अननस पार्टी

 

 अननस पार्टी


भूक नाही...पाणी पिऊन पोट भरलंय...सध्याच्या तीव्र उन्हाळ्यातला हा आपल्या सर्वांचा अनुभव. आमच्या घरातही सध्या यात दोन वाक्यांचा वरचस्मा आहे. पण हे असं वाक्य कितीही वेळा पुढे आलं तरी काहीतरी खायचं असतं, आणि ते खाण्यापूर्वी आपल्याला ते तयार करायचं असतं. त्यामुळेच असे संवाद चालू झाले की हमखास आमच्याकडे अननस पार्टी सुरु होते. एरवी अननसचा फक्त ज्यूससाठी वापर होतो. फारतर शिरा करतांना त्याची सोबत दिली जाते. पण उन्हाळा सुरु झाला की मी अननस पुलाव आणि अननसाची कढी हे दोन पदार्थ नक्की करतेच. शिवाय चटणी, सॅलेड, कोशिंबीर यामध्ये त्याचा सढळ हातानं वापर करते. आंबटगोड चवीचे हे फळ कुठल्याही पदार्थात गेल्यावर त्याची चव अधिक रुचकर करतं. मुख्यम्हणजे, उन्हाळ्यामध्ये भूक नाही...पाणी पिऊन पोट भरलंय, यावर हा अननस म्हणजे रामबाण उपाय. याच अननसाच्या रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करतेय.


अननसाचा पुलाव हा भन्नाट पदार्थ आहे. एका मंदिराच्या प्रसादाच्या थाळीमध्ये पहिल्यांदा या अननस पुलावाची चव चाखली होती. कांदा-लसूण वगळून केलेल्या या अननस पुलावाच्या प्रेमात आम्ही पडलो, त्याला दहा वर्ष होऊन गेली. त्या दहा वर्षात मी माझ्या सवयीप्रमाणे ही रेसिपी आलटून पालटून चांगली दहा-बारा वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली. सुरुवातीला अननस नेमका कधी वापरायचा, फोडणी घालतांना, भाज्या परततांना की पुलाव वाफेला लावतांना...यावरच बराच वेळ गेला. यातील प्रत्येक चवीमध्ये फरक होत गेला. शेवटी एकदा थोडासा कच्चा अननस वापरुन बघितला, आणि चमत्कार झाला. त्या पुलावाचा स्वाद एखादी जादुची काडी फिरवावी असा बहारदार झाला. बाकी तामझाम काहीही नाही. आपण आपल्या घरी पुलाव करतो तसाच करायचा. तशीच तयारी. तुम्हाला जो हवा तो तांदूळ घ्या. पण त्याला पंधरा मिनीटं भिजवून ठेवा. दालचिनी, लवंग, काळीमिरी, तेजपत्ता, हिरवी वेलची, मोठी मसाला वेलची, थोडं जिरं या खड्या गरम मसाल्याची फोडणी द्यायची. सोबतच जरा तिखट चविच्या मिरच्या. फोडणी तडतडली की त्यावर कांदा परतायचा. मग कांदा थोडा गुलाबी रंगाचा होत आला की तुम्हाला आवडतात त्या भाज्या घाला. मटार तर हवाच, सोबतीला फ्लॉवर, बटाट, फरसबी, गाजर, शिमला मिरची यांचीही साथ चांगलीच लागते. याच भाज्यांसोबत कच्च्या अननसाचे थोडे मोठे तुकडे घालायचे. आणि हे मिश्रण छान परतून घ्यायचे. दोन मिनिटानंतर अंदाजानुसार मिठ घालून पुन्हा परतायचे. यानंतर धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे. थोडी कोथिबीर आणि पुदिनाच्या पानं. पुन्हा मिश्रण ढवळले की गरम पाणी घालून एक चांगली उकळी आणायची. त्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा. पुलाव वाफेला लावतांना त्यात अगदी चमचाभर तुप घालायचं आणि एक वाफ द्यायची. उन्हाळ्यामध्ये अशा पुलावाची साथ द्यायला काकडी आणि

पांढ-या कांद्याची कोशिंबीर अगदी पुरेशी होऊन जाते. अननसाची आंबट गोड चव या पुलावाला येते. त्यामुळे ज्यांची भूक या गरमची झळ लागून पळाली आहे, त्यांच्यासाठी हा अननसाचा पुलाव अगदी योग्य उपाय ठरतो.

या पुलावासारखेच आणखी काही पदार्थांमध्ये अननसाचा वापर करता येतो. त्यातील एक म्हणजे, अननसाची कढी. ताकाची किंवा खोब-याचे दूध काढून आपण कढी करतो. अशीच कढी अननसाचा वापर करुनही करता येते. त्यासाठी नारळाचे दूध, कडीपत्ता, मिरच्या आणि फोडणीचे जिन्नस लागतात. तेलावर हे फोडणीचे जिन्नस चांगले तडडले की, त्यात कडीपत्ता, मिरच्या आणि अननसाच्या फोडी टाकायच्या हे किमान एक मिनिट तरी परतायचे. त्या अननसाचा सगळा स्वाद फोडणीमध्ये उतरला की, त्यामध्ये नारळाचे दूधाची दुसरी फेरी घालायची. ही दुसरी फेरी म्हणजे, नारळाचे दूध काढतांना पहिल्यांदा घट्ट दूध येतं. नंतर परत त्याच नारळ्याच्या चु-यामध्ये थोडं पाणी घालून एक मिक्सरची फेरी घ्यायची. त्यातून जे दूध निघतं ते थोड पाणेरी रंगाचं असतं. पण तेच दूध या फोडणीमध्ये घालायचं. आणि एक उकळी आणायची. ही उकळी आली की पहिल्या फेरीतील नारळाचं दूध, चवीपुरतं मीठ, किंचीत साखर आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. ही अननसाची कढी फार चवीची होते. विशेषतः तापामुळे तोंडाची चव गेली आहे, अशात तर ही कढी एक नंबर ठरते. अगदी मऊसर शिजलेला भात, अननसाची कढी आणि हौस असेल तर एखादा पोह्याचा पापड हा फक्कड बेत होऊन जातो.

अर्थात या दोन हक्काच्या पदार्थांसोबत काही अन्य पदार्थांमध्येही अननसाचा वापर माझ्याकडून मुबलक होतो. त्यातील बरेच पदार्थ हे अडल्याला काय....या वाक्यातून तयार झाले आहेत. एकदा चुकून एक कच्चा अननस कापला. त्याची एक फोड चाखली तर पार आंबट. अगदी दाताला झिणझिण्या येईल असा. अशा अननसाचे काय करायचे, हा प्रश्न पडला. अशात फ्रिजमध्ये थोडे कांदा-खोब-याचे वाटण होते. त्याचा वापर करुन मग या अननसाची आमटी


करायला घेतली. नेहमीचे फोडणीचे जिन्नस आणि कडीपत्ता, जोडीला कोथिंबीर अशी फोडणी केली. त्यावर तिखट, मिठ, हळद लावून ठेवलेले अननसाचे मोठे तुकडे परतले. नंतर अगदी एक मिनिट ते वाफेवर ठेवले. या अननसाच्या फोडी थोड्या खरपूस भाजल्यावर त्यात कांदा-खोब-याचे वाटण, चमचाभर गुळ आणि गरम पाणी घातले. हे मिश्रण चांगले पाच-सात मिनिट उकळले. थोड्यावेळात अननसाच्या या आमटीचा घमघमाट एवढा सुटला की विचारु नका. तरीही त्या आंबट अननसाची भीती वाटत होती. म्हणून आमटीत शिजून चांगली मऊ, लुसलुशीत झालेली फोड काढली, आणि थोडी गार झाल्यावर चाखून बघितली. त्या आंबट चवीऐवजी आता तिखट, गोड अशा चवीची साथ त्या फोडीला मिळाली होती. या अशा चवदार पदार्थांसह अननसाचा वापर आपल्या नेहमीच्या बुंदी रायतामध्येही सहज करता येतो. शिवाय सध्याच्या सुट्टीच्या सिझनमध्ये मुलांच्या खाऊसाठी होणा-या पिझामध्येही अननसाच्या तूप किंवा बटरमध्ये परतलेल्या फोडी पिझाची चव वाढवून जातात. अगदी सॅलेडमध्येही या अननसाच्या मोठ्या फोडी तिखट-मिठ लावून फ्रायरमध्ये भाजून वापरल्या तर सॅलेडची चव अधिक रुचकर होते, आणि पोषकही.  म्हणजेच काय....घरी महिन्यातून एकदा तरी अननस नावाचे सेमी काटेरी फळ आणायलाच हवे. कच्चे आणले तरीही ते वाया जाणार नाही, याची हमी आहे. बरं, तुमच्याकडे अननसाच्या काही रसदार रेसिपी असतील, तर त्याही नक्की शेअर करा....मी वाट बघते...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments