संसार आणि मोहमाया
काही ओळखी या अगदी सहज झालेल्या असतात, पण त्यांचे रुपांतर नंतर मैत्रीच्या नात्यामध्ये होते. या मैत्रीला वयाची बंधने नसतात. अशाच मित्रपरिवारापैकी एक कुटुंब म्हणजे, सुशिला मावशी आणि माधव काका. आमच्या रोजच्या चालण्याच्या रस्त्यावर नेहमी हे जोडपं दिसायचं. आमच्यासारखेच तेही बहुधा आम्हालाही बघत असावेत...त्यातूनच आम्हा चौघांच्याही चेह-यावर हसू यायला लागलं आणि त्या ओळखीचे चांगल्या मैत्रीमध्ये रुपांतर झालं. गेल्या दहा-बारा वर्षाची ही मैत्री आता कुटुंबातील रुसवे फुगवे दूर करण्यासाठी मदतीस येत आहे. अशाच एक रुसवा दूर करण्यासाठी माधवकाकांचा चार दिवसांपूर्वी फोन आला. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. ठरलेला विषय...यावर्षी जरा जास्तच उन आहे. मुलाची चौकशी. अगदी भाजी काय केली, याचीही चौकशी केल्यावर मग काका...काही बोलायचं आहे का...हे विचारलं. तेव्हा काका म्हणाले, तुझी मावशी जरा रागवलीय...माझ्यावर नाही तिच्या सुनेवर. मला तिचा राग कसा दूर करायचा कळत नाही, तुमचा चालण्याचा मार्ग आज जरा आमच्या घराकडे वळवा ना...म्हणून काकांनी फोनवरुन आग्रह केला. अर्थात त्यांना नाही बोलणं शक्य नव्हतं. संध्याकाळी त्यांच्या घरी सहज म्हणून फेरी मारली आणि नात्यातील एक होत असलेला नवा गुंता समोर आला.
खरंतरं सुशिला मावशी आणि त्यांची सून, जान्हवी यांचे खूप छान नातं आहे. त्यांचा मुलगा, साहील हा नोकरीनिमित्त बंगलोरला असतो. जान्हवीसुद्धा तिथेच नोकरी करते. तर मावशींची एक मुलगी लग्न करुन ऑस्ट्रेलियामध्ये कायमची गेली आहे. ती अगदी दोन वर्षातून एकदा येते. मावशी आणि काकाही तिच्याकडे जाऊन आले. पण तिथलं वातावऱण त्यांना फारसं झेपलं नाही, म्हणून आता त्यांचा दौरा होतो तो बंगलोरपर्यंतच. त्यांच्या मुलाला दोन मुलं आहेत. त्यांच्या शाळाही तिथेच. बंगलोरला कुटुंब असल्यामुळे साहीलनं तिथेच स्वतःचा ब्लॉक घेतला आहे. घर मोठं आहे. सुशिलामावशी आणि माधव काका लेकाकडे वर्षातले चार-सहा महिने रहायला जातात. पाऊस सुरु झाला की हे दोघं तिथे जातात, मग अगदी दिवाळी करुन इथे परत येतात. यानंतरही लेक आणि सूनेला काही गरज असेल तर दोघं बंगलोरला रहायला जातात. आता इथेच रहा म्हणून त्या दोघांचाही आग्रह असतो. पण या घराचा मोह सुटत नाही, म्हणून दोघं वर्षातले चार-पाच महिने इथे रहातात. या महिन्यात नातवंडांना सुट्टी आली, तर मुलगा आणि सून त्यांना घेऊन इथे येतात. फारकाय, दोन वर्षापूर्वी सुशिला मावशींचे एक ऑपरेशन झाले, तेव्हा जान्हवी त्यांच्यासोबत सावलीसारखी राहीली. डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिल्यावर त्यांना घेऊन बंगलारला घेऊन गेली. अगदी फुलासारखी जपलं मला, म्हणून मावशी तिचं न थकता कौतुक करत होत्या तेव्हा.
