तूप आणि डाल बाटी

 

तूप आणि डाल बाटी


अलिकडच्या दिवसांमध्ये प्रवास हा सोपा झाला आहे.  लांबचा ट्रेनचा प्रवास असला तरी सोबतीला खाऊ काय घ्यावा यासाठी फार विचार करावा लागत नाही.   एकतर रेल्वे गाड्यांमधील पॅन्ट्रीमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात.   शिवाय ऑनलाइन फूड सुविधा एवढ्या चांगल्या झाल्या आहेत की कुठल्याही स्टेशनवर आपल्याला तेथील गरम गरम जेवणाचा आस्वाद घेता येतो.  आम्ही बऱ्याच वेळा इंदूरचा जेव्हा दौरा करतो तेव्हा, वाटेत लागणाऱ्या बडोदा किंवा सुरत स्थानकांमधून स्थानिक पदार्थ ऑनलाइन मागवतो.  पण त्या अमेरिकेने सगळं गणित बिघडवलय.  इराण सोबत सुरू असलेल्या युद्धामुळे बऱ्याच ठिकाणी कॅन्टींग सुविधा बंद केल्याच्या बातम्या आल्या आणि आम्ही काळजीत पडलो. आम्ही जयपूरसाठी रेल्वेचं तिकीट बुक केलं तेव्हा सोबतीला काय खाऊ घ्यावा हा पहिला प्रश्न होता.  एकूण 18 तासांचा प्रवास. एसीच तिकीट असलं तरी उन्हाळा मी... म्हणतोय.  अशा


उन्हाळ्यामध्ये कुठला खाद्यपदार्थ टिकून राहील आणि पोटाची भूक भागवेल यावर बराच विचार केला.  लहानपणी कुठे जायचं असेल तर बटाट्याची पिवळ्या रंगाची भाजी आणि पुरी हा बेत शाही थाटाचा वाटायचा. आत्ताही त्याचा शाही थाट कायम आहे.  पण सध्याच्या गर्मीमध्ये आणि प्रवासात ही भाजी फार काळ टिकेल का, हा प्रश्न मनात होता.   म्हणून आम्ही दोघांनी जरा वेगळा विचार करायचं ठरवलं.  जाणार कुठे....तर राजस्थानला. मग तिथलाच एखादा पदार्थ करून बघूया का, म्हणून नवऱ्याने सुचवलं. अशात मुगाच्या डाळीपासून तयार होणारी मुगडाळ बाटी मदतीला आली.

मला आठवतं,  लेक जेव्हा पहिल्यांदा जयपूरच्या कॉलेजमध्ये गेला तेव्हा आम्ही तिथल्या चार दिवसांच्या मुक्कामात राजस्थानच्या बहुतांशी पदार्थांचा आस्वाद घेतला. राजस्थान म्हटलं की, दाल बाटी आणि ती लसणीची चटणी हे गणित पक्क असतं.  पण या दौऱ्यामध्ये आम्हाला जी दाल बाटी मिळाली, त्याची चव फारशी आवडली नाही.  मुळात आम्ही जी दाल बाटी खाल्ली, तिथे थाळी सिस्टीम होती. त्यात दोन मोठ्या दाल बाटी, सोबत वाटीभर तूप, चुरमा, तुरीची


घट्ट दाळ आणि लसूण, लाल मिरचीची झणझणीत चटणी....ती थाळी पाहून आम्ही सुरुवातीला एक थाळी खातो, म्हणून रिक्वेस्ट केली होती.  वाटल्यास पैसे जास्त घ्या, पण अन्न वाया जायला नको, म्हणूनही विनंती केली. पण तिथे थाळी शेअरिंग हा भाग नव्हता आणि आम्ही दोघांनी दोन दाल बाटी थाळी घ्याव्या लागल्या.  अर्थातच त्या एका वाटीमध्येच आमची विकेट पडली. कारण बाटी खूप मोठी होती. शिवाय थाळीतील अन्य पदार्थांमुळे पोट भरून गेलं आणि बाटीचा स्वाद नीट घेता आला नाही. पण एकदा का पदार्थ आपल्या जिभेवर आला की, त्याच्यावर अनेक प्रयोग करण्यात माझा हातखंड आहे.  तसेच प्रयोग आम्ही जयपूरहून आल्यावर या बाटीवर सुरू केले.  सुरुवातीला नुसत्या गव्हाच्या पिठाचा वापर करून बाटी तयार केली.  त्यात तुपाचा चांगला वापर केला.  या बाट्या चांगल्या खुसखुशीत झाल्या, पण अजून काहीतरी कमी वाटतंय म्हणून मग मूग डाळ बाटी करायला सुरुवात केली.  ही रेसिपी मात्र परफेक्ट जमली आणि जिभेवर रेंगाळलीही.  तीच दाल बाटी घेऊन आम्ही जयपूरपर्यंतचा प्रवास केला.  

