त्यादिवशी भेटलेली ती...
महिला दिन कसा साजरा झाला हे विचारू नका. प्रचंड धावपळ. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून. रात्री आठ पर्यंत शेड्युल एकदम टाईट. अर्थात तो दिवस आपलाच असतो. यानिमित्ताने आपल्या आसपास वावरत असलेल्या महिला किती उदात्त ध्येयाने कार्य करत आहेत याची माहिती मिळते. त्यांना जाणता येतं... त्यांचे विचार कानी पडल्यावर आपल्यावरही सकारात्मक संस्कार होतात. याच महिला दिनाच्या धावपळीत मला ती दिसली....अर्थात ती म्हणजे एक महिला. गेल्या काही वर्षापासून मी तिला ओळखते. नावाने नाही, पण ठराविक ठिकाणी ती मला दिसते. गार्डनच्या बाजूला असलेल्या बाकांवर ती बसून असते. काही वेळा हातात बिस्कीटचा पुडा किंवा चिप्स खाताना तिला मी बघितलं आहे. त्या व्यतिरिक्त धावपळत, लगबग करत चालतांना बघितलं आहे. पण एवढ्या वर्षात तिचं नाव विचारायचं माझ्या मनात कधी आलच नाही. महिलादिनी ती मला चक्क सकाळी सहा वाजता तिच्या नेहमीच्या ठिकाणी बसलेली दिसली.... एवढ्या लवकर कामावर येते ही, हा विचार माझ्या मनात आला. पण माझी गडबड असल्यामुळे तिच्याशी
बोलता आले नाही. दुपारी बारा वाजता परतले तेव्हाही अशीच गडबड. त्यामुळे ती आहे की नाही, हे बघता आलं नाही. परत दुपारी तीन वाजता बाहेर पडले, तेव्हा मात्र तिची जागा भरलेली होती. एका हातात बिस्कीटचा पुडा आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली. रात्री साडेआठच्या सुमारास परत आले, तेव्हा बाई परत तिथेच बसलेल्या. एव्हाना महिला दिनाचे पाच कार्यक्रमांनी मी उपस्थित होते. पण या सर्वात मला ती अस्वस्थ करून जात होती. आज कितीही उशीर झाला तरी तिच्याशी बोलायचं, हा विचार केला आणि तिच्या नेहमीच्या गार्डनच्या बाकड्यावर तिच्या बाजूला जाऊन बसले. पुढच्या अगदी अर्ध्या तासात एका खमक्या स्त्रीचं मनोगत माझ्यासमोर होतं.
तिचं नाव मी सांगत नाही. आपण सोयीसाठी शक्ती म्हणूया. अगदी ठेंगणी म्हणता येईल अशी उंची. वर्ण काळा सावळा. अंगकाठी अगदी बारीक. शक्तीचं वय आता 45 आहे. तिची आई धुण्या भांड्यांचे काम करत होती. लहानपणापासून आईसोबत जाणाऱ्या शक्तीने हे काम सहज शिकून घेतलं आणि शाळेपासून चार हात दूर झाली. घरात ती, तिची आई आणि दोन वर्ष मोठा भाऊ. वडील पक्के दारूडे. असेच दारूच्या नशेत एका गाडीखाली आले आणि तो अध्याय संपला. शक्तीला वडील आठवतात ते फक्त आईला मारत असतानाचे. आईने वर्षभर त्यांचा फोटो सांभाळून ठेवला होता. नंतर मात्र त्या आठवणीही नको म्हणून तिने त्या फोटोलाही समाधी दिली आणि या तिघांचे विश्व सुरू झाले. घराची सगळी जबाबदारी आईच्या कामावरच. चाळीच्या अगदी शेवटी, पत्र्याची शेड म्हणजे शक्तीचा घर होतं. पैशांची गरज
आणि शाळेचे लाड नको म्हणून भावांनेही इमारत कामावर मजूर म्हणून जायला सुरुवात केली. सुरुवातीला आईने त्याला शिकण्यासाठी आग्रह धरला होता. पण घरात येणारे पैसे बघून तो आग्रहही
मागे पडला. पुढे शक्तीही
धुण्या भांड्याच्या कामामध्ये सराईत झाली आणि घराचं चक्र सुरळीत झालं. शक्तीला
आणखी चार काम मिळाली. भावाचाही त्याच्या
कामांमध्ये चांगला जम बसला. दोन्ही
भावंडांचा मुळात स्वभावच समंजस असल्यामुळे भावाला त्याच्या साइटवर बढती मिळाली. त्याचं एक फलित म्हणजे छोटी का होईना एक पक्की
खोली मिळाली. शक्ती, तिची आई आणि भावासाठी हा सर्वात मोठा दिवस होता.
या नव्या घरात शक्तीच्या आईनं पहिल्यांदा पूजा घातली. आपल्या परिचितांना बोलावलं. ती जिथे काम करत होती त्या कुटुंबातही तिने
विश्वासाने जागा मिळवली होती. या सर्व
कुटुंबांनी शक्तीला आणि तिच्या आईला नवीन घरासाठी मदत केली.
तिच्या
आईने एवढ्या वर्षात अशी अनेक कुटुंब बांधून ठेवली होती, या सर्वांनी केलेल्या
मदतीमुळे शक्तीचं घर, स्वप्नांचे घर झालं.
शक्ती अठरा वर्षाची झाली. मग
तिच्या आईला तिच्या लग्नाची स्वप्न पडू लागली.
शक्तीचे लग्न झालं की तिच्या भावाचेही लग्न लावून द्यायचं होतं, मला सून
मुख बघायचे आहे, त्याच्या अगोदर तुझं लग्न करून देते, म्हणून ती शक्तीच्या मागे लागली. पण शक्तीसाठी स्थळ कोण शोधणार....तिनं
तिच्यासोबतच्या जुन्या भांडी करणाऱ्या बायांना सांगितलं... मुलगा बघा
हिच्यासाठी....दरम्यान शक्तीच्या भावासोबत एक मुलगा कायम घरी येऊ लागला होता. तो सुद्धा तिच्या भावासारखाच साइटवर काम करत
होता. सांगलीकडचा...पण दुष्काळामुळे जमीन
विकावी लागली होती आणि ती हाय खाऊन वडिलांनी आपलं जीवन संपवलं होतं. आता कमवायचं काय, म्हणून आईने त्याला शहरात
पाठवलं आणि ती तिकडे शेतावर मोल मोजरी करून घर सांभाळत होती. त्याला शक्ती आवडली. त्याने थेट शक्तीच्या भावाकडे तिच्यासाठी
लग्नाची मागणी घातली. ही बातमी ऐकून शक्ती
काय हरखून गेली होती. आपल्या कोणी प्रेमात
पडेल, ही कल्पनाच तिने कधी केली नव्हती.
अगदी महिनाभरातच एका साध्या हॉलमध्ये लग्न पार पडलं. शक्तीची आई जिथे काम करत होती, तिथल्या एका
मालकीण बाईने शक्तीला शालू घेतला, एकीने
चक्क गळ्यातलं डोरलं केलं...सोन्याचं...बाकीच्या कुटुंबाने साड्या...गरजेच्या
वस्तू असा आहेर केला...शक्ती म्हणाली, पहिल्यांदाच
माझ्याकडे बारा साड्या जमल्या...बारा...तिच्यासाठी हा आकडा खूप मोठा होता.
लग्नानंतरची पाच वर्ष अगदी छान हवेत गेली.
साताऱ्याकडे शक्तीचं स्वतःचं एक घर झालं.
अगदी साधं मातीचं होतं. पण ते तिचं हक्काचं होतं. सासूही छान होती. सणावाराला शक्ती आणि शक्तीचा नवरा आवर्जून गावी
जात. शक्तीला दोन मुलं झाली. त्यावेळी
सासू हक्काने मुलाकडे राहायला आली आणि सुनेचं बाळंतपण केलं. शक्तीच्या भावाचंही लग्न झालं. या सर्वात शक्तीची आई मात्र थकली आणि तिची एक-एक
कामं सुटू लागली. लहान मुलांमुळे
शक्तीलाही तिची दोन-तीन कामं सोडावी लागली.
पण एकूण बरं चालत होतं. अचानक एक
दिवशी इमारतीच्या साइटवर अपघात झाला.
तात्पुरती उभारलेली लिफ्ट नेमकी शक्तीच्या नवऱ्याच्या डोक्यात कोसळली आणि
तो जागीच गेला. शक्तीचं आयुष्य तिथेच
थांबलं. हाताशी फार जमापुंजी नव्हती. तरणा मुलगा गेल्याची बातमी ऐकल्या ऐकल्या
सासूनेही देह सोडला. शक्तीसाठी आभाळ फाटलं.
पदरात दोन मुलं. त्यांच्यासाठी
काहीतरी करणं भाग होतं, म्हणून पुन्हा ती घर कामाला लागली. तिच्या आई सुद्धा या
धक्क्याने बरीच आजारी पडली. पण शक्तीच्या सोबतीला ती तिच्याकडे राहू लागली. अवघं वर्षभर तिने तग धरला आणि ती सुद्धा
गेली. शक्ती समोर करायचं काय हा प्रश्न
होता. तिचा भाऊ तिला आणि तिच्या दोन
मुलांना त्याच्या घरी घेऊन गेला. भावालाही
एक मुलगा आणि एक छोटी मुलगी, वन
रूम किचन. त्यात अर्थात तीन नवी
पाहुणे. सुरुवातीला वहिनीने थोडी कटकट
केली. साहजिकच होतं ते. पण शक्तीने तिला माझ्या पोरांचे आणि माझे
महिन्याचे पैसे देते असे सांगून शब्द दिला.
