ती..मी..एक आई
कशी आहेस...हा एकच प्रश्न तिला विचारला, आणि कधीपासून रोखून ठेवलेला तिचा एक हुंदका बाहेर आला. ती...म्हणजे, अल्का...माझी एक मैत्रिण. दोन दिवसांपूर्वी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात अल्काला मी बघितलं, आणि काळजीपोटी तिला फोन केला. त्यानंतर अर्धातास तरी आम्ही मैत्रिणी बोलत होतो. अल्का नक्कीच आजारी होती, पण तिचा आजार हा मानसिकच अधिक होता....त्यात लोकं अशी का वागतात...हा प्रश्न सातत्यानं येत होता. तो एका आईचा प्रश्न होता...त्यामुळे तिच्या या प्रश्नानं माझ्याही मनाचा ठाव घेतला होता...अर्थात अल्काचा फोन झाल्यावर मी सुद्धा काही काळ स्तब्ध झाले.
अल्का आणि मी गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ एकमेकींच्या मैत्रिणी आहोत. आमची दोघींची मुलं, शाळेत असतांनापासूनचे मित्र. त्यामुळे आमची मैत्री होणं स्वाभाविकच. मुलांचे शालेय शिक्षण झाले, मग पदव्या झाल्या. आता ही मुलं भरारी घेण्यासाठी घराबाहेर पडली आहेत. मुलांचा एकमेकांशी सोशल मिडियाद्वारे संपर्क असतो. आणि आम्ही दोघींची मैत्री, फोनवर किंवा असंच कधी एकमेकींच्या घरी जाऊन पोटभर गप्पा मारुन ताजी टवटवीत होत आहे. अल्काचा लेक सध्या परदेशी आहे. तोही भल्यामोठ्या जहाजावर. गेल्या वर्षभरापासून अल्काचा अर्णव घरी आलेला नाही. सध्या जे युद्धासदृश्य वातावरण आहे, त्यात अर्णव असलेले जहाजही अडकलेले आहे. हे जहाज म्हणजे, एक शहरच आहे. त्यावर सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. अवाढव्य असलेल्या या जहाजाला काहीही नुकसान होऊ नये म्हणून संबंधित कंपनीनं जहाज जिथे आहे, तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायानं अर्णव गेले दोन महिने एकाच जागेवर आहे. अर्णव रोज त्याच्या आईला फोन करतो. कधीकधी रेंज नसेल तर इथे अल्काचा जीव वरखाली होतो. गेल्या काही दिवसांपासून तिनं रोजच्या बातम्या बघणंही बंद केलं आहे. तिचे पती, म्हणजेच अर्णवचे वडिलही काळजीत आहेत. पण अल्काच्या मनाची अवस्था पाहून त्यांनीही तिच्या या कृतीला समर्थन दिलं आहे. पण एवढं करुनही अल्काची मनस्थिती अधिक बिघडत गेली. त्याला कारण ठरले ते तिला येणारे फोन.
अर्णवचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यानं मरिन इंजिनिअरिंगचा पर्याय निवडला आणि तो ती पदवी घेऊन मोठ्या कंपनीत रूजूही झाला. अर्णव, सोशल मिडियावर त्याचे त्या मोठ्या जहाजावरील वेगवेगळे फोटो शेअर करत असतो. तो ज्या शहरवजा जहाजावर कामाला आहे, त्यावरुन त्यानं अनेक देशांना भेट
दिली आहे. त्याच्यासाठी हा एक्साईटींग करणारा अनुभव आहे. अवघं जग फिरायचं हे त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात येत असल्यानं त्याच्यासह त्याच्या आई वडिलांनाही त्याचं कौतुक आहे. या सर्वात अनेकांनी त्यांना अर्णवचे पॅकेज किती, तो त्याला मिळणारा पगार कसा खर्च करतो, घरी किती पैसे पाठवतो, याची चौकशी केली. अल्का आणि तिच्या पतीनं यामध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता ही माहिती सांगितलीही. मात्र आता अर्णवचे जहाज अडकल्यावर परिस्थिती बदलली. तिच्याकडे अर्णवची चौकशी करणा-या फोनची संख्या जशी वाढली, तसे नको ते सल्लेही येऊ लागले आहेत. मुलाला भरपूर पगार आहे, पण पगारापेक्षा एकुलत्या एका मुलाची काळजी करा...आता आला की, त्याला इथेच कुठेतरी नोकरी शोधायला सांगा....एवढा पगार काय कामाचा...जीव महत्त्वाचा...लेकाच्या पगारामागे धावू नकोस...असे नको ते सल्ले आहेतच, सोबतच जणू ही मंडळी खरोखरच अर्णवचे जहाज जिथे आहे, त्या भागात जाऊन पहाणी करुन आली आहेत अशा आवेशात...आला का फोन, परिस्थिती खराब आहे तिथली, काही खरं नाही...यावेळी युद्ध भयंकर होतंय तिथं, असे सल्ले देणा-यांचाही समावेश आहे. खरंतर या फोनमुळेच अल्काची तब्बेत बिघडली आहे.
