हो, मी हाऊस वाईफ आहे...
विवारची सकाळ....आळसावलेली...थंडी असूनही पेपर वाचण्याची हौस झोपू देईना....त्यात रविवारी व्यायाम बियाम नाही...त्यामुळे कॉफीचा मग आणि पेपर...पेपर वाचून झाला...कॉफीचे दोन मग रिचवले तरी आळस जाईना...मग नेहमीचा उपाय केला...सक्काळ सक्काळ भाजी छान मिळेल म्हणून घराबाहेर पडले...सर्व छान होतं...ओळखीचे चेहरे दिसत होते...मुळात रविवार असल्याने डब्याची घाई नव्हती...निवांतपणा चांगला सुखावत होता...रस्त्यात माझ्यासारखीच बाहेर पडलेली एक जुनी मैत्रिण भेटली...रविवार असल्याने मासे आणण्याची जबाबदारी तिच्यावर होती...तिच्यासोबत चालत गप्पा सुरु झाल्या....ती नोकरी करणारी...त्यामुळे तिचं व्यस्त शेड्युल ऐकून झालं.  नेहमीची धावपळ...ट्रेन म्हणजे जीवनच...त्यात सध्या किती गर्दी असते...त्यातून आमच्या डोंबिवलीतून ट्रेन पकडणं म्हणजे किती अवघड....परत येतांना तशीच दगदग....मग अशा दगदगीमध्ये एखादी सुट्टी लागून आली तर त्यासारखं सुख कशात नाही...बरोबर होतं तिचं...काही वर्षापूर्वी मी सुद्धा अशाच बिझी शेड्युलचा अनुभव घेतला होता...त्यामुळे हे सर्व मला ओळखीचे वाटत होतं...तिच्या बोलण्यात मी माझे पूर्वीचे दिवस आठवत असतांनाच या माझ्या या सो–कॉल्ड मैत्रीणीने जुन्या आठवणीतून गचकन वर्तमानकाळात आणले...
काय ग, तुझं काय...सध्या घरीच ना.....बरं आहे बाई...एवढी दगदग नाही...आराम आहे...तुझा वॉक चालू आहे का अजून...बरं आहे...आम्हाला काय वेळचं नाही...तू घरी आहेस म्हणून जमतंय.  आमचं काय रविवारी असा होईल हा  तेवढाच व्यायाम....अजून अस्स काही बाही तिचं बोलणं चालू झालं...माझा रविवार छान सुरु झाला होता, पण आता मला ठाऊक होतं... मनाला कितीही समजावलं तरी ही गोष्ट माझ्या मनातून जाणार नव्हती...मी मनातून नाराज झाल्याचं त्या मैत्रिणीला समजलंही नाही...तिचं मी आणि ती प्रकरण सुरु होतं...मग मी मधली पळवाट शोधली...समोरच्याच दुकानात थांबले आणि तिची रजा घेतली...

