परीक्षां आली रे.....
हे बघ, पेपरला काय छान लेख आलाय...दहावीच्या वेळी घरात
कसं वातावरण असावं ते आलंय...आईवडीलांनी काय काळजी घ्यावी...मुलांनी अभ्यास कसा
करावा...मुलांना खाऊपिऊ काय घालावं...सगळं आहे त्यात, मी वाचला लेख, तूही वाच...
माझ्यापुढे पेपरमधील लेख देत नवरा हसत म्हणाला...पेपरमध्ये दहावी आणि
बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा लेख आला होता..आमचा मुलगा दहावीला
आहे...त्यामुळे दहावी प्रकरणाची
दहशत काय आहे याचा अनुभव आम्हाला येतोय...गेले वर्षभर, काय यंदा दहावी ना...बापरे
दहावी का...अशा स्वरुपाचे डायलॉग आम्ही ऐकत आहोत.
आता तर परीक्षा
अवघ्या काही दिवसावर आली आहे. त्यामुळे
अशा संवादाला जोर आलाय...मुळात पहिल्यापासून दहावी प्रकरणाचं मी फार मनावर घेतलं नाही(मुलाने
तर नाहीच नाही)...तो यंदा दहावीला आहे कारण तो गेल्यावर्षी नववीला होता...आणि
त्याच्या मागच्या वर्षी आठवीला...तेव्हाही परीक्षा झाली...शाळेची पायरी चढल्यावर प्रत्येक
वर्षी होते तशीच...आताही तशीच आहे...दरवर्षी शाळेची परीक्षा होते..अगदी बालवाडी
असो की मॉन्ट वन वगैरे इंग्रजी रुप असो...परीक्षा ही होतेच...या प्रत्येक वर्षात
आम्ही पालकांनी त्याच्या अभ्यासाला वेळ दिला...त्याला स्वतःला अभ्यास करायची सवय
लावली. शिवाय शाळा उत्तम आहे. शिक्षक चांगले आहेत...ते आपले काम चोख
करतात. मग आपण घरी फक्त थोडा सराव करायचा,
तोही नेमाने...असा आमचा नेहमीचा पायंडा...त्यामुळे अभ्यास पहिलीचा असो किंवा आता
दहावीचा, अभ्यासाचा बागुलबुआ कधी वाटलाच नाही.
आताही रात्री-अपरात्री जागरण नाही...की भल्या पहाटेची साधना नाही...फक्त
नियमाने वाचायचे, शाळेने दिलेली पुस्तके आणि शिक्षकांच्या सूचनांचे पालन करायचे,
असा माझ्या मुलाचा नियम...त्याने स्वतःचा, स्वतःला घातलेला....त्यामुळे रात्री
झोपतांना अभ्यासाच्या पुस्तकाऐवजी एखादे अवांतर विषयाचे पुस्तक किंवा एखाद्या ई-मॅगझिनचा
लेख वाचण्यात चिरंजीव मग्न असतो आणि त्याला आता बस कर, झोपूया....हे सांगायची वेळ
येते.

हे सर्व मी, माझं किंवा माझ्या मुलाचा मोठेपणा, हुशारी सांगावी म्हणून सांगत नाही. पण काही जणांची अभ्यास पद्धती पाहिली की काळजी नक्की वाटते. परीक्षा किंवा दहावी, बारावीचं वर्ष असलं की अभ्यास भरपूर केला पाहीजे, बाकीच्या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्यावा....वगैरे प्रकार मला त्या दोन मिनिटात होणा-या नूडल्स सारख्या वाटतात...त्या नूडल्सनी पोट तर भरतं...पण त्याचबरोबर नको ते खायची सवय जिभेला लागते...शिवाय दोन मिनिटाच्या लालसेने परिश्रमाची सवयही मोडली जाते, याकडेही लक्ष दिले पाहिजे...त्यातून पोटाला पौष्टीक खाद्य मिळत नाही...पण पोटावर वाईट परिणाम होतात. मला परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागणारे या दोन मिनीट नूडल्सच्या गटातले वाटतात. वर्षभर मजा करायची...शाळेला दांड्या मारायच्या...अलिकडे तर शिक्षक काही शिकवत नाहीत, असं सांगून पालकच मुलांना दांडी मारायला लावतात. मग यात काही अभ्यासाचे राहीले तर तो दोष शिक्षकांचाच...मग क्लासचा सोस...शिवाय सगळे सण जोरदार साजरे करायचे....सर्व समारंभ...वर्षाकाठच्या पिकनीक...पावसाळा, उन्हाळा, हिवाळा गेटटूगेदर...राहिलेच तर नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या वाढदिवसाच्या पार्ट्या...शनिवार, रविवार मॉलला गेलं नाहीतर स्टेटस् कमी होईल असं काहीबाही...या सर्वात वेळ राहीला तर अभ्यास...असा प्रकार मी अनेक कुटुंबात पाहिला आहे. ही मंडळी परीक्षा आली की जागी होतात...दोन मिनिटात नूडल्स करतांना जसं पाणी उकळत ठेवतांना आणि ते पाकीट फो़डतांना जी धडपड होते तसंच...मुलांना रात्री जागवायचं...शिवाय सकाळीही लवकर उठवायचं..त्यांचा रट्टा मार अभ्यास सुरु होतो...टीव्ही बंद...नू़डल्स हा प्रकार कधीही पौष्टीक या लेबलखाली येतच नाही. तरीही काहीजण त्यात गाजर, ब्रोकोली, मटार,काजू, मशरुम अश्या भाज्या टाकून आम्ही पौष्टीक नूडल्स खातो....हे जसं अभिमानाने सांगतात..तसाच अभ्यासाच्या बाबतीतही प्रकार होतो. मुलांना प्रसंगी दोन चार रट्टे मारले जातात...आणि चांगला झोडलाय...आता होईल अभ्यास असे समाधान व्यक्त होतांना दिसते. मग एकदाची परीक्षा होते. पुन्हा अभ्यासाचा थकवा जाण्यासाठी पार्टी... परीक्षेचा निकाल लागला की पुन्हा पार्टी...मग आपली पुस्तक दुकानदाराला अर्ध्या किंमतीत विकायची किंवा एखाद्याला देऊन टाकायची....नवीन पुस्तकांना कव्हर घालून छान स्टीकर लावायचा...मग काय, येरे माझ्या मागल्या...सध्या आपली अभ्यासपद्धती अशी झाली आहे. फक्त वेळेपुरता अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आपल्या आसपास असतात. अशा महिन्या दोन महिन्याच्या अभ्यासाने आपण काय साधतो...खरतर ही त्या मुलांची चूक नसतेच...पालकांनी प्रथम चोख रहायला हवं, असं मला तरी वाटत. वरदचा अभ्यास आणि परीक्षांचा व्याप वाढला तेव्हा मी प्रकर्षाने काही समारंभ टाळले, सण साजरे केले पण मर्यादित..या गोष्टींचे काहीजणांनी कौतुक केले आणि ब-याच जणांनी नावं ठेवली...आपल्याकडचा नावाजलेला डायलॉग माझ्याही वाट्याला आला...आमच्या मुलांनीही परीक्षां दिल्यात...शिवाय मुलावर नाहक अभ्यासाचे प्रेशर टाकल्याचा कधी ओरडाही, अर्थात नाहकच खावा लागला. मंडळी, अशावेळी दोन कानांचे महत्त्व आणि उपयोग मला समजले...एकाने ऐकायचे आणि दुस-याने सोडून द्यायचे...हे माझे धोरण होते. कोणाला काय वाटते यापेक्षा माझ्या मुलाचा आनंद कशात आहे, याला मी प्राधान्य दिले.
वरवर केलेला अभ्यास खरोखर पुरेसा असतो असे
आपल्याला वाटते का...दरवर्षीची पुस्तक फक्त त्याच वर्षासाठी उपयोगी पडतात
का...पुढच्या वर्षी मुलांना ती संदर्भासाठीही लागू नयेत...सध्याची अभ्यासपद्धती,
पुस्तके, वेगवेगळे बोर्ड....आदी बाबत बोलायला मी तेवढी तज्ञ नाही. पण आपल्या सभोवताली घडत असलेले बदल नक्की
त्रासदायक वाटतात. आपल्या पूर्वजांनी
गुरुकूल पद्धती रुजवली. ही पद्धती किती
फायदेशीर होती याचा प्रत्यय आता येतो.
मुलं एकदा गुरुजींच्या ताब्यात गेली की ती वर्षभर त्यांच्या आश्रमात
रहात. वर्षातून एकदा ही मुलं घरी येत.
बाकी सण-समारंभ-अभ्यास-खेळ सर्व नियमात आणि नित्याने...काळाच्या ओघात ही गुरुकूल
पद्धती पुसली गेली. आज पालकांनी मुळात
आपली लाईफस्टाईल बदलली...त्यात मुलं ओढली गेली.
सोमवार ते शुक्रवार दिवस-रात्र पालक कामावर. मग शनिवार-रविवार थकवा घालवण्यासाठी बाहेर
फेरफटका, हॉटेलिंग...यात मुलांचीही ओढाताण.
वास्तविक शाळा कुठलीही असो, तिथे चांगले शिकवले जाते. फक्त जे शिकवले जाते ते घरी किमान एकदा तरी
वाचले पाहिजे. असे जर नेमाने केले तर परीक्षांचे
ओझे वाटणार नाही. प्रेशर, टेन्शन,
बर्डन...आदी शब्दांच्या ओझ्याखालीही मुलं दबणार नाहीत. या सर्वात त्या विद्यार्थ्याला
त्याच्या पालकांनी साथही द्यायला हवी. शेवटी
मंडळी झटपट नू़डल्स पेक्षा आपलं भाजणीचं थालीपीठ खमंग आणि अधिक स्वादिष्ट
असतं. अर्थात तुम्ही भाजणी किती खमंग करता
आणि किती ते खुसखुशीत भाजता यावर त्याचा स्वाद ठरतो, नाही का...
सई बने
डोंबिवली
----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
कृपया आपला अभिप्राय खाली नोंदवावा
सई बनेचा छान आणि सुचसुटीत लेख.
ReplyDeleteफक्त वाचू नका पण त्यातील मुद्यांवर विचार पण करा.
सर, धन्यवाद..
Deleteअतिशय छान पैकी पालक आणि विध्यार्थी यातील सूमध्य साधक विचार प्रवाह वर्णिलेला आहे
ReplyDeleteव्वा..छान प्रतिक्रीया...धन्यवाद...
Deleteअप्रतिम तुझी लेखणी तर अजूनही धारदार असल्याचेच हे प्रतीक.असेच उद्बोधनात्मक लिखाण अपेक्षित.best luck
ReplyDeleteधन्यवाद
Deleteलेख अभ्यासपूर्ण तर आहेच पण त्यातील ' अनुभवाचे बोल ' पालकांसाठी मोलाचे , त्यांच्या मनावरचा ताण घालवणारे आहेत.
ReplyDeleteछान ! अभिनंदन सई !
धन्यवाद भारती मॅडम...तुमचे पाठबळ महत्त्वाचे आहे
DeleteAajche palak kahi sagla vel detat mangutisach bastat tar kahi je hoil te hovo ase nuddle sarkhe aso all d best
ReplyDeleteधन्यवाद
Deleteलेख छानच आहे,यात विद्यार्थी व पालक यांची विचार प्रणाली विषद केली आहे.विशेष म्हणजे हे खरंच अनुभवाचे सुरेख बोल आहेत.
ReplyDeleteसुरेख वास्तव मांडणी ,सचित्र दिशा दर्शक लेख
Deleteधन्यवाद
Deleteमुलांपेक्षा पालकांना विचार करायला लावणारा छान लेख.
ReplyDeleteधन्यवाद मॅडम..
DeleteTenstion free
ReplyDeleteधन्यवाद
Deletevery nice खूप छान अनुभवसिद्ध शिक्षणप्रणाली आहे👍
ReplyDeletevery nice खूप छान अनुभवसिद्ध शिक्षणप्रणाली आहे👍
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम अनुभवी लिखाण.
ReplyDeleteधन्यवाद प्रशांतजी..
Deleteविद्यार्थी आणि पालकांनी असा उपक्रम राबविला तर किती छान होईल.
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete