आजची ती....
दोन आठवड्यापूर्वी पुण्याला धावती भेट दिली. या धावत्या भेटीचा सगळा प्रवास झाला तो ट्रेनच्या माध्यमातून. अडीच ते तीन तासांच्या या दोन्ही वेळेच्या प्रवासात आयटी क्षेत्रांमध्ये काम करणा-या तरुणींचा शेजार लाभला. प्रवासाच्या या दोन-तीन तासांच्या काळात या मुलींबरोबर अल्प संवाद झाला. नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या रहाणा-या या तरुणी स्वतःच्या सुरक्षेसाठी कशी काळजी घेतात, या माझ्या प्रश्नाला त्यांनी अगदी मोजक्या पण खमक्या शब्दात उत्तरे दिली. घरापासून दूर राहताना, तेही स्वतंत्रपणे राहतांना काय काळजी घ्यायची, आणि कोणाला आपल्या आसपास किती येऊ द्यायचे ही सीमा त्यांना माहित होती. या तरुणींबरोबर झालेल्या या चर्चेतून मला अनेक विषय मिळालेच, पण माझ्या मनातील अनेक प्रश्नांचीही उकल झाली. त्याच चर्चेचा हा गोषवारा.
पुण्याला जातांना ठरलेले खाऊ अड्डे आहेत. त्यातला पहिला म्हणजे, कर्जतचा वडापाव. आमची गाडी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास कर्जतला पोहचण्याच्या बेतात होती, तेव्हा बाजुला बसलेल्या तरुणीची चुळबूळ सुरु झाली. आम्ही कल्याणहून गाडी पकडली. तिनं आमच्या आगोदरच्या स्टेशनमधून गाडी पकडली होती. पण बाई आम्ही आलो तेव्हा गाढ झोपलेल्या, किंवा तसे दाखवून चेह-यावर स्कार्फ घालून बसलेल्या होत्या. आपल्या शेजारी कोण बसलं आहे, याची साधी तिनं तसदीही घेतली नाही, म्हणून मी नव-याकडे आश्चर्य व्यक्त केलं. ती झोपली आहे, तू शांत बस, म्हणत, नव-यानं माझ्या हातात पुस्तक दिलं आणि तोही एका पुस्तकात डोकं घालून बसला. कर्जत जवळ आलं तेव्हा मात्र मी त्याला पुस्तक बाजूला ठेव, वडापाव आधी आण म्हणून जरा मोठया शब्दात ऑर्डर सोडली. माझ्या आवाजानं नव-यावर काहीही परिणाम झाला नाही, पण त्या शेजारी बसलेल्या तरुणीची चुळबूळ सुरु झाली. तिनं ती भल्यामोठ्या पाकीटांची बॅगी पॅन्ट आणि क्रॅप टॉप घातला होता. माझे कर्जत आणि वडापाव हे शब्द तिनं बरोबर पकडले. त्या बॅगी पॅन्टच्या एका खिशात हात घालून तिनं पन्नास रुपयांची नोट काढली. अर्थात तोपर्यंत तिच्या चेह-यावरचा स्कार्फ तसाच होता. हातात पन्नासची नोट लागल्यावर तिनं स्कार्फ बाजुला काढला आणि मला, कर्जत आलं का म्हणून विचारलं. मी येतंय म्हटल्यावर बाई लगेच उठल्या, आणि आम्हाला साईड प्लीज म्हणत, रवाना झाल्याही. ती गेल्यावर मी नव-याकडे मोठे डोळे करुन बघितले, मग तोही वडापाव आणण्यासाठी रवाना झाला. थोड्यावेळानं दोघेही हसत हसत वडापाव घेऊन दाखल झाले आणि त्या वडापावची चव चाखत मग आमच्या गप्पा रंगल्या.
