आमचं युद्ध यासाठीच..

 

 

आमचं युद्ध यासाठीच...


जगात काय चालू आहे. युद्ध. तिकडे अमेरिका आणि इराण यांचे सुरु असलेले युद्ध, तुफान या शब्दाच्या पलिकडे गेले आहे. आपण दिवाळीत जसे फटाके फोडतो, त्याच्या चौपट ही मंडळी क्षेपणास्त्र एकमेकांवर फोडत आहेत. जमिन, पाणी आणि आकाश अशा तिनही मार्गातून एकमेकांवर हल्ले करण्यात या देशांची स्पर्धा चालू आहे. या युद्धामुळे टीव्ही लावयचीही सोय राहिलेली नाही. कारण त्यात तर युद्धाची परिसीमा गाठली आहे. एखादे क्षेपणास्त्र थेट आपल्या घरात येईल की काय, अशा बातम्या चालू आहेत. दुसरीकडे युद्धामुळे महागाईचा भडका कसा होणार आहे, तेलाची कशी कमतरता होणार आहे, याच्या चर्चांवर चर्चा सुरु आहेत. हे सर्व होतांना आमच्याकडे काय चालू आहे, असा प्रश्न विचारायची सोय नाही. कारण जगात काहीही चालू दे, आमच्याकडे मार्च महिना सुरु झाला की, आमचे वेगळे युद्ध सुरु होतं. हे युद्ध म्हणजे, एकमेकांवर कुरघोडी करायचे असते. कसली कुरघोडी विचाराल तर ती असते, काजू बियांची आणि फणसाच्या कुयरीची. आहे की नाही


गम्मत....इथे जगात काहीही होऊदे. आमच्याकडे मार्च महिन्यात या काजू बियांची आणि फणसाची भाजी झाली नाही तर युद्ध सुरु होतं. बरं हे युद्ध दोन्हीबाजूनी असतं बरं. म्हणजे, पहिली भाजी कोण करते, याचीही स्पर्धा असते. आणि हा पहिला मान घेतलेली मग सर्वकडे फोन करत सुटते. आमच्याकडे ओल्या काजूगराची भाजी केली, हे वाक्य मग कितीतरी अलंकार घालून सजवण्यात येतं, सोबतीला फणसाच्या कुयरीचीही भाजी असेल, तर बढेजाव मारण्यात ते डोनाल्ड ट्रम्प कमी पडतील, एवढी बढाई मारली जाते. अर्थात कोकणातल्या प्रत्येकासाठी या दोन्ही भाज्या सोन्याहून प्रिय आहेत, त्यामुळे त्या पहिल्यांदा घरी केल्यावर त्यांचा थोडा मानपान झालाच पाहिजे.

धुळवडीच्या दिवशी दुपारी फोन आला तो मैत्रिणीचा. पहिल्यांदा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अगदी जागतिक विषयांपासून गप्पांची सुरुवात झाली. तो ट्रम्प काय गोंधळ घालतोय, पासून आमच्या गावाकडे होळीची पालखी कशी नाचवतात, यावर चर्चा झाल्यावर मग हळूच तिनं माझ्याकडे भाजी काय केलीय, याची चौकशी केली. मी भाजीचं नाव सांगितलं, आणि मैत्रिण एकदम ओरडली. तू चक्क धुळवडीला काजू गरांची भाजी केली नाहीस...कमालच आहे. मग बाई सुरु झाल्या. कारण तिनं ओले काजू गर भरपूर आणले होते. सोबत फणसाच्या चार कुय-याही. त्यामुळे तिच्या स्वयंपाकघरात ही आगळी धुळवड साजरी झाली होती. काजूगरांची रस्सा भाजी आणि फणसाच्या कुय-याच्या तिखट कापा केल्या होत्या. वरवर वाटतात तेवढे हे साधे पदार्थ नव्हे बरं. एकदा का यांची चव तुमच्या जिभेला लागली की, ती काही सुटत नाही. 


दरवर्षी होळीच्या आधी मी हमखास ठाण्याच्या बाजारात जाते. तिथे वाट्यावर ओले काजू गर आणि फणसाच्या कुय-या विकायला आलेल्या असतात. दरवर्षी धुळवड साजरी करतांना या दोन्हीही भाज्या आमच्या घरी होतात, आणि माझ्याकडे जशी मैत्रिण फोन करुन चौकशी करत होती, तशी मी सर्व मैत्रिणींच्या घरी फोन करुन माझ्या भाज्यांची बढाई मारत असे. हा क्रम चुकला आणि नेमका मैत्रिणींनी मोका साधला. अर्थात या सर्व बढाया मारुन झाल्यावर मात्र मैत्रिणीनं ओले काजू गर आणि फणसाची एक कुयरी घेऊन येते, म्हणून सांगितलं, आणि आमच्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या.

