ, तिखट, मिठ, झालचं तर आल्या लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची असं जे काय आपल्याला आवडतं त्याचा मारा करायचा. वरुन एक चमचा तेल टाकायचे आणि हलक्या हातानं सगळं मिक्स करायचं. शक्यतो यासाठी काट्याचा वापर केला तर अधिक छान होतं. मग फ्रायर मध्ये हे ब्रुलेसलचे चपटे वडे ठेवायचे. दहा मिनिटात आलटून पालटून झाले की, त्याचे कुरकुरीत वडे होतात. फ्रायर नसेल तर साध्या पॅनला अगदी थोड्या तेलामध्येही तसेच ब्रुसेल वडे तयार होतात.
मुळात ब्रुसेल स्प्राऊट ही भाजी युरोपची. बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेलवरुन या भाजीचे नाव ठेवल्याची माहिती आहे. तिथून ही भाजी भारतात आली. आता भारतातील थंड हवेतल्या प्रदेशात ही भाजी तयार होते. अनेक औषधी गुणधर्म असलेली ही भाजी हिमाचल प्रदेश, काश्मिरमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातही तयार होऊ लागल्याची माहिती मला त्या ॲपवरुन समजली. अर्थात त्यातीलच काही ब्रुसेल स्प्राऊट आमच्या घरी आले होते. त्यातील तीन पाकीट तर लगेच संपली. राहिलेल्या एका पाकीटातील ब्रुसेल स्प्राऊटची मी आपल्या कोबीच्या भाजीप्रमाणे भाजी केली. माझ्या दुख-या हातामुळे भाज्या फार बारीक कापता येत नव्हत्या. त्यात याचा उपयोग
झाला. एका ब्रुसेलसचे चार भाग केले आणि काम झालं. तसंच कांदा-टोमॅटोचेही. आलं, लसूण ठेचून टाकलं, आणि भरपूर कडीपत्ता. दोन मिरच्या उभ्या चिरुन टाकल्यावर झणकेबाज फोडणी झाली. त्यावर कांदा, टोमॅटो परतून लगेच हे ब्रुसेल स्प्राऊटचे तुकडे टाकले आणि भाजी वाफेला ठेवली. पाच मिनीटांनी गॅस बंद केला. कुठलीही भाजी निवल्यावर त्यात भरपूर कोथिंबीर आणि खोबरं टाकायचं हे शास्त्र असतं. यावर खोवलेलं नाही, पण जायफळाच्या किसणीवर किसलेले खोबरे टाकून ही हे शास्त्र पाळलं आणि भाजीची चव बघितली...छानच. म्हणजेच काय हे ब्रुसेल स्प्राऊट नावाचे छोटे कोबी आपण करु तसे होतात, चवदार आणि लज्जतदार...मध्यंतरी राणीच्या बागेतल्या पुष्प प्रदर्शनाला गेले होते तेव्हा या ब्रुसेलच्या बिया दिसल्या. हौशेनं घेतल्या आहेत. आता त्याच्यावर प्रयोग सुरु....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
Very helpful information
ReplyDeleteThank you Ma'am
Khup chhan lekh
ReplyDelete