फुटणारे चणे

 

 फुटणारे चणे


गुरुग्रामला, लेकाकडे रहायला गेले होते, तेव्हा अनेक गमतीजमतीही झाल्या. मुळात या गुरुग्राममध्ये देशातीलच काय पण विदेशातीलही खाद्यपदार्थांची सदैव जत्रा लागलेली असते. सोबतच येथील अनेक मॉलमध्ये असे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारी सामुग्री मिळते. आमच्यासारख्या खवय्यांसाठी ही मोठी मेजवानीच. या संधीचा आम्ही दोघांनीही चांगलाच फायदा घेतला आणि त्यातून अनेक नवे पदार्थ समजून घेतले. अशाच एका दिवशी लेक सकाळी कामावर गेल्यावर आम्ही दोघंही एका मार्केटमध्ये गेलो. तिथे हरियाणासह उत्तराखंड आणि हिमाचलप्रदेशमधील काही उत्पादने ठेवलेली होती. तेलाचे अनेक प्रकार होते. कडधान्य, मसाल्याचे अगणित प्रकार. अगदी शेंगदाणाही दहा प्रकारातील होता. हे सर्व बघतांना आम्ही दोघंही हरखून गेलो. हा आमचा उत्साह कडधान्यांचे काऊंटर सांभाळणा-या तरुणांनं पाहिला आणि मग तो स्वतः आमच्यासोबत फिरु लागला. त्यानं या सर्व उत्पादनांची माहिती दिली. नैसर्गिक खतांचा वापर करुन तयार केलेल्या धान्याला आणि त्यापासून तयार अन्य पदार्थांनाच येथे ठेवण्यात आले होते. सोबतच मसाल्यांचे जिन्नस कसे


तयार होतात, त्याची झाडं कशी असतात. त्यांची लागवड कशी होते, ते त्या झाडांपासून मिळणा-या उत्पादनाची काढणी आणि त्या मॉलमध्ये ते उत्पादन आल्याची तारीख....इथपर्यंत सगळा प्रवास त्या तरुणानं सांगितला. आम्ही दोघंही या दुनियेत एवढे हरवून गेलो, की दुपारचे दोन कधी वाजून गेले, याचा पत्ताही लागला नाही. आम्ही घरी जाण्याची घाई करु लागलो, तेव्हा या तरुणानं याच दुकानाचा एक भाग असलेल्या किचन कॉर्नरकडे जायला सांगितले. तेथील छोले पुरी नक्की खा...म्हणून आग्रह केला. एवढे जिन्नस बघितले, आता त्यांची चव तर बघू म्हणून त्या किचन कॉर्नरमध्ये गेलो, आणि त्या तरुणाच्या सुचनेप्रमाणे छोले, पुरीची ऑर्डर दिली. आपल्या चपातीच्या आकाराबरोबर स्पर्धा करतील अशा दोन पु-या आणि पांढ-या चण्यांची, म्हणजे, छोल्यांची रस्सा भाजी. सोबत दह्याची वाटी. त्या पु-यांची चव भन्नाट होतीच पण भाजीनं आम्हाला अक्षरशः प्रेमात पाडलं. ते काबुली चणेच होते,पण त्यांचा आकार लहान होता. आपल्याकडे लाल चणे मिळतात ना, त्याच आकाराचे. पोटपूजा झाल्यावर आम्ही पुन्हा त्या कडधान्याच्या भागात गेलो आणि त्या छोट्या चण्यांची शोधाशोध सुरु केली. मदतीला पुन्हा तो तरुण आला. त्यानं या छोट्या काबुली चण्यांना रगडा चणे म्हणतात, अशी माहिती दिली. हे चणे पटकन शिजतात, आणि त्यांची चवही फार छान असल्याचे सांगितले. अर्थातच या चण्यांसह अन्य सामानाचाही आम्ही खरेदी केली आणि सायंकाळी आरामात घरी परतलो.

आमच्यापाठोपाठ लेकही घरी आला. आता चित्र बरोबर उलटं झालं होतं. तो


लहान होता, तेव्हा शाळेतून आल्यावर तिथल्या गमती जमती सांगायचा. आता ती वेळ आमची होती, तो आल्याआल्या आम्ही ज्या मॉलमध्ये गेलो होतो, तिथल्या गमती जमती सांगायला सुरुवात केली. शिवाय तिथे केलेली खरेदी त्याला दाखवली. यातून त्यानं बरोबर ते छोट्या चण्यांचं पाकीट बाहेर काढलं, आणि उद्या या चण्यांची आपल्या पद्धतीनं उसळ आणि व़डे कर म्हणून फर्माइश केली. दुस-या दिवशी सर्व आवरुन झाल्यावर ते पांढरे चणे पहिल्यांदा भिजत घातले आणि आम्ही दोघं भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो. दुपारी एकच्या सुमारास घरी आलो आणि भाजी आवरुन जेवणाची तयारी केली. जेवतांना मात्र एक आवाज मला अस्वस्थ करु लागला. सारखा टप...टप...टप असा आवाज येऊ लागला. कुठला नळ चालू राहिला का, म्हणून पहिल्यांदा शंका आली. घरातले सर्व नळ चेक केले. पण ते गच्च बंद केलेले. मग हा आवाज कुठून येतोय, म्हणून माझा शोध चालू झाला. अगदी फ्रीजही शोधला. पण आवाज कुठून येत आहे, याचा अंदाज येईना. आवाज किचनच्या ओट्याच्या आसपासच येत होता. त्यामुळे कुठे लिकेज आहे की काय, म्हणून मला अधिक चिंता वाटायला लागली. मग किचनच्या बेसीनचा पाईप चेक केला. पण या टप...टप...टप...आवाजाचा उगम कुठे आहे, याचा अंदाज येईना. शेवटी काही क्षण ओट्याजवळ शांत उभी राहिले, आणि त्या आवाजाचा अंदाज घेऊ लागले. शांत राहिल्यावर तो आवाज अधिक स्पष्टपणे येऊ लागला. आवाज अगदी आसपास असल्याची जाणीव झाली, आणि हात आपसूक त्या चणे भिजवलेल्या भांड्याकडे वळला. त्या भांड्यावरचे झाकण काढले तर भिजलेले चणे पाण्यावर तरंगत होते. आणि असे तरंगत असतांना त्याची सालही दूर होत होती, त्यातूनच तो टप...टप आवाज येत होता. मी चणे दाबून  बघितले, तर अगदी मऊसूत भिजले होते. याच फुटणा-या चण्यांनी मला हैराण करुन सोडलं होतं.

सायंकाळी भिजलेले चणे साध्या कांद्याटोमॅटोवर फोडणीला टाकले. मी घरुनच


सुक्या खोब-याचे वाटण करुन घेतले होते. ते चमचाभर वाटण आणि मालवणी मसाला टाकून मिश्रण चांगले परतले. वरुन गरम पाणी टाकून चण्यांची उसळ शिजायला ठेवली. अगदी पाच मिनिटात चण्यांचा रस्सा रटरटू लागला. सोबतच त्याचा घमघमाट घरभर पसरु लागला. दहा मिनिटात हे छोटे रगडा चणे शिजलेही छान. वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करायला आणि लेक घरी यायला एकच वेळ. बाहेर सगळ्या पॅसेजमध्ये आपल्याच भाजीची दरवळ आहे, हे सांगत तो घरात आला आणि माझी कळी खुलली. आल्यावर चहा-कॉफी काहीही नको, तू फक्त वडे तळ, मी फ्रेश होऊन होतो...सांगून तो सरळ बाथरुममध्ये गेला. क्षणभर माझ्या डोळ्यासमोर पुन्हा शाळेचे दिवस आले. घरी येतांनाच भूक लागली....म्हणून आरोळी ठोकणारा लेक समोर आला. आता मध्ये फक्त काही वर्ष गेली आहेत, बाकी तो आहे तसाच आहे, ही सुखद जाणीव पुन्हा झाली....आणि त्या फुटणा-या चण्यांच्या उसळीसोबतच्या वड्यांची तयारी सुरु केली...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. लेख खुप छान आहे.

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय

    ReplyDelete
  3. मस्त लिहिले आहे.

    ReplyDelete

Post a Comment