त्या एका जागेसाठी..
स्टॅंडअप कॉमेडी हा प्रकाराबाबत मी तेवढी उत्सुक नाही. मात्र लेकाला यातील बरीच माहिती....त्यामुळे तो आला की तो त्याच्या आवडत्या स्टॅंडअप कॉमेडियनचे शो आवर्जन बघायला लावतो. नवी पिढी...नवा दृष्टीकोन...लेकही हेच सांगतो. हे बघ...यातून नवं काहीतरी सुचेलं...पण यावेळी स्टँडअप कॉमेडीनं जो राळ उठवला आहे, ते बघून डोक्याला हात लावला आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोमध्ये मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणा-या सेजल पवार नावाच्या मुलीवर आता चहूबाजुनं टीका होत आहे. सेजल ही मुंबईतील प्रसिद्ध केईएम मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. वैद्यकीय शाखेच्या कुठल्याही विद्यार्थ्यांला विचारा...त्याचे केईएम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे स्वप्न असते. अशा कॉलेजला याच सेजलनं चिंधी म्हणत तिथल्या प्राध्यापकांचीही सोशल मिडियावर यथेच्छ टिंगल केली. सेजलला तिच्या या कृतीबद्दल केईएम मेडिकल कॉलेजच्या
व्यवस्थापनाकडून १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. याबाबत तिची चौकशीही चालू आहे. या सर्वानंतर सेजलला केईएम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशच कसा मिळाला, याबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत. ती सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय आहे. तिचे अनेक आक्षेपार्ह व्हडिओ आता सोशल मिडियावर फिरत असून ही डॉक्टर झाल्यावर काय करणार...असा प्रश्नही विचारला जात आहे. या सर्वात मेडिकल कॉलेजमध्ये दाखला मिळण्यासाठी वादग्रस्त ठरलेल्या नीट परीक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेले आठवडाभर प्रणीत मोरे आणि सेजल पवार प्रकरण पहातांना, वाचतांना
मला माझ्या आसपास असणा-या अनेक विद्यार्थ्यांची आठवण झाली. माझ्या परिचित
अनेकांच्या मुलांनी या नीट परिक्षेची तयारी करतांना त्यांना आलेला अनुभव मला आजही
आठवतो. त्या मुलांची एका जागेसाठी चाललेली धडपड आणि अपेक्षित मेडिकल कॉलेज न
मिळाल्यामुळे आलेली कमालीची निराशा....मी पाहिली आहे. यातील काही विद्यार्थ्यांना
या निराशेतून बाहेर काढून नव्या वाटेवर मार्गस्थही केले. या सर्व गुणी
विद्यार्थ्यांची आणि त्या सेजल पवारची तुलना होऊच शकत नाही. पण त्यांना त्यांच्या मेहनतीला
न्याय न मिळता, ज्यांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल जराही आदर नाही, अशांना तिथे जागा
मिळते, हे बघून मात्र मन दुःखी होते.
सहा वर्षापूर्वी घटना आहे. तेव्हा माझ्या एका जवळच्या मैत्रिणीची मुलगी नीटची तयारी करत होती. लहानपणापासून तिचं एकमेव स्वप्न, ते म्हणजे डॉक्टर होण्याचे. लहानपणी बाहुलीसोबत खेळली नाही...तर स्टेथोस्कोप आणि एप्रनसोबतच खेळली...हे सांगतांना माझी मैत्रिण हरखून जायची. मात्र हिच मुलगी दोन वर्ष नीट देऊनही अपेक्षित मेडीकल कॉलेज मिळत नसल्यामुळे
कमालीची निराश झाली होती. गुण अगदी सहाशे पर्यंत होते. पण सरकारी मेडिकल विद्यालयात ओपनसाठी या गुणांवर प्रवेश मिळत नव्हता. प्रायव्हेट कॉलेजमधील फी चा आकडा बघितला आणि माझ्या मैत्रिणीचे डोळे विस्फारले होते...फक्त एक-दोन गुण कमी होते...मैत्रिण जेवणाच्या ऑर्डर घेते, तिचे पती इलेक्ट्रीशियनचे काम करणारे...त्यामुळे कर्ज काढायचीही त्यांची हिंमत होत नव्हती. दुस-यावेळी आलेल्या अपयशानंतर त्या कुटुंबानं हाय खाल्ली. ती मुलगी तर एक कोपरा पकडून बसली. मी तिच्या घरी गेले तेव्हा त्या मुलीची अवस्था पाहून अस्वस्थ झाले होते. शेवटी आता काय करायचं ही चर्चा सुरु झाली. त्यावर प्रत्येक पर्यायाला या मुलीचा नकार होता...झाले तर डॉक्टरच होईन...नाहीतर घरी बसेन...हा तिचा पवित्रा. शेवटी हो ना हो करता, पॅरा मेडिकलचा पर्याय सुचवला. आधीच दोन वर्ष मेडिकलच्या नादात खराब झाली, तुझ्यासोबतची मुलं पुढे गेली...