टेक सिटीला दिलेली भेट
भारताची टेक सिटी म्हणून ओळख मिरवत असलेल्या गुरुग्राम...गुडगाव या शहराला लेकाच्या निमित्ताने आम्ही भेट दिली. भेट दिली म्हणजे, चांगला दहा दिवसांचा मुक्काम केला. या मुक्कामात सगळे गुरुग्राम शहर पालथे घातले नाही. किंबहुना अगदी दहा टक्के शहर ही बघता आले नाही. पण शितावरून भाताची परीक्षा....या न्यायाने बाकीचं शहर कसं असेल, याचा अंदाज मात्र आला. या शहरात कुठेही गेला तरी एक शब्द कायम ऐकावा लागतो, तो म्हणजे निर्माणाधीन....आणि या शब्दाच्या न्यायाने जिथे बघावं तिथे बांधकाम चालू आहेत. पण तरीही हे अवघं शहर न्यारं आहे. मुळात तरुण आहे. भारतातल्या कानाकोपऱ्यातील आयटी इंजिनियर्स या शहरांमध्ये आलेले आहेत, त्यातलाच आमचाही एक लेक. दहा दिवसांच्या मुक्कामामध्ये लेकासोबत रहातांना या शहराचे दोन चेहरे पाहता आलेत.
गुरुग्राम. हरियाणा राज्यातील या शहरात अवघा देश नांदत आहे. देशच काय पण परदेशातील अनेक तरुण-तरुणी या गुरुग्राम मध्ये नोकरी निमित्त रहात आहेत. दिल्ली पासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या गुरुग्राम मध्ये हाय टेक सुविधा उपलब्ध आहेत. अर्थात त्यामुळेच हे शहर देशातील महागड्या शहरांपैकी एक आहे. येथे केलेल्या दहा दिवसांच्या मुक्कामात मला बऱ्याच अनोख्या गोष्टी समजल्या. मुळात आमचा लेक राहतो ती अवघी इमारतच एका कंपनीच्या ताब्यात आहे. अशा अनेक कंपन्या गुरुग्राम मध्ये उपलब्ध आहेत. अशा कंपन्या इमारतीच्या इमारती बांधतात आणि शहरात नोकरी निमित्त येणाऱ्यांना त्यातील फ्लॅट भाड्याने देतात. हे अगदी रेडी टू लिव्ह या तत्त्वाचे फ्लॅट असतात. म्हणजेच येथे फ्रिज, टीव्ही, फर्निचर, अगदी गाद्या आणि गॅस, गॅसची चिमणीसह वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर यासारख्या सुविधा असतात. एकाच कंपनीकडे इमारतीचा ताबा असल्यामुळे सगळ्यांच्या सुविधा समान..अगदी फर्निचर आणि त्याचा रंगसुद्धा. काही तक्रार करायची असेल तर ती त्या कंपनीच्या वेबसाईटवर करायची आणि तिथेच महिन्याचं भाडंही भरायचं. लाईटची तर
अजूनच कमाल. आपण जसा फोनचा रिचार्ज करतो, तसंच इथे लाईटचा रिचार्ज करायचं. रिचार्ज चे पैसे संपले की लाईट बंद होते. आणि पुन्हा पैसे भरले की काही सेकंदातच सुविधा सुरु. या शहराची आणखीन एक गोष्ट म्हणजे, आपल्याकडे जशा नाका नाक्यावर रिक्षा उभ्या असतात, तसा प्रकार येथे नाही. प्रत्येकाच्या फोनवर रिक्षा, कार बुकिंग करण्याचा ॲप आहे. त्या ॲपमध्ये आपल्याला जिथे जायचं आहे, त्या स्थानाचा पत्ता टाकायचा. रिक्षा अगदी एक मिनिटाच्या आत आपल्या दारात उभी राहते आणि अगदी नाममात्र रुपयांमध्ये तिथे घेऊन जाते. सगळा अँप चा कारभार....
मी तर गमतीने ओटीपी वर चालणारे शहर म्हणूनच गुरुग्राम चा उल्लेख करेन. कारण हे अवघं शहर या ओटीपी वरच चालतं. बहुतांश घरांमध्ये अगदी मिरची, कोथिंबीर ते औषधांपर्यंत सगळे पदार्थ घरपोच मागवले जातात. त्यामुळे या शहरात कधीही कुठेही गेलात तरी डिलिव्हरी बॉयचे जथ्थेच्या जथ्थे गाडीवरून फिरताना दिसतात. पाठीवर भली मोठी बॅग अडकवलेली ही मुलं दिवस-रात्र फिरत असतात. एखाद्या सिग्नलवर आपण रिक्षामध्ये असलो तर आपल्या आजूबाजूला किमान दहा ते बारा डिलिव्हरी बॉय सहज आढळून येतात. आम्ही जाईपर्यंत आमचा लेक तर सकाळच्या दुधापासून ते घरात लागणाऱ्या कुठल्याही किराणा सामानाची वस्तू या डिलिव्हरी बॉय मार्फत मागवत होता. अर्थात आम्ही दोघांनी गेल्यावर आमच्या नेहमीच्या शिरस्त्यानं आसपासचे सगळे मॉल धुंडाळले आणि किराणा
मालाची...भाजीपाल्याची दुकानं शोधून काढली. पण आता आम्ही परत आल्यावर तिथे लेक याचवस्तू पुन्हा घरपोच मागवत आहेच. असो.
या दुकानांमध्ये चौकशी केल्यावर समजले की, नोकरी निमित्त या शहरात येणाऱ्या मुलांना अशा किरकोळ खरेदीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. मुळात त्यांच्यावर कामाचा बोजाही तेवढाच असतो. त्यामुळे पिशवी घेऊन बाहेर खरेदीला जायचं, एवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. मग अशावेळी घरातील वस्तू दारात आल्या तर त्यांना अधिक सुलभ ठरतात. त्यामुळे बहुतांश दुकानदारांनी सुद्धा अशा घरपोच सेवा सुरू केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी तीन शिफ्ट मध्ये हे काम चालतं. पहिल्या दिवशी आम्ही खरेदीला बाहेर पडलो तेव्हा आमचा लेक भडकला होता. दोघांनी आराम करा, कुठेही खरेदीला जाऊ नका, जे हवं ते घरी मागवा आणि कधीही मागवा. त्याच्या या गोड रागाकडे दुर्लक्ष करून आम्ही शहरातील जेवढी जमतील तेवढी दुकानं पालथी घातली आणि या नवख्या शहराला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी भाजीचा प्रश्न आला तेव्हा माझा हटवादी स्वभाव बघून लेकाने हुडा मार्केटचे नाव सांगितले. इथे एकाच जागी सगळं मिळेल, उगीच फार फिरत राहू नकोस म्हणून रिक्षा बुक केली. शिवाय खरेदी झाल्यावर पुन्हा रिक्षा बुक कशी करायची याची माहिती दिली. दहा मिनिटांनी आम्ही त्या हुडा मार्केटमध्ये पोहचलो, तेव्हा सकाळचे साडेअकरा वाजले होते. आपल्याकडे या वेळात कुठलाही मार्केटमध्ये गेलं तरी मोठी गर्दी असते. मात्र हे हुडामार्केट ओस पडल्यासारखं होतं. सगळी दुकानं चालू होती, पण ग्राहक अगदी तुरळक. आम्ही अर्धा तास आरामात
सगळा मार्केटचा सैरसपाटा केला. इलेक्ट्रिक सामानांपासून देवाच्या पूजेचे सामान, फळांची, भाजीची, खाद्यपदार्थांची, अन्नधान्याची, कपड्यांची अशी सगळी दुकानं या मार्केटमध्ये होती. दुकानांमध्ये गि-हाईक नव्हते तरी त्यांचा व्यवहार चालू होता. अर्थात ते डिलिव्हरी बॉय मार्फतच...प्रत्येक दुकानातून खाकी पिशव्या घेतलेले डिलिव्हरी बॉय बाहेर पडत होते. आम्ही ज्या भाजीच्या दुकानात खरेदीसाठी गेलो, तिथेच जास्ती रेंगाळलो. तिथे कमळाच्या दांडी पासून ते पंजाबच्या प्रसिद्ध टिंडीपर्यंत सगळी भाजी होती. भाजीवाल्याबरोबर गप्पा मारल्यावर गुरुग्रामच्या जीवनशैलीची कल्पना आली. जी तरुण मंडळी या शहरात नोकरी निमित्त येतात ती त्यांच्या व्यस्ततेमुळे घरात स्वतः जेवण करण्यापेक्षा हे काम कुककडे देतात. अशा स्वयपाक्यांची, म्हणजेच कुकची संख्याही येथे खूप आहे. यातील अनेक स्थानिक महिला आहेत. त्यांना हे रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. या महिला सायकलवर स्वार होऊन सगळीकडे फिरत असतात. सोमवार ते शुक्रवार पर्यंत घराघरात जाऊन त्यांच्या आवडीनुसार जेवण करतात. बहुतांशीवेळा याच महिलांकडे भाजीच्या दुकानांमधून भाजी खरेदी करण्याची जबाबदारी सुद्धा असते. व्हेज-नॉनव्हेज असा जो पदार्थ हवा तो पदार्थ बनवला जातो. काही मुलं तर सोमवारीच चार दिवसांची भाजी बनवून घेतात आणि ती व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिली जाते. पुढचे चार दिवस ही भाजी आणि रेडी टू इट पराठा किंवा रोटी यांच्या आधारावर काम केले जाते. मग शनिवार-रविवार मात्र बाहेरचा खाना पसंत केला जातो. शनिवार-रविवारी या कुक ऐवजी घराघरात सफाई कर्मचारी येतात. हे सफाई कामगार किचन टू बाथरुम असं सगळं स्वच्छ करुन देतात. कपडांची स्वच्छता आणि अगदी इस्त्रीही. या सर्वांमुळे गुरुग्राम मधील स्थानिकांना खूप मोठा रोजगार मिळाल्याचे त्या भाजीवाल्याने सांगितले
या भाजीवाल्याच्या सांगण्यानुसार आम्ही संध्याकाळी सुद्धा या मार्केटचा आणि आसपासच्या मार्केटचा सैरसपाटा केला. देश विदेशातील खाण्याचे
मुबलक प्रकार प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या सर्वच खाऊगल्ल्यांवर तरुण-तरुणींची तुफान गर्दी असते. रात्री अकरा वाजेपर्यंत या सगळ्या खाऊगल्या चालू असतात. सोबतच ते डिलिव्हरी बॉयही आसपास असतात. आम्हा दोघांनाही तिथला एका मोठ्या हॉटेलमध्ये लेक हौसेनं घेऊन गेला. तिथे रात्री साडेनऊ वाजता आम्ही नंबर नोंदवला, वेटिंग तब्बल दोन तासांचे...साडेअकरा वाजता आमचा नंबर आला. तोपर्यंत त्या हॉटेलच्या परिसरातील मार्केटमध्ये पुन्हा सैरसपाटा. शेवटी रात्री साडेअकरा वाजता हॉटेलमध्ये गेल्यावर माझा पहिला प्रश्न होता, परत जायची सोय काय आहे. यावर माझा लेक निर्धास्त...तू आरामात खा...घाई करू नकोस, म्हणत त्यांनी सराईतपणे ऑर्डर दिली. समोर आलेले पदार्थ खाल्ले...फोटो काढले...रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही तिथून बाहेर पडलो तेव्हा त्याने मोबाईलवर कधी गाडी बुक केली होती, हे आम्हालाही कळले नाही. हॉटेल मधून पाय बाहेर काढला आणि दारात गाडी हजर त्यात बसलो आणि दहा मिनिटात घरी. घरी आल्यावर त्यानं हौसेने विचारलं आईस्क्रीम मागवू का....मी हात जोडले....हे शहर असंच आहे. या नव्या विचारांच्या, नव्या प्रवाहाच्या शहरात आपण फिट होऊ शकतो, पण तिथे आपल्या घड्य़ाळाची टिकटिक मागे ठेवावी लागते.
या सगळ्यात तो निर्माणाधीन हा शब्द मात्र कायम लक्षात ठेवायचा. कारण आम्ही तिथे असताना तीन दिवस तरी पाऊस पडला. आपल्याकडे त्या पावसाला अगदी शिंपडल्यासारखं म्हणता येईल. पण गुरुग्राम मधील बहुतांश रस्त्यावर त्या पावसाचं पाणी साठलं. लेक म्हणाला. हे या शहराचे दुसरे रूप. इथे पाऊस चिरकला तरी रस्ते पाण्याखाली येतात. आपल्यासारखा तुफान पाऊस पडला की येथे काय होत असेल, याचा विचार कर. त्यासरशी माझ्या नजरेसमोर मागच्या वर्षी तुंबलेल्या गुरुग्रामचे चित्र उभे राहिले. हे शहर
आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. मोठाल्या बिल्डिंग आहेत. देशातील आणि विदेशातील नामवंत कंपन्यांची आणि उद्योग समूहाची संकुले आहेत...पण या सर्वात येथे नाल्यांची अवस्था बिकट आहे. मुळात पाणी वाहून जाण्याची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे अगदी जरासा पाऊस झाला तरीही सगळे रस्ते पाण्यानं हाउसफुल होतात. काही ठिकाणी तर आपल्या डोंबिवलीतील रस्त्यांवर फिरतोय की काय, असे खड्डे आणि त्या खड्ड्यात असलेलं पाणी होतं. त्या हॉटेलमधून रात्री घरी परत असताना लेक म्हणाला, बघ हे असंही शहर आहे. तेव्हा नवरा हसत मिळाला, अरे ते तुझ्यासाठीच खास ठेवलं असणार....तुला आपल्या शहराची आठवण येऊ नये म्हणून...या त्याच्या जोकवर मी डोक्याला हात मारून घेतला होता हे सांगणे नकोच....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteMast.. Tuzya sobatch सैरसपाटा करतेय असं वाटलं..
ReplyDeleteखूप छान लिहिलंय,पण ही नवीन जीवनशैली आकर्षक दिसली ती आरोग्यासाठी(शरीर,मन)नक्कीच योग्य नाही! बाकी कॉंक्रीट नगररचनेतली कमतरता आज सर्वच भारतातल्या शहरात दिसते आहे!! पण लक्षात कोण घेतो?
ReplyDelete