या लोकांना काय बोलायचं हे कळतं का....कोणी मी कशी आहे, याची चौकशी करत नाही. तर अर्णव कसा आहे, तो आहे, तिथंली परिस्थिती भयंकर आहे, जणू तो आता घरी परत कधी येणारच नाही, असे घाबरवणारे फोन येण्याची संख्या वाढली आणि अल्काच्या बीपीला धडकी भरली. त्यात रात्री झोप येईना. परिणामी तिला ताप भरला आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली. डॉक्टरांनी तिला औषधं दिलीच सोबतच टिव्हीपासून आणि मोबाईलपासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे. अल्का सध्या आराम करत आहे, अगदी मोजके फोन ती उचलते. त्यात माझ्या फोनचा समावेश होता. माझ्या कशी आहेस, या प्रश्नावर तिच्या मनातला हा सगळा कोंडमारा बाहेर आला. आम्ही काही पैशासाठी लेकाला दूर पाठवलं आहे का...त्याची आई आहे मी...लेकापेक्षा पैशावर मी प्रेम करेन का...हे लोकं समजून का घेत नाहीत. मुलांनी त्यांची स्वप्न पूर्ण करायची नाहीत का...आणि प्रत्येक ठिकाणी काय मखमली गाद्या अंथरुन ठेवलेल्या असतील का...अडचणी या येणार...त्यांना घाबरुन आपण आपल्या मुलांना कधी मोकळ्या आकाशात सोडायचंच नाही का...आज अडचणी येतील, आणि उद्या त्यावर तोडगाही निघेल. अर्णव काही एकटाच नाही,
अशी अनेक मुलं आहेत ग....फक्त मला आणि या अन्य आयांना थोडा दिलासा हवा आहे. बस्स...फक्त आम्हाला फोन करुन नको ती चौकशी करणा-यांना एवढी समज आली तरी खूप झालं...अल्का हे सर्व बोलून शांत राहिली.
यावर मी अल्काला माझा ठेवणीतला सल्ला दिला. जे आपल्याला समजून घेत
नाहीत, ती लोकं आणि जे आपल्याला समजून आपल्या सोबत उभं रहातात, ती आपली लोकं...लोकं
आणि आपली लोकं, यात आपण कोणाला निवडायचं आणि कोणाचं ऐकायचं, हे आपणच ठरवायचं असतं.
नको ते सल्ले देणा-यांचं तोंड कधी धरता येत नाही, हा माझाही वैयक्तिक अनुभव. मलाही
आठवड्यातून एकदा तरी, लेकाला एवढ्या दूर कशाला ठेवलं, आपल्याकडे नोक-या नाहीत
का...असा सवाल करत फोन येतातच. प्रत्येकाला आपली आणि मुलांची भूमिका पटवून
सांगायला गेलं, तर नको तो मनस्ताप होतो. तशाच तापासून सध्या अल्का जात आहे. अर्थात यामुळेच आपल्या जाणकारांनी ऐकावे जनाचे
आणि करावे मनाचे, ही म्हण शोधून काढली होती...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
अलकाबाईंना मनात येणारे प्रश्न, चिंता व त्यामुळे निगेटिव्ह पण येत असल्याने त्यांच्या मनावर व शरीरावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांना औषधापेक्षा जास्त मनात पॉझिटिव्ह विचार आणणारे पुस्तक वाचायला दिले तर त्या धीट होतील आणि त्यातून त्यांच्या मनातील धास्ती निघून गेली की त्या पुन्हा पहिल्यासारख्या होऊन जातील.
ReplyDeleteहो कधी कधी आपल्या मुलाला साधा आजार असतो पण आसपासच्या लोक अरे बापरे! असं झालं का ?अरे देवा! असं बोलून मनात भीती भरवतात त्यामुळे आपण जास्तच हबगतो
ReplyDelete