खरंतर या मैत्रिणीने काही चुकीचं सांगितलं नव्हतं.. मी घरीच आहे...म्हणजे नोकरी करत नाही...पण म्हणजे माझी किंमत शून्य का....नक्कीच नाही..आणि घरी आहे म्हणजे दिवस-रात्र आराम आहे, असंही नाही...वास्तविक कधी कधी ऑफीसला असते तर आराम मिळाला असता असं वाटावं, एवढा कामाचा पसारा आवरावा लागतो...पण तरीही मी आणि माझ्यासारख्या ज्या महिला आहेत,  त्यांच्या घरकामाला काही किंमत समोरचा देतो किंवा नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे...माझ्या मैत्रिणीचे चुकीचे नक्कीच नव्हते, मी घरी आहे...कितीतरी महिला नोकरी न करता घर सांभाळतात...पण त्यात कमीपणा आहे का...नक्कीच नाही...त्यामुळेच माझ्या मैत्रिणीने केलेली त्यातील तुलना आणि अहंमची भावना चुकीची होती....मी घरी आहे....पैसे कमवून आणत नाही, म्हणजे माझे मुल्य तिने झिरो मोजले होते....अर्थात त्यामुळे मला वाईट वगैरे वाटलं याची तिला कळजी नव्हती...ती तिचा रविवार सुखकर आणि माझ्या रविवार सुखावर विरझण टाकून निघून गेली होती.
काही वर्षापूर्वी मुलासाठी मी नोकरी सोडली आणि आता पूर्ण वेऴ घरी आहे.  हा निर्णय घेतांना मानसिक ओढाताण खूप झाली...मुळात घराचे आर्थिक गणित...नव-यावर पडणारा सर्व खर्चाचा भार..घराचे हफ्ते...काटकसर...अशा नकोनको त्या बाबींचा विचार झाला.  नवरा ठाम होता...मुलाला तुझी गरज आहे, त्याचं बालपण पुन्हा येणार नाही...थोडी काटकसर करुया हे त्याचं मतं आणि तो त्यावर ठाम राहीला....माझी होणारी मानसीक ओढाताण त्याला समजत होती...हातातली चांगली नोकरी,  नोकरीमुळे मिळालेली ओळख हे सर्व एका बाजुला आणि लोकांना काय सांगायचं हा प्रश्न एका बाजुला...या सर्वात मुलाचा आणि नव-याचा विजय झाला...मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला...पहिल्यांदा छान वाटलं...आराम कोणाला आवडत नाही...माझंही तसंच होतं. पण नंतर मी नोकरी सोडली याची काळजी माझ्यापेक्षा बाहेरच्यांना किती आहे याची जाणीव होऊ लागली...काही जणांनी दु:ख व्यक्त केले...तू आता करणार काय...असा प्रश्नही काहींना पडला...मुलांमुळे का...अशी हळहळ व्यक्त करुन मुलाला दोषी ठरवलं गेलं....या प्रश्नांनी मी सुरुवातीला एवढी बेजार झाले की या अती चौकस परिचितांपासून दूर पळत होते.  नोकरी सोडल्याच्या माझ्या मनातल्या दु:खाला अशांनी खतपाणी मिळत होतं.  पण या सर्वांत मी माझं लिखाण चालू ठेवलं...बरं ते समजल्यावर काहींनी तर किती पैसे मिळतात असा (आगाऊ)प्रश्नही विचारला...या परिस्थितीतून बाहेर यायला मला वेळ लागला..इकडे मुलगा सुखावला...त्याचा प्रगती दुप्पटीने होऊ लागली..शाळा...खेळ..शाळाबाह्य उपक्रम..यात त्याचा सहभाग वाढला.  मुलाच्या प्रगतीकडे पहात चौकस प्रश्नांना हाताळायचे कौशल्यही मला आले....काही दिवसांतच पाककला, विणकाम, वॉलपेंटींग, हॅन्डी क्राफ्ट असे काही ना काही चालू झाले. केक चॉकलेटच्या अनेक व्हरायची येऊ लागल्या..घराच्या भिंती वारली मधुबनी पेंटींगने सजल्या... वरदचं ग्राऊंड..त्याच्या  स्पर्धा...अभ्यास...शिवाय घरातली सर्व कामं...अशा मोठ्या चक्रात मी सामावून गेले.  आता सकाळी चार वाजता उठणं मला हेक्टीक वाटत नाही...घरात केकपासून सिझलरपर्यंत मी आरामात करते.  माझा मुलगा दहावीला असूनही  शिकवणीला जात नाही.  शिवाय घरात घरकामासाठी बाई नाही...म्हणजे मी कमवती नसले तरी बरीच माझ्या वेळेचा चांगला उपयोग करतेच की....
माझ्यासारख्याच अनेक महिला आज फक्त घर सांभाऴतात...मुलं...त्यांचा अभ्यास..त्यांच्या अभ्यासाव्यतिकिक्त अन्य घडामो़डी...घरातील सर्व कामं... बॅंक, भाजी मंडई, घरखर्चांचे नियोजन...असं सर्व घर त्यांच्या ताब्यात...शिवाय शेजार-पाजार...नातेवाईक, मित्र-मैत्रिणी....या आघाड्याही सफाईदारपणे सांभाळतात...माझ्या अनेक मैत्रिणी नोकरी करत नाहीत...पण त्या काय-काय नाही करत...हे सांगायची सोय नाही...मान्य त्या नऊ ते पाच या वेळेत ऑफीसला जात नाहीत...त्यासाठी प्रवासाची दगदग करत नाहीत...ऑफीसच्या कामाचं दडपण त्यांच्यावर नसतं...पण मैत्रिणींनो, नुसतं घर सांभाळणं म्हणजेही मोठं कसब आहे.  आता बघा... एकीची दोन्ही मुलं उत्तम खेळाडू...त्यांच्या शाळांच्या वेऴा वेगवेगळ्या..मग काय या बाई सकाळपासून गाडीवरच असतात...सकाळी लवकर उठून डबे प्रकरण...बरं मुलं खेळात असल्यानं त्यांचं डायट खाणं वेगळं....सकाळी मोठ्याला शाळेत...मग धाकट्याला...दुपारी त्यांना शाळेतून घ्यायचं...अभ्यास...मग ग्राऊंड...मधल्या वेळेत बॅंकेची कामं..डॉक्टर...भाजीची तयारी....पाहुणे..असं काही न काही चालूच....एक मैत्रिण म्हणजे अन्नपूर्णेचं दुसरं रुप...घरात सिझन नुसार भाज्या अन् फळं... अगदी हिरवे चणे, तूरीच्या शेंगा ते केळफूलाच्या भाजीपर्यंत बारीक काम...कोणी अचानक जेवायला गेलं तरी ताटात कमीतकमी दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर असं पूर्ण जेवण... सदा हसतमुख...सर्व सार्वजनीक कार्यामध्ये पुढे....अशा एक ना दोन महिला माझ्या परिचयाच्या आहेत...तुमच्याही असतील...मला त्या सर्वांचं कौतुक वाटतं.  नाही जमलं त्यांना नोकरी करणं...पण आपली कौटुंबिक जबाबदारी त्या चोख पार पाडत आहेत.  आणि याचं कौतुक व्हायलाच हवं. 
मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा काहींनी नाना प्रश्न विचारुन मला बेजार केलं होतं...एवढं की त्यांच्यापासून लपून राहवं असं वाटायचं...पण काही मैत्रिणींनी खूप चांगली साथ दिली...मी कशी एकटी राहणार नाही याच्या अनेक टिप्स दिल्या....आणि एकटं का नाही रहावं हेही सांगितलं... स्वत:चा लूक हाऊस वाईफ म्हणून कसा जपावा आणि अपटूडेट कसं रहावं हेही सांगणा-या अनेक जणी होत्या...नशिबाने खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या.. आपण जे करतो ते बरोबरच...या त्यांच्या अधिकारवाणीने नेहमी नवे शिकण्याची सवय लागली...आता सो कॉल्ड नोकरी करत नसले तरी माझे दैनंदिन वेळापत्रत नोकरदार महिलेसारखे व्यस्त आहे.
खरं तर नोकरी करणा-या महिलांचेही कौतुक आहे...त्यांची कसोटी मोठी असते.  पण घर सांभाळणा-या महिलाही अशीच कसोटी नेहमी देत असतात. हेही ध्यानात ठेवायला हवे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  पण दोघींनीही एकमेकींचा मान...आदर ठेवला पाहिजे...मी मोठी की तू मोठी हा वाद आला की मनभेद येणार...मला माझी जाणीव करुन देणारी एक मैत्रिण याच भेदामुळे काही काळ तरी दुरावली...असा माझ्यासारखा अनुभव अनेकींना येत असेल...आपण प्रत्येकजणी आपापल्या जागी फिट्ट आहोत.. समोरच्या व्यक्तीच्याही काही भावना असतील, हे जाणून आदर ठेवावा ही अपेक्षा मात्र आहे...
थोडं वेगळं
काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधेयक संसदेत मांडले आहे.  सुट्टीच्या दिवशी अथवा कार्यालयीन  कामकाजाच्या वेळेनंतर कामासंबंधीचे कॉल आणि ईमेलला नकार देणे त्यामुळे शक्य होणार आहे.  या विधेयकाचे नाव राईट टू डिसकनेक्ट असे आहे.  कामाच्या कार्यायीन वेळेव्यतिरिक्त कार्यालयातून योणा-या कामासंबंधीच्या कॉल आणि इमेलपासून दूर राहण्याचा अधिकार त्यामुळे मिळणार आहे.  शिवाय सुट्टीच्या दिवशी वा कामाच्या वेऴेशिवाय बॉस आणि कार्यालयातून येणारे कामासंबंधी कॉल आणि ईमेट रिजेक्ट करण्याचाही अधिकार आता मिळणार आहे...हे सर्व छान आहे. चांगले आहे.  पण आमचे काय....आमची चोवीस तास ड्युटी आहे ना...या सुट्टीच्या दिवशी चोवीस काय पण अठ्ठेचाळीस तास झाले तरी घरातली कामं संपत नाहीत.  हो ना.....





सई बने
डोंबिवली


Comments

  1. सईजी अतिशय छान लिहलय आपण

    ReplyDelete
  2. खुप छान मनोगत व संदेश, अप्रतिम.

    ReplyDelete
  3. Saglya house wife aaj tuzyamule khush hotilani tyanasudha man sanman ahehe he tuzya lekhatun dakhvlas farch Chan

    ReplyDelete
    Replies
    1. हो..ब-याच वेळा गृहिणी असेल तर तिला काही समजत नाही असं समजतात..पण ती खरी शक्ती असते...गृहिणीला मान मिळाला पाहिजे...आणि त्यांनीही स्वतःला कमी लेखू नये

      Delete
  4. खुप सुंदर लेख वाचून मला व माझ्या बायकोलाही खुप आवडला असेच लेख पाठवत रहा माझ्या बायकोचा आत्मविश्वास वाढला

    ReplyDelete
    Replies
    1. छान...तिच्या प्रतिक्रीयेनेही मला बरं वाटलं..धन्यवाद

      Delete
  5. खूप छान लेख., सर्व गृहुणीचा आत्मविश्वास वाढवणारा लेख.असेच लिखाण चालू ठेव.

    ReplyDelete
  6. खूप छान. असच लिहित रहा.

    ReplyDelete
  7. अगदी खरं आणि मनातलं लिहीलं आहेस.गृहीत धरली जाते ती गृहिणी

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना...किती बरोबर मॅडम..गृहीत धरली जाते ती गृहिणी...

      Delete

Post a Comment