मूग दाल बाटी मध्ये मुख्य पदार्थ असेल तर तो अर्थातच मुगाची डाळ आणि गव्हाचे पीठ.  बाटी करण्यासाठी मुगाची डाळ अगदी स्वच्छ धुवून पाच तास भिजत ठेवायची.  यासाठी अख्खे हिरवे मूग भिजत ठेवले तरीही चालतात.  पण हिरवे मूग असतील तर बाटीचा रंग मात्र बदलतो हे ध्यानात ठेवलं पाहिजे.  मुगडाळ पाच तास भिजवून झाली की, माफक पाण्याचा वापर करत अगदी बारीक वाटून घ्यायची.  डाळ जेवढी बारीक वाटली जाते तेवढी नंतर बाटी छान लागते हे लक्षात ठेवायचं.   अशा बारीक वाटलेल्या मूग डाळीच्या मिश्रणामध्ये मग चमचाभर पांढरे तीळ, चमचाभर काळे तीळ, थोडासा ओवा हातावर कुस्करून, आवडत असल्यास कस्तुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग, मीठ हे टाकून घ्यायचं.  बरं या मूग डाळ बाटी मध्ये तिखट किती असावं आणि कुठल्या प्रकारे असावं हा आपल्या आवडीचा विषय. जर मी अख्ख्या मुगाची दाल बाटी केली तर भिजवलेले मूग वाटतानाच त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं, लसूण घेते. पण जेव्हा नुसत्या मूग डाळीची बाटी करायची असेल तेव्हा मात्र त्यामध्ये थोडं लाल तिखट आणि धण्या जिऱ्याची पूड टाकते.  अर्थात या बाटीमध्येही आलं-लसूण पेस्ट टाकली तरीही चालते. 


हे सगळं मिश्रण चांगलं फेटून घ्यावं, त्यातच तीन चमचे भरुन तूप टाकायचं आणि पुन्हा मिश्रण फेटून घ्यायचं.  जर बाटी लगेच करायची असेल तर यामध्ये अगदी चिमूटभर सोडा टाकला तरीही बाटी छान खुसखुशीत होतात.  थोडंसं फेटल्यानंतर या मिश्रणात गव्हाचे पीठ टाकायला सुरुवात करायची. पाण्याचा अजिबात वापर न करता जेवढं जिरेल तेवढं पीठ टाकायचं.  एक वाटी मुगाची डाळ घेतली असेल तर साधारण दीड वाटी पीठ आपसूक जिरून जातं. 

असा छान सर गोळा तयार झाला की त्याचे समान भाग करायचे.  मी ही डाळ बाटी आप्प्याच्या भांड्यात करते.  त्याचे बारा खण... त्यामुळे या तयार गोळ्यांसाठी पिठाचे सहा भाग केले.  हा प्रत्येक गोळा अगदी पातळ लाटायचा.  लाटला की त्याच्यावर ब्रशच्या साह्याने छान तूप लावायचे वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं. मग या लाटलेल्या बाटीच्या चपातीचे दोन भाग एकमेकांसमोर जोडायचे.  पुन्हा त्यावर थोडासा तुपाचा हात फिरवायचा, गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि ती दोन्ही टोकं एकमेकांना जोडायची.  फाफड्यासारखे ही चपाती तयार होते.  पुन्हा त्याच्यावर तुपाचा ब्रश फिरवायचा आणि गव्हाचं पीठ भुरभुरायचं.  आता या फोल्ड केलेल्या चपातीचा घट्ट रोल तयार करून घ्यायचा.  हा रोल तयार झाला की त्याचे शक्यतो दोऱ्याने अगदी मधोमध दोन भाग करायचे.  मी सुरुवातीला दोऱ्याने काय आणि सुरीने काय दोन भाग तर करायचे आहेत, म्हणून हट्टाने सुरीने तुकडे केले होते.  पण सुरीने कापताना या लाटी मध्ये जी आवरणं झाली असतात


ती एकमेकांना चिकटल्याचे जाणवले. त्यामुळे बाटीचे नंतर लेअर सुटले नाहीत. त्यामुळे दोऱ्याने दोन भाग करायचे. अशा बरोबर बारा दाल बाटी तयार होतात. असे बारा तुकडे तयार झाले की, त्याला बरोबर हळुवार हाताने मध्ये थोडीशी जागा ठेवून गोल करायचे या मधल्या जागेत अगदी थोडं तूप टाकून बाटी बंद करायची आणि त्याला गोल आकार द्यायचा.  अशा बारा वाट्या आपल्या आप्प्याच्या पात्रामध्ये तूप टाकून मंद गॅसवर भाजायला ठेवायच्या.  अजिबात घाई करायची नाही की दहा वेळा झाकण काढायला जायचं नाही.  अगदी मोजून दहा मिनिटानंतर बाटी होऊ लागल्याचा पुरावा घरभर पसरतो.  हा दरवळ पसरू लागला की अप्प्याच्या पॅनचं झाकण काढून बाटी पलटून घ्यायच्या. त्यावर तूप घालायचे.  हा पदार्थ थोडा तूप वेडा आहे हे लक्षात घेऊनच तुपाचा वापर करा.  पुन्हा साधारण सात-आठ मिनिटे. बस्स...यानंतर गरमागरम बाटी तयार असतात.  तुपाचा वापर केल्यामुळे या वाटीला खूप छान पेरे सुटलेले असतात. तुपामुळे ते छान खुसखुशीत होतात.  कुठलीही चटणी, भाजी किंवा डाळ सोबतीला नसली तरी तयार बाटीवर पुन्हा एक चमचा तूप टाकलं तरी काम भागतं.  

आम्ही प्रवासात अशाच तुपाच्या साजात नटलेल्या मूग डाळ बाटी सोबत घेतल्या होत्या.  सकाळी घाई नको म्हणून आदल्या दिवशी रात्रीच दाल बाटी करून त्याला तुपाचा हात लावून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या.  त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता मुगाची डाळ भिजत ठेवली.  रात्री दहा वाजता वाटली आणि अकरा पर्यंत हा सगळा दाल बाटीचा बेत तयार झाला.   दुसऱ्या दिवशी एकीकडे आंबील करताना आप्पा पॅनमध्ये या 12 बाटी खुसखुशीत भाजून तयार झाल्या.  गरम असतानाच त्याच्यावर तूप टाकलं आणि थोड्या गार झाल्यावर डब्यामध्ये भरल्या.  मूग दाल बाटी, सुरणाच्या कापा, शेंगदाण्याची चटणी आणि तूप असा दुपारच्या जेवणाचा बेत होता.   सकाळी नऊ वाजता


आमचा प्रवास सुरू झालेला,  दुपारी बारा वाजेपर्यंत आजूबाजूच्या सगळ्यांची चांगली ओळख आणि गप्पा हाणून झाल्या होत्या.  बारा वाजता आम्ही जेव्हा जेवणाची तयारी करू लागलो, तेव्हा आजपासच्या प्रवाशांचेही डबे उघडत होते.   थेपले, पुरी भाजी, इडली चटणी... असा बेत होता सगळ्यांकडे.  आणि आमच्याकडे मूग दाल बाटी...नुकतीच ओळख झालेल्या एका मैत्रिणीने राजस्थानी मध्ये विचारलं, अरे तुम्ही तर राजस्थानी आहात पण मराठी किती छान बोलता....यावर आम्हा दोघांची हसून हसून पुरेवाट झाली.  आम्ही म्हटलं, नाही हो, आम्ही मराठीच आहोत. पण जिथे जाणार आहोत ना, तिथल्या खाद्यपदार्थांची आधीच जिभेला सवय करून ठेवतो, म्हणून हा दाल बाटीचा बेत.... अजून काय सांगणार...अर्थात त्या बारा डाल बाटी आम्ही आणि आमच्यासोबतच्या सहप्रवाशांनी फस्त केल्या...सोबत रेसिपीही शेअर करुन झाली. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. डाल बाटी ची तुमची रेसिपी मॉर्डनायजेशन आहे. मात्र गॅस पेक्षा लाकडाच्या किंवा गौरीच्या निखाऱ्यावर पार्टी शेकल्यास आणखीनच चव वेगळी लागते. सोबत बेसणाची लांब गोलाकार लाटुन गोल नळी सारखे बनवुन त्याचे छोटे तुकडे करून केलेली भाजी डाल बाटी सोबत मारवाडी करतात. डाल बाकी हा फक्त दुपारी जेवणासाठी केली जाते. डाल बाटी चुरून त्यावर तूप आणि पिठीसाखर टाकुन सोबतीला लोणचं.

    ReplyDelete
  2. खूपच छान !!

    ReplyDelete

Post a Comment