फक्त तगमग
माझ्यासमोर बसलेल्या स्वराची कुठल्या भाषेत आणि कुठल्या शब्दात समजूत काढायची हेच मला कळत नव्हते. तब्बल दहा किंवा बारा वेळा तिने मला प्रती प्रश्न केला होता, हो पण या सगळ्यात माझी काय चूक.... स्वरा, आठवीला होती तेव्हापासून नीट परीक्षेची तयारी करत आहे. बरोबर पाच वर्ष. तिची मावशी डॉक्टर. स्वरावर तिची फार छाप. आपल्या मावशी सारखंच मोठं डॉक्टर व्हायचं म्हणून ती आठवीपासून नीटची तयारी करतेय. पाच वर्ष एका परीक्षेसाठी सर्वस्व वाहून द्यायचं....सोप्पं नसतं ते...यामध्ये फक्त परीक्षा देणारा विद्यार्थीच परिश्रम घेतो असं नाही, त्यासोबत त्याचं सगळं कुटुंबही परीक्षेची मानसिकरित्या आणि आर्थिक रित्या तयारी करत असतं. या सर्व कालावधीत परीक्षा म्हणजे फक्त परीक्षा. अगदी स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीकडे सुद्धा पाठ फिरवून बारा ते अठरा तास अभ्यासाला बसण्याची तयारी ठेवावी लागते. कुठला सण नाही की उत्सव नाही...अशा कठीण मेहनतीनंतर एक परीक्षा द्यायची. त्यातून मोठा निश्वास घ्यायचा. आता त्या परीक्षेच्या निकालाकडे लक्ष ठेवत, थोडीशी मजा मस्ती करूया म्हणून फिरण्याचे प्लॅनिंग करायचं....आणि या सर्वांतच एक बातमी धडकते....पेपर फुटले आता पुन्हा परीक्षा....गेली पाच वर्ष नीट परीक्षेचा अभ्यास अत्यंत प्रामाणिकपणे करणारी स्वरा या सगळ्या प्रकरणाने प्रचंड दुखावली. हे असं का करतात.... यामुळे माझ्यासारख्या किती मुलांच्या सीट जात असतील...आता नव्यानं होणारा पेपर मला जर अवघड गेला तर मग माझं काय....हा प्रश्न स्वराला त्रस्त करत होता....अर्थात तिच्यासोबत तिच्या कुटुंबालाही. तिच्या प्रश्नाने अधिक चिंतेत पडलेली माझी मैत्रीण आणि तिची आई, रचना तिला माझ्याकडे घेऊन आली
होती. आता तिच्यासोबत मी सुद्धा स्वराच्या प्रश्नांनी निरुत्तर झाले होते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक नियमीत माझ्याकडे येतात. त्यातीलच ही स्वरा. तिची आई रचना आणि माझी ओळख एका कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली होती. तेव्हाच गप्पांच्या ओघांमध्ये तिनं तिच्या लेकीला डॉक्टर व्हायचे असल्याचे अभिमानानं सांगितलं. रचना तेव्हा स्वरासाठी चांगले क्लास शोधत होती. माझ्या ओळखीतल्या दोन क्लासची नावं तेव्हा मी तिला दिली. त्यातील एक क्लास स्वरा आणि तिच्या पालकांना आवडला, आणि स्वरा तिथे नीटच्या तयारीसाठी जाऊ लागली. तेव्हा स्वरा आठवीला होती. नीट, जेईई, नाटा अशा प्रवेश परीक्षांची तयारी करणारी मुलं किती झपाटलेली असतात, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला. माझा लेक आठवीपासून जेईईच्या तयारीला लागलेला. या सर्व वर्षात त्यानं फार क्वचित घरगुती सणसमारंभाला हजेरी लावली होती. शाळेचा अभ्यास आणि या क्लासचा अभ्यास सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. या