आता हे तरी कर...म्हणत वडिलांच्या डोळ्यात पाणी आल्यावर मुलगी तयार झाली. हैद्राबादच्या एका कॉलेजमध्ये पॅरा मेडिकलच्या प्रवेशाची परीक्षा दिली. त्यात ती गुणवत्ता यादीत आली. चक्क नव्वद टक्के प्रवेश शुल्क माफ झाले. त्यामुळे तिच्या पालकांना हॉस्टेल आणि अन्य खर्च परवडला. मुलगी हैद्राबादच्या कॉलेजला गेली. पहिल्या वर्षापासून तिन जो पहिला नंबर पकडला तो चार वर्ष टिकवला. कॉलेजचं गोल्ड मेडल मिळवलं, शिवाय चांगल्या ठिकाणी इंटरशिपही. तिथेच पुढचे शिक्षण घेण्यासाठीचे पैसे गोळा केले. जर्मनीमधील एका विद्यापीठाची परीक्षा दिली. त्यातही चांगली स्कॉलरशिप मिळाली. ही स्कॉलरशिप मिळाल्यावर आईवडिलांना बातमी दिली. त्यांना हा सुखद धक्का होता. जर्मनीला जाण्यापूर्वी आठवणीनं माझ्याकडे पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली होती. पेढा हाती देऊन पाया पडली तेव्हा, मावशी तिथे डॉक्टरेट करण्याची
संधीही आहे....तू बघच माझ्या नावापुढे डॉक्टर असे लागेलच...म्हणत मिठी मारली....तेव्हा आमचे सर्वांचे डोळे भरुन आले होते....एका शुल्लक नियमामुळे या गुणी मुलीची संधी हिरावण्यात आली होती...पण तिच्या गुणांच्या आधारे तिनं तिला जे साध्य करायचं होतं, ते तिनं करुन दाखवलं होतं.
अजून एक उदाहरण. आमचे नेहमीचे उसाच्या रसवाले दादा...त्यांच्या मुलाचंही डॉक्टर व्हयचं स्वप्न. माझ्या लेकापेक्षा एक वर्षानं लहान. अनेकवेळा आमची स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासाची पुस्तके त्याला दिली आहेत. हा मुलगा नववीपासून नीटच्या तयारीला लागला. तेव्हा त्या दादांनी चांगल्या क्लासची चौकशी केली होती. त्यांना मी, मला माहित असलेल्या नीट परीक्षेसाठी चांगली तयारी करुन घेणा-या क्लासची माहिती दिली. त्यातील एका क्लासमध्ये या मुलांनं प्रवेश घेतला आणि तो अहोरात्र परीक्षेची तयारी करु लागला. चार-आठ दिवसांनी दादांची भेट झाल्यावर ते आवर्जून मुलाची अभ्यासातील प्रगती सांगायचे. शेवटी ती नीट झाली. पण या मुलाचा नंबर कुठल्याही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये लागला नाही. खाजगी मेडिकल कॉलेजची करोडच्या घरातील फी ऐकल्यावर मात्र हे दादा हतबल झाले. आता काय करु, म्हणून त्यांनी विचारल्यावर आमची अनेक पर्यायांवर चर्चा झाली. त्यात रशियामधील मेडिकल कॉलेजचाही समावेश होता. रशियामधील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करुन देणा-या एका ठाण्याच्या संस्थेचा त्यांना पत्ता दिला. पण काळजीपूर्वक निर्णय घ्या...म्हणूनही सांगितले. कारण तेव्हा रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष झाले होते. पुढचा आठवडा त्या दादांनी आणि त्यांच्या मुलांनी ठाण्याच्या त्या संस्थेमार्फत सर्व माहिती मिळवली. काही सेमिनारही ऐकले. मग रशियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे निश्चित केले. पैशांची जमवाजमव झाली. बॅंकेतून कर्ज घेतले. त्यांच्यासाठी मुलगा रशियाला जाऊन शिकणार ही मोठी गोष्ट होती. मी त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेले तेव्हा त्या युद्धाचा उल्लेख केला, तेव्हा मला ते दादा म्हणाले, जायद्याहो...युद्धाचं काय...मुलगा डॉक्टर होण्यात आमचा आनंद आहे, म्हणत त्या कुटुंबांनं सर्व निराशावादी विचार दूर सारले. आज तो मुलगा गेली तीन वर्ष रशियामध्ये आहे. तिथे गेल्यावर वर्षभरानं एकदा भारतात आला, तेव्हा भेटला...रशियाची हवा त्याला चांगलीच मानवली होती. मुळात आपल्याला जे हवं ते शिकता येत आहे, याचा आनंद त्याच्या चेह-यावर दिसून येत होता. आताही ते दादा आठवड्यातून चार वेळा भेटतात....दरवेळी लेकाची चौकशी होते, आणि त्याच्या
प्रगतीच्या खुणा वडिलांच्या चेह-यावर पाहून समाधान वाटते.