अशा गोड सासू सुनेच्या जोडीमध्ये मिठाचा खडा कसा पडला, म्हणून आम्ही
विचारल्यावर सुशिला मावशींनी तिच्या मनातील अढी आमच्यासमोर मांडली. सुशिला मावशींच्या
वयानं आता पासष्टी गाढली आहे, काका सत्तरीचे आहेत. आता आपल्या नंतर आपल्या
संसाराचे काय...हा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. त्यातही सुशिला मावशीला तिच्या संसाराची,
म्हणजे तिच्या भांड्याकुंड्याची विशेष काळजी आहे. घरातील प्रत्येक गोष्टीमागे एक
गोष्ट आहे. अशा वस्तूंचे आपल्यानंतर काय होणार याची तिला काळजी पडली आहे.
त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांना आहेरात खुपशी भांडी मिळाली होती. त्यांच्या
सासूबाईंनी ही सर्व भांडी माळ्यावर ठेवली. गावचं घर. तिथे सासूबाईंचा संसार आधीच होता. त्यातच ही नवी सून सामावून गेली. नंतर त्यांच्या मिस्टरांना, माधवकाकांना इथे शहरात नोकरी मिळाली. मग सुशिलामावशींच्या आहेरातील भांड्याच्या गोणी माळ्यावरुन खाली उतरल्या. सुरुवातीला त्यातील अगदी गरजेपूरती भांडी त्या घेऊन शहरात आल्या. इथे त्यांचा नवा संसार चाळीतील खोलीत थाटला. अगदी छोटीशी खोली, आणि त्यातच स्वयंपाकघर. त्यामुळे सुरुवातीला फारशी भांडी नव्हतीच. पण नंतर संसार बहरु लागला. दोन मुलं झाली, पाहुणे राहुणे येऊ लागले, आणि भांडी वाढू लागली. मग गावाकडे सासूबाईंनी सांभाळून ठेवललेली आहेरातील सर्व भांडी दिलीच शिवाय त्यांच्या संसारातील काही खास भांडीही सुनेकडे प्रेमानं दिली. त्यात तांब्याच्या कळशा आणि जुन्या समयांचाही समावेश होता. सुशिलामावशींनी सासूबाईंनी दिलेली भेट अगदी प्रेमानं सांभाळली. अगदी तांब्या-पितळेची भांडी स्वयंपाकघरातून बाद झाली तरी त्यांनी ही जुनी भांडी सांभाळून ठेवली आहेत.
सुशिलामावशींनी त्यांच्या बेचाळीस वर्षाच्या संसारात सगळा जीव लावला
तो त्यांच्या स्वयंपाकघराला. प्रत्येक दिवाळीला त्या नवी भांडी घेतात. त्यांच्यावर
त्यांची आणि कुटुंबातल्या सर्वांची नावं आणि तारीख. शिवाय, कुठल्या ठिकाणी फिरायला
गेलं, आणि तिथे नव्या पद्धतीची भांडी, ताटं दिसली की मावशी ते घेणारच. अशा
पद्धतीनं त्यांन त्यांच्या स्वयंपाकघरात पाटा,
वरवंटा ते अगदी छोटं जातही घेतलं आहे. कितीतरी प्रकारची ताटं आहेत. तांब्या-पितळेची
भांडी आहेत. मातीची भांडीही मावशीनं हौसेनं घेतली आहेत. आता याच सगळ्यांचे करायचे काय हा
प्रश्न मावशीसमोर आहे.
कारण त्यांच्या लेकानं तिकडे बंगलोरमध्ये स्वतंत्र संसार थाटला आहे.
जान्हवीनं तिच्या गरजेनुसार तिचे स्वयंपाकघर सजवले आहे. ती इथे आल्यावर
सुशिलामावशींनी तिला इथली काही भांडी तिकडे घेऊन जाऊया म्हणून सुचवले होते, पण उगाच
कशाला तिकडे, तिथे आहेत, ती भरपूर आहेत. गरज पडल्यावर नवीन घेऊ...या जुन्या
भांड्यांपेक्षा नवी भांडी अधिक चांगली असतात, म्हणून तिनं तेव्हा टाळलं. नाही
म्हणायला, मावशींनी त्यांच्या गावचं घर आता चांगलं सुसज्ज केलं आहे. तिथे ब-यापैकी
भांडी आणि कपडे नेऊन ठेवले आहेत. पण आपल्यानंतर तिथेही कोण जाणार आहे का, हा प्रश्न
त्यांना त्रस्त करु लागला आहे. आपल्या नंतर आपल्या संसाराचे काय, हा प्रश्न आता
माझ्या साड्यांचे काय होणार, घराचे काय होणार...असा व्यापक होऊ लागला आहे. एक-एक
मणी त्यांच्या चिंतेच्या माळेत सामील होऊ लागला. परिणामी मावशींची तब्बेत थोडी बिघडली.