आमच्या शेजारी होती ती शायली. महाड शहरातली. इंजिनिअरिंग करुन तिनं
एमबीएचीही पदवी घेतलेली. गेल्या वर्षापासून पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये कामाला आहे. तिथेच भाड्यानं ब्लॉक घेऊन रहातेय. आणखी एक वर्ष पुण्यात रहाणार आणि पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला जाण्याची तिची तयारी सुरु होती. त्यासाठी आवश्यक असे काही कोर्स ती सध्या करत होती. पुण्यातले आयटी कल्चर कसे आहे, या माझ्या प्रश्नावर तिनं सावधपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, हल्ली सर्वांना आयटीमध्ये काम करणारे तरुण-तरुणी सर्रास दारु पितात असे वाटते. पार्टीला जातोय, असं म्हटलं तरी समोरचे विचारतात, तिथं काही अंमली पदार्थ असतात का. आम्हाला काय आमच्या तब्बेतीची काळजी वाटत नाही का...मी स्वतः आठवीपासून इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेसाठी तयारी करत होते. तेव्हापासून कुठलाही सण नाही की कौटुंबिक कार्यक्रम नाही. सगळा वेळ त्या जेईईच्या पुस्तकांसोबत घालवला. नंतर इंजिअरिगची चार वर्ष अहमदाबादमध्ये. त्यानंतर एमबीए. या सगळ्यात कधी पार्टीला जायला काय, पण पार्टी या शब्दालाही दूर ठेवलं. या सर्वात माझ्या कुटंबानं मला खूप प्रोत्साहन दिले. पण आता आईचा घाबराघुब-या आवाजात फोन आला की काळजी वाटते. तिला कोणीतरी सांगतं, पुण्यात पार्टी कल्चर आहे. मुलं रात्री पार्टीला जातात. दारु पितात, चरस-गांजा ओढतात. हे ऐकलं की आई लगेच फोन करते. पण मला सांगा एवढा अभ्यास करणा-या आम्हा तरुणांना स्वतःच्या तब्बेतीची काळजी वाटणार नाही का. एखादा शनिवार-रविवार मित्र मैत्रिणींसोबत पार्टीला जातो, म्हणजे, दारुच प्यायला जातो असंच समोरच्याला वाटतं. बरेच जण पॅकेज किती आहे, असं थेट विचारतात. या पॅकेजसाठी आम्ही किती वर्ष रात्रंदिन अभ्यासात घातली आहेL, याचा कोणीही विचार करत नाही. काही कपड्यांवरुन प्रश्न विचारतात. अशावेळी मग कोणाशी बोलायचेच नाही, असं ठरवते. मग आमच्यावर फटकून वागणारी असा शिक्का मारतात. माझ्या बाजुची शायली हे सर्व तळमळीनं सांगत असतांना आम्ही दोघींनी वडापाव संपवून दोन कॉफीही रिचवल्या होत्या.
तिचं बोलणं झाल्यावर तिला माझा आई म्हणून अनुभव सांगितला. आमचा लेक गुरुग्रामला नोकरीला आहे, हे सांगितल्यावर अनेकांनी आम्हाला घाबरवून सोडलं होतं. गुरुग्राममध्ये दारु स्वस्त मिळते, तिथे अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते....आदी अनेक उदाहरणे आमच्यापुढे सादर केली. मी लेकाला हे सर्व सांगितल्यावर त्यानं त्याच्या नेहमीच्या शांत स्वभावात मला उलटा प्रश्न विचारला, दारु कुठे मिळत नाही, आणि दारु स्वस्त मिळते, म्हणून काय सर्वजणं दारु पितात का...तू काळजी करु नकोस मला माझ्या फुफ्फुसाची काळजी आहे, असं स्पष्ट मराठीमध्ये सांगून विषय बंद केला. पण माझ्या मनातील आई काही शांत होत नव्हती. गुरुग्रामला गेल्यावर तिथे भेटलेल्या काही तरुणांना मी तेथील पार्टी कल्चरबद्दल चर्चा केली होती.
तेव्हाही या तरुणांनी अशाच प्रकारची उत्तरं दिली होती. माझे हे अनुभव सांगून झाल्यावर मी शायलीसोबत नाशिकच्या टीसीएस प्रकरणाबाबत चर्चा केली. तू एकटी रहातेस, तुला भीती नाही वाटत का, हे विचारल्यावर ती लगेच म्हणाली, त्यात काय घाबरायचे. टीसीएस प्रकरणानंतर माझी आईही घाबरली होती. आता लग्न लावून देते म्हणाली, नंतर किती हवं ते शिक, असं तिचं म्हणणं आहे. पण टीसीएसमध्ये तर लग्न झालेल्या मुलींनाही सोडलं नाही. इथं प्रश्न जागरुकतेचा आहे, असं ठणकावून शायलीनं सांगितलं. माझ्या ऑफीसमध्ये मी एक बॉन्ड्री आखली आहे, ती कोणी ओलंडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याची जाणीव करुन देते, आणि त्यातूनही त्यानं धडा घेतला नाही तर मी शाय....ली नाही हे दाखवून देते. आपल्या नावाची अशी फोड करुन शायली मनमुराद हसली. एव्हाना गाडीनं तळेगाव सोडलं होतं. शायली उतरायची तयारी करु लागली. उन्हापासून बचावासाठी तिनं एक खास कोट घातला, आणि केस आणि कपाळ झाकण्यासाठी एक मोठा बेल्टही लावला. तिचा हा बदललेला गेटअप मी बघत असतांनाच ती हसत म्हणाली, हे कव्हर कसं आहे, माझ्याभोवती, यात मला उन्हाचा त्रास होणार नाही. तसाच माझा स्वभाव मी करुन घेतलाय....एवढं बोलून बाई आम्हा दोघांनाही टाटा करुन निघाल्याही. तिच्या त्या स्वतंत्र स्वभावानं आम्हा दोघांनाही भुरळ घातली.
दुस-या दिवशी परतीच्या प्रवासातही अशीच एक तरुणी शेजारी होती.
तिच्याबरोबरही अशाच स्वरुपाच्या गप्पा झाल्या. त्यातून एक समजलं, की ही तरुण पिढी
खरंच वेगळी आहे. त्यांनी त्यांचे जे स्थान प्राप्त केलं आहे, त्यासाठी बरीच मेहनत
घेतली आहे, आणि घेतही आहेत. फक्त या पिढीला समजून घेतांना थोडी कसरत होते. थोडे
वाद होतात, विवाद होतात. पण त्यांच्या मनाचा एकदा ठाव घेतला आणि त्यांच्यासमोर
असलेल्या आव्हानांची आपल्याला जाणीव आहे, हे सांगून त्यांना विश्वस्त केलं तर मग
पुढचा संवाद सुरळीत होतो....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
ReplyDeleteब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली वाटेल त्या बातम्या छापणाऱ्या वर्तमानपत्र आणि सोशल मीडियापासून काही काही वेळेला परत दूर राहावं वाटतं. प्रतिमा आणि प्रत्यक्ष यांच्यातला फरक कायम लक्षात घ्यायला हवा
अनेक पालकांच्या साशंकतेचे आणि त्याचबरोबर अत्यंत सावधपणे ,आत्मविश्वासाने वागणाऱ्या तरुणाईच्या मनातले विचार मांडले आहेस तू सई..
ReplyDeleteआवश्यक, उपयुक्त लेख.. मस्त एकदम 🤗
शाय...ली ही जशी शब्दांची फोड केली ना, तसेच लहानपणाचे संस्कार त्यातुन आपली चौकट, भीतीयुक्त स्वतःला स्वतःची असलेली भीती वाटत असली ना तर मग काळजी करायची नसते. काही वेळा शिकलेले नमुने बिघडलेले दिसतात आणि कमी शिक्षण झालेले किंवा लहानपणीच मस्तीखोर, बिघडलेले अशी ख्याती झालेले मोठ्यापणी यशस्वी झाल्याची पावलोपावली उदाहरणे बघायला मिळतात.
ReplyDeleteअभिनंदन सौ. सई बने, पुणे, मुंबई येथे आय टी क्षेत्रात करिअर करणाऱ्या नव्या पिढीतील युवतीचे अंतरंग आपल्या खास ओघवत्या शैलीत खूप छान मांडले आहे.
ReplyDeleteचांगला उपक्रम आहे यापुढे सतत आपण लिहित राहावे पुढील वाटचालीस शुभेच्छा
भिमराव पांडुरंग महाले, जळगाव