तेव्हापासून शक्ती सकाळी पावणे सहाला घर सोडते तिथे रात्री दहा वाजता घरी
जाते. तिच्या मुलांना तिने मराठी मिडीयमच्या
शाळेत घातलं आहे. शाळेत जाण्यासाठी आणि
शाळेतून येण्यासाठी रिक्षा लावली आहे.
वहिनीला सांगितल्याप्रमाणे ती दर महिन्याचे ठराविक पैसे तिच्या हातात देते. अधे मध्ये या दोघींमध्ये थोडी कुरबूर होते...पण
आता वहिनीचा स्वभावही निवळला आहे. दुपारी
आराम करायला तरी घरी या म्हणून ती आवर्जून सांगते. पण शक्तीला बहुदा आराम हा शब्दच आवडत
नाही. जिथे काम करायला जाते त्यांच्याकडे
सकाळच्या चहा नाश्ता होतो. दुपारी
ज्यांच्याकडे जेवण करण्यासाठी जाते, ती
मंडळ ही चांगली आहेत, तिला दोन चपाती भाजी खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाहीत. शक्ती अशीच रात्री पर्यंत चार घरं करते. मधल्या वेळेत गार्डनच्या बाकड्यावर बसून आपला
थकवा घालवते.
किती दिवस असंच रहाणार, विचारल्यावर तिचा चेहरा खुलला. भावानं नवं घर घेतलं आहे. जुन्या घरात शक्तीला राहायला मिळणार होतं. आता तिथे शक्ती स्वतःचा पोळी भाजीचा व्यवसाय सुरू करणार आहे. ती झ्या घरात जेवणाची काम करते, त्यांना ती तिच्या स्वतःच्या घरातून जेवणाचे डबे पोहचते करणार आहे. अर्थात ती जेवण बनवणार आणि दोन्ही मुलं हे डबे पोहोचवण्याचं काम करणार आहेत. काही विद्यार्थी भेटले आहेत, त्यांनाही डबे हवे आहेत. एकूण काय शक्तीच्या आयुष्यातला नवा टप्पा सुरू होत आहे. तिचा आनंद बघून मला खूप बरं वाटलं, पण या संघर्षाचा कंटाळा येत नाही का तुला, म्हणून विचारल्यावर ती थोडी शांत झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. बहुदा मागच्या जीवनाचा सगळा सारीपाट समोर आला असेल. डोळ्यातले अश्रू टिपून म्हणाली, एवढं सोसलं आहे ना की मन दगडाचं
झालंय....जेवढं वाईट व्हायचं होतं तेवढं होऊन गेलं... आता तो देव सुद्धा दमला असेल....एवढं बोलून शक्ती हसू लागली... तिच्या हसण्यात आनंद होता की खेद होता की देवाला थेट आव्हान होतं हे मात्र मला कळलं नाही...तिच्याशी काही बोलणार इतक्यात समोर एक रिक्षा येऊन थांबली. त्यातून एका महिलेने शक्तीला हाक मारली आणि ताई चला घरी जाऊया, म्हणून रिक्षा बोलावून घेतलं. शक्ती उठली...हे शेवटचं घर म्हणून रिक्षात बसली. मी तिझ्या शांत चेहऱ्याकडे बघत होते...महिला दिनाच्यांतीने मला अनेक कर्तृत्ववान महिला भेटल्या. पण त्या सगळ्यात सामर्थ्यवान महिला म्हणजे ही शक्तीच होती.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
काही काहींचे आयुष्य केवळ कर्म करण्याकरता दुःख भोगण्यि जन्माला आलेलं असतं. त्यातलीच एक ही.. खूप खूप शुभेच्छा तिला
ReplyDeleteमहिला दिनी केवळ चमकोगिरी करणाऱ्यांचा सन्मान होतो असं बऱ्याचदा वाटतं.(काही अपवाद वगळता) प्रतिकूल परिस्थितीत लढणारी शक्ती खरी स्त्री शक्ती! ती खरी सन्मानास पात्र ठरली पाहिजे. पण अशा महिलांना महिला दिन माहिती नसतो. तुझ्या सारख्या कुठं तरी त्यांना भेटून उजेडात आणतात. सेलिब्रेटी महिलांपेक्षा यांचं काम जास्त प्रेरणादायी असतं. खूप छान लिहिलंय सई!
ReplyDeleteकधी कधी आपलच दुःख आपल्याला मोठ वाटत असत. देव आपल्यावर किती अन्याय करतोय. असं वाटत पण अशा स्त्रिया पाहिल्या की निशब्द व्हायला होतं.
ReplyDeleteKhup chhan mahiladin vishesh lekh
ReplyDeleteअगदी खरं आहे.अशा महिलेचा सन्मान झाला पाहिजे.
ReplyDeleteप्रतिकूल परिस्थितीवर कठोर संघर्षमय जीवन जगणाऱ्या शक्तीवर लिहीलेला लेख हाच महिलादिनी झालेला मोठा सन्मान आहे.!!अभिनंदन!!
ReplyDelete