आम्ही भेटायला गेलो, तेव्हा हे सगळं सांगत असतांना मावशींच्या डोळ्यात पाणी आलं
होतं. हौशेनं जमवलं आहे बघ सर्व, आता सुनेनं नाही म्हटलं, तर या सर्वांचं काय
होईल. म्हणून त्यांनी डोक्याला हात लावून घेतला. वास्तविक या नको त्या चिंतेमुळे
त्यांनी एका चांगल्या नात्यामध्ये उगा गाठी मारायला सुरुवात केली होती.
नातं हे पाण्यासारखं असतं. साठवलेल्या पाण्यात खाली शेवाळ जमा होतं. पण नदीचं पाणी कसं असतं. खळखळतं...नात्याचंही तसंच. एखादी गोष्ट मनात ठेवली तर ती नंतर हा शेवाळरुपी दुरावा आणते आणि उगा चांगल्या नात्याचा विचका होतो. मी मावशींना या सर्वांवर फक्त जान्हवीबरोबर बोला, म्हणून सुचवले. सुरुवातीला तिच्यासोबत कसे बोलायचे...तिला काय सांगू...तिला काय वाटेल...असे बोलणा-या मावशी नंतर तयार झाल्या. दोन दिवसातच मावशी आणि माधव काका सकाळी घरी आले, तेव्हा त्यांचे चेहरे बघून सर्व पुन्हा
सुरळीत झाल्याची पावती मिळाली. त्या रात्री मावशींनी त्यांच्या मनातले विचार जान्हवीला सांगितल्यावर ती तिकडे खळवळून हसली. तुम्हाला काहीही होत नाही आई, अजून नातवांची लग्न लावायची आहेत, म्हणून त्यांच्या मनातील भीती आधी दूर केली. नंतर राहिला त्यांचा भांड्यांचा प्रश्न. त्यावर जान्हवीनं, असं काही झालं तर त्यातील उपयुक्त भांडी गावच्या घरी घेऊन जाईन, म्हणून सांगून मावशींना सुखद धक्का दिला. ती आणि मावशींचा मुलगा निवृत्त झाल्यावर आपल्या गावीच जाऊन रहाण्याचा विचार करत होते, हे ऐकून मावशी अधिक सुखावल्या. त्यात राहता राहिला मावशींच्या साड्यांचा आणि अन्य सामानाचा प्रश्न. जान्हवी पुढच्या भेटीमध्ये घरामधील या जास्त असणा-या वस्तू कुठल्याशा आश्रमाला आणि गरजवंताला देणार होती. तुम्ही कुठलीपण काळजी करता आई, ही काय काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का...आम्ही आहोत...काळजी करु नका...असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि इकडे सुशिला मावशींनी देवच पावला म्हणून हात जोडले.
नातं हे असंच असतं. सहज आणि सुंदर...जिथे संवाद संपतो...तिथे नातं जड
होतं...त्यातून आलेला दुरावा समोरच्या व्यक्तीची संपूर्ण प्रतिमाच बदलून टाकतो....आणि
चित्रपटला व्हिलन आपल्या आय़ुष्यात आल्याचा भास होतो...मग सुंदर नात्याला पिळ बसत
जातो...हा पिळ वेळीच सुटावा असं वाटत असेल तर संवाद साधा...हा संवादच नात्यातील
सुंदरता पुन्हा मिळवून देतो...सुशिलामावशीच्या आणि जान्हवीच्या नात्यासारखी...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
विसंवादांमुळेच सर्व नातेसंबंधांमधे कटुता येत असते,पण तरी संवाद बंद न करता चालू ठेवणं हेच त्यावर उत्तर असतं.किती छान सांगितलंय तुम्ही!!
ReplyDeleteएका ठराविक वयानंतर वस्तू,स्थान,व्यक्ति याधली भावनिक गुंतवणूक ही कमी कायला हवी,आसक्ती कडून थोड्या विरक्ती कडे जायला हवे!! आवा चाली पंढरपुरा सारखे वागणे टाळायला हवे !!
Very Useful information 👍 thank you dear 😊
ReplyDeleteखूपच मस्त .......
ReplyDelete