तपासणी...शरीराची आणि मनाचीही....


तपासणी...शरीराची आणि मनाचीही....


पैशांची काळजी नको, सर्वात महागातलं पॅकेज असेल तरी चालेल, पण सर्व तपासण्या व्हायला
हव्यात...आणि हो, आजचा सगळा दिवस इथे गेला तरी चालेल, आम्हाला घाई नाही...गेल्या आठवड्यात वर्षभराच्या वैद्यकीय तपासणीसाठी मी नव-याबरोबर एका हॉस्पिटलमध्ये गेले होते.   तेव्हा शेजारी बसलेले एक काका फोनवरुन या सूचना कोणालातरी देत होते.  बरं ते अगदी माझ्या बाजुच्या सोफ्यावर बसलेले...पण मोबाईलवरुन बोलत असतांना एवढ्या जोरात बोलत होते, की त्या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकालाच त्यांच्या सूचना ऐकू येत होत्या....

माझ्या एका मित्राने वार्षिक वैद्यकीय तपासणीचे महत्त्व मला पटवून सांगितले.  त्यामुळे गेल्या काही वर्षापासून वर्षातला एक दिवस आरोग्याच्या नावाने जातो.  त्यातून नव-याच्या ऑफीसमधूनही असे चेकअप करण्याची सुविधा उपलब्ध आहे.  त्यामुळे जोडीने ही तपासणी होते.  त्यासाठीच गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील एक मोठं हॉस्पिटल सकाळी सात वाजता गाठलं.  त्यापासून सुरु झालेली तपासण्यांची लगबग अकरा वाजेपर्यंत मंदावली.  मग नंबर येत वाट पहात एका हॉलमध्ये तपासणीसाठी आलेले सर्वजण बसलेले होते.  प्रत्येकाच्या हातात मोबाईल.  त्यामुळे अनेकांच्या माना खाली.  अगदी ती रिसेपनिस्ट नाव दोनदा घेईपर्यंतही त्या मोबाईलच्या नादात गुंतलेले...माझ्यासारखे मोबाईल बाजुला असलेले अगदी बोटावर मोजण्यासारखे....त्यामुळे पेपर चाळत नंबरची वाट पहात मी बसले होते.  त्यातच  शेजारी बसलेल्या या वयस्कर जोडप्याने माझे लक्ष खेचून घेतले.
साधारण साठी ओलांडलेलं जोडपं होतं.  दोघेही छान म्हणजे अगदी टीप-टॉप म्हणावे असेच होते.  त्यांच्या बोलण्यावरुन आणि राहणीमानावरुन तरी प्रसन्न वाटत होते.  ते फोनवरुन बोलत असतांना मी त्यांच्याकडे बघितलं हे त्यांनी बरोबर मार्क केलं.  फोन झाल्यावर म्हणाले, पूर्ण शराराचं चेकअप आहे.  सर्वात महागातलं पॅकेज घेतलंय.  कुठल्या तपासण्या झाल्या, आम्हाला कसं वाटतंय, यासाठी हॉस्पिटलवाल्यांचेच फोन येत आहेत.  त्यांच्याबरोबरच बोलत होतो.   त्या काकांच्या कुठल्यातरी तपासणीसाठी एक तासाचा अवधी होता, आणि मी जिथे तपासणीसाठी जाणार होते तीथे कुणी अपघातग्रस्त रुग्ण आला होता.  त्यामुळे मलाही किमान अर्धा तास तरी थांबावं लागणार होतं.  तोपर्यंत काकांनी आधी माझी चौकशी करुन घेतली.  फारकाय मी कितीचं पॅकेज घेतलं आहे हेही विचारलं....मग पुन्हा आपल्या पॅकेजची माहिती सांगितली...बरं ही माहिती  मी न विचारता त्यांनी सांगितली,  आणि तीही ठसक्यातच...कारण त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये असलेलं सर्वात महागडं पॅकेज आपल्यासाठी आणि आपल्या पत्नीसाठी घेतलं होतं.  या पॅकेजची माहिती आणि महती ज्यां कर्मचा-यानं त्यांना सांगितली होती त्या कर्मचा-याला ते कुठलीही तपासणी झाली की लगेच फोन करुन त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कसा अनुभव आला हे सांगत होते.
त्यांची दोन्ही मुलं परदेशात.  महिन्याला दोन्ही मुलं आई वडीलांच्या अकाऊंटमध्ये पैसे टान्सफर करत होती.  शिवाय काकांनाही पेन्शन.  वर्षातून हे जोडपं वैद्यकीय तपासणी, एखाद्या पॅकेज टूरबरोबर पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी अशा कार्यक्रमात रमलेले आहेत.  त्यांनी आपला सर्वच देश पाहिला असल्याचं अभिमानानं सांगितलं.  त्यांची मुलं वर्षातून एकदा येतात.  नवी मुंबईमध्येच त्यांचा तीन बेडरुमचा फ्लॅट, शिवाय चारचाकी गाडीही आहे.  ही सर्व माहिती अभिमानाने सांगत असतांना नेमकं मी त्यांना मध्येच थांबत विचारलं,  आता कशाला वैद्यकीय तपासणी करत आहात, मुलं आली की करायची. मग त्यांचीही सोबत होईल ना...बस्स मी हे वाक्य काय बोलले...काका आणि काकूंचा मुडच गेला.  जणू मी त्यांच्यावर मोठा बॉम्बच टाकला.  ते चक्क रागावले.  मुलं आल्यावर कशाला...आम्हाला काही करता येत नाही का...मी लगेच सफाई देऊ लागले....म्हणजे मुलं असली की त्यांनाही कळेल ना आई-बाबांची कशी काळजी घ्यायला हवी ते म्हणून...नाही त्या काकांचा मुड गेला तो गेलाच....आमची मुलं आम्हाला वेळच्यावेळी पैसे पाठवतात आणि सर्व महागातलं करा असं हक्काने सांगतात.  आता काही दिवसांपूर्वी आम्ही दोघांनी नवीन चष्मे करुन घेतले.  तेव्हा त्या दुकानदाराला चांगली महागातली ब्रॅन्डेड फ्रेमच दाखवायला सांगितली...ही बघा...एवढ्या हजाराची आहे.  मला हसावं की रडावं हे कळेचऩा...मी त्यांना दुखवण्यासाठी बोलले नव्हते.  मुलं सोबत असली की मानसिक आधार वाटतो, एवढाच हेतू माझ्या बोलण्यामागे होता.  त्यांना काही सांगायला जाणार इतक्यात माझा नंबर आला.  तिथे तपासणी झाल्यावर पुन्हा वेटींग हॉलमध्ये जाऊन बसले. 
आता काकूंच्या बाजुची जागा खाली होती.  त्यांच्या हातात पेपर होता.  पण फक्त पानं पलटण्यापेक्षा दुसरं काही त्या करत नव्हत्या...मी मात्र आता यांच्याबरोबर जरा लांबच राहू हा विचार करुन पेपर वाचायला घेतला.  पण यावेळी काकू स्वतःहून बोलायला आल्या...कुठून आलात...मुलं किती...काय करता....अशा चौकश्या सुरु झाल्या.  मी जेवढ्याच तेवढं उत्तर देत होते.  कारण काकूंनी पुन्हा गाडी त्यांच्या मुलांवर आणली होती.  त्यांच्या मुलांनी त्यांना परदेशात कायमचे बोलावले आहे.  दोन्ही सुनाही चांगल्या आहेत.  नातवंडंही आहेत.  पण ती तिथल्या शाळेत रमली असल्याने आता इथे येणं होणार नाही.  डिसेंबर महिन्यात हे काका-काकू जाणार आहे, मुलांना भेटायला.  साधारण तीन महिन्याचा कार्यक्रम आहे.  ही माहिती देता-देता काकू सहज बोलल्या आमचा तीन बेडरुमचा फ्लॅट आहे.  पण तसा पाहिला तर रिकामाच असतो.  कंटाळा आला की बाहेर पडतो.  आज इथे या चाचण्यांसाठी दिवसभर राहणार.  इथेच जेवणार...संध्याकाळी उशीरा घरी जाणार....इथे आजूबाजुला माणसं आहेत, जरा बरं वाटतं ग...
काकूंच्या मनातली सल बाहेर आली.   पैसे कितीही असले तरी आपल्या माणसांची सोबत जास्त सुखावणारी असते.  काकूंच्या या वाक्यावर काका थोडंसच हसले.  मला जाणवलं,  मगाशी ते थोडं ओरडून बोलत होते,  माझ्याबरोबर स्वतःहून बोलायला आले कारण त्यांना कुणाबरोबर तरी बोलायचे होतं.  पुढे मी जेव्हा त्या्ंच्या मुलांबद्दल विचारले, तेव्हा नकळत त्यांची दुखरी नस दाबली गेली होती.  वाईट वाटलं...पण त्यांना ते दाखवायचे नव्हतं.  आमचं मुलांवाचून काहीही अडत नाही, हे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते.  त्यादिवशी त्यांनी दिवसभराचं पॅकेज घेतलं होतं.  पूर्ण शरीराचं चेकअप होणार होतं...मुलं रात्री ठरलेल्या वेळात फोन करणार होती...त्यांना दिवसभराचं सांगायचं....पैसे लागले तर सांगा, पाठवतो...हे त्यांचे बहुधा उत्तर असणार...पण आता या काका-काकूंना पैसे नको होते.  शरीराच्या चेकअपपेक्षा मनाचं चेकअप करता आलं असतं तर किती बरं झालं असतं, नकळत माझ्या मनात हा विचार आला...अर्ध्या तासात मी मोकळी झाले.  निघतांना मी त्या दोघांचाही निरोप घेतला.  त्यांची आता टेस्ट झाली की दुपारचे जेवण आणि मग स्पेशलिस्ट बरोबर अपॉईंटमेंट असं शे़ड्युल होतं.  मी काळजी घ्या म्हणतं तिथून बाहेर पडले....
हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ओपीडी चालू होती.   गर्दी होती.  डॉक्टरांना भेटून आलेली बाप मुलाची जोडी माझ्या पुढेच उतरत होती.   बाबा बहुधा गावावरुन आला होता.  काय महाग आहे, गावाकडे अख्या गावाचा इलाज होईल एवढ्या पैश्यात...असं काही तरी तो मुलाला सांगत होता.  पुढे रिक्षासाठी आम्ही एकत्रच उभे होतो.  मुलगा बाबाला कोप-यातल्या टपरीवर चहा पिऊ म्हणून सांगत होता.  बाबा तयार नव्हता...घरी जाऊ आणि जेऊ म्हणत तो बाबा ठाम नकार देत होता.  मी रिक्षात बसले, माझ्या मागच्या रिक्षात ही जोडी बसली....रिक्षातही त्या दोघांचा असाच संवाद चालू होता.  
त्यादिवशी माझी वैद्यकीय तपासणी झाली.  शिवाय दोन टोकाचे अनुभव घेता आले.  पहिल्यात त्या काकांकडे पैशाला तोटा नव्हता....फक्त माणसांचा होता.  जिन्यावर क्षणभरासाठी दिसलेला तो गावचा बाबा त्याहुन वेगळा.  आपल्या तपासणीच्या खर्चात गावचा विचार कराणारा...शिवाय मुलावर आणखी खर्चाचा भार नको म्हणून चहालाही नकार देणारा....दोघेही तसे पाहिले तर श्रीमंतच होते.  फक्त प्रत्येकाची श्रीमंतींची व्याख्या वेगळी होती....



सई बने
डोंबिवली

----------------------------------------------------------------------
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा


Comments

  1. आदरणीय सईजी नमस्कार
    मानवी मन हे कायम संसारातच जोडले गेलेले आसते एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब यात् महत्वाचे म्हणजे आपले आप्त आपली किती काळजी घेतात हे तितकेच महत्वाचे आहे जितके आप्त सोबत किती आहे
    कितीही पैसे असले फ्लैट 3 बेड चा असो की4 बेड चा सोबत चारचाकी आसो ह्याला एका ठराविक वयोमर्यादे पर्यंतच किंमत असते त्या नंतर गरज भासते ती आप्त स्वकीयांची हे निर्विवाद सत्य आहे
    अपन अतिशय सुंदर लिखाण केलय त्यात एकाच नान्याच्या दोन बाजू समर्पक मांडल्या आहेत
    धन्यवाद
    नित्तिन पाटिल(अण्णा)

    ReplyDelete
  2. Nice article.this situation is most of parents facing in India.

    ReplyDelete

Post a Comment