अनुभवांचे पावसाळे
मावशी, जर आमच्या आईंबरोबर बोलाल का..... म्हणून पूर्णिमाचा फोन आला आणि माझ्या पोटात मोठा खड्डा पडला. अनघा नावाच्या माझ्या मैत्रिणीची ती सून. दोन वर्षांपूर्वीच अनघाच्या अमेय नावाच्या मुलाचे लग्न झाले आणि पूर्णिमा सून म्हणून तिच्या घरात आली. सहा महिन्यापूर्वी या दोघांना मुलगी झाली. पूर्वा तीन महिन्याची झाल्यानंतर पूर्णिमा ऑफिसला जायला लागली, आणि पूर्वाचा सगळा ताबा अनघाकडे आला. अनघा आणि तिचे मिस्टर यांनी ही नवीन ड्युटी खूप आनंदाने स्वीकारली. गेल्याच आठवड्यात दोघेजण गार्डनमध्ये नातीला खेळवताना मी पाहिलं होतं. पण अचानक आलेल्या पूर्णिमाच्या फोनमुळे मनात शंकांचे काहूर उठले. उगा फोनवर चौकशी करण्यापेक्षा मी सरळ अनघाचे घर गाठले.
मी घरी गेले तेव्हा सायंकाळचे चार वाजलेले. अनघा बहुधा नुकतीच झोपेतून उठली होती. घरात सगळीकडे शांतता. मला बघून अनघा थोडीशी दचकल्यासारखी वाटली. कदाचित झोपेतून नुकती उठल्यामुळे अशी वागत असेल म्हणून मीही दुर्लक्ष केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पूर्वा, आत झोपली असेल, म्हणून मी हळू बोलत होते. थोड्या वेळाने अनघाचे मिस्टर सुद्धा बाहेर आले आणि अनघा चहा कॉफी आणते म्हणून आत गेली. मी अनघाच्या मिस्टरांना हळूच विचारलं, पूर्वा आज झोपली आहे का. तेव्हा त्यांचा चेहरा पडला. हळू आवाजात ते म्हणाले, पूर्वाला आता पाळणाघरत ठेवतात. संध्याकाळी ती दोघं घरी येतात तेव्हा तिला घेऊन येतात. मला हे ऐकून खूप धक्का बसला. कारण अनघाचं घर तसं ऐसपैस. दोन बेडरूम, पाहुण्यांसाठी वेगळी खोली, छोटी देवघराची जागा आणि मोठा हॉल आणि किचन, ओपन टेरेस सुद्धा मोठं. त्यात अनघा आणि तिचे मिस्टर हे दोघेही साठी- पासष्टीचे. त्यामुळे नातीला सांभाळायला त्यांची फार धावपळ, दगदग होत असेल असेही नाही. पूर्वा झाल्यापासून अनघाने जेवणासाठी स्वतंत्र मावशी ठेवल्या होत्या. त्यामुळेच पूर्णिमाने पूर्वाला पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय का घेतला हे काही मला कळेना.
थोड्या वेळातच अनघा चहा कॉफी आणि खाऊ घेऊन बाहेर आली. अनघाच्या मिस्टर आणि तिला हळू आवाजात सांगितले, ही पूर्वाला भेटायला आली आहे बरं का. त्यावर अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. मी, पूर्णिमाच्या फोन बद्दल सांगणार होते, पण अनघाची अवस्था बघितली आणि स्वतः ला आवर घातला. काही मिनिटांसाठी त्या घरात अगदी पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. नंतर कॉफीचे घोट घेता घेता, अनघा सांगू लागली. सुरुवातीला पूर्वाला
सांभाळताना पूर्णिमा आमच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवत होती. आमचीपण ती नातच आहे ना....पण नंतर नंतर ती अगदी बारीक सारीक सूचना करायला लागली. तिला काय भरवायचं...किती भरवायचं....कधी भरवायचं....अशा सगळ्या सूचना होत्या. सुरुवातीला आम्हाला याचं खूप कौतुक वाटू लागलं. ती तर तिची आई ना....नोकरी सांभाळून मुलीबद्दल एवढी काळजी घेते म्हटल्यावर मला सुद्धा तिचं कौतुक वाटत होतं. पण नंतर नंतर पूर्णिमा जरा जास्तच सूचना देऊ लागली, याची जाणीव व्हायला लागली. अलीकडे तर मी पूर्वाचे लाड जास्त करते, असं बोलायला लागली. अशा लाडांमुळे पूर्वा अगदी नाजूक साजूक होईल असं तिचं म्हणणं. त्यांना म्हणे मुलीला रफटफ करायचं आहे. अगं पाच-सहा महिन्याच्या मुलीला रफटक करण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर चालायला लावायचं का. लहान पोर ते, जरा जास्ती झोपली तरी तिला काळजी, कमी झोपली तरी काळजी. बरं खाण्यासाठी ते युट्युबचे व्हिडिओ बघून एक वेगळा चार्ट बनवला तिने. तुला तर माहिती आहे ना, आमच्या घरात किती बाळतंपणं झाली. लहान मुलांचं मी किती केलं. आपल्याकडचे पदार्थ काही कमी आहेत का...आता एवढ्या छोट्या जीवाला हवामानानुसार...ऋतूनुसार फळं, खाऊ भरवला पाहिजे ना. मी तिला समजून सांगितलं पण ती ऐके ना. पूर्णिमाच्या आईबरोबर पण बोलले. त्या आणखी बिनधास्त. मला म्हणाल्या, ठेवू दे तिला पाळणा घरात. एक दोन महिन्यात फरक समजेल आणि परत ठेवेल तुमच्याकडे. तोपर्यंत फिरून घ्या सगळं.
आता काय बोलणार यावर. आमचा अमेयही उजेड पडल्यासारखा वागतोय. पंधरा-वीस दिवसांपूर्वी दोघेही पूर्वाला घेऊन फिरायला गेले. आम्ही दोघांनी त्यांना सांगितलं होतं, पूर्वाला घरी ठेवा आणि तुम्ही फिरून या. पण दोघेही ठाम...तिला घेऊनच जाणार...तिला सगळी सवय व्हायला पाहिजे म्हणे.... पुन्हा तेच...तिला रफटफ करण्याचं कारण....शेवटी दोन दिवसानी घरी आले, आणि पूर्वा तापाने सडकून आजारी पडली. पुढचा सगळा आठवडा तिच्या आजारपणात गेला. शेवटी मी दोघांनाही ओरडले, तेव्हा मी पूर्वाला फारच नाजूकपणे वाढवते त्यामुळे ते आजारी पडली म्हणून मलाच बोल पडले. त्यानंतर पूर्णिमाने तिला स्टेशनजवळच्या पाळणाघरात ठेवणार असल्याचे मला सांगितले. पहिल्या दिवशी तर मला मोठा धक्का बसला. दिवसभर रडत होते. यांनी पण खूप समजावलं, पण मनच नाही लागत ग. आता पूर्वा रात्री
आठ पर्यंत घरी येते. त्यामुळे आम्ही दोघेही घड्याळाकडे नजर लावून बसलेलो असतो. कधी एकदाचे आठ वाजतात आणि ती घरी येते असं होऊन जातं. मी रोज पूर्णिमाला समजवत आहे, पण ती काही लक्षच देत नाही. तुम्हाला उगीच दगदग नको म्हणते. तू आता आली आहेस ना, आठ वाजेपर्यंत थांब, पूर्णिमाला सांग, मला दगदग होत नाही. पुन्हा घरात पिन ड्रॉप सायलेन्स.
आता माझीच कोंडी झाली. मी कसं सांगणार की त्या पूर्णिमाच्या सांगण्यावरूनच
मी घरी आलेय ते. थोड्या वेळाने पुन्हा
गप्पा सुरू झाल्या. एरवी पूर्णिमा आणि
अनघा दोघीही नजर लागतील अशा सासू सुना.
गेले सहा महिने पूर्णिमा बाळंतपणासाठी सुट्टीवर होती. अनघाने सुनेच बाळंतपण
अगदी आनंदाने केलेलं. या दोघींमध्ये असा
काही दुरावा येईल हे वाटलंच नव्हतं...बऱ्याच वेळा अशा दुराव्याला थोडा संयम दाखवला
तर आपसूक उत्तर मिळतं. मी तसंच अनघाला
सांगितलं. एव्हाना तिच्या डोळ्यातून गंगा
यमुना सुरु झाल्या होत्या. अशानं तुझीच
तब्बेत बिघडेल, म्हणून तिला जवळ घेतलं. थोड्यावेळानं ती सावरली. प्रत्येक पिढी
वेगळी असते. हे वेगळंपण जाणून घेतलं, समजून घेतलं, तर दोन पिढीमधलं अतंर आपसूक विरघळून
जातं. अनघाला हे सांगतांना, तिला माझ्या बाबतीत असं कधी झालं, तर हे तू लक्षात
ठेव, आणि माझेपण तेव्हा कान ओढ म्हणून सांगितलं. एवढ्यानं का होईना, बाईंची कळी
खुलली...लक्षात ठेवते हो...म्हणत, तिनं हसून मला निरोप दिला. त्यानंतर मी बरीच
गडबडीत होते. एक छोटा दौराही झाला. मसाल्याची गडबड आणि पापड, फेण्यांची तयारी. यात
अनघा, पूर्णिमा आणि छोट्या पूर्वाला पार विसरून गेले. काल संध्याकाळी बाहेर
फिरायला म्हणून पडले, तेव्हा अनघा तिचे मिस्टर आणि छोटी पूर्वी गार्डनमध्ये दिसले.
मला बघून अनघा धावतच आली. मी तिच्याकडे गेले होते, त्यानंतर दोन-तीन दिवसानंतरच
पूर्वाचे पाळणाघर बंद झाले म्हणे...तिथे ती सारखी रडत असल्याची तक्रार होती. शिवाय
एकदा तिला उलट्या आणि जुलाबही झाले. पूर्णिमा आणि अमेयनंही मग सुट्टी घेतली. यात
काहीतरी जादू झाली. पूर्णिमानं अनघाची माफी मागितली. उगा कोणाचातरी सल्ला ऐकला,
आणि पूर्वाला पाळणाघरात ठेवलं, म्हणून अनघाच्या कुशीत शिरुन रडलीही. दोघीही आयाच
ना. एकमेकींना समजून घेतांना असे प्रसंग होतातच. दोघीही थोड्या रडल्या आणि मग हसू
लागल्या. त्याचीच परिणिती म्हणजे, आता पून्हा पूर्वा घराची राणी झाली आहे आणि
चोवीस तास अवघं घर तिच्या भोवती फिरत आहे.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
नात्यांच्या पडलेल्या गाठी अशाच नाजूकतेने व संयमाने सोडवल्या तर सुटतात अन्यथा आणखी बसत जातात!!
ReplyDeleteकिती वास्तव मांडल आहे. आजी आजोबांची इथेही कुचम्बणं
ReplyDeleteहल्ली कोणाला कोणाचे उपकार नको असतात. No obligations.
ReplyDeleteखरे तर प्रेमाने आनंदाने द्यावे घ्यावे.