आंबीलला पर्याय नाही

 

आंबीलला पर्याय नाही


आठवडा कसा पार पडला हे काही विचारु नका.  दोन हातांऐवजी चार हात असते तर बरं झालं असतं, एवढी कामाची गर्दी झालेली.  लेकाच्या कॉलेजचा समारंभ, त्यानिमित्ताने जयपूरचा दौरा, आणि सोबतीने लेकाच्या दिल्लीच्या घरावर स्वारी...एवढा चांगला मजबूत बेत असल्यामुळे तयारी काय करावी...किती करावी...यात माझा प्रचंड गोंधळ उडून गेलेला.  शेवटी हाती वही घेतली आणि यादी सुरू केली.  या यादीप्रमाणे मंगळवारपासून तयारी सुरू झाली. लाडू,  चकल्या, चटण्या, वड्याचे पीठ, चण्याचं पीठ, भाकरीसाठी तांदळाचे पीठ...त्याला आवडतात त्या ओल्या काजूंची ऑर्डर...अशी बरीच मोठी यादी आणि ती यादी पूर्ण करताना होत असलेली आमची धावपळ.   खरंतर हा सगळा बेत अचानक ठरला.  त्यामुळे गाडीचं रिझर्वेशन ही घाईत करावं लागलं.  मिळेल त्या गाडीचा रिझर्वेशन बुक केलं.  जयपूरला जाणारी गाडी नेमकी सकाळी नऊची.  घर सहा वाजता सोडायचं, असा आदेश नवऱ्याने काढला आणि सोबत प्रश्नही विचारला जाताना नाष्टा काय करायचा.  आता


सकाळी सहा वाजता कोण नाश्ता करणार...म्हणून एरवी मी त्याला लेक्चर दिलं असतं. पण सध्या त्या तिकडच्या युद्धामुळे कोण परिस्थिती आली आहे. गाड्यांमधील जेवण बंद झाल्याच्या बातम्या आहेत. उगा त्याची परीक्षा कोण घेणार, म्हणून नव-यालाच काहीतरी विचार करुन ठेव, मी बाकीचं बघते, म्हणत अन्य कामाला लागले.  शेवटी दिवसभराचा प्रवास, त्यामुळे काहीतरी पोटभर आणि पोषक खाऊन निघूया असं आमचं दोघांचं एकमत झालं. उन्हाळ्यात पोटभर आणि पोषक या शब्दांना पर्यायी शब्द म्हणजे, नाचणीचे आंबील. या आंबीलला पर्याय नाही, म्हणत गुरवारच्या दिवसापुढे त्या वहीमध्ये आंबील लिहिलं आणि अन्य तयारी सुरु केली.

फार उन्हाळा वाढला,  खाण्याची इच्छा उरली नाही, आणि सारखं पाणी प्यावंसं वाटू लागलं की या आंबील सारखा दुसरा पदार्थ नाही.  मुळात आंबील करायला फार काही लागत नाही.  एका माणसाला दोन चमचे नाचणीचे पीठ आणि कपभर ताक आणि तेवढंच पाणी. बाकी फार लाड नाहीत. अर्थात मी सुद्धा लेकाकडे जायचं म्हणून सगळ्या डब्यांची आवरावरच करत होते.  नेमकं एका भाकरी होईल, एवढं नाचणीचे पीठ राहिलं होतं.  निघण्याच्या आदल्या दिवशी घरच्या विर्जणाचं ताक होणार होतं. त्यामुळे त्याच ताकाचा वापर करून


आंबीलची तयारी करुन ठेवली.  आम्ही गुरुवारी निघालो,  पण खरं सांगते लेकाकडे जायचं म्हणून त्या रात्री झोपही आली नाही. बुधवारी रात्रीच ताकामध्ये नाचणीचे पीठ टाकून ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं.  गुरुवारी अगदी मध्यरात्री दोन वाजता उठले.  कारण दुपारच्या जेवणासाठी  मुगाची तूप बाटी आणि सुरणाच्या कापा करायच्या होत्या.  बरोबर दोन वाजता कामाला सुरुवात केली घराची साफसफाई, झाडांना पाणी आणि आंघोळ, पूजा करून तीन वाजता एका गॅसवर मुगाची तूप बाटी करण्यासाठी पॅन आणि दुसऱ्या गॅसवर आंबीलचं घाटण.  एकीकडे मंद गॅसवर बाटी तयार व्हायला ठेवल्या. हे होत असतानाच असताना आंबील घाटायला घेतलं.  अगदी नाममात्र मीठ आणि चवीसाठी थोडासा गुळ टाकून आंबील चांगलं घट्ट केलं.   एरवी अगदी ग्लासातून पिता येईल एवढं पातळ असं मी आंबील करते.  पण प्रवासामुळे थोडं घट्टसर होईपर्यंत शिजवलं.  आंबील झालं की नाही हे समजण्यासाठी त्याला येणारे बुडबुडे हे एकच प्रमाण आहे.  असे बुडबुडे आले की, गॅस बंद.  वरून तुपाची फोडणी.  बऱ्याच वेळी ही फोडणी देताना मी ताज्या लोण्याचा वापर करते.   त्याची चव ही न्यारी लागते.  पण आता निघण्याची घाई म्हणून लोण्याचं तूप आधीच झालं होतं आणि ते मूग बाटी सोबत खाण्यासाठी डब्यामध्ये पॅक झालं होतं.  त्यामुळे घरच्या साठवलेल्या तुपामध्ये चांगलं चमचाभर जिरं, कडीपत्ता, कोथिंबीर घालून आंबीलवर फोडणी टाकली.  घरातल्या मिरच्या संपल्या होत्या म्हणून मिरच्यांच्या भानगडीत पडलेच नाही.  पण एरवी या आंबीलवर मिरचीची आणि ठेचलेल्या लसणीची फोडणी सरस लागते.  फार काय मी बऱ्याच वेळा यावर कच्चा कांदा सुद्धा टाकते.  उन्हाळ्यात मिळणारा पांढरा कांदा असेल तर ही चव अजून न्यारी लागते.  अगदी ग्लास भरून आंबील नाष्ट्याला घेतलं तर दुपारच्या जेवणापर्यंत फार भूक लागत नाही.

आंबील झाल्याचा सुगंध घरभर पसरला आणि थोडंसं गार करण्यासाठी आंबीलला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं आणि मी बाकीचे आवरावर करायला लागले.  एव्हाना चांगल्या खुसखुशीत मूग बाटी करून झाल्या होत्या.  


सोबतीला सुरणाच्या कापा सुद्धा तळून झाल्या. मूग बाटी आणि सुरणाच्या कापांसोबत शेंगदाण्याची चटणी हा वेगळा डबा पॅक झाला.  पुन्हा सामानाची मोजमाप.  दोन माणसं आणि सहा बॅगा.  सगळी तयारी झाल्यावर निघण्याच्या बरोबर पंधरा मिनिटे आधी आंबील फ्रीजच्या बाहेर काढलं.  दोन बाऊल भरले.  पहिला घास घेतल्यावर नवऱ्याने आंबीलच्या ऐवजी घरच्या तुपाचं कौतुक केलं. अर्थात ताज्या तुपाची चव कशालाही येत नाही.  निघण्याची घाई म्हणून की काय, अगदी मिनिटभरात मोठा बाउलभर आंबील फस्त झालं.  भांडी आवरून स्वयंपाक घरावर शेवटचा हात फिरवून आणि देवाला नमस्कार करून घराबाहेर पडलो.  

साडेसहाची गाडी पकडायची होती.  त्याच दिवशी रामनवमी. त्यामुळे बँक हॉलिडेचा फायदा झाला. गाडी ब-यापैकी रिकामी होती.  सहा बॅगांसह आम्ही दोघं आरामात चढू शकलो.  कुर्ल्याला उतरलो तिथून रिक्षाने बांद्रा टर्मिनल्स.  गाडी आमच्या समोरच होती पण दरवाजे बंद.  आठ वाजता दरवाजे उघडल्यावर आमची चढण्याची लगबग आणि ते सामान लावण्याची धडपड.  गाडी  बरोबर सुटली आणि गाडीमध्ये चहा कॉफी वाले फिरू लागले.   या सगळ्या वेळात आमची दोघांची प्रचंड धावपळ झाली होती.  पण खरं सांगू का त्या आंबीलची कमाल एवढी की एवढ्या वेळेत भूकच काय पण तहानपण लागली नाही.  गाडीमध्ये खाऊची पाकीट फिरत होती.  एरवी मी हमखास कॉफी पिते. पण त्या आंबीलची कमाल एवढी होती की मन तृप्त होतं. त्याचा तो मंद तुपाच्या फोडणीचा स्वाद अजूनही जिभेवर होता. दुपारी बारा वाजेपर्यंत आंबीलच्या कृपेमुळे भुकेची जाणीवच झाली नाही.

खरंतर आपल्याकडे असे अनेक पदार्थ आहेत जे पाश्चात्य पदार्थांच्या


सणसणीत कानाखाली लगावतील.  असाच हा आंबील नावाचा पदार्थ आहे.  फक्त नाचणीचीच नाही तर तांदूळ ज्वारी, बाजरी अशा पिठांची ही आंबील फार सरस लागते.  ती हवामानानुसार ऋतू नुसार केली तर अधिक पोषक ठरते.  जेवणाला पर्याय म्हणून उन्हाळ्यामध्ये होणारा हा हक्काचा पदार्थ आहे. तोच पदार्थ आम्हाला प्रवासात सुखाचा वाटला.  दुपारचे बारा वाजल्यावर मात्र नवऱ्याची चुळबुळ सुरू झाली.  आता वेळ त्या मुगडाळ बाटीची होती.   अर्थात हा बेतही फर्मास झाला होता.   त्याच्यासोबत तुपाचा छोटा डबाही होताच....या फर्मास अशा मूग डाळ बाटीची रेसिपी आता पुढच्या ब्लॉगमध्ये.... सोबतच प्रवासातल्या गंमतीही...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Khup mast lekh

    ReplyDelete
  2. आंबील सारखाच रेसेपीचे वर्णन करणारा लेख एकदम रसरशीत झाला आहे.

    ReplyDelete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete
  4. मस्त रेसिपी लिहिली

    ReplyDelete
  5. तुझं कौतुक आहे सई.
    सगळं नीटनेटकेपणाने मांडतेस

    ReplyDelete
  6. सई, तू प्रवासासाठी कमालीची तयारी करतेस आणि रेसिपी तर तुझी मास्टरपीस कृती असते. तुझं खूप कौतुक!! ललिता छेडा

    ReplyDelete
  7. खूप छान लेख लिहिला आहे.

    ReplyDelete
  8. खूप छान रेसिपी सई.
    (माधवी ताई )😋

    ReplyDelete

Post a Comment