या दोन भाज्यांची चवच एवढी भन्नाटच असते. मार्च महिना सुरु झाला की ओले काजू गर सगळीकडे दिसू लागतात. श्रावणातला मटार कसा गोडूस लागलो, अगदी नुसत्या तिखट, मिठ आणि खोब-यावर परतलेल्या मटारची भाजी अविट गोडीची लागते. तशीच या ओल्या काजू गरांची भाजी असते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला येणारे काजू गर फार छोटे नाही आणि फार मोठेही नाही, असे असतात. या काजू गरांची भाजी हा कोकणातल्या तमाम खवय्यांचा आवडीचा विषय. अर्थात काजू गर किती महाग झाले आहेत, ही चिंता व्यक्त करत त्यांची वारेमाप खरेदी होणारच. मग भाजी असो वा भात, हे काजू गर त्यात डोकवणार.

ओल्या काजू गरांची भाजी कशी करायची हा प्रश्न कधी विचारु नये. कारण कुठल्याही प्रकारे ही भाजी करा, त्याची चव अप्रतिमच लागणार. अगदी भरपूर काजू गर असतील तर त्याची अगदी मिरचीवरची भाजी करायची. फोडणीला मिरची, कडीपत्ता अगदी नावाला कांदा, आणि त्यावर काजू गर. वरुन हळद आणि भरपूर खोबरं टाकून भाजी वाफवायची. बस्स. तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी खातांना एखादी भाकरी  पोटात अधिक रिचवली जाईल, एवढी ही साधी भाजी चवीला न्यारी लागते. प्रवासात न्यायची असेल किंवा उपवास असेल तेव्हा ही भाजी कांदा न घातलाही केली जाते. आता रस्ता काजू भाजी करायची असले तर ओल्या कांद्याचे वाटण, ओल्या खोब-याचे आणि मिरचीचे वाटण, भाजलेल्या कांदामसाल्याचे वाटण अशा अनेक प्रकारात भाजी होते.


काजू गर किती आहेत, यावर या भाज्यांमध्ये काजू गरांचा सोबती निवडायचा. त्यातून भाजीची चव अधिक वाढते. यात बटाटा, कच्चे टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा आणि फणसाच्या कुयरीचे तुकडेही सहज मिळून जातात. हेच काजू गर मसाला भातात टाकले तर अन्य भाज्यांपेक्षा अधिक भाव खाऊन जातात. नॉनव्हेज प्रेमींसाठी हे काजू गर चिकन किंवा मटनाच्या रस्स्यात टाकले तर त्या रस्स्याच्या झणक्याला अधिक स्वाद देतात.

बरं काजू गरांची चव न्यारी असेल तर ती फणसाची कुयरीही तेवढीच दुलारी ठरते. ब-याचवेळा फणसाची कुयरी कापायची कशी, मग ती शिजावयाची कशी हा प्रश्न असतो. पण मी ही कुयरी स्वच्छ धूवून अगदी थोडं तेल आणि भरपूर पाणी टाकून थेट कुकरमधून वाफवून घेते. अशी शिजलेली कुयरी कापायला सोप्पी जाते. मग तिच्या फोडी कुस्करुन फोडणीची कुयरी भाजी होते. कुयरीचे तुकडे कापून रस्सा कुयरी होते. किंवा त्याच कुयरीचे छान गोल तुकडे करुन तिखट, मिठ आणि रव्यामध्ये घोळवून  कापही चवदार होतात. एकूण काय कोकणामध्ये मार्च महिन्यापासून मिळणा-या या दोन्ही भाज्या सोन्याच्या आहेत. आम्हा मैत्रिणींमध्ये या भाज्यांवरुन आगळी स्पर्धा लागते. यावेळी मैत्रिणीनं त्यात बाजी मारली तरी बाई, त्यातली थोडी भाजी आणि काजूगर, फणसाची कुयरी


घेऊन घरी आल्या. तिकडे अमेरिका-इराणमध्ये युद्धानं परिसीमा गाठली असली, तरी आमचं हे अनोखं जग आहे. इथे स्पर्धा आहे, पण त्यात ईर्षा नाही की कुरघोडी नाही. थोडावेळ गम्मत जम्मत होते. पण नंतर आम्ही गळ्यात गळे टाकून गप्पामध्ये रंगून जातो. मैत्रिण काजू बिया घरी घेऊन घरी आली, तेव्हाही असंच झालं. पण एवढ्यात अजून एका मैत्रिणीचा फोन आला, मसाला केलास का...मसाला संपलाय...कधी पाठवणार....अरे देवा...आता परत एक स्पर्धा....


सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. छान लेख सई

    ReplyDelete
  2. लेख लय भारी 👍

    ReplyDelete
  3. हो ना मस्तच

    ReplyDelete

Post a Comment