ही दोन उदाहरणं इथे दिली पण असे अन्यही काही विद्यार्थी आसपास आहेत. ज्यांना
मनापासून मेडिकलमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. त्या अभ्यासक्रमातील कुठल्याही गोष्टीची
त्यांना घाण वाटत नाही की, त्याची ते टिंगल करत नाहीत. उलट आपल्याला अभ्यासात असे
करावे लागेल...तसे करावे लागेल...याची त्यांना उत्सुकता आहे. पण यासाठी त्यांना ती
जागा लागणंही गरजेचं आहे. ही मुलं सर्व प्रलोभनांना दूर सारत अभ्यास एके अभ्यास
करत आहेत. त्यापैकी बहुतेकांनी सोशल मिडियाला दूर सारले आहे, काही तर जेवणाची कडक
पथ्य पाळत आहेत...सण, समारंभातील आनंदावर पाणी सोडत आहेत....हे सर्व का...तर त्या
नीट परीक्षेसाठी. त्यानंतर मिळणा-या चांगल्या मेडिकल कॉलेजच्या स्वप्नासाठी ही
मुलं दिवस रात्र एक करत आहेत. अशा मुलांच्या मेहनतीवर या सेजल पवार सारख्या आडकाठी
बनत आहेत....मेडिकलचा अभ्यास करणारी ही मुलगी सोशल मिडियावर जास्त वेळ काढते...तिच्या
कपड्यांबद्दल नाव ठेवण्याचा प्रश्न नाही...तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे...पण
अभ्यासाव्यतिरिक्त सर्व काही करणारी ही मुलगी आता तणावात आहे, असं तिचे पालक
सांगतात...मात्र या पालकांना नम्र विनंती आहे, तुम्ही मेडिकलची एक अमुल्य जागा
अडवून ठेवली आहे...आपल्या मुलीची आवड पाहून तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात टकलं
असतं तर हा आत्ताचा तणाव तिच्या वाट्याला आलाही नसता...अर्थात तिनं जी जागा अडकवली
आहे, ती आता मोकळी केली तरी काहीही उपयोग नाही...कारण त्या पोकळीत त्या एका जागेसाठी
इच्छुक असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे उसासेच ऐकू येणार आहेत....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
अतिशय उत्तम लेख आहे. आजच्या घडणाऱ्या गोष्टी तुन बऱ्याच गोष्टी मध्ये बदल आवश्यक आहे. विशेष करून वैद्यकीय शिक्षणात तरी. आणि शिक्षणक्षेत्रात तरी 👍
ReplyDeleteखर आहे सरकारी नोकरीत येणाऱ्यांची मानसिक तपासणी झाली पाहिजे. बिना लायकीचे असा उडाण टप्पू लोक सरकारी नोकऱ्या करतात त्यांची सोय होते पण लोकांचे प्रश्न तसेच राहतात.
ReplyDeleteखूप छान लेख!! कशाचाही अट्टाहास वाईटच,मेडिकल ला पर्याय आहेत,डेंटल,पॅरा मेडिकल वगैरे! 'जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया' असा दृष्टिकोन हवा!!
ReplyDeleteबाकी त्या हिणकस विनोदाबद्दल बरेच काही लिहून झाले आहे,पण अशा 'अमानुष'व्यक्तीची डॉक्टर होण्याची लायकी नाही हे खरे आहे !!!
डॉक्टर पदवी घेऊन प्रॅक्टिस न करता केवळ अभिनय क्षेत्रात मिरवणाऱ्या लोकांना काय आनंद होतो. आणि त्यांच्या चाहत्यांनाही काय आनंद होतो कल्पने पलीकडचं आहे...
ReplyDeleteमेडिकल प्रवेश मिळवून मेडिकल प्रॅक्टिस न करणारे शेकडो लोक आहेत. अगदी iAS, IPS मधेही. मोरारजी देसाईंच्या मते हा निव्वळ वेळ पैसे यांचा अपव्यय आहे. ह्यांच्याकडून व सेजल सारख्यांकडून सर्व खर्च व्याजासकट वसूल करायला पाहिजे.
ReplyDeleteअगदी खरं आहे खूप छान लेख आहे.
ReplyDeleteSejal Pawar's insensitive remarks on social media are insulting to the Donors who have donated their bodies. And yes blocking some deserving student's chance to join the noble profession.
ReplyDeleteआजचे हेच विदारक वास्तव आहे...merit ला zero value आहे ... असो कालाय तस्मै नमः
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete