लगीन घाई.....
सध्या बातम्या सिया, केतन आणि चेतन या तीन नावांभोवती फिरत आहेत. सिया गोयल या अवघ्या वीस वर्षाच्या तरुणीवर तिच्या होणा-या नव-याला, म्हणजेच सव्वीस वर्षाच्या केतन अग्रवालला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या लोहगड या किल्ल्यावरुन ढकलून दिल्याचा आरोप आहे. तिच्या या कृत्यामध्ये तिला तिचा सहकारी असलेल्या, तेवीस वर्षाच्या चेतन चौधरी या तरुणानं मदत केल्याचा संशय आहे. गुन्हा उघडकीस आल्यानंतर सिया आणि चेतन यांना अटक झाली आहे. तर केतनचे सर्व कुटुंब धक्क्यात आहे. केतन उच्चशिक्षित होता. एकत्र कुटुंब पद्धती जपणा-या या अग्रवाल कुटुंबाच्या व्यवसायाची धुरा त्याच्या हातात देण्याची तयारी सुरु होती. त्याच्या लग्नासाठी अवघं कुटुंब तयारीला लागलं होतं. कोट्यवधी रुपयांची बुकींग करण्यात आली होती. अशा आनंददायी वातावरणात सुरुवातीला मुलाच्या अपघाती निधनाची बातमी आली. त्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याची कुटुंबाला शंका आली, मग तपास झाल्यावर त्या घरची होणारी भावी सूनच प्रमुख आरोपी ठरली. बरं या मुलीचे कुटुंब आणि अग्रवाल कुटुंबाची ओळख तब्बल पस्तीस वर्षापासूनची. त्यामुळेच ओळखीच्या घरातील मुलगी आहे, या एकमेव आधारावर हे लग्न ठरलं आणि अग्रवाल कुटुंब आपल्या मुलाला हरवून बसलं.
पुण्यामध्ये घडलेल्या केतन अग्रवालच्या हत्येनंतर अग्रवाल कुटुंबाला
जेवढा धक्का बसला आहे. तेवढाच धक्का ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोहचली आहे, अशा
सर्वांनाच बसला आहे. या घटनेनंतर सोशल मिडियावर सिया आणि केतनचे अनेक व्हिडिओ
व्हायरल झाले आहेत. केतनचे वडिल प्रसार माध्यमांमध्ये मुलाखत देतांना अनेकवेळा
सिया खूप हट्टी आहे, तिच्याबद्दल काही चौकशी केली आहे का, अशी विचारणा केतन करीत
होता, असा दावा करीत आहेत. सियाच्या काही व्हिडिओ बद्दलही वाद आहेत. सिया एका
क्लबमध्ये वाढदिवस साजरा करत असल्याचाही व्हिडिओ आहे. या व्हिडिओवरुन सियाला
केतनच्या आईनं ओरडा दिल्याची बातमीही आहे. सियाच्या वागण्याबाबत या कुटुंबानं
तिच्या आत्याकडे नाराजी व्यक्त केली होती, मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करण्यात
आलं, त्याचं पर्यावसन या हत्याकांडामध्ये झालं.
हे सर्व प्रकरण बघितल्यावर लगीन घाई...हा आपला शब्द आठवला. लग्नाची गाठ ही स्वर्गात बांधली जाते अशी आपली श्रद्धा आहे, पण या वाक्यावर अतीश्रद्ध ठेवली तर हे वाक्य अंधश्रद्धेसारखं होतं, आणि याच अंधश्रद्धेचा फटका अग्रवाल कुटुंबाला बसल्याचे या सर्व प्रकरणातून स्पष्ट होत आहे. बरोबर सोळा वर्षापूर्वीची एक घटना मला या सर्व प्रकरणानंतर आठवली. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीचे लग्न ठरत होते. मैत्रिणीनं लग्नाची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली. अगदी बोलणी करण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत. दोघांनी पसंतीचा होकार दिल्यावर पुढची तयारी सुरु झाली. खरेदी कऱण्याआधी मुलाची आपण पुन्हा चौकशी करायला हवी, या मताची मी होते. मुलाचे स्थळ ओळखीतून आले आहे, त्यामुळे चौकशीची काहीही गरज नाही, असं मत मैत्रिणीच्या कुटुंबियांचे पडले. पण मैत्रिणीचा माझ्यावर ठाम विश्वास. तिनं, तुला चौकशी करायची आहे ना, मग कर. म्हणून मला ग्रीन सिग्नल दिला. मग त्या मुलाच्या कंपनीमध्ये मी जाऊन त्याच्या वरिष्ठ अधिका-यांना भेटले. मुलाचा स्वभाव कसा आहे, याची विचारपूस केली. त्यांनी मग त्याच्या काही मित्रांनाही बोलवून घेतले, आणि माझी ओळख करुन दिली. त्या सर्वांनी मुलगा सुस्वभावी असल्याची पावती दिली. अर्थात ही गोष्ट त्या मुलाला कळली. त्यानं त्याच्या घरी याची माहिती दिल्यावर त्या कुटुंबानं
आक्षेप घेतला. आमच्या मुलाची चौकशी करण्याची काय गरज आहे, आम्ही सांगितलं होतं, मुलगा कसा आहे ते, तुमचा आमच्यावर विश्वास नाही का...म्हणून प्रश्न विचारले. थोडे दिवस तणावाचे वातारवण होतं. पण मी त्या मुलाला आणि त्याच्या आईला जाऊन भेटले. लग्न हे जीवनासाठीचे गोड बंधन आहे. अशा बंधनात बांधले जाण्यापूर्वी, मुलाची काय आणि मुलीची काय...दोघांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या स्वभावाची माहिती हवी, एवढी माझी भूमिका असल्याचे त्या मुलाच्या आईला सांगितले. तुम्हीही आमच्या मुलीची चौकशी करायला पाहिजे, त्याशिवाय लग्नाची घाई करु नका, दोघांचीही मत पुन्हा जाणून घ्या, म्हणून माझी भूमिका स्पष्ट केली. यानंतर वातावरण निवळलं. मुलाच्या आईनं माझी बाजू स्विकारली. वर्षभरातच हे लग्न पार पडलं. आता त्या जोडप्याचा मोठा मुलगा दहावीला आहे, तर धाकटी मुलगी सातवीला आहे. आता मुलाचे कुटुंबियही आपलेसे झाले आहेत. सुरुवातीला मुलगा नेहमी मला चिडवायचा...मावशी, बघा, तुम्ही चौकशी केल्याप्रमाणेच आहे ना मी....पण आता त्याची भूमिका बदलली आहे. आमच्या दोन मुलांच्या लग्नाची जबाबदारीही तुम्हालाच घ्यावी लागणार आहे, असं हक्कानं तो सांगतो, तेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा होतात.
केतन अग्रवालच्या हत्येची बातमी वाचतांना सोळा वर्षापूर्वीच्या या
लग्नातल्या आठवणी माझ्यासमोर ताज्या झाल्या होत्या. लग्न जुळवतांना विश्वासाची
मोठी सांगड घालावी लागते. ही सांगड घातलांना दोन्ही बाजुंची खातरजमा झाली की नात्याची
विण घट्ट होत जाते. या सर्वातच कुठेतरी अग्रवाल कुटुंब कमी पडलं. ओळखीतल्या
कुटुंबातून आलेलं स्थळ म्हणून होकार दिला आणि पुढचा सगळा विनाश होऊन बसला....आता माझ्यापुढे
त्या दुर्देवी मुलाची आई येत आहे...मी काय पण आपल्यापैकी कुणीही तिला भेटलं नसेल.
पण तिचा आक्रोश मात्र प्रत्येकाला मुळापासून हादरवणारा आहे...त्याचा दोष
काय...आमचा दोष काय....लग्न करायचं नव्हतं तर नाही बोलायचं...मारायचं कशाला...या
तिच्या प्रश्नावर कोणाकडेही उत्तर नाही...केतन अग्रवालचे कुटंब आता पुढे
काय...केतन शिवाय आपले आयुष्य कसे शून्य आहे हे सांगत आहे....या कुटुंबानं केतन
आणि सियाच्या लग्नासाठी तब्बल सतरा करोड खर्च करुन जयपूरमधील अलिशान महल बुक केला
होता. सोबतच हॉटेल आणि चार्टर विमानांचेही बुकींग केले होते. लग्नासाठी देशातील नामवंत इव्हेन्ट मॅनेजमेंट
टीम कामाला लावली होती. पण या सोहळ्यातील एक उत्सवमूर्ती काळाच्या पडद्याआड गेली
आहे, आणि दुसरी व्यक्ती सध्यातरी तुरुंगात आहे.
सियाचे पुढे काय होईल, ती त्या, राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी सारखी १० ते ११ महिन्यानंतर जामिनावर येईल, आणि मिडियाला आपण कसे निर्दोष होतो, अशा मुलाखती देत सुटेल...अशा मिम्सने सोशल मिडिया भरला आहे. अर्थात काही दिवसानं या सर्वांवर पांघरुण पडेल....चर्चा शांत होतील. चर्चेसाठी आणि मिम्ससाठी वेगळे विषय मिळतील. त्यावर रिल येतील...समाज काही दिवसांनी कोण केतन आणि कोण सिया...हा प्रश्न विचारेल...पण ज्या घरातून तरुण मुलगा अचानक गेला आहे, तिथे मात्र कायमचा दुःखाचा डोंगर राहणार आहे. शिवाय प्रश्न अनेक राहतील. लग्न ठरवण्याआधी फक्त ओळखीतून सोयरीक आली आहे, आपल्या जोडीचे घराणे आहे, या व्यतिरिक्त थोडी मुलीची चौकशी करायला हवी होती. मुलगा आणि मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलांना लग्नाबाबत मोकळेपणानं विचारुन विवाह नक्की करायला हवा होता. फक्त घराणं मोठं आहे....हा एक निकष ठेऊन विवाहाच्या गाठी बांधल्या जातात....आणि तिथे लगीन घाई...संकटात नेई...याचा प्रत्यय येतो....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
लग्न सोहळा हा दोन कुंटूबाचा कायमचा मिलाप असतो. आजकाल हा सोहळा इव्हेंट, फोटोसेशन, व्हिडिओ, रिल्स, हायफायचा देखावा झाला आहे. आता यासाठी कायदा करण्याची पाळी येऊ नये इतके तारतम्य पाळण्याची गरज आहे.
ReplyDeleteखुपचं छान!
ReplyDeleteबरोबर आहे.
पण असे काही घडत नाही.