कसरतीमध्ये त्यानं स्वतःला पाच वर्ष झोकून दिलं होतं. त्याच्या सोबत आम्ही दोघंही नकळत ही कसरत करत होतो. त्या काळात या मुलांवरचा अभ्यासाचा ताण आणि समाज म्हणून येणारे टेन्शन याची मला चांगली ओळख झालेली. स्वरा आणि रचना या दोघीही अशाच ताणामध्ये आल्या की कायम हक्कानं घरी येणा-या. आत्ताही तशाच आलेल्या. स्वरानं गेल्या पाच वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. तिच्या सराव
परीक्षांमध्ये तिला सहाशेच्यावर गुण मिळायला लागल्यावर तिनं मला फोन करुन ही बातमीही सांगितली होती. आता थोडे दिवसच मुख्य परीक्षेला आहेत, या दिवसात चोवीस तास काय पंचवीस तास एका जागी बसून रहाणार आणि यापेक्षा चांगले गुण मिळवणार. मग मला चांगलं कॉलेज मिळेल, बघच तू...म्हणून आत्मविश्वासानं तेव्हा स्वरा बोलत होती. तिच्या नीटच्या परीक्षेच्या आधी तिला घरी जाऊन शुभेच्छाही दिल्या, तेव्हाही स्वरा अशीच आनंदी होती. अभ्यास व्यवस्थित झाला होता. आता फक्त उजळणी चालू असल्याचं तिनं सांगितलं. गेल्या पाच वर्षात स्वराच्या निमित्तानं तिचं कुटुंब फार कुठे फिरायला गेलं नव्हतं. त्यामुळे तिच्या वडीलांनी तिच्या सांगण्यानुसार आता सिंगापूरची ट्रीपही प्लॅन केली होती. परीक्षेनंतर भरपूर बोलूया म्हणून मी तेव्हा स्वरा आणि रचनाचा लगेच निरोप घेतला होता. तिची परीक्षा झाल्यावर रचनानं आवर्जून फोन करुन पेपर छान झाल्याचं सांगितलं होतं. आता ते सिंगापूर ट्रीपच्या तयारीला लागले होते. तिथून आल्यावर सर्वजण आमच्याकडे येणार असल्याचे रचनानी सांगितलं. चार दिवसांनी सर्वजण सिंगापूरला गेलेही. तेव्हापासूनच नीटचा पेपर फुटल्याची कुणकुण ऐकू येऊ लागली. तिकडे सिंगापूरला गेलेल्या स्वराला तिच्या कोणा मैत्रिणीकडून ही बातमी समजली. आता काय होणार, या टेन्शनमुळे तिचं तिथे लक्ष लागेना. शेवटी कशीबशी आठ दिवसांची ती ट्रीप करुन हे कुटुंब परत आलं, तोपर्यंत नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे जाहीर करण्यात आलं होतं. या सर्वांचा स्वराला खूप त्रास झाला. तिची चिडचिड वाढली. त्यामुळे रचना तिला माझ्याकडे घेऊन आली. साहजीकच ती जे प्रश्न विचारत होती, त्याची माझ्याकडेही उत्तरं नव्हती. गेली पाच वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करुन मी जेवढे गुण मिळणार तेवढेच गुण कोणीतरी चिटींग करुन मिळवणार...मग परीक्षा घेतातच कशाला. परीक्षेला जातांना केवढ्या सूचना देतात. अगदी हातात घड्याळ नको, कानातले नको...असेच कपडे घाला...चप्पलही तपासतात...मग एवढी मोठी पेपरफुटी आधी तापासता आली नाही का...जी मुलं पैसे देऊन पेपर विकत घेत असतील त्यांना काहीच लाज वाटत नसेल का...त्यांच्या पालकांची
मानसिकता कशी असेल...असे डॉक्टर झाले तर त्या पेशंटचं काय होईल...अशी निरुत्तर करणा-या प्रश्नांची सरबत्ती स्वरानं माझ्यावर सुरु केली होती.
तिची ती तगमग मी बघत होते. जाणत होते. गेली पाच वर्ष स्वरासारखी लाखो मुलं एका प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. त्यापुढे त्यांनी सर्व जगाचा विसर पाडून घेतला होता. स्वराला जे हवं ते देण्यासाठी तिचे पालक सक्षम आहेत, पण या परीक्षेची तयारी करणा-या अनेक मुलांच्या पालकांनी कर्ज घेऊन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलेला. काहीजणांनी जमिनी विकल्या किंवा गहाण टाकलेल्या. त्या मुलांची समस्या तर स्वरापेक्षाही अधिक. पण या सर्वांची मानसिक होरपळ मात्र सारखीच. या सर्वात आमचा काय दोष...या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तर माझ्याकडे नाही. मला विचाराल तर सर्व भ्रष्ट्राचा-यांना भर चौकात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा द्यायला हवी. पण आपल्याकडे कायदा आहे, आणि अशा भ्रष्टाचा-यांना शिक्षा देण्याचे काम कायदा करेलच. पण तोपर्यंत स्वरासारख्या मुलांच्या मानसिकतेचे काय....इथे ही मानसिकता जपणेच महत्त्वाचे असते. मी सुद्धा तेव्हा तेच केले. आधी स्वराला बोलू दिले. तिच्या मनातील संताप बाहेर पडला. ती रडलीही. व्यवस्थेला दोष दिला. त्या पेपर फुटीला साथ देणा-यांना दोष दिला. तिच्या जवळची ही सर्व यादी संपली आणि स्वरा शांत झाली. आता काय, असा प्रश्न तिच्या चेह-यावर आला. तेव्हा तिला समजवलं. पेपर फुटला पण त्यानंतर पुन्हा परीक्षा होणार आहे ना, मग ते चिटींग करणारे काय करणार. या चिटींगच्या नादात त्यांनी तुझ्यासारखा अभ्यासही केलेला नाही. तुला फक्त थोडी रिव्हिजन करायची आहे, आणि पहिल्यासारखा आत्मविश्वास ठेवायचा आहे. या सर्वात एक महिना पुन्हा तुला अभ्यास करावा लागले, आणि तुझ्या निकालाची प्रतीक्षा थोडी लांबणार आहे. पण हा थोडा उशीर तुला आणि तुझ्यासारख्या प्रामाणिक
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असेल, तर चांगला आहे ना...स्वराच्या मनावर अशी हळूवार फुंकर घालतांना तिच्यासोबत माझ्याही डोळ्यात अश्रू जमा झाले होते. थोडा वेळ शांततेत गेला. मग स्वरानं पहिले आपले अश्रू पुसले आणि मग माझे...ठिक आहे...क्सालमध्ये आता पुन्हा वर्ग लावले आहेत, रिव्हिजनसाठी....आता उद्यापासून त्यांना नियमीत जाते...माझ्या हातावर हात ठेवून स्वरानं मला प्रॉमिस दिलं, आणि रचनाची कळी खुलली. मग थोडावेळ सिंगापूरच्या गप्पा आणि कॉफी असा कार्यक्रम झाला. दोघीही निघाल्यावर, मी येईन मध्ये घरी, असे आश्वासन रचानाला दिले. या अशा अस्वस्थ मुलांच्या मागे आपण अश्वासक बोलांनी पाठिंबा दिला की त्यांची वाट सुरळीत होते, हा माझा अनुभव...वाघाचे कातडे घालून वाघ होता येत नाही, हे जोपर्यंत कॉपी करणा-यांना कळणार नाही, तोपर्यंत हे असे प्रकार होतच रहाणार आहेत. पण या सर्वात जे प्रामाणिक विद्यार्थी भरडले जातात, त्यांच्या मागे शांतपणे उभं रहाणं आणि त्यांना सकारात्मक विचारांनी प्रोत्साहन देणं हाच एक राजमार्ग मला सध्यातरी ज्ञात आहे...आणि तोच मी स्विकारते...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
वाईट वाटतं ते या शिक्षकी पेशाचं . आपल्या पेशात चांगले नाव असलेले हे शिक्षक असे कसे वागले?पैशाच्या लोभापुढे मान सन्मान मूल्य सगळे कसे विसरले?
ReplyDeleteमाझे विद्यार्थी मला भेटले की वाकून नमस्कार करतात. शिक्षक या प्रोफेशनला अजूनही समाजात खूप मान आहे . इतर व्यवसायांमध्ये पैसा मिळतो पण काम थांबलं की लोक विसरतात पण हा व्यवसाय असा आहे की शिकवतानाही समाधान मिळते आणि आपण जेव्हा हा व्यवसाय थांबवतो त्यानंतरही आपले विद्यार्थी आपल्याला न विसरता भेटत राहतात मान देत राहतात.
या लोभी मूर्ख माणसांनी शिक्षकी पेशाला लाज आणली आणि प्रचंड अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक ताण दिला.
आश्वासक विवेकी भावनिक आधार अशा वेळी खूप महत्वाचा!! खूप छान !!
ReplyDelete