आज पुन्हा अपर्णा भेटली
काही व्यक्ती भेटल्या तर काय बोलावं....हा पहिला प्रश्न उभा रहातो. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे अपर्णा. बाईंचा तोराच एवढा की, ती समोर आली की काय बोलावं हा पहिला प्रश्न उभा रहातो. पण यावेळी अपर्णा भेटली ती पूर्णपणे बदलेली. रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी मी मोठी पिशवी घेऊन दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले. जरा गर्दी कमी असेल हा माझा होरा साफ चुकला होता. त्यामुळे हातातील यादीनुसार भराभर खरेदी सुरु केली. अशातच घोटभर पाणी पिण्यासाठी थांबले आणि मागून कोणीतरी खांद्यावर थोपटले. पाण्याचा घोट गालात भरुन मागे पाहिले तर अपर्णा. तिला पाहताच ते पाणीसुद्धा एवढं पटकन घशाखाली उतरलं की ठसका लागला. अग किती घाई करतेस, हळू हळू म्हणत तिनं पुन्हा तसंच थोपटलं, तेव्हा मी चमकून तिच्याकडे पाहिलं. या अपर्णाची माझ्या मनात दहशत फार...पण त्यादिवशी माझ्यासोबत जी अपर्णा होती, ती थोडी वेगळी वाटली.
थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अपर्णा चल कॉफी पिऊया, म्हणत मला हॉटेलमध्ये घेऊन गेली, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. एक कोपरा पकड़ून आम्ही दोघी बसलो, तेव्हा माझं लक्ष घड्याळाकडे होतं. माझा तो अस्वस्थपणा पाहून अपर्णा म्हणाली, जुन्या मैत्रिणीसाठी आता तुझ्याकडे दोन तास सुद्धा नाहीत. एवढी बिझी झालीस....तिच्या या शब्दांनी मी भानावर आले. पुन्हा एकदा अपर्णाकडे पाहिलं. आम्ही दोघीही समवयीन. मी ज्या अपर्णाला ओळखायचे, ती अगदी वेगळी होती. प्रचंड आत्मविश्वास किंवा गुर्मी तिच्या चेह-यावर कायम असे. समोरचा काय बोलतोय, त्याच्या भावना काय...याची कसलीही तमा न ठेवता, ती त्याची बिंधास्त टर उडवायची. आपलंच किती बरोबर आहे, मी किती मोठी आहे, हे ती त्या व्यक्तीसमोर अशा शब्दात मांडायची की, मग तो समोरचा व्यक्ती कायम तिच्याबद्दल मनात अढी ठेऊन रहात असे. मी सुद्धा त्यातलीच एक. कधीकाळी आमची छान मैत्री होती. पण अपर्णाच्या या स्वभावामुळे कुठेतरी दुखावलेली मी...तिच्यासमोर दूर झाले. आता ब-याच वर्षांनी तिच अपर्णा समोर आली होती, ती अगदी वेगळी होती. खांदे झुकलेले होते, आणि नजर मवाळ...
अपर्णा आणि मी समवयीन. अपर्णाचे लग्न थोडं लवकर, म्हणजे वयाच्या बावीसाव्या वर्षी झाले. घरात मोठी असलेली अपर्णा सासरी धाकटी सून झाली. पण हा धाकटेपणा तिला त्रासदायक ठरला. दोन वर्षाच्या कुरबुरीमुळे वैतागलेली अपर्णा माहेरी आली. नवरा समजवायला आलाही, पण अपर्णा अडून बसली. कुटुंबापासून दूर रहायला जायचे, दुस-या शहरात नोकरी करायची, यावर ती ठाम होती. तिची नव-यानं खूप समजूत काढली, पण अपर्णा मागे हटली नाही. किंबहुना तिच्या आई वडिलांनीही तिची बाजू धरुन ठेवली. दुस-या शहरात घर खरेदी करुन देण्याची तयारी दाखवली. पण नव-याला ही अट मान्य नव्हती. जवळपास पाच वर्षानंतर अपर्णानं घटस्फोट मिळवला. या सर्वात तिच्या धाकट्या भावाचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो नोकरीनिमित्त अमेरिकेला रवाना झाला. दोन वर्षांनी तो आला तो लग्न करुन पुन्हा गेला. इकडे हटून बसलेली अपर्णा माहेरी मुक्कामी राहीली, ती कायमची.
