मी माझी खमकी

 

मी माझी खमकी


ब-याचवेळा कुठे गेल्यावर आपला वेळ वाया गेल्याची जाणीव होते. अशीच जाणीव आणि सोबत आलेला मनस्ताप घेऊन मी अपर्णाच्या घरातून परत आले.  माझी एक मैत्रिण. लेकाची शाळा संपल्यापासून माझा आणि अपर्णाचा संपर्क ब-यापैकी कमी झालेला. तिच्या दोन्ही मुली आणि माझा लेक एकाच शाळेत. तेव्हापासून आमची ओळख. तीन-साडेतीन वर्षापूर्वी तिच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. तेव्हा आम्ही बाहेरगावी असल्यामुळे या लग्नाला जाता आलं नव्हतं. नंतर अपर्णाला शुभेच्छा आणि लेकीला भेटवस्तू देऊन आले. अपर्णा तेव्हा भरभरुन जावयाचे कौतुक करत होती. त्यानंतर तिचा थेट आत्ता पंधरा दिवसांनी फोन आला होता. थोडं बोलायचं आहे, घरी येते....किंवा तूच माझ्या घरी ये, म्हणून आग्रह करीत होती. पण मला वेळ काढता आला नाही. मग आठवड्यापूर्वी निदान अर्धा तासासाठी तरी ये, म्हणून तिचा परत फोन आला, तेव्हा भर दुपारी दीड-दोन वाजता तिच्या घरी गेले. विश्वास ठेवा, उन्हाचा जेवढा त्रास झाला नाही, तेवढा त्रास तिच्या घरी गेल्यावर झाला. घरातील एकानं आडमुठी भूमिका घेतल्यावर अवघं घर कसं त्रासून जातं याचा अनुभव मी घेऊन आले.






अपर्णाची मोठी मुलगी आपला तीन वर्षाचा संसार मोडीत काढून परत माहेरी आली होती. तिची मुलगी साक्षी ही उच्चशिक्षीत. शिक्षणाप्रमाणे तिला नोकरीही मिळालेली. तिच्याच ऑफीसमधील एका मुलाची आणि तिची ओळख झाला, आणि अवघ्या सहा महिन्यात दोघांचाही विवाह झाला. सुरुवातीचे सहा महिने सर्व काही ठिक होतं. तोपर्यंत साक्षीला दिवसही गेले. दिवस गेल्यावर मात्र दोघांमध्ये वाद सुरु झाले. त्यातच साक्षीच्या नव-यला अन्य कंपनीमध्ये अधिक वरच्या पदाची आणि पगाराची नोकरी मिळाली. साक्षीनंही या पदासाठी मुलाखत दिलेली, मात्र तिची निवड न झाल्यानं ती पुरती निराश झाली. मग घरात कुरुबुरी वाढल्या. घरातली कामं कोण करणार...इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. साक्षीला घरात कामाची फारशी सवय नव्हती. तशीच तिच्या नव-यालाही. सासरी सर्व कामांसाठी मावशी होत्या. पण लग्नानंतर निदान साक्षीनं सायंकाळच्या जेवणाच्या वेळी थोडावेळ तरी स्वयंपाकघारात डोकवावे, अशी अपेक्षा तिच्या सासूची होती. साक्षीला यायला उशीर झाला तर ती ब-याचवेळा जेवणाचे पार्सल घेऊन येई. डाळ-भाताची जबाबदारी सासूवर. मात्र याव्यतिरिक्तही घरात कामं असतातच की. नव्याचे नऊ दिवस हे दोघंही शनिवार-रविवार बाहेर फिरायला जायचे. मॉल, चित्रपट, झालंच तर जवळच्या पिकनीट स्पॉटवर वननाईट स्टे...असं सगळं चालू होतं. घरात कुरकुर सुरु झाल्यावर या सर्वांवरही परिणाम झाला. हे हॉटेल नाही. या पहिल्या डायलॉगपासून सुरु झालेला वाद तुमचा लेकही सुट्टीत बसून असतो ना...यावर येऊन थांबला. या सर्वात साक्षीला दिवस गेल्यावर घरातील वातावरण पुन्हा

बदलले. तोपर्यंत साक्षीलाही बहुधा सासूचे महत्त्व समजले होते. तिला मुलगी झाली. तीन महिन्यांची मुलगी झाल्यावर साक्षी आठवड्यातले दोन दिवस ऑफीसला जाऊ लागली, बाकी ती घरुन काम करत असे. आता घरकामासाठी आणखी एका मावशींना ठेवले. पण आता वादाला कारण ठरली ती साक्षीची खरेदी.

छोट्या बाळासाठी साक्षी जे दिसेल ते खरेदी करु लागली. अगदी तिच्या खाण्यासाठीही वेगवेगळे खाऊ, खेळणी आणि दर दोन दिवसांनी नवे कपडे. यावरुन सुरुवातीला तिला तिच्या सासूनं रोखलं. बाळ लहान आहे, त्याला एवढ्या खेळण्यांची गरज नाही, कपडे आधीच भरपूर आहेत, नवे कपडे कशाला हवे, म्हणून तिला सांगितले. मग माझा पैसा...माझी मुलगी हा मुद्दा आला. हा वाद वाढला आणि साक्षीच्या नव-याची कोंडी झाली. आईची बाजू घ्यावी की बायकोची की त्या गोड बाळाचे कौतुक करायचे. वाद वाढल्यावर अपर्णा लेकीच्या घरी गेली, तेव्हा तिच्या सासूनं बाळाच्या कपड्यांच्या भरलेल्या बॅगाच तिच्या समोर ठेवल्या. पाच महिन्याच्या महिन्याच्या बाळाच्या कपड्यांच्या दहा बॅगा.  अपर्णाने आणि तिच्या नवऱ्यानेही लेकीला समजावले.  पुन्हा थोडे दिवस सर्व सुरळीत होते.  नंतर साक्षी पूर्णवेळ ऑफिसला जाऊ लागली.  अशावेळी घरी असलेल्या सासूची धावपळ वाढली.  कामासाठी ज्या मावशी ठेवल्या होत्या त्या, काही दिवस रजेवर गेल्या होत्या.  या दरम्यान साक्षीनं थोडी तरी घराची जबाबदारी घ्यावी म्हणून सासूने तिला काही सल्ले दिले.  यावर साक्षीने जबाबदारी दोघांची आहे त्याच्यामुळे सासूने आपल्या मुलालाही काम करायला सांगावे म्हणून आग्रह धरला.  सारखा सारखा होणारा वाद नको आपण स्वतंत्र राहूया ती नवऱ्याच्या मागे लागली.  थ्री बीएचके चा ब्लॉग सोडून परत दुसऱ्या घरात कशाला जायचं, शिवाय आई-वडील आहेत ते मुलीची काळजी घेत आहेत, उगाच बजेट बिघडेल म्हणून साक्षीला समजवण्याचा प्रयत्न केला.  शिवाय माझ्या परीने जेवढी होईल तेवढे मी काम करेल म्हणून साक्षीला पुन्हा समजलं.  या सगळ्या रुसव्या फुगव्यात बाळ वर्षभराचं झालं आणि आता मी सहन करू शकत नाही म्हणत, वर्षभराच्या मुलीला घेऊन साक्षी थेट तिच्या आईकडे दाखल झाली आहे.  मी माझ्या मुलीला स्वतंत्र मोठी करण्यासाठी सक्षम आहे, माझी मी खमकी आहे, मला कोणाची मदत नको,  हा तिचा घोषा आहे. 

या दरम्यान तिचा नवरा आणि सासू सासरे तिला समजवण्यासाठी घरी येऊन गेले.  पण राहीन तर स्वतंत्रच हा साक्षीचा आग्रह मान्य करायला तिच्या नवऱ्याने ठामपणे नकार दिला आहे.  त्याची भूमिका स्पष्ट आहे, उगा मोठा फ्लॅट सोडून परत दुसऱ्या फ्लॅटची शोधाशोध कशाला करायची.  शिवाय या सर्वात त्या छोट्या बाळाला सांभाळणार कोण, पूर्णवेळ बाई ठेवली तर तो खर्च.


आई-वडिलांच्या प्रतीही काही जबाबदारी...या सर्वात नाहक खर्च होणार, असं त्याच स्पष्ट मत.  पण साक्षीचा यावरही उत्तर ठरलेलं.  मी कमावती आहे.  मला  रग्गड पगार आहे. मला तुझ्या पैशाची गरज नाही.  मी माझ्या मुलीसाठी लागेल तेवढा पैसा खर्च करेन.  यावर तो काय बोलणार. कर, एवढंच बोलून जावई निघून गेला आणि अपर्णांनी डोक्याला हात लावला. गेली चार महिने साक्षी आपल्या आईच्या घरी राहत आहे.  या सर्वात तिने बराच वेळा तिला समजावण्याचा प्रयत्न केला.  जावयाशीही बोलण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. अपर्णा आता आपल्या परिचयातील व्यक्तींना साक्षीला समजण्यासाठी बोलवत आहे.  त्यात आता माझा नंबर लागला होता, आणि मी अपर्णाच्या घरी गेले.  तिनं सगळा हा क्रम उलगडून सांगितला आणि मी कपाळावर हात मारला.  विद्या विनयेन शोभते....हा सुविचार माझं तरी शिक्षण चालू होतं तेव्हा फळ्यावर कायम लिहिलेला असायचा.  पण आता जमाना लॅपटॉप झाला आणि या अशा सुविचारांची सुट्टी झाली आहे.  अपर्णांने आग्रह केला, म्हणून साक्षी बरोबर बोललेही.  पण तिने गेल्या चार महिन्यांचा आढावा दिला.  चार महिने नवऱ्यापासून वेगळी राहतेय, माझं कुठे काय अडलंय....त्यातच अडलंय तिकडे...बोलूया म्हणून फोन करतो....पण स्वतंत्र घर घेतल्याशिवाय मी जाणार नाही....बाळाला काय, पाळणाघर आहेत,  तिथे ठेवेन...एवढं सगळं मला ठणकवून सांगितल्यावर साक्षी ऑफिस मधील तिच्या प्रगतीचा आलेख मला सांगू लागली.   कौतुकास्पदच होता तो.  ती आता सीनियर पोझिशनला होती.  पगार शब्दशः रग्गड होता.  पण या सगळ्यात कौटुंबिक नात्याचे काय, याचे उत्तर मात्र तिच्याकडे नव्हते

अपर्णाला आता साक्षी सोबत तिच्या धाकट्या मुलीचीही काळजी वाटू लागली होती.  मोठी मुलगी जर वाद करून माहेरी रहात असेल तर धाकटीचे लग्न कसे जमणार... हा तिच्या समोरचा प्रश्न होता.  मी साक्षीशी बोललेही.  पण आता कुठल्याही बंधनात अडकायची माझी मानसिक तयारी नाही, असं सांगून ती मोकळी झाली.  तिच्या या वाक्याने अपर्णाने डोक्याला हात मारला.  तिला कोणाचीही गरज नव्हती....पण माझ्या मनात वेगळाच प्रश्न रुंजी घालत होता...साक्षीची सव्वा वर्षाची लेक बाजूलाच गाढ झोपली होती.  आपल्या आसपास काय चालू आहे याची त्या जीवाला सुतराम कल्पना नव्हती.  तिला पण कोणीतरी विचारावं की, तुला कुठे राहायचं आहे....आई-बाबांची सोबत हवी, आजी आजोबांची माया हवी, की फक्त रग्गड पैशाची गुर्मी हवी.  अपर्णा हताश पणे आता काय करायचं, हे मला विचारत होती.   माझ्याकडेही उत्तर नव्हतं.  तिला म्हटलं आणखी थोडा वेळ जाऊ दे,  बघूया थोडं वातावरण शांत होतं का ते....एवढ्यात ती छोटीही उठली आणि लगेच शेजारीच बसलेल्या आजीला बिलगली.  त्या सरशी अपर्णा रडायची थांबली.  खरंच, बऱ्याच वेळा वाटतं, मुलं एवढीच रहावी... निरागस... निष्पाप....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. लेख खूपच छान आहे,मनापर्यंत आशय पोचला
    पण हे शेअरिंग झालं
    मनात आलं त्यामुलीला समजावणं बंद करावं
    तिने एकटीनेच घर घेऊन रहाव,कारण तिला कोणाचीच गरज नाही,ना तिला असलेल्या
    नात्यांची किंमत
    थोड्या दिवसांनी कळेल अशा अपेक्षेने
    नवऱ्याने थोडे दिवस वाट बघावी आणि मग निर्णय घ्यावा
    कारण ऑफिस मधले बढती मिळवणे असा जरी गोल असेल तरी ती इतर बाबतीत तडजोड करेलच न

    ReplyDelete
  2. मुलींना स्वतःच्या कमाईचा गर्व चढतो की काय ..त्यांना नात्यांची पर्वाच नाहीये.. पन्नाशीनंतर त्यांची चूक त्यांच्या लक्षात येते हे कॉमन उदाहरण झालंय आताशा..

    ReplyDelete
  3. मुलींना स्वतःच्या कमाईचा गर्व चढतो की काय ..त्यांना नात्यांची पर्वाच नाहीये.. पन्नाशीनंतर त्यांची चूक त्यांच्या लक्षात येते हे कॉमन उदाहरण झालंय आताशा..

    ReplyDelete
  4. एकदम मस्त वाटावं असे सगळी कडे

    ReplyDelete

Post a Comment