वेळ येते आणि जाते...
गुरुवारी असलेल्या गुढीपाडव्याची तयारी आमच्याकडे बुधवारपासून सुरू झाली. बाकी सगळं राहू दे, पण माझ्यासाठी अशा प्रसंगी रांगोळी हा मुख्य मुद्दा असतो. दुपारी जेवणाचे आवरून रांगोळीचे डबे घेऊन बाहेर बसले. अगदी पहिली रेघ ओढली आणि लिफ्टचा आवाज आला. मागे वळून बघितलं तर विभा. तिला बघितलं आणि हातातली रांगोळी गळून पडली. हे व्यक्तिमत्व असं आहे. काही वर्षांपूर्वीची माझी अगदी खास मैत्रीण. पण मध्ये असं काही झालं की, आमच्या दोघींमध्ये एक किंतू आला....त्यानं माझी चांगली मैत्रीण हिरावून घेतली. आता कधीतरी आम्ही भेटतो, बोलतो, पण आम्हा दोघींनाही जाणवतं, की हा तो जिव्हाळा नाही. त्यामुळेच अचानक विभाला समोर बघून मला आश्चर्य वाटलं. तुला रांगोळी काढायला वेळ लागेल ना, मग मी थोड्या वेळाने येते, म्हणत ती फिरली आणि मी जागी झाले....कशाला थोड्यावेळाने, तू ये रांगोळी सावकाश काढेन मी...म्हणत विभाला घरात घेतलं.
सुरुवातीला पाणी...कॉफी...थोडाफार गप्पा झाल्या. पण विभा काही तिचं येण्याचं कारण सांगेना. बरं एवढ्या वर्षानंतर ती अचानक घरी आल्यावर माझीही जणू वाचच बसली. शेवटी विभाच, बिचकत बिचकत म्हणाली, तू वीस वर्षांपूर्वी बरोबर होतीस.....तेव्हा तुझं ऐकायला पाहिजे होतं....तेव्हा तुझ्याबरोबर भांडले. आता त्याचा पश्चाताप होतोय. तिच्या या वाक्यासोबत मी वीस वर्षापूर्वीच्या माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणी सोबत पोहोचले. मी आणि विभा समवयीन. ती मला भेटली तेव्हा आम्ही दोघी तीशीमध्ये होतो. माझा लेक तेव्हा तीन-चार वर्षाचा होता. त्याला मैदानावर घेऊन जायचे, तिथे विभा चालायला यायची. काही दिवसातच आमची चांगली मैत्री झाली. विभा आणि तिची आई या दोघी आमच्या घराच्या जवळच राहत होत्या. विभाची आई साठीच्या आसपास होती. विभा मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कामाला होती. आमची दोघांची मैत्री हळूहळू चांगल्या कौटुंबिक संबंधांपर्यंत गेली. खाद्यपदार्थांची देवाण-घेवाणही सुरू झाली. त्यातच एका ठिकाणी विभाच्या लग्नाची बोलणी सुरु असल्याचे मला समजले. पण एका आठवड्यातच ही बोलणी फिस्कटली. नेमकं तेव्हाच माझ्याकडे विभाला साजेशा एका मुलाची माहिती आली. पहिल्यांदा विभाच्या आईबरोबर बोलले. नंतर विभाला त्या मुलाची माहिती सांगितली. बाकी सगळं ठीक होतं, फक्त मुलाची पदवी विभा पेक्षा कमी होती. सुरुवातीला या कमीवर विभाच्या आईने बोट ठेवलं. पण मी थोडा जास्तच आग्रह केला. माझ्या माहितीतला मुलगा आणि स्वभावाने अत्यंत शालीन...त्याचे आई-वडीलही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. पहिल्यांदा बघून तर घे म्हणून मी
विभाला तयार केलं. पण विभाची आई काही तयार होईना. त्यांनी माझ्यासमोर एक भली मोठी यादीच ठेवली. त्यांच्या मते विभापेक्षा मुलाची पदवी जास्त हवी. तसंच त्याचं वेतनही विभापेक्षा थोडं जास्तच हवं. मुलाला स्वतंत्र फ्लॅट हवा. विभा त्याच्या आईवडिलांसोबत एकत्र कुटुंबामध्ये राहणार नाही. अशा एक ना दोन अटी माझ्यासमोर आल्या. पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत मी विभाची आणि त्या मुलाचे भेट घालून दिली हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. या पहिल्या भेटीत विभाची आई सुद्धा मी येणार, म्हणून मागे लागली. त्यामुळे मग मुलाचे आई-वडीलही या भेटीत सामील झाले. आम्ही एका हॉटेलमध्ये भेटलो. अर्थात सर्व सूत्र विभाच्या आईने हाती घेतली. विभा लहानपणापासून कशी हुशार आहे, इथपासून तिच्या वडिलांच्या निधनानंतरही तिने तिचं करिअर कसं घडवलं याची इत्यंभूत माहिती आईने मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना दिली. यामध्ये चार वेळा तरी विभाचा पगार सांगून झाला. विभाच्या वडिलांची इच्छा होती की, विभाचे लग्न तिच्या पेक्षा डबल पगार असलेल्या मुलाबरोबरच करून द्यायचे आहे हेही तेव्हा मला नव्याने समजले. आता त्या मुलाच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या मस्तकावरही आठ्या दिसू लागल्या होत्या. विभाच्टया आईने चौकशीच्या नावाखाली मुलाला स्वतंत्र फ्लॅट, कुठल्या ब्रँडची गाडी, ऑफिसमध्ये त्याच्या प्रमोशनचे चान्सेस याबाबत प्रश्न विचारले. अर्थात त्यांच्या मुलीचे लग्न करायचं होतं त्यामुळे चौकशी व्हायलाच पाहिजे. पण या सर्वात विभाच्या आईचा स्वर हा काहीसा हिणवल्यासारखा होता. याची जाणीव झाल्यावर मुलाने आणि त्याच्या आई वडिलांनी ही भेट आटोपती घेतली आणि नमस्कार करून ते रवाना झाले.
मला सुद्धा या सगळ्या प्रकारानंतर प्रचंड आश्चर्य आणि चीड सुद्धा वाटत होती. विभाच्या आईला स्पष्ट शब्दात, तुम्ही खूप चुकीच्या स्वरात त्याची चौकशी करत होतात हे सांगितले. त्यावर त्या काकू माझ्यावर भयंकर चिडल्या. माझ्या लेकीचं काही फार वय झालं नाही आहे, आणि ती काही मला जड सुद्धा झाली नाही, हे दोन डायलॉग त्यांनी माझ्या तोंडावर मारले आणि विभाला घेऊन त्या निघून गेल्या. तेव्हा ती तीस वर्षाची होती. स्वतंत्र होती. कमावती होती. पण आईच्या या स्वभावापुढे तिने नांगी टाकली आणि ती सुद्धा निघून गेली. नंतर मी फोन करून त्या मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची माफी मागितली. तसाच फोन विभाला सुद्धा केला. तिला तू नीट विचार कर लग्नाला फार उशीर सुद्धा करू नये गं... म्हणून प्रेमाची गळ घातली. पण विभावर तिच्या आईच्या विचारांचे गारुड स्वार होते. तिने माझीच उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली तो मुलगा किती बेकार आहे....त्याला धड बोलता येत नाही...त्याचा पगारही खास नाही...प्रमोशनचे चान्सेस नाहीत....अशा मुलाशी लग्न करून काय फायदा....हा प्रश्न मला विचारला. मी डोक्याला हात मारून घेतला. तिला आणखी काही बोलणार
एवढ्यात तीने स्पष्ट शब्दात सांगून टाकलं की, माझी आई याबाबतीत चांगला निर्णय घेईल आणि तो मला मान्य असेल. त्या दिवसानंतर आमच्या दोन्ही कुटुंबात एक अदृश्य भिंत उभी राहिली. ती पदार्थांची देवाण-घेवाण, फोनवरील गप्पा, मेसेज, बाहेर भेटणं...हे सगळं बंद झालं. कधी रस्त्यात भेटलो तर फक्त हात दाखवून चेहऱ्यावर थोडेफार स्मित घेऊन निघून जायचो. त्यानंतर थेट कोरोना काळात मी विभाला एक दोन फोन केले. कारण करोनामध्ये तिच्या आईचं निधन झालं. ती बातमी कळल्यावर तिचे फोनवरून सांत्वन केलं. त्यानंतर काही दिवसानंतर तिला फोन करून काही गरज असल्यास नक्की सांग म्हणून सांगितलं. पण बाई अजून त्या जुन्याच दिवसांमध्ये होत्या. मी एकटे सगळे मॅनेज करू शकते, असं तिने सांगितलं आणि फोन ठेवला. परत ती अदृश्य भिंत.
त्यानंतर विभा एखाद दुसऱ्यांदा दिसली. पण तिच्याशी स्वतःहून बोलायला जावं असं कधीही
वाटलं नाही. आता एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर बाई दस्तुर खुद्द घरी दाखल झाल्या
होत्या. त्यामुळे मी सुद्धा गडबडले. एवढ्या काळानंतर काय बोलावं हा माझ्यासमोरचा
पहिला प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर
दिलं ते विभानेच. आता तिला पहिल्यांदा
एकाकी आयुष्याचा कंटाळा येऊ लागला आहे. तिचं
वय वर्ष 52. ती एका चांगल्या कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर आहे. अगदी काही वर्षापर्यंत सहकाऱ्यांबरोबर तिचं
चांगलं जमत होतं. पण आता तिथेही दुरावा
आला आहे. कारण येऊन जाऊन म्हणे, सगळ्यांचे विषय त्यांचे कुटुंब, त्यांची मुलं, त्यांचे शिक्षण, शाळेतील
गमती जमती, मुलांची आजारपणं, बायकोचे
शॉपिंग, तिच्या हातच्या खाद्यपदार्थाची तारीफ, पतीच्या सवयी, त्याचं ऑफिस...या सर्वांभोवतीच आहेत. यात विभा काय भर घालणार. फारसे नातेवाईकही जवळ नाही. आई गेल्यावर
त्यांची ही दारं विभान बंद केली. त्यामुळे अन्य कुठला सोशल कॉन्टॅक्टच नाही. याचा परिणाम म्हणजे ऑफिस मधून सुद्धा विभा
मनानं कधीच बाहेर पडली आहे. ज्या
सोसायटीमध्ये राहते तिथे भरपूर कार्यक्रम साजरे होतात पण ही वर्गणी देण्यापलीकडे
फार त्यात उत्सुक नसतेच. कारण तिथेही तेच
कारणं... दुसऱ्यांच्या मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मी कशाला जाऊ आणि टाळ्या
वाजवू... हा तिचा प्रश्न.
एकूण काय तिला आता पूर्णपणे एकाकी वाटत होतं आणि हे एकाकी पण दूर करण्यासाठी तिला माझी मदत हवी होती. आता आली का पंचाईत. कारण मागे जो विभानी गोंधळ घातला होता त्याचे पडसाद आमच्या घरापर्यंतही उमटले होते. एरवी मदतीला माझी कधीही ना नसते. पण शहाणपण हे अनुभवातूनच येतं. विभाच्या बाबतीत एकदा मी चांगलीच पोळले गेले होते, त्यामुळे आता तिच्या प्रस्तावावर काय उत्तर द्यावं हे मलाच समजत नव्हतं.
विभा बरच काही बोलत होती. तिच्या रिटायरमेंटला आता तीन-चार वर्ष बाकी असल्याचंही कळलं. तिला या चार वर्षानंतर काय होणार याची भीती अधिक वाटत होती. निदान आता ऑफिसला जाण्यापुरतं तरी ती घराबाहेर पडतेय. चार माणसात वावरतेय...पण नंतर हे सगळं बंद झालं तर ही चिंता तिला होती. माझं अवघं आयुष्य वाया गेलं...म्हणून विभा शांत बसली...मी तिच्याकडे बघितलं. बहुदा यापूर्वी एकांतामध्ये ती बऱ्याच वेळा रडली असावी....कारण आता तिच्या डोळ्यात टिपूसही नव्हता...नजर कुठेतरी शून्यात. नंतर हळूच म्हणाली, वधू-वर केंद्रात नाव नोंदवायला जायच्या विचारात आहे...तुला काय वाटतं...या वयात मला कोणी जोडीदार मिळेल का...खरं सांगायचं तर या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं...मी फक्त खांदे उडवले. मनाच्या एका कोपऱ्यात विभाबाबतही मी साशंक होते. लगेच मदतीचा हात पुढे केला आणि बाईंचा नूर पलटला तर काय करता. पूर्व अनुभव गाठीशी असल्याने, यावेळी तिला आपण या विषयावर पुन्हा एकदा बोलूया...चालेल का तुला...म्हणून तिला विचारले....ठीक आहे म्हणत विभा जायला निघाली. मी तिला थोडा वेळ बस म्हणून आग्रह केला. आता जेवूनच जा, म्हणून सांगितलं. तीनंही फार आढेवेढे घेतले नाहीत. फार काय मला जेवण करण्यासाठी मदतही करु लागली... हा तिच्यातला बदल थोडा स्वागताहार्य नक्कीच होता...रात्री जेवण झालं आणि विभा निघाली तेव्हा मी तिला पुन्हा ये, आपण या विषयावर बोलू असे सांगितले. रविवारी येते म्हणून तिने माझा निरोप घेतला. मी बराच वेळ शांतपणे जाणाऱ्या विभाकडे बघत होतो....अगदी ती गेल्यावरही तिच्या वाटेवर बघत राहिले... शेवटी नवऱ्याने हाक मारली आणि मी भानावर आले...माझ्यामते प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. वेळ येते आणि जाते...पण योग्य वेळ पकडली नाही तर ती वेळ तिच्यासोबत बरंच काही घेऊन जाते. विभाच्या बाबतीतही तेच घडलं होतं. बघुया आता तिच्या प्रश्नाला कधी उत्तर मिळतं ते....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
शहाणपण हे अनुभवातून येतं आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं ही दोन्ही वाक्यं खूप काही शिकवून जातात. ह्या लेखाचा उद्देशच लक्षात येतो. एक शिकवणारा अनुभव!!
ReplyDeleteअनुभव गुरू हेच खरं !! खूप छान लिहिलंय!!
ReplyDelete