घटस्फोटाच्या आधी एक वर्ष तिच्या नव-यानं पुन्हा तिला समजवायचा प्रयत्न केला. पण आता तुझ्यात आणि तुझ्या कुटुंबात कुठलाच इंटरेस्ट नाही, मी माझी जगू शकते, स्वतंत्र आहे...असं सांगून ती मोकळी झाली. घटस्फोट झाल्यावर अपर्णानं आई वडिलांसह हॉटेलमध्ये छानसी पार्टीच साजरी केली.
याच सर्वात तिची आणि माझी ओळख झाली होती. तेव्हा नोकरीनिमित्त मी नेहमी ठाण्यापर्यंत प्रवास करायचे. दोघींचीही ट्रेन एकच. अशात अगदी थोड्या गप्पा व्हायच्या, मग ओळख अधिक वाढल्यावर गप्पा मारण्यासाठी आम्ही एकमेकींच्या घरी जायचो. तेव्हा अपर्णा नावाचे गारुड माझ्यावर स्वार होते. तिचा तो स्वतंत्रपणा भारी आवडायचा. अत्यंत रोखठोक स्वभाव. कुठलिही गोष्ट आवडली नाही, तर ती स्पष्ट सांगायची. एवढं स्पष्ट की समोरच्याची पार पीसं काढून टाकायची. ती म्हणेल ती पूर्व दिशा....तिच्या ऑफीसमध्ये ती वरिष्ठ पदाला होती. पगारही चांगलाच. घटस्फोट मिळाला, तेव्हा तिच्या चेह-यावरचा आनंद मला आत्ताही आठवतो. तेव्हा, मी मोकळी झाले, एकदाची सुटले त्या बंधनातून...कसंलही स्वातंत्र्य नाही, हे कसलं, सहजीवन....म्हणत कितीतरी वेळ ती तिच्या न जुळलेल्या वैवाहिक जीवनातील दोन वर्षावर बोलत होती. त्यातूनच तिच्या सासरची माहिती मिळाली होती. एकत्र कुटुंब होतं. आई, मोठा भाऊ, भावाची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा. पण अपर्णाला स्वतंत्र रहायचं होतं. त्यातूनच सुरु झालेल्या कुरबुरी थेट घटस्फोटापर्यंत पोहचल्या. नव-याला घटस्फोटासाठी पाच वर्ष कसं तंगवलं हे सांगतांना अपर्णा जोरजोरानं हसत होती. नंतर अपर्णाचं हे हसू वाढतच गेलं. तिचे कायम प्लॅन तयार असायचे. फिरायची तिला फार हौस. दर शनिवार-रविवार ती कुठल्या ना कुठल्या ट्रेकला जायची. तसा मलाही आग्रह व्हायचा. पण एकमेव रविवारच्या सुट्टीमध्ये त्या ट्रेकपेक्षा घर महत्त्वाचं वाटायचं. घराची आवराआवर, पुढच्या आठवड्याची भाज्यांची तयारी, झालंच तर नातेवाईकांच्या भेटी, नव-याबरोबर भटकंती किंवा एखादा पिक्चर...असं सर्व माझं शेड्यूल. मग अपर्णा यावरुन चिडवायला लागली. काय हे...तुला काही स्वतःचं आहे की नाही....कधी तरी बाहेर पड...बाहेरचं जग बघ...हे ती सांगायला लागली, की मी तिला सांगायचे,
हेच माझं जग आहे ग...पण मग तिचं ते खास हसू बाहेर पडायचं.
