माझी....
दोन-चार दिवसांपूर्वी
नेहमीच्या खरेदीसाठी बाहेर पडले आणि समोर मीरा भेटली...मी तिच्याकडे बघत
बसले...पुन्हा तिची तीच झालेली दिसली....गेल्या काही वर्षापासून मीरा आणि माझी ओळख
आहे. नेहमी घाईत असलेली. केसाचा कसातरी अंबाडा...साधी रहाणी असलेली मीरा....मात्र
दोन महिन्यापूर्वी तिचा कायापालट झाला होता....पण आता तिच्यातून तीच पूर्वीची मीरा
डोकावत होती....मी थोड्या नाराजीनेच तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला.....
तसं पाहिलं तर मीरा माझी शालेय मैत्रीण...शालेय म्हणजे माझ्या लेकाची
आणि तिच्या लेकाची शाळा एकच...त्यामुळे नेहमी शाळेच्या बसस्टॉपवर आम्ही
भेटायचो. माझी दहावी झाली. म्हणजेच लेकाची...त्यामुळे आता आमची भेट कमी झाली. साधारण एप्रिल महिन्यात तिची आणि माझी भेट
झाली होती. तेव्हा भलतंच इंप्रेस केलं
तिनं मला...नेहमी केसांचा अंबाडा आणि ऐसपैस ड्रेस घालून फिरणा-या मीराने तेव्हा
चक्क मेकओव्हर केला होता. केसांचा छानसा
कट. ड्रेसही छानसा होता. तिला बघताच मी डोळे मिचकवले....त्यावर ती
तेवढीच छानसी लाजली. मग कळलं, मीराची परदेशात
राहणारी चुलत बहिण तिच्याकडे काही दिवसासाठी रहायला आली होती.
या दोघी म्हणे एकत्र वाढल्या. अगदी शिक्षणही एकत्र झालेलं. गावी कॉलेज नव्हतं. त्यामुळे हॉस्टेलवर काही वर्ष होत्या. दोघींनी अभ्यास जसा भरपूर केला, तसंच कॉलेज
लाईफही चांगल एन्जॉय केलं. पुढे लग्न
झाल्यावर मीरा आणि तिच्या बहिणीची ताटातूट झाली.
मीरा मुंबईकडे आली आणि बहिणीचा
नवरा बदली होऊन अमेरिकेला गेला, त्यामुळे तिची बहिणही अमेरिकेत. आता तब्बल बारा वर्षानंतर ती एकटीच काही
कामासाठी भारतात आली. मीरा लग्नानंतर काही
वर्ष नोकरी करत होती. पण नंतर कुटुंबाच्या
दैनंदिन धावपळीत नोकरी त्रासदायक ठरली. मग
नोकरी सोडली. बहिण अमेरिकेत नोकरी करत
होती. तिथे मुलांना बेबीसिटींगमध्ये ठेऊन
तिने नोकरी केलीच शिवाय पुढचे शिक्षणही घेतले.
ही बहिण जेव्हा मीराला भेटली तेव्हा तिला बहिणाचा अवतारच भासला. कारण सतत कुटुंबाच्या मागे पळतांना मीराने
स्वतःला हरवले होते. या बहिणीने पहिलं काय
केलं असेल तर पार्लरमध्ये जाऊन तिचा हा छानसा कट केला...आणि तिच्यासाठी कपडे खरेदी
केले. बरं हे कपडे घेतांना नेहमीच्या साचातले
कपडे, रंगसंगती बाजूला सारले होते. मला
मीरा भेटली तेव्हा तिने असाच बहिणीने घेतलेला पंजाबी सूट घातला होता. कॉटनचा..पण थोडा मॉड लूक असलेला ड्रेस नेहमीपेक्षा
वेगळा होता. त्यामुळे माझेही लक्ष खेचून
घेत होता. एकूण काय मीराबाई खूप छान दिसत
होत्या.....आणि ते तिला समजत होतं बरं...त्यामुळे नकळत का होईना तिच्यात थोडा
रुबाब आला होता....तिचं कौतुक करत तिने हेअरकट केलेल्या पार्लरचा पत्ताही मी मागून
घेतला होता.
पण आज तिचा हा रुबाब...कुठेतरी हरवला
होता. अंबाडा नाही..कारण केस तेवढे वाढले
नव्हते...पण सर्व केस गुंडाळून मोठी क्लीप आली होती. मुलाला शाळेच्या बसमध्ये सोडून भाजी आणि
किराणासामान घ्यायचं होतं....त्यामुळे नेहमीप्रमाणे घाई...मी थोड्या नाराजीत तिला
विचारलं...केसांचं काय केलंस...मोकळे किती छान दिसत होते....मीराने हसण्याचा प्रयत्न
केला...जाऊदे, घाई आहे ग....पाहुणे येणार आहेत...म्हणून माझ्या तावडीतून पळ
काढला...मी तिला जाताना बघत होते....काहीतरी नक्कीच बिनसलं आहे...
लगेच दुस-या दिवशीही मीरा दिसली...पुन्हा
तशीच...पूर्वीसारखीच...पण आज थोडी हसली...पुढे येऊन तिच म्हणाली, ताई...पुन्हा
तशीच झाले ना मी...जाऊदे...केसांची स्टाईल बदलून किंवा कपडे बदलून थोडीच माणसं
बदलतात...मी आताही पूर्वीचीच मीरा आहे.
मीरा हे बोलली पण अगदी पाठ केल्यासारखं.
ती मुलाला आणायला आली होती. गाडीला
अजून वेळ होता. म्हणून मी पुन्हा
विचारलं...अगं तुला छान दिसत होता बदल...कधीतरी आपणही आपल्याला बदलून बघण्यात काय
जातंय....थोडं चेंज केलं की बरं वाटतं....शिवाय तुझ्या बहिणीनं किती हौशीनं केलं
होतं सगळं....मग ती गेल्यावर काय झालं....
मीरा माझ्या या प्रश्नावर शांत राहीली...मग
म्हणाली...मी केस कापल्यावर आधी सर्वांनी कौतुक केलं...पण सासूबाईंनी नाराजी
व्यक्त केली...या वयात मुलांकडे लक्ष द्यायचं की आपल्याकडे...आता कोणी केस कापतं
का...बरं त्या कापलेल्या आणि सेट केलेल्या केसांबरोबर त्यांचे शांपू आणि कंडिशनर
वेगळे आले...त्यांची किंमत पाहून नव-याने नाराजी व्यक्त केली. मग सुट्टीत लग्न...काही पाहुणे रहायले
आले...काहींनी बदल छान दिसतो म्हणून कौतुक केलं...तर काहींनी वयाचा तराजू
लावला...य़ा वयात नाही कापत केस म्हणे...शिवाय लग्नात अशा पिंजारलेल्या केसांपेक्षा
वेणी आणि गजराच छान दिसतो असं सर्वांचं मत पडलं....मग मी पण कंटाळले...पूर्वीसारखं
केसांना तेल चोपडून घट्ट बांधायला सुरुवात केली....आधी जमत नव्हतं...तेवढे केसही
नव्हते...पण आता वाढत आहेत...आणि ब-यापैकी बसतात....ही कहाणी सांगून मीरा गुमान
गाडीतून उतरलेल्या मुलाला घेऊन निघून गेली...
मीराच्या या बोलण्यानी मी दोन वर्ष मागे गेले. दोन वर्षापूर्वी मी माझे चांगले कंबरेखाली
येणारे केस कापून छोटा कट केला. खरं तर
केस लांब होते. पण त्यांची नीगा राखता येत
नव्हती. ब-याचवेळा सकाळी घट्ट वेणी घालून
तेवढाच घट्ट आंबाडा घातला की तो दिवसभर पुरायचा.
बाहेर जायच्यावेळीही खूप घाई व्हयची...केसांना ओरबडूनच मी विंचरायचे...मग
व्हायचं तेच झालं...केस गळू लागले. अगदी
खालचे केसतर शेपटासारखे बारीक झाले होते.
फक्त नावाला लांब होते...एकदा मॉलमध्ये गेले असतांना लेक आणि नवरा
कसल्यातरी शोला जाऊन बसले. मला तो शो बघायचा नव्हता...मग मी पुस्तक कॉर्नर आणि
स्वयपांकघरातील नवीन प्रकारची भांडी मिळतात, त्या दुकानात फेरफटका मारत होते. तितक्यात समोर पार्लर दिसलं...सहज डोकावले तर
गर्दीही कमी होती...म्हणून मनाचा हिय्या करुन केस कापायला त्या खुर्चीवर बसले...
हेअरड्रेसर मुलांनेही केस कापायचे ना...असं दोनवेळा विचारलं...मी बिंधास्त हो
सांगितलं....कोणता कट..मला कुठं माहित होतं...म्हटलं नवा लूक हवा आहे...मग त्या
मुलाने तासाभरात कायकाय केलं ते त्यालाच ठाऊक...पण जेव्हा मी आरशात बघितला तेव्हा
मीच मला डोळे मिचकवले...एव्हाना लेक आणि नवराही मोकळा झाला..
.मी नेहमीच्या स्टॉपवर
दिसले नाही म्हणून फोन करत होते. मी नव-याला पार्लरमध्ये पैसे द्यायला बोलावलं...खरं
सांगू आताही दोन वर्षापूर्वीची लेकाची आणि नव-याची प्रतिक्रीया आठवते...लेक, ओ आई
किती छान दिसतेस म्हणत मला बिलगला...तर नव-याने कुठलीही नाराजी व्यक्त न करता बील
चुकतं केलंच, शिवाय चला तुझा तास चांगला मार्गी लागला....अशी मोकळी प्रतिक्रीया
दिली...आणि मी मनाच्या अस्वस्थपणापासून मुक्त झाले. माझ्या नवीन लूकचे खूप जणांनी स्वागत केले. काहींनी नकोसे सल्ले दिले...चांगले केस
कापले, काही कळत नाही म्हणून बोलही
लावले...पण मी माझी सोय बघितली...माझा वेळ वाचला...केस आवरायला जो वेळ लागायचा त्याची बचत झाली...त्या वेळेचे मुल्य
माझे मलाच माहीत होते की...शिवाय केस छोटे झाल्याने त्यांची निगा राखायलाही सोप्पे
झाले....त्यामुळे त्यांचेही चोचले पुरवता येऊ लागलेत....
पण हे माझ्यापुरतं...मी मला आलेल्या सकारात्मक
प्रतिक्रीयांना धन्यवाद म्हटलं...ज्यांना आवडलं नाही, त्यांना समजवण्याच्या
भानगडीत पडले नाही...पण मीराचं तसं नव्हतं...आजूबाजुच्या मा-यात ती स्वतःला विसरली
होती...कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मीरानं केस कापले म्हणून तिला बोल लावणारे कधी
त्यांच्या निर्णयात मीराची ढवळाढवळ सहन करणार होते का...नक्कीच नाही...आणि नव्या
लूकमुळे तिने घराची जबाबदारी झटकली होती का...तर तेही नाही...मला तर यात मीराचीही
चूक दिसत होती....ठेवीले जैसे...तैसेची रहावे...असे तिने स्वतःला मोल्ड केले
होते. त्यात तिची ती हरवली होती. तिला वय या फॅक्टरच्या बाहेर काढायला हवे
होत. नक्कीच...ती माझी चांगली मैत्रीण
आहे. आणि पुढचे काही दिवस या चांगल्या
मैत्रिणीला मी बोलती करणार होते आणि तिला तिची ती सापडायला मदत करणार
होते....
सई बने
डोंबिवली
-----------------------------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
स्त्रीने स्वतःचा विचार कधी करायचा ? आयुष्यभर दुसऱ्यांची काळजी करीत जीवन जगायचं.आई,बाबा,भाऊ मग नवरा,मुलं, सासू,सासरे इतर नातेवाईक या साऱ्यांचे करण्यातच आयुष्य संपत येतं.तिला स्वतःच मन,अस्तित्व आहे की नाही ?...मला वाटतं स्त्रीने अशा वेळी दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करू नये.स्वतःसाठी कधीतरी नव्हे,नेहमीच जगावं.
ReplyDeleteलेख खूप छान आहे. वाचून आनंद झाला. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हेच बरोबर आहे.कोणी काही म्हणो आपण आपल्यासाठी जगायला हव.सौंदर्य ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. तिला जपायला हव.
ReplyDeleteप्रत्येकीने स्वत:ला शोधलच पाहिजे.स्वत:साठी वेळ दिलाच पाहिजे.हा विचार मनात रूजवणारा छान लेख!
ReplyDelete