सूप डे......
आज काय करायचं...हा प्रश्न आता अधिक गंभीर होत चालला आहे. उन्हाचा कडाका जसा वाढत गेलाय, तशी भूक गायब होत चालली आहे. काही खाण्याची इच्छा नाही म्हणत, डोसे, अंबोळ्या, कढी भात, दहीवडे...अशी क्रमवारी सध्या घरात सुरु आहे. मात्र या सर्वात रात्रीच्या जेवणात काय...हा प्रश्नही बाकी रहातो. काहीतरी साधं, सोप्प...पण पोटभर...अशी अपेक्षा त्या पदार्थाकडून असते. अशावेळी हक्काचा एकच पदार्थ पुढे येतो, तो म्हणजे, सूप. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही एका आयुर्वेदिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती. योगायोगानं तिथे आम्ही गेलो, तेव्हाचा वार कुकींग क्लासचा होता. त्यादिवशी त्यांनी तब्बल वीस ते बावीस सूपचे प्रकार सांगितले, तेही विना तेलाचे...आणि आपण ज्या भाज्यांना नाक मुरडतो, त्याच भाज्यांचे. मला त्या रेसिपी लिहून घेतांना पहिल्यांदा शंका आली होती. पण नंतर रात्रीच्या जेवणात त्यातीलच एक सूप ताटात होतं. चक्क भोपळ्याचं सूप. त्यातही मीठ आणि तिखट नावालाही नाही. या भोपळ्याच्या सूपचा पहिला घोट घेतला आणि हे भोपळा सूप यापुढे घरी कायम होणार अशी खूणगाठ आम्ही दोघांनीही बांधली होती. त्याच भोपळ्याच्या सूपमध्ये अन्य जिन्नस घालून त्याची चव आणि पोषकता आणखी वाढवणा-या रेसिपी तिथून मिळाल्या. अर्थात आम्ही घरी आल्यावर लगेच संध्याकाळी जाऊन कधी नव्हे तो एक किलो भोपळा घेऊन आलो आणि या भर उन्हाळ्यात जेव्हा खाण्याची काही इच्छा नाही...हे प्रमाण
वाक्य बाहेर आलं, की आमच्याकडे लगेच या भोपळ्याच्या सूपची तयारी सुरु होते.
कधी येणार...कधी येणार...म्हणून यावर्षी जेवढी पावसाची प्रतीक्षा होत
आहे, तेवढी अद्याप कोणाचीही केली नसेल. बातम्यांमध्ये अमूक-तमूक ठिकाणी पाऊस
पडला...एवढी बातमी ऐकली, की माझी घालमेल सुरु होते. पडद्यांनी झाकलेल्या खिडक्या
मोकळ्या करत कुठे एखादा ढग दिसतोय का...म्हणून बसून रहाते. या सर्वातून आज रात्री
जेवणात काय....हा नव-याचा प्रश्न कानी आला की, जाग येते. एरवी गरम गरम नाचणी,
ज्वारी, बाजरीची भाकरी आणि चटणी सोबत असेल तरीही मला स्वर्ग सूख वाटतं. पण आता तिच
गरम भाकरी उन्हाच्या झळांमुळे नकोशी झाली आहे. मग यावर उपाय काय, तर भोपळ्याचं
सूप. गेल्या पंधरा दिवसांपासून दर दिवसाआड वेगवेगळ्या पद्धतीनं भोपळ्याचे सूप
आमच्याकडे होत आहे. मुळात भोपळ्याची भाजी केली तरी त्याला एखादा जोड पदार्थ करावा
लागतो, अशी या भाजीची लोकप्रियता. त्यात त्याचे सूप केले तर ते कसे लागेल, हा
मलाही प्रश्न पडला होता. त्यात माझ्यासमोर जे भोपळ्याचं सूप आलं, होतं, त्यात तर
मीठ आणि तिखटाचाही पत्ता नव्हता. पण अशा आळणी आणि बीनतिखटाच्या पदार्थांमधून
त्याची खरी चव समजते, हे ते सूप बनवणा-या काकांनी सांगितलं, आणि आम्ही विश्वासानं
पहिला घोट घेतला. अर्थात त्या काकांनी आधीच आम्हाला त्या भोपळ्याच्या सूपाची
रेसिपी सांगितली होती, सोबतच त्याच्याजोडीनं अन्य वीस प्रकारचे सूप कसे करायचे
होते, याचे धडेही दिले होते. आता तेच भोपळ्याचे सूप उन्हाळ्याचे साथीदार झाले आहे.
भोपळ्याचे सूप ही अगदी साधी पण तेवढीच पौष्टीक रेसिपी आहे. त्यासाठी काय घ्यायचे...अर्थात छान पिकलेला लाल भोपळा. त्याची साल काढून मोठ्या फोडी करायच्या आणि तेल किंवा तूप,बटर न घालता त्या छान परतून घ्यायच्या. भोपळा थोडा मऊ झाला आणि थोडं पाणी सुटल्यावर त्यात चमचाभर मगज बी घालायचे आणि पुन्हा छान परतून घ्यायचे. भाजणं आणि करपणं....या दोघांचा मध्य साधायचा. हे मिश्रण थंड झाल्यावर नंतर
मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे आणि त्यात आवश्यक तेवढे पाणी घालून एक उकळी काढावी. आम्ही आरोग्य केंद्रामध्ये जे सूप प्यायलो होतो, त्यात मीठ किंवी तिखट काहीही नव्हते. त्याऐवजी त्यांनी मिरपूड आणि काळं मीठाचे छोटे डबे समोर ठेवले होते आणि त्यावर आवश्यक असेल आणि गरज पडेल, तेवढेच घ्या...असे लिहिलेही होते. तेव्हाही आम्ही अगदी नावाला मीठ आणि मिरपूड घेतली होती. आता घरीही हे भोपळ्याचे सूप करतांना अगदी नावाला मीठाचा वापर होतो. काळीमिरीही तेवढीच. पण चवीच्या बाबतीत विचाराल तर काहीवेळा हे भोपळ्याचे सूपच आहे का, हा प्रश्न पडावा, अशी भन्नाट चव लागते.
याच भोपळ्याचा मुख्य जिन्नस म्हणून वापर करत मग त्याला अनेक रंगाच्या चवीमध्ये रंगवता येते. त्यात मगज बी सोबत अगदी दोन काजूही घातले तरी चव बदलते आणि अधिक क्रीमी स्वरुपाचे सूप लागते. याच सूपामध्ये भोपळ्याच्या सोबत टोमॅटो आणि कांद्याचा वापर केला तरीही चव छान लागते. मी हे असे टोमॅटो वापरुन भोपळ्याचे सूप केल्यावर त्याच्यासोबत तूप किंवा बटर लावून थोडे कुरकुरीत केलेले ब्रेडही करुन घेतले होते. आणखी हौस म्हणून तर त्या ब्रेडवर चीज घातले तेव्हा चवीची आणखी एक पायरी चढल्यासारखे झाले होते. शिवाय सूप आणि हे कुरकुरीत ब्रेड स्लाईस पोटभर होऊन जाते. या भोपळ्यासोबत गाजर, बीट, शेवग्याच्या शेंगा, दुधी, मक्याचे
दाणे, ब्रोकोली, शिजलेली मसूर डाळ अशी जोड देत नवनव्या चवीचा अविष्कार घडवता येतो. उन्हाळ्यात कुठलेही सूप करतांना त्यामध्ये लसूण, आलं आणि काळंमिरीचा वापर जरा जपून करा, असा सल्ला मला त्या आरोग्य केंद्रातून मिळाला होता. त्या सल्याप्रमाणे सध्या आमच्याकडे एक दिवसाआड सूप डे साजरा होत आहे. उन्हाच्या धारा कमी झाल्या की लवकरच येणा-या पावसाळ्यात या सूपमध्ये आलं, लसूण आणि काळीमिरीचा वापर करा...सर्दीचा त्रास होणार नाही, असा सल्लाही त्या काकांकडून मिळाला आहे. आता दिवसाआड हे सूप पितांना रोज आभाळ बघते...कधी येणार त्या सरी आणि कधी खाणार आम्ही काळीमिरी....असं झालं आहे...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
लहानपणी चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची आठवण झाली. आज परत आपल्या शब्दांनी अप्रतिम रित्या भोपळा सुपाची रेसीपी मस्त सजली, आता रविवारी ट्राय करावी लागणार
ReplyDeleteलहानपणी चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची आठवण झाली. आज परत आपल्या शब्दांनी अप्रतिम रित्या भोपळा सुपाची रेसीपी मस्त सजली, आता रविवारी ट्राय करावी लागणार
ReplyDelete