काही वर्षांनी लेक झाल्यावर माझी ट्रेन सुटली आणि अपर्णाची भेटही कमी झाली. ती दोन-तीन महिन्यातून कधीतरी घरी यायची...तिला गप्पा मारायच्या असायच्या आणि मला लेकाच्या मागे धावायचं असायचं....मग अपर्णा भेट आवरती घेत रवाना व्हायची. नंतर तिच्या या भेटी कमी झाल्या. अपर्णाच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळाल्यावर मी तिच्या घरी गेले. तेव्हा लेक शाळेत जाऊ लागला होता. माझ्याकडे वेळ होता, म्हणून ब-यापैकी गप्पा झाल्या. एव्हाना अपर्णा अमेरिका, युरोप फिरुन आली होती. भारतातील अनेक ट्रेकींग स्थाने तिनं पालथी घातली होती. तिचा ट्रेकींगचा ग्रुप तयार झाला होता. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिचं दुःख हलकं करण्यासाठी मी गेले तेव्हा, तिनं आपण एकटे कसे फिरतोय, किती स्वावलंबी झालोय...दुनिया बघण्यातला आनंद किती आहे, हे मला रंगवून सांगितले. मी छान म्हटले, तुझं कौतुक आहे, असं सांगून तिच्या आईशी खुशाली विचारुन बाहेर पडले. वडील गेल्यावर तिचा भाऊ काही दिवसांसाठी आला होता, तेव्हा त्यानं अपर्णाला दुस-या लग्नाचा सल्ला दिला. पण अपर्णानं नकार दिला. भाऊ निघून गेल्यावर अपर्णासाठी तिची आईच तिचं अवघं विश्व बनलं. अर्थात या सर्वात अपर्णाचा स्वभाव थोडा चिडका झाला. ऑफीसमध्येही तिचं फारसं कोणाशी जमायचं नाही. सहज कधी भेटल्यावर सर्वांना मुलांशिवाय कोणीही दिसत नाही. त्यांच्या मुलांचं कौतुक ऐकून मला कंटाळा आलाय, असं म्हटल्यावर मी माझ्या मनातील शब्द मनातच ठेवायचे आणि तिचा निरोप घ्यायचे. एकदा तिच्या घरी काम करणा-या मावशी भेटल्या होत्या. तेव्हा अपर्णा आणि तिच्या आईचं हल्ली रोज भांडण होतं, म्हणून सांगत होत्या. पण अपर्णाच्या कुठल्याही विषयात बोलणं म्हणजे, तिचा तो अहंभाव दुखावण्यासारखंच होतं. आता पाहुणेही फार कोणी येत नव्हते. कारण फार आधीपासून अपर्णानं कौटुंबिक कार्यक्रमांना जाण्याचं टाळलं होतं. अशा कौटुंबिक कार्यक्रमाला
गेल्यावर घरातल्या महिला, गप्पा मारतांना मुलांच्या शाळांचा, त्यांच्या प्रगतीचा मुद्दा असायचा. कोण किती मस्ती करतो, कोण कुठल्या खेळात पुढे आहे, कोण अभ्यासात पुढे आहे...अशा गप्पांमध्ये अपर्णा मागे पडायला लागल्यावर तिनं अशा कौटुंबिक कार्यक्रमापासून दूरावा केला. तिची आई गेल्यावर तर अपर्णाचं घर अगदी भकास वाटायला लागलं. त्यावेळी मी तिच्या घरी सात्वनासाठी गेले, तेव्हा भाऊ आला नाही, मी एकटीनं सर्व विधी केले, हे ठणकावून सांगणारी अपर्णा कुठेतरी दुखावल्यासारखी वाटत होती.
त्यानंतर ती मला भेटली ती थेट एकदम बदललेली अपर्णा. माझ्यासमोर होती.
अगदी शांत. कॉफीचा एक एक घोट शांतपणे घेत अपर्णा, फार एकटं वाटतं ग..असं म्हणाली,
तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं. वेळ परत येत नाही....टाईम मशीन ही कंसेप्ट
वास्तवात नाही....हे या अपर्णाला समजलं होतं. तिच्या नव-यानं घटस्फोटानंतर चार वर्षांनी लग्न केलं
होतं, घटस्फोटानंतरही तो अपर्णासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी एकदा
घरीही आला होता, पण अपर्णाच्या आईनं, माझ्या लेकीबरोबर बोलायाचा प्रयत्न केलास, तर
पोलीसात जाऊ...म्हणून त्याला धमकावलं. अपर्णाची आई गेल्याची माहिती मिळाल्यावर
तिची एकेकाळची जाऊबाई, तिच्या घरी आली होती. तेव्हा तिला बघून अपर्णाला धक्का बसला
होता. तिनंच ही माहिती तिला सांगितली. आम्हाला तू हवी होतीस, पण ती वेळच बरोबर
नव्हती....आता कधी काही लागलं, तर हक्कानं सांग...म्हणून तिचा निरोप घेतला, तेव्हा
अपर्णा तिला मिठी मारुन हमसाहमशी रडली. मलाही ही घटना सांगतांना ती रडत होती. तिचं
सांत्वन कसं करायचं....माझ्याकडेही त्यासाठी शब्द नव्हते. आता नोकरीतून निवृत्ती
घेऊन कुठल्याशा आश्रमात जाण्याचा तिचा विचार चालू होता. तिथल्या लहान मुलांमध्ये
ती तिचं बालपण शोधण्याचा प्रयत्न करणार होती, आणि जमल्यास आयुष्याचे धागे पुन्हा
जोडण्याचाही...जाण्यापूर्वी तुझ्या घरी नक्की येते, म्हणून तिनं सांगितल्यावर मी
तिला जेवायलाच यायचं आमंत्रण दिली. लेक काय करतो तुझा...आता खूप मोठा झाला असेल
ना...म्हणत तिनं लेकाची चौकशी केली, तेव्हा तिच्या बदलत असलेल्या स्वभावाची पावती
मिळाली. बदल होता, आणि तोही चांगलाच.... वादळ स्थिरावू पाहत होतं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow,
Share आणि Comment करा
खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक व्यथा मांडली आहे ! कधी कधी तरुणपणी आपल्या स्वतःच्या मिजासीत निर्णय चुकत असतात. पण त्यावेळी कुटुंबातील जेष्ठ किंवा योग्य व्यक्तीचा सल्ला मानायला हवा! नाही तर आयुष्याच्या उत्तरार्धात निर्णय चुकीचा वाटतो पण उपयोग नसतो. टाईम मशीन उलटं फिरत नाही प्रत्यक्षात..
ReplyDeleteअशा व्यक्ती पाहिल्या आहेत,सिंहाच्या तोर्यात जगणार्या! पण सिंहही म्हातारा होतोच कधीतरी,छान लिहिलंय तुम्ही नेहमीप्रमाणेच !!
ReplyDeleteअशा कथा आपल्या अगदी आजूबाजूला घडत आहेत त्यामुळे ही व्यथा चांगल्या पद्धतीने मांडली आहेस....ललिता छेडा
ReplyDeleteआपल्या आजुबाजुला अशा गोष्टी घडतात . वाचताना खरे आपण अनुभवले असे वाटले
ReplyDeleteघरच्यांचे लाड, स्वभाव व त्यामुळे झालेली सवय यामुळे तिला वाटले हा तोरा आणि ही मस्ती शेवटपर्यंत राहील. पण तिला माहीत नव्हते का बदलत असतो. अपर्णाची आई देवा घरी गेल्यावर जाऊ भेटायला येते म्हणजे एक प्रकारे तिच्या एक्स पती व त्यांच्या कुटुंबीयांचे चांगलेच झाले असेच म्हणावे लागेल.
ReplyDeleteसत्य परिस्थिती लेखात मांडलेली आहे.